उपसभापती यांनी केली विधिमंडळ व्यवस्थेची पाहणी
नागपूर,ता.२८ नोव्हेंबर २०२३: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आज विधान भवनात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली.यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.विधानभवनात पत्रकारांसाठी असणारी अपुरी पत्रकार दिर्घा तसेच विधान भवन परिसरातील माध्यमकर्मींसाठीची अत्यंत गैरसोयीची व्यवस्था याविषयी प्रश्न केला असता,विधान भवनाची जागा अपुरीच असल्याचे त्यांनी मान्य केले.पूर्वी फक्त प्रिंट मिडीयातील पत्रकार हे विधी मंडळाच्या कामकाजाचे वार्तांकन करीत असे त्यामुळे जागेचा प्रश्न उद् भवला नाही.आता मात्र वृत्त वाहीन्यांचे प्रतिनिधी तसेच डिजिटल माध्यमकर्मींमुळे ही संख्या ठरविता येत नसल्याचे त्या म्हणाल्या.डिजिटल माध्यमासाठी अद्याप कोणतेही दिशानिर्देश नसल्याने तुम्हीच तुमची आचार संहिता ठरवा असा सल्ला देत,मुंबईत देखील जागेचा प्रश्न उद् भवत असल्याने परिसरातच विधान सभा तसेच विधान परिषदेच्या वार्तांकनासाठी टीव्ही संच लावण्याची व्यवस्था केली जात असते असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना, या अधिवेशनामध्ये आरोग्य व्यवस्थेत नवे बदल करण्यात आले आहेत. या अधिवेशनाच्या कामकाजाचा व पूरक व्यवस्थेचा डोलारा ८ हजारांवर कर्मचारी विविध आघाड्यांवर सांभाळणार आहेत. त्यामुळे लोक प्रतिनिधींसोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेत यावर्षी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.. या अंतर्गत पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या तपासणीची सर्व सोय करण्यात आली आहे. १९२१ पासून विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले असून ही शतकोत्तर वाटचाल आहे. याचे औचित्य साधत यावर्षी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विधानभवनाची सुरक्षाव्यवस्था चोखबंद ठेवण्यासाठी यावर्षी दिवसाला केवळ १२ तासांची प्रवेशिका देण्यात येणार आहे. माध्यम प्रतिनिधींची वाढती संख्या लक्षातघेवून सभागृहाचे कामकाज लाईव्ह बघण्याची व्यवस्था गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येणार आहे. प्रवेशिकांशिवाय विधानभवन परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
जागो- जागी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह,मोबाईल टॅायलेट अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील पेट्रोल पंपावरील सर्व टॅायलेट याकाळात स्वेच्छेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मागील हिवाळी अधिवेशन कालावधी प्रमाणेच यावर्षी महिला लोकप्रतिनिधींसाठी बालसंगोपनाकरिता हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी यावर्षी पासून विधानभवन परिसरात असा हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.

विधान भवनात येणा-या आंगतुकांनाही येथील संत्रा ज्यूसचे फार आकर्षण असतं त्यामुळे दर दोन दिवसांनी याची गुणवत्ता तपासली जाईल तसेच भांडी किवा ग्लास धुण्याची अडचण बघता पेपर ग्लास वापरण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वच्छता गृहात चहापाण्याची भांडी धुण्याची मनाई करण्यात आली असून यासाठी आधीच वेगळी व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्या म्हणाल्या.मागील हिवाळी अधिवेशनात स्वच्छतागृहात चहाची भांडी धुण्याचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता,हे विशेष.
विधान सभेचे अध्यक्ष डॉ.राहूल नार्वेकर यांच्यासमोर सध्या शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी सुरु असून मी देखील पीठासीन अधिकारी असल्याने राजकीय प्रश्नांची उत्तरे देऊ शकणार नसल्याचे त्यांनी आधीच खुलासा केला.
आजच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांचा आढावा विधीमंडळाच्या काळात अर्धा तासांसाठी आढावा घेण्यात येईल तसेच अधिवेशन संपण्या पूर्वी करण्यात आलेल्या सूचनांबाबत आढावा घेण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली.
बंदोबसतावर असलेल्या पोलिसांच्या जेवणाचा प्रश्न दरवर्षी भेडसावतो,याविषयी विचारले असता,सुरवातीच्या दोन दिवस हा प्रश्न नक्कीच भेडसावतो कारण एकाच कंत्राटदारावर ही जवाबदारी सोपवली असते,यावेळी मी पोलिस आयुक्तांना जबाबदारीचे विकेंद्रीकरण करण्यास सांगितले असल्याचे उत्तर डॉ.नीलम गो-हे यांनी दिले.
विदर्भाविषयीचे प्रश्न जास्त प्रमाणात अधिवेशनात चर्चिले जावे,यासाठी तुम्ही पुढकार घेणार का?यावर बोलताना,विधी मंडळात विदर्भाचे नेतृत्वच असल्याने बरेच प्रश्न सुटले आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या.अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देण्याचे निर्णय हे मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले जातील.
विदर्भातील आमदार हे विदर्भाचे प्रश्न उचलून धरतात का?या विषयी बोलताना लक्षवेधी किवा स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विदर्भाचे आमदार खूप चांगले प्रश्न उपस्थित करतात व सरकार देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असते.यावेळी देखील लक्षवेधीच्या माध्यमातून खूप चांगले प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिली.विदर्भात मागील वीस वर्षात बरेच बदल झाले आहेत समृद्धी महामार्ग,राष्ट्रीयस्तराचे कँसर हॉस्पीटल,अनेक नामांकित विद्यापीठे विदर्भात आली.विदर्भाचे प्रश्न सगळेच सुटले असे नाही पण सगळच नकारात्मक घडले नाही,असे उत्तर त्यांनी दिले.

सध्या राज्यभर गाजत असलेला मराठा-कुणबी जात आरक्षणाच्या प्रश्नावर छेडले असता,हा विषय सभागृहात येणार यात शंकाच नाही मात्र,आज या विषयी मी काहीच जाहीर करु शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.या मुद्दावर सभागृहात चर्चा होऊन निश्चितच तोडगा निघेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील अधिवेशनात ‘खोके‘यासारखे काही असंसदीय शब्द उच्चारण्यात आले,यावेळी अश्या शब्दांवर काही बंदी आणनार का?असा प्रश्न केला असता,संसदीय शब्दांची यादी ही लोकसभेकडूनच प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र,त्यात अश्या काही शब्दांवर बंदी आहे जी आपल्या राज्यात सहज बोलले जात असते.यामुळे किती शब्द काढायचे?मतभेद होऊ शकतात मनभेद होता कामा नये,एकमेकांच्या मैत्र भावनेतून अधिवेशन पार पडायला हवे,असे उत्तर त्यांनी दिले.
वारंवार होणारा गदारोळ याविषयी छेडले असता,गदारोळ का होतो?तर विरोधकांना त्यांचा मुद्दा पुढे न्यायचा असतो तर सरकारला त्यांचा मुद्दा रेटायचा असतो.विरोधी पक्षाचे स्थगन स्वीकारले जात आहे की नाही यावर ही गदारोळ उठतो.याशिवाय मध्येच कोणती तरी ब्रेकिंग न्यूज येते.तो मुद्दा घेऊनही सभागृहात गदारोळ होतो.आता तर पाच ही राज्यांचा निवडणूक निकाल येणार आहे,त्यावरही गदारोळ होऊ शकतो,असे त्यांनी सांगितले.
८ डिसेंबरला विधान परिषदेच्या वार्ताहरांसोबत वार्तालापाचा कार्यक्रम
१९२१ साली विधान परिषद अस्तित्वात आली.यंदा ही विधान परिषदेचे शताब्दी वर्षानंतरची वाटचाल आहे. या पाश्नार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ वा.दरम्यान विधान परिषदेचे वार्तांकन करणा-या पत्रकारांसोबत मेळावा घेण्यात येईल.यात विधान सभेचे वार्तांकन करणारे पत्रकार देखील सहभागी होऊ शकतील.याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती राहील,अशी माहिती याप्रसंगी उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिली.
याप्रसंगी त्यांनी विधान सभा तसेच विधान परिषदेत जाऊन व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच संपूर्ण परिसर फिरुन कॅन्टिंग,परिसरात माध्यमकर्मींची व्यवस्था इत्यादीची पाहणी केली.
उपसभापतींची अधिका-यांसोबत पार पडली बैठक-
विधानभवनातील सभागृहात आज विधिमंडळ व्यवस्थेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले .यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या काही अडचणींचा उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेषलक्ष देण्याच्या सूचना केल्या.
विधिमंडळाचे सचिव विलास आठवले, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्यासह विविध २२ विभागांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
व्यवस्थेसंदर्भातील मॅाक ड्रिल ४ डिसेंबरला होणार आहे.फायर ऑडिटचा अंतिम अहवाल ५ डिसेंबर पर्यंत तयार करा, विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्थानिक नागरिकांना वाहतूक व्यवस्था व मोर्चाची अडचण व गैरसोय होवू नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भंडारा जिल्ह्यात घडलेल्या महिलांच्या अपमानकारक कृत्याची गंभीर दखल घेत आज रविभवन येथे
तातडीची बैठक बोलाविली व योग्य सूचना केल्या.

आमचे चॅनल subscribe करा