Homeराजकारणशरद पवार हे ‘किंग मेकर्सच’

शरद पवार हे ‘किंग मेकर्सच’

राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग: पवारांच्या सारीपाटावरील सोंगट्यांचा खेळ:समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस

पत्र परिषदेतील शरद पवार यांच्या देहबोलीतून महाराष्ट्रातील चाणाक्ष प्रेक्षकांनाही उलगडला सहज बंडामागील अर्थ

‘बंडखोर’अजित पवारांविषयी पवार यांची अतिशय नरमाईची भाषा!महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही

मोदी यांचे भोपाळमधील भ्रष्टाचारविषयीचे विधान अन्… राज्यात मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचेच नेते!

राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग केंद्रीय तपास यंत्रणांचीच महिमा मात्र शिंदेंचं काय?चर्चेला ऊत

अजित पवार तिस-यांदा उपमुख्यमंत्री पदी!:मोदींची ईच्छा झाली पूर्ण

२०१९ मध्ये चाणाक्ष फडणवीसांपेक्षा नवखे उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांना सत्ता वाटली सोपी:अडीच वर्ष सत्तेची रसाळ फळेही चाखली

सुप्रिया सुळे यांचे ‘पार्टी Spilt’चे ट्टीट यावेळी का नाही?

राज ठाकरे यांचेही सूचक ट्टीट

जाहीरातीने डाव बिघडवला का?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२ जुलै २०२३: पहाटेच्या शपथविधी आधी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक,सर्व बाबी ठरल्या.भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी पक्षाच्या सरकार स्थापनेला शरद पवार यांचा होकार ही मिळाला पण,दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासोबत वाटाघाटी झाल्यानंतर पवार यांनी माघार घेतली.त्यांनी डबलगेम केला.त्यानंतर अजित पवार यांनीही शपथविधीनंतर भूमिका बदलली.शरद पवार हे ‘किंग मेकर‘नव्हे तर ‘टिम ब्रेकर’असून सरकारे पाडण्यात ते माहीर असल्याची घणाघाती टिका नुकतीच २९ जून रोजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली होती.आज रविवार दिनांक २ जुलै रोजी राष्ट्रवादीचे जवळपास ४० आमदार फूटून राजभवनात पोहोचले व त्यातील ९ जणांनी मंत्री पदाची शपथ ही घेतली,या सर्व घडामोेडी शरद पवार यांच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाही अश्‍या लाखो प्रतिक्रिया समाज माध्यमांवर अक्षरश:कोसळल्या असून शरद पवार हे ‘टिम ब्रेकर’नसून ‘किंग मेकर’च असल्याचे नेटकरी यांचे ठाम मत आहे.

ही सर्व पूर्वनियोजित स्क्रीप्ट असून महाराष्ट्राच्या सुजाण जनतेला मूर्ख समजण्याचा खेळ सुरु असल्याचा संताप आज समाज माध्यमांवर चांगलाच व्यक्त झाला. २०१९ च्या मतमोजणीनंतर सत्तालोलूपतेचा हा खेळ सुरु झाला असल्याची खरमरीत टिका ही या पार्श्वभूमीवर उमटली.अजित पवार यांची पक्षातील बंडखोरी ही निव्वळ धुळफेक असून,सक्तवसूली संचनालयाच्या(ईडी)च्या कारवाईपासून मुक्त होण्यासाठीच असल्याची सत्यता नाकारली जाऊ शकत नाही.विशेषत: छगन भुजबळ व प्रफूल्ल पटेल हे निष्ठावंत शिलेदार शरद पवारांच्या विरोधात बंडखोरी करतील यावर महाराष्ट्रातील शेंबडे पोर ही विश्‍वास ठेवणार नाही.

मागील वर्षी २ जुलै रोजीची बंडखोरीतून महाविकासआघाडीची सत्ता उलथवून शिंदे-फडणवीसांची सत्ता स्थापनेची घटना, ही निश्‍चितच महाराष्ट्रातील जनतेला ‘धक्कादायक’ठरली होती.यंदा मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेत महाविकासआघाडीतून फूटून निघत,राष्ट्रवादीचे सत्तेत सहभागी होणे हे कोणालाही धक्कादायक वाटले नाही.

गेल्या काही दिवसांपासून याची संपूर्ण कल्पना महाराष्ट्राच्या जनतेला आलीच होती.अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन सोहळ्यातच त्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या जवाबदारीतून मुक्त करुन संघटनात्मक जवाबदारी सोपविण्याची मागणी उघडपणे केली होती.याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार जुलैमध्येच व अधिवशेनापूर्वीच होणार असल्याचा केलेला सूतोवाच बरेच काही अधोरेखित करणारा होता.

आज राजभवनावर शपथ घेणारे मंत्री व राष्ट्रवादीच्या आमदारांचा वावर,त्यांची सहजता ही ‘शरद पवार यांच्या आदेशाचे पालन’,हेच ठलकपणे अधोरेखित करणारी दिसून पडत होती.भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत २०१९ मध्ये झालेली चर्चा ही तर आमची राजकीय खेळी असल्याचे स्वत: शरद पवार यांनी फडणवीस यांच्या विधानानंतर केली होती.आजची राजकीय खेळी ,ही जनतेला मूर्ख समजून खेळण्या ऐवजी, उघडपणे राष्ट्रवादीचा सत्तेत सहभाग दाखविणारी असती तर जनतेने एकवेळ ते मान्य ही केले असते,अशी नाराजी आता समाज माध्यमात उमटलेली दिसून पडतेय.

पत्र परिषदेत शरद पवार यांची अनेक विधाने ही अजित पवार यांना पाठींबा दर्शविणारी होती.मी पुन्हा पाच आमदार घेऊन पक्षाची बांधणी करेन,त्यांचे हे विधान तर अनेकांच्या पचनी न पडणारेच होते.२८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे पाच वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण साेहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सुमारे ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचे विधान केले होते.यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील गैव्यवहार,सिंचन घोटाळा,बेकायदा खाणी घोटाळ्यांचा उल्लेख त्यांनी केला होता.ही यादी बरीच लांबलचक होईल असा इशारा ही त्यांनी दिला होता.याच वेळी मोदी यांनी ‘तुम्हाला सुप्रिया सुळेचे भले करायचे असल्यास राष्ट्रवादीला मत द्या’अश्‍या शब्दात घराणेशाहीवर टिका केली होती.

मोदी यांच्या या इशारानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांच्या मागे हसन मुश्रीफ,अनिल देशमुख सारखेच ईडीचा ससेमिरा लागण्याच्या भीतीतून भाजपला विरोध करण्यापेक्षा सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय झाला असल्याचे मत बुद्धीजीवी व्यक्त करीत आहेत.प्रफूल्ल पटेलांची तर वर्णी केंद्रात मंत्रीपदी लागणार असल्याची देखील चर्चा आहे.

शपथ विधी नंतर अजित पवार यांना, त्यांच्या या कृतीसाठी राष्ट्रवादी पक्षातील कोणाचा पाठींबा आहे?असा प्रश्‍न पत्र परिषदेत केल्यानंतर त्यांनी ‘सगळ्यांचा’असे उत्तर दिले.सगळे म्हणजे पक्षाचे अध्यक्ष देखील का?या प्रश्‍नावर पुन्हा अजित पवार यांनी ‘सगळ्यांमध्ये सगळे आले’असे सूचक उत्तर दिले आणि पक्षाचा आम्हाला आर्शिवाद असल्याची पुश्‍ती ही जोडली…..!एवढंच नव्हे तर लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका या घड्याळ याच निवडणूक चिन्हावर लढणार असल्याचे रोखठोकपणे सांगून टाकले.

यानंतर शरद पवार यांनी पत्र परिषद घेऊन जी भूमिका मांडली ती अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन यांनाही अभिनयात मागे टाकणारी होती,असा सूर समाज माध्यमात उमटला नसता तर नवलच!पक्षाचे ५८ आमदार निवडून आले त्यातील आता ६ आमदारच पक्षात असून सगळे सोडून गेले असल्याचे शरद पवार यांनी अगदी हसतमुखाने माध्यमकर्मींसमोर कबूल केले.त्यांच्या चेह-यावर रोष,संताप,काळजीचा लवलेष ही नव्हता.हेच करायचे होते तर २०१९ मध्येच मग का फडणवीस यांच्यासह सत्तेत त्यांना सहभागी होता आलं नाही?हा प्रश्‍न मात्र एकाही माध्यमकर्मींनी त्यांना विचारण्याची तसदी घेतली नाही कारण अजित पवार यांच्या बंडाला यावेळी ही त्यांचा पाठींबा नाही,असाच सूर ते आवळत होते.

हा प्रकार मला नवीन नाही असे सांगून, पक्ष बांधणीसाठी उरलेल्या पाच लोकांना घेऊन मी पुन्हा महाराष्ट्राच्या लोकांमध्ये जाईल असे ते म्हणाले.मात्र,अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का?न्यायालयात जाणार का?या सर्व प्रश्‍नांना टाळ,लोकांमध्ये जाऊनच भूमिका मांडूचा सूर त्यांनी आवळला.९ जणांनी शपथ घेतली,जाण्यापूर्वी भेटून गेले,राजभवनावर गेल्यावर कळवतो असे म्हणाले व नंतर ते मंत्री झाल्याचेच कळले,शरद पवार यांच्या या विधानावर साक्षात ब्रम्हदेव तरी विश्‍वास ठेवणार का?पक्ष फूटला,घर तुटलं असं ही मला अजिबात वाटत नाही असे ही एका प्रश्‍नाच्या संदर्भात ते म्हणाले,याचा अर्थ पक्ष फूटलाच नसून बंडखोर आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याआधी रितसर शरद पवारांचा आर्शिवाद मिळवला होता,असाच होत नाही का?

मोदींच्या विधानानंतर पक्षातील आमदार अस्वस्थ होते,आम्ही त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला नाही,असे शरद पवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले तसेच आम्ही न्यायालयात जाणार नसून पक्ष म्हणून लोकांसमोरच जाऊ,असा पवित्रा त्यांनी घेतला.

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी शिवसेनेतून फूटून ४० आमदार सुरतला गेले तेव्हा उद्धव ठाकरे हे ज्याप्रकारे गलितगात्र व तितकेच भावूक झालेले महाराष्ट्राच्या जनतेने बघितले,आज शरद पवार यांच्याकडे बघून खरंच ते महाराष्ट्राच्या जनतेला मुर्ख समजतात याची खात्री पटत होती.१६ आमदारांच्या अपात्रतेविषयी बोलतानाही निवडणूका जाहीर होईपर्यंत विधान सभा अध्यक्षांकडून त्याचा निकाल लागणार नसल्याचे ठाम मत ही त्यांनी व्यक्त केले.

अजित पवारांविषयी नाराजी आहे का?या प्रश्‍नावर देखील ,कुणाबद्दलही नाराजी नसल्याचे आश्‍चर्यजनक मत व्यक्त केले.आजपासून मी पुढच्या कामाला लागलो,असे एवढ्या मोठ्या घडामोडीनंतर ते सहज बोलून गेलेत.नुकतेच १८ एप्रिल २०२३ रोजी अजित पवार यांनी आम्ही सगळे राष्ट्रवादीत असून,पक्षातच राहू.आम्ही सर्व शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहोत.राष्ट्रवादीत अनेक चढउतार आले.कामानिमित्त आमदारांची भेट घेतली.यातून दूसरा अर्थ काढू नका,मी राष्ट्रवादीतच आहे हे प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का?असे म्हणत मुंबईत एका पत्रकारावरच संतापले होते.संपर्कात असणारे राष्ट्रवादीचे ते चाळीस आमदार आज अजित पवारांसोबत राजभवनात उपस्थित होते.याचाच अर्थ अजित पवार हे अद्यापही राष्ट्रवादीतच असून शरद पवार यांचा संपूर्ण पाठींबा त्यांच्या शपथविधीला असल्याचा दावा केल्या जात आहे.

जयंत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेत, शरद पवार यांच्याच इतक्या प्रसन्नतेनी, शिंदे यांना टोला हाणत ,अजित पवार हे अर्थमंत्री असल्याने आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना विकास निधीच मिळत नसल्याचा आरोप करीत आघाडीतून बंडखोरी करुन शिंदे बाहेर पडले आता तेच सत्तेत पुन्हा आले, त्यामुळे शिंदेंना माघारी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिवसेनेत परत जाण्याची संधी लाभली असल्याची मिश्‍कली त्यांनी केली.

एकनाथ शिंदे यांनी १३ जून रोजी ’राष्ट्रामध्ये मोदी महाराष्ट्रात शिंदे’ही मोदी व त्यांची पानभर जाहीरात दोघांच्याच छायाचित्रासह सर्वच आघाडीच्या दैनिकात प्रसिद्ध केली होती.त्यानंतर ते फडणवीस यांना डावलत असल्याची आरोळी उठली होती,दुस-याच दिवशी शिंदे-फडणवीस यांचा चेहरा असल्याची व त्यांच्या कारभाराचे गुणगान करणारी पानभर जाहीरात पुन्हा नव्याने प्रसिद्ध झाली मात्र,दुधात मिठाचा खडा पडल्यानेच फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेतल्याचा कयास ही आता लावला जात आहे.

आजच्या घडामोडीनंतर मात्र भाजपचा मतदार हा चांगलाच नाराज झाल्याचे दिसून पडलेत.किमान विदर्भाचा मतदार निश्‍चितच राष्ट्रवादीच्या सहभागातून आनंदी दिसून पडला नाही.राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे हिंदू विवाह पद्धतीतील कन्यादान संस्कारावरील खोचक विधान हे अद्याप भाजपचे मतदार विसरले नाहीत.नागपूरातील एका सुप्रसिद्ध मंदिरातील पुजारी यांनी देखील भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्याची नाराजी उघडपणे व्यक्त केली.

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीत स्वत: मोदी यांनी अजित पवारांचा सत्तेत सहभाग असावा ही ईच्छा व्यक्त केली होती,अशी चर्चा आहे.अजित पवार हे आज ‘सत्ताधारी’ झाल्याने मोदी यांची ईच्छा पूर्ण झाली असल्याच्या प्रतिक्रियाही समाज माध्यमात चांगल्याच व्हायरल झाल्या.

.महत्वाचे म्हणजे पहाटेच्या शपथविधीनंतर लगेच सुप्रिया सुळे यांनी ट्टीटरवर ‘पार्टी Split’हे दोनच शब्द ट्टीट केले होते,याचा मोठा परिणाम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झाला होता.त्यावेळी अजित पवार एकटे भाजप गटात असलेले दिसून पडत होते,यावेळी तर राष्ट्रवादीचे ५० आमदार गेल्याचा दावा केला जात आहे, आज दिवसभरात मात्र सुळे यांचा एक ही ट्टीट का नाही? यावर देखील चांगलीच चर्चा झडली.

एकनाथ शिंदे माणूस म्हणून अतिशय भले असल्याच्या देखील प्रतिक्रिया चांगल्याच उमटल्या होत्या.गेल्या वर्षी त्यांनी केलेल्या बंडालाही हजाराे नेटक-यांनी योग्य ठरवले मात्र फडणवीस यांच्या अफलातून राजकारणाला मात्र नेटक-यांनी मनापासून दिलखुलास दाद दिल्याचे आढळून आले.आजच्या घडामोडीनंतर मिम्स आणि जोक्सनी तर संपूर्ण सोशल मिडीयाच व्यापून टाकला होता.

थोडक्यात २४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला.२८८ पैकी भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या.या निवडणूका युती म्हणून लढल्या गेल्या होत्या तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री होतील हे राज्यातील जनतेने देखील गृहीत धरले होते.मात्र,आपल्याशिवाय भाजप सत्तेत येऊ शकत नसल्याचे बघून, उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे ताणून धरले,यानंतर फडणवीस यांची शरद पवारांशी चर्चेनंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता, अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी झाला,यानंतर पुन्हा सत्तेच्या सारीपाटावरील सोंगट्या शरद पवारांनी ज्याप्रकारे हलवल्या.सोनिया गांधींचा हिरवा कंदील मिळताच चाणाक्ष फडणवीस यांच्या ऐवजी नवखे असणारे व प्रशासनाचा अनुभव नसणारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्तेत गेल्याने सत्तेची मलाई अधिक सहजतेने चाखायला मिळणार असल्याचा अंदाज येताच, कोलांटीउडी घेऊन अजित पवारांना ७२ तासात माघार घ्यायला लावणारे व त्यानंतर स्थापित महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळवून देणारे शरद पवार, हे आज झालेल्या बंडानंतर इतके सहज,इतके शांत कसे होते?

या प्रश्‍नांची उत्तरे या घडामोडीनंतर समाजमाध्यमांमध्येच फिरत असून,महाराष्ट्राच्या जनतेला या सर्व राजकारणाचा उबग आला असून,आपापली विचारधारा गुंडाळून सत्तेसाठी किवा ईडीच्या कारवाया टाळण्यासाठी एकत्रित आलेल्या चार ही प्रमुख पक्षांनी आमदारकींचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेचा कौल मागावा व निवडणूकांना सामोरे जाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

…………………………………………….

राज ठाकरे यांचे ट्टीट……

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .

उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.

ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?

 

…………………….

 

Latest बातम्या