
पाच वेळा निवडून देणा-या नागपूरकरांचे माझ्यावर विशेष प्रेम:विमानतळावर फूलांचा वर्षाव
उपमुख्यमंत्र्यांचे शहरात जल्लोषात स्वागत:जंगी मिरवणूक
हजारोंच्या गर्दीने स्वागत मार्ग फूलले:कटआऊट्स,संदेशांनी लक्ष वेधले
ढोल ताशे आणि भगवामय पश्चिम नागपूर :कार्यकर्त्यांचा उत्साह आसमंतात
भाजप आमदार,पदाधिका-यांची सरबराई :शंकर नगर चौकात कार्यकर्त्यांना संबोधन
नागपूर,ता.५ जुलै २०२२: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर व तब्बल अडीच वर्षांनंतर राज्यात भाजप-सेनेचे सरकार स्थापन केल्यावर, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरात आज प्रथमच आगमन झाले अन्, त्यांच्या या मतदारसंघात त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते,पदाधिकारी व समर्थकांनीच नव्हे तर शहरातील हजारो नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.सकाळी दहा वाजता विमानतळावर त्यांचे आगमन झाले त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विदर्भ,मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य देणारे सरकार आता राज्यात स्थापित झाल्याचे सांगितले.
गेल्या अडीच वर्षांपासून विदर्भाच्या हक्काचा विकासकामांचा निधी महाविकासआघाडी सरकारने अडवून ठेवला होता.जिल्हा नियोजन समितीच्या कामांनाही निधी मिळत नव्हता.पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ,मराठवाड्याच्या वाट्याला अल्प निधी प्राप्त होत होता.अजित पवार हे अर्थमंत्री असताना डीपीसी अंतर्गत जिल्ह्याला फक्त ६२५ कोटींचा निधी मंजूर केला होता.फडणवीस यांच्या काळातील जलयुक्त शिवार योजना आघाडी सरकारने बंद केली असून त्याची चौकशी देखील सुरु केली होती.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भ,मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य देणारे सरकार आता राज्यात आल्याचे सूचक विधान केले.
शिंदे गटातील १६ अपात्र आमदारांविषयी दाखल असणा-या याचिकेबाबत बोलताना, यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडू,योग्य निकाल येईपर्यंत यावर टिपण्णी करने योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले.
शिंदेंच्या शिवसेनेने अर्धी लढाई जिंकली आहे अद्याप विधान सभेत शिवसेनेतील खरा गट कोणता,कोणत्या गटाला मान्यता मिळू शकेल,कोणाला धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह मिळेल कि ते गोठविले जाईल,सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपात्र घोषित करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काय सुनावणी करेल,या पार्श्वभूमीवर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
आज भाजपच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत करण्यात आले.सुशोभित रथावर त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीप्रसंगी त्यांनी सर्वप्रथम विमातळावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले.विमानतळ ते धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत निघालेल्या या जंगी मिरवणूकीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली.तरुणाईने फडणवीस यांचे कागदी मुखवटे धारण करुन जल्लोष केला.संपूर्ण स्वागत मार्ग भाजपच्या भगवा झेंड्याने झाकोळून गेला.
‘भाजपा नाव समृद्धिचे, भाजपा नाव विश्वासाचे,भाजपा नाव अभिमानाचे,स्वप्नपूर्तीचे’ या गीतांच्या शब्दांनी, स्वरांनी संपूर्ण स्वागत मार्ग, दूमदूमत राहीला.भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आज ओसंडून वाहत होता.तब्बल अडीच वर्षांच्या तपश्चर्येनंतर भाजपची सत्ता राज्यात पुर्नस्थापित झाली आहे,याचा जोश,याचा आनंद कार्यकर्त्याच्या चेह-यांवरुन ओसंडून वाहत होता.आपल्या लाडक्या नेत्याच्या कौतूकासाठी कित्येक मैल पायवाट ते सहस चालत राहीले.
ढोल ताश्यांचा गजरात न्हाऊन निघालेत.तरुणाई,वृद्ध,महिला,लहान बालके, पुरुष,कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्वागत मार्ग फूलून गेला.भाजपच्या महिला पदाधिका-यांनी रथा समोर फूगडी खेळून आनंद साजरा केला.स्वागत मार्गावर ठिकठिकाणी नृत्याच्या विविध संचांनी देखील नृत्य सादर करुन आनंद द्विगुणीत केला.
फूलांच्या आरासने सजलेल्या रथात फडणवीस व त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी नागरिकांना,कार्यकर्त्यांना हात हलवून अभिवादन केले.विजयाची खूण दाखवली.
ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतपर लावण्यात आलेल्या फलकांवर, त्यांनी केलेला मुख्यमंत्री पदाचा त्याग,पक्षाची शिस्त पाळणारे,कोणतीही खदखद न करता,श्रेष्ठींचा आदेश मानणारे, पक्षाच्या एका आदर्श कार्यकर्त्याच्या रुपातील स्लोगन लक्ष वेधून घेणारे होते.
मराठ्यांनी पानीपतमधील अपयश तब्बल अडीच वर्षांनी धूवून काढले होते.पानीपतमधील हार ही मराठेशाहीला बसलेला जबरदस्त धक्का होता.दिल्लीपासून ९७ किलोमीटर दूर पानितपमध्ये हे युद्ध अफगानीस्तानमधून आलेल्या दुर्रानीसोबत १४ जानेवारी १७६१ रोजी लढण्यात आले होते.मराठा सैनिकांनी आपला कुटूंब-कबिला,जनावरेही सोबत नेली असल्याने,रणनीती आखून दूर्रानी सैन्याने त्यांची पाण्याची,धान्याची रसद कापली, परिणामी या युद्धात मराठ्यांना शोर्याने लढून देखील हार पत्करावी लागली होती. हे अपयश धूवून काढण्यासाठी मराठ्यांनी अडीच वर्षे रणनीती आखली होती व संपूर्ण तयारीनिशी पुन्हा आक्रमण करुन आपले अपयश धूवून काढले व अटकेपार झेंडा गाढला.
फडणवीस यांच्या युती सरकारला पुन्हा एकदा राज्यातील जनतेने, सत्तेसाठी बहूमत दिले असताना शिवसेनेने दगा-फटका करुन ऐन वेळी २०१९ मध्ये ‘हिंदूत्व ’विचारधारेला तिलांजली देत काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत आघाडी स्थापित केली व भाजपला सत्तेपासून दूर ठेवले मात्र तब्बल अडीच वर्षांनी फडणवीस यांनी शिवसेनेला खिंडार पाडून, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्ता पुर्नप्रस्थापित करुन युतीची भगवी पताका ‘दिल्लीश्वरांपर्यंत’ फडकवली.
नोव्हेंबर २०१९ साली घडवून आणण्यात आलेल्या ‘पानीपत’ सदृश्य राजकीय युद्धाचे अपयश आपल्या चाणाक्ष रणनीतीतून अडीच वर्षातच फडणवीसांनी धूवून काढले व राज्यावर पुनश्च भाजप-सेना युतीची माेहोर उमटवली.त्यांच्या या यशाची पताका स्वागत मार्गावर ठिकठिकाणी लहरत होती.
त्यांच्या या यशामुळेच म्हणूनच नागपूरच्या रस्त्यांवर नागपूरकरांचा जल्लोष,हा गगनाला भेदणारा होता.त्यांच्या या विजयी रथाचे सारथ्य भाजपचे सरचिटणीस व आमदार चंद्रशेखर बावणकुळे,खासदार डॉ.विकास महात्मे, आ.कृष्णा खोपडे,शहराध्यक्ष प्रवीण दटके,आ.मोहन मते,माजी महापौर संदीप जोशी,आ.परिणय फुके,माजी महापौर दयाशंकर तिवारी,माजी सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्यासह पहील्या फळीतील सर्व शिलेदार करताना आढळत होते.
याप्रसंगी त्यांनी शंकर नगर येथे सभेला संबोधित देखील केले.नागपूरकरांनी मला पाच वेळा निवडून पाठवले असल्याचे ते म्हणाले.नागपूरकरांचे माझ्यावर विशेष प्रेम असल्याची पावतीही त्यांनी भारावून दिली.या विजयी मिरवणूकीसाठी त्यांनी नागपूरकरांचे आभार ही मानले.
फडणवीस हे पुन्हा एकदा सत्ताकेंद्री आल्याने नागपूर तसेच विदर्भाच्या विकासाचा,अनुशेष भरुन काढण्याच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या असल्याचे या स्वागत रॅलीतून आढळत होते.
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी रेशिम बाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिस्थळालाही भेट दिली.प्रेस क्लब येथे पत्रकारांशी त्यांनी ‘मिट द प्रेस’अंतर्गत मनमोकळा संवाद ही साधला.

आमचे चॅनल subscribe करा