Homeनागपूर न्यूजवर्ना आसमां से भी खून की बारीश होती...

वर्ना आसमां से भी खून की बारीश होती…

Advertisements


भुजबल यांचा सूचक इशारा: राष्ट्रवादीचा वर्धापन सोहळा
नागपूर (Nagpur),ता.१० जून २०२२: भारतीय जनता पक्षाच्या प्रवकत्या नुपूर शर्मा या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भलतंच काही तरी बोलून गेली,संविधानात लिहले आहे कुठल्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह्य बोलायचे नाही,नुपूर शर्मा यांच्या त्या विधानामुळे कतारपासून तर आबूधाबीपर्यंत अनेक देशात भारताची नाचक्की झाली,इतर देशात त्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटल्याच्या १० दिवसांनंतर भाजपने नुपूर शर्मा यांना प्रवकत्या पदावरुन बाजूला केले,नूपूर शर्माच्या विरोधात महाराष्ट्रातही ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेत.तुमचा पक्ष सभ्य म्हणवता मग तुमचे प्रवक्ते असे कसे?हिंदू-मुस्लिम वाद लावायचे,त्यांना डिवचायचं,ते चिडले की आपण हिंदूंचे रक्षणकर्ते बनायचं आणि भाजपलाच मत द्या अशी मानसिकता रुजवायची.त्यामुळेच शांत डोक्याने विचार करा,जे कायद्यात आहे त्याची अंमलबजावणी होईलच,भाजपचे तर धोरणच आहे हिंदू-मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचे,‘शुक्र है परिंदो को मजहब नही होता वर्ना आसमां से भी खून की बारिश होती’अश्‍या शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल (Chagan Bhujbal)यांनी भाजपवर ताशेरे ओढले.

ते गांधी सागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी (Rashtrawadi)पक्षाच्या वर्धापन सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी मंचावर माजी मंत्री रमेश बंग, सलील देशमुख,राष्ट्रीय अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे,माजी आमदार प्रकाश गजभिये,दिनानाथ पडोळे,प्रविण कुंटे पाटील,अनिल अहिरकर,शेखर सावरबांधे,प्रशांत पवार,जावेद हबीब,जानबा मस्के,गंगाप्रसाद ग्वालबंशी,बजरंगसिंह परिहार,वेदप्रकाश आर्य,दिलीप पनकुले,वर्षा शामकुळे,श्रीकांत शिवणकर,अफजल फारुक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भुजबल म्हणाले,की दुपारी दीड वाजताच्या विमानाने माझे नागपूरात आगमन होणार होते मात्र विमान उशिरा असल्याने चार वाजता नागपूरसाठी उड्डाण घ्यावे लागले.पुन्हा सायंकाळी साढे सातच्या विमानाने परत जायचे असल्याने व याच दरम्यान ईश्‍वर बाळबुधे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यालाही उपस्थित राहावयाचे असल्याने कार्यकर्ता व पदाधिका-यांसोबत फार वेळ राहता आले नाही किवा संवाद साधता आला नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

२३ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १० जून रोजी सकाळी मुंबईच्या षणमुखनंद सभागृहात राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली होती.त्यावेळी विविध ठराव पारित झाले होते.मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये याच दिवशी सभा झाली त्यावेळी फक्त शिवाजी पार्कच नव्हे तर बाहेरही प्रचंड गर्दी होती.महाराष्ट्राला शरद पवार व त्यांच्या पक्षाची वाटचाल याबाबत ऐकण्याची पराकोटीची उत्सुकता होती.शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष होते तर मला त्यांनी प्रदेशाध्यक्ष केले.यानंतर फक्त दोन महिन्यांच्या कालावधीतच विधान सभा व लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या.

एकीकडे काँग्रेससारखा दीडशे वर्ष जुना पक्ष तर दुसरीकडे फक्त दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षाने त्या निवडणूकीत जवळपास सारख्याच जागा जिंकल्या.यानंतर महाराष्ट्रात काँग्रेससोबत सरकार स्थापन झाली.विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर मी उपमुख्यमंत्री झालो.त्या वेळी अनेक जिल्ह्यात तर राष्ट्रवादीचे संघटनही अस्त्विात नव्हते.आम्ही फक्त उमेदवार उभे केले होते तरीही लोकशाहीचे ते शिवधनुष्य आम्ही पेलले.प्रत्येक क्षेत्रात मग ते शैक्षणिक असो किवा नागरि क्षेत्र,उद्योग जगत ते शेतकरी,सातत्याने आम्ही काम केले.लोकांनी पवार यांच्या नेतृत्वावर भरभरुन प्रेम केले.महाराष्ट्रात दहा वर्ष काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती.

याही वेळी २०१९ मध्ये आम्ही तीन पक्षांची आघाडी स्थापन केली मात्र समोरच्या लोकांना ते बघवले गेले नाही अश्‍या शब्दात त्यांनी भाजपला टोला हाणला.अडीच वर्षे मला व समीर भुजबलला तुरुंगात डांबून ठेवण्यात आले.आता न्यायालयाने ते आरोपच रद्द केले.महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचाराबाबत कधी ५ हजार कधी १० हजार कोटींचा आकडा विरोधक बदलत राहीले मात्र सिद्ध काहीच केले नाही.महाराष्ट्र सदन आम्ही एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलसारखे बांधले होते.आतापर्यंत त्याच्या कंत्राटदाराला एक पैसा ही दिला नाही.

हाच कित्ता विरोधकांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीतही गिरवला.आमचे सरकार आल्याने त्यांना आणखी टोचणी लागली,दु:खं झाले,काही कारण नसताना अनिल देशमुख यांना तुरुंगात डांबले.‘बाहेरचा चौथा माणूस बाहेरच्या पाचव्या माणसाला सांगतो त्याने असं ऐकलं आहे’म्हणून देशमुखांना चक्क अटक होते!

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही कधी ५५ लाख तर आता ५५ लाखांवरुन, ५ लाखांची संपत्ती दाऊदकडून विकत घेतल्याचा आरोप ठेऊन त्यांनाही तुरुंगात डांबले.१९९८ साली झालेल्या व्यवहारात दहशतवादी दाऊदसोबत संबंध जोडण्यात आला.अनेक नेत्यांच्या मागे ईडी,सीबीआयसारख्या केंद्रिय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला.

प.बंगालसह ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही नेमकं त्याच राज्यातील नेत्यांच्या मागे या केंद्रिय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे.अनिल देशमुखांचा राजीनामा आम्ही घेतला मात्र नंतर लक्षात आले भाजपचा तर ‘प्लॅनच’ वेगळा आहे!त्यामुळेच आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही,काहीही झाले तरी मलिक राजीनामा देणार नाहीत,असे आम्ही ठरवले.संबंध नसताना आर्यन खानला, वानखेडेने अमली पदार्थाच्या सेवनाच्या आरोपाखाली गोवले.आर्यन निर्दोष सिद्ध झाला,वानखेडे कुठच्या कुठे फेकला गेला!नवाब मलिकांना मात्र शिक्षा करण्यात आली!

तपास यंत्रणांचा किती गैरवापर होतोय याचा काही हिशेबच नाही.त्यांच्याकडे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्देच नाहीत.पवार मात्र जनतेच्या प्रत्येक संकटात धावून जाणारे नेते आहेत.महागाई तिपटीने वाढली मात्र यावर विरोधक बोलत नाहीत,ते बोलतात लाऊडस्पीकरवर,अजाण,हनुमान चालीसा पठणावर,भोंगे,भारत-पाकिस्तान,हिंदू-मुसलमान,ईडी-सीबीआयवर,कोटी,कोर्ट,निकाल,काश्‍मीर फाईल्स,राम मंदिर,राग,राडा,राणा,त्यांच्यासाठी देशात हेच महत्वाचे प्रश्‍न आहेत.

आम्ही महागाईवर बोलतो,महिलांच्या समस्यांविषयी बोलतो,व्यापारी,उद्योगजगत,ओबीसी वर्ग,शेतकरी,कर्ज हे आमच्या चिंतनाचे विषय असतात.ते केंद्रिय तपास यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांना तुरुंगात डांबतात,त्यांची बदनामी करतात मात्र सत्य हे कधीही लपत नाही.‘जिंदगी में तारीफ कम इल्जाम बहोत,उम्र है चार दिन की, इम्तहान बहोत’अश्‍या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तरीही राष्ट्रवादी लढेल,आता तर आपण ‘२३ वर्षांचे’ तरुण झालो आहोत.घाबरणार नाही,थांबणार नाही,राष्ट्रवादी ही प्राणवायू घेऊन धावत राहणार आणि जिंकणार सुद्धा,कार्यकर्त्यांमध्ये असा हंूकार फूंकत पक्षाचे कार्य करीत रहा,निवडणूका या देशात सातत्याने चालतच राहतात,तुम्ही लोकांची कामे करीत रहा,मला कितीही मोठा हार घातला,श्रीफळ दिलेत तरी मी तुमचा मतदार नाही,जनताच तुम्हाला,तुमच्या कामाला मत देणार आहे.जात-धर्म बाजूला ठेवा,माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे.शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेऊन काम करीत रहा असा सल्ला देत त्यांनी, राष्ट्रवादीच्या वर्धापन सोहळ्याच्या उपस्थितांना शुभेच्छा प्रदान केल्या.

Latest बातम्या