

विधानसभेत विरोधक सत्तापक्षावर ‘भारुडांचं गारुड’
डॉ.ममता खांडेकर
(senior Journalist)
नव्या सत्ताधाऱ्यांचं सरकार स्थापनेनंतर नागपूरातलं हे पहीलंच अधिवेशन. या हिवाळी अधिवशेनाचे वैशिष्ठ सांगायचे झाल्यास विधान सभेत रंगलेलं ‘भारुड’अर्थात याची सुरवात विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्तापक्षावर हल्लाबोल करता-करता अचानक फडणवीस यांनी ज्ञानदेव माऊलींच्या भारुडाचा कागद हातात घेऊन वाचायला सुरवात करताच सर्वात आधी तर त्यांच्या बॅक ऑफिसची तत्परता आणि कल्पकता जनतेला कळली. तिन पक्ष् मिळून सत्ताधारी झालेल्या सत्ताधाऱ्यांना ‘तीन’ची महिमा सांगणाऱ्या या भारुडात सगळंच काही आलं. जरी ज्ञानेश्वर माऊलींनी हे १६ व्या शतकातील सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात लिहंल असेल तरी ते आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात किती ‘चपखल’ बसतंय फडणवीस यांनी हे भारुड वाचून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
’काट्याच्या अणीवर वसली तीन गावें ।
दोन ओसाड एक वसेचिना ॥
वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।
दोन थोटे एका घडेचिना ॥
घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।
दोन कच्ची एक भाजेचिना ॥
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुग ।
दोन हिरवे एक शिजेचिना ॥
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।
दोन रुसले एक जेवेचिना ॥
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी ।
दोन वांझ्या एक फळेचिना ॥
फळेचिना तिला झाले तीन टोणगे ।
दोन मेले एक जगेचिना ॥
जगेचिना त्याचे आले तीन रुपये ।
दोन खोटे एक चालेचिना ॥
चालेचिना तिथे आले तीन पारखी ।
दोन आंधळे एका दिसेचिना ॥
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या ।
दोन हुकल्या एक लागेचिना ॥
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।
सद्गुरूवाचुनि कळेचिना ॥
आम्ही ’राजे’नाही झालो आम्ही जनतेचे ‘सेवकच‘राहीलो,सेवक म्हणूनच जनतेसमोर गेलो हा विनम्रतेचा भाव फडणवीस यांनी सभागृहात अधोरेखित करताना या ‘त्रिशंकू’सरकारची नवी व्याख्याही ‘तीन पक्ष् एकमेकांवर शंका घेणारे’ अशी अधोरेखित केली.
फडणवीस यांच्या भारुडाला तेवढेच दमदार उत्तर आज सभागृहात मुख्यमंत्री यांनी दिले. तीन चाकी सरकार असल्याचे मान्य करीत ही तीन चाकांची रिक्क्ष्ा गरीबांची असल्याचे ते म्हणाले.संतांनी सांगितलेला सार हा ग्रंथात नाही जिवनात असतो असा टोला ही हाणला. भुकेलेल्याला जेवण देणे, दु:खी,निराशांना जगण्याची हिंमत देणे, गरीब तरुणींचा विवाह करुन देणे, कष्टाशिवाय भाकर न मिळवणे, संताच्या या ओव्या मोठ्या करुन मंत्रालयात लावणार असल्याचा सूतोवाच त्यांनी केला.
चांगल्या् राज्यकर्त्यांनी काय करावं?गती कि प्रगती कि अधोगती या वादात पडणार नसून ’सुधीर..नका होऊ इतके अधीर..झालात तुम्ही बेकार..म्हणून वाटते उद्धवा अजब तुझे सरकार’असा टोला सुधीर मुनगंटीवारांना हाणल्यानंतर आमचे सरकार हे ‘त्रिशंकू’नसून काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत असे सांगून तुकडोजी महाराजांच्या ओवींचे काव्य विडंबन त्यांनी ‘पाहूनी सौख्य माझे…देवेंद्र तो ही लाजे..शांती सदा विराजे..या झोपडीत माझ्या’ही ओवी त्यांनी ऐकवली व सभागृहाची दाद घेतली.
रावसाहेब दानवेंवरही भरपूर हल्ला चढवल्यानंतर ते पुन्हा भारुडाकडे वळले.‘वसेचिना,घडेचिना,भाजेचिना,शिजेचिना,जेवेचिना,फळेचिना, जगेचिना,चालेचिना, दिसेचिना, लागेचिना, कळेचिना...’या सर्व यमकांचा चांगलाच समाचार घेत मुख्यमंत्री यांनी ‘गिळेचिना’या शब्दाचा प्रयाेग केला. मूग गिळून बसणे याचा अर्थ काय होतो? १९९२ च्या बाबरी मज्सिद पडल्यानंतर मूग गिळून बसलेले ‘गिळेचिना’अवस्थेत होते.
’अच्छे दिन येता येता येईचेना,
पंधरा लाख जमा होता होता होईचेना
देशातील बेकारी हटेचिना
दोन कोटी राेजगार मिळेचिना
विदेशातून काळा पैसा येईचेना
नोटा बंदीनंतर पन्नास दिवस संपेचिना
आर्थिक मंदी जाईचेना।।
असे भारुड रचून चोख उत्तर दिले.सावरकर ांच्या मुद्दावर बोलताना गायीचा प्रश्नावर ते घसरले आणि ’महाराष्ट्रात गाय ही माता बाजूच्या राज्यात जाऊन खाता’किरण रिजीजू आणि दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या विधानांची फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांनी आठवण करुन दिली.
आपण कसं वागावं हे तुकडोजी महाराजांच्याच शब्दात सांगत देशात नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे आगडोंब पसरला आहे. तुकडोजी महाराज सांगतात ‘राजाने कसं वागावं..राजकारण करु नये..सत्तेनी जे कायदे केले..त्याचे फायदे मुजोरांनी घेतले’या ओव्या उद्दृत केल्या.
भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार असून याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संतांनी केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली असून ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली,मात्र २१ व्या शतकाच्या १९ साव्या दशकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्या स्वरुपाचे भारुड आज विधान सभेत सादर करुन अवघ्या महाराष्ट्राला भारुडाचे महात्म्य पुन्हा एकदा आठवणीत आणून दिल्याची चर्चा आज विधान भवन परिसरात चांगलीच रंगली होती.‘भारुडाचं गारुड’ हे सत्ताधारी व विरोधक दोघांच्याही डोक्यावर चढले असल्याचे बोलले जात होते,मुख्यमंत्री यांच्या उत्तरा नंतर विरोधी पक्ष् नेत्याने बोलण्याचा प्रघात नसताना फडणवीस यांनी तरीही ‘भाषण दिले पण शेतकर्यांना मदत हे सरकार देईचेना..काय बोलले हे आम्हाला समजेचेईना’असे नवे भारुड रचूनच सभात्याग केला हे विशेष.

आमचे चॅनल subscribe करा