Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादीने भाकरी फिरवली...विस्कटलेली घडी ‘नीट’बसणार का?

राष्ट्रवादीने भाकरी फिरवली…विस्कटलेली घडी ‘नीट’बसणार का?

(छायाचित्र-आभा पांडे यांचा पक्ष् प्रवेश सोहळा)

राष्ट्रवादी शहर अध्यक्ष् अनिल अहिरकर यांचा राजीनामा

नवा गडी नवा राज’ ला होणार सुरवात:कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाराजी व आनंद!

आभा पांडे प्रदेश सरचिटणीस:पूर्व विधानसभा मतदारसंघावर असणार दारोमदार!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ४ जून: राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष् अनिल अहिरकर यांनी अखेर आज आपल्या पदावरुन राजीनामा दिला.गेल्या ४ वर्षांपासून ते या पदावर होते.शहरात सुरवातीपासूनच पक्षांतर्गत दोन गट एकमेकांच्या विरोधात कुरघोडीमध्ये व्यग्र होते.पक्षाचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे व दूसरा गट अनिल अहिरकर यांचा मानला जातो. पूर्वी देखील अनिल अहीकरकर यांच्या विरोधात पक्ष श्रेष्ठींकडे जोरदार ‘लॉबिंग‘करण्यात आली होती मात्र तेव्हा अहीरकर यांनी आपले पद वाचवण्यात यश प्राप्त केले होते,अपक्ष् नगरसेविका आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशातून अहिरकर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना शह दिला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशानंतरच अनिल अहिरकर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी विरोधी गटानी दवाब निर्माण करण्यास सुरवात केल्याची चर्चा होती.

काँग्रेसला रामराम करुन शहरात स्वत:चे वेगळे भारदस्त व दबंग अस्तित्व निर्माण करणा-या आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशाने अनेकांच्या पोटात शूल उठला.याच वर्षी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी आभा पांडे यांनी ‘नाही कोणाशी वादावादी..आता आम्ही राष्ट्रवादी’म्हणत पूर्व नागपूरमधील शांतीनगर येथील लॉनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल,करोनामुळे रुग्णालयात असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे वीसीद्वारे या सोहळ्यात उपस्थित राहीले तसेच आपल्या अभूतपूर्व समर्थकांच्या उपस्थितीत पक्ष् प्रवेश केला.

आभा पांडे मूळच्या काँगेसच्या असून मनपात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष् पद देखील भूषवले होते.मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणूकीत बंडखोरी देखील केली होती.मनपाच्या निवडणूकीत चार वार्डाच्या प्रभागातून त्या मनपात एकमेव अपक्ष् उमेदवार म्हणून निवडून आल्या.त्यांच्या या विजयाचे स्वत: अजित पवार यांनी पक्ष् प्रवेशाच्या वेळी कौतूक केले होते.आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशाच्या वेळी पूर्व नागपूरातील शांतीनगरचा संपूर्ण परिसर हा राष्ट्रवादीच्या झेंड्यांनी व मोठमोठ्या कट्आऊट्सनी झाकोळला होता.आभा पांडे यांचा स्वत:चा प्रचंड मतदार वर्ग असल्याने त्यांच्या पक्ष् प्रवेशाच्या वेळी पोलिसांना देखील गर्दी आवरताना कष्ट घ्यावे लागले.

या प्रचंड समर्थकांच्या गर्दीचीही अजित पवार यांनी मुक्त कंठाने दखल घेतली होती.एवढंच नव्हे तर मंचावरुन आभा पांडे यांनी आपल्या भाषणात मनपातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तसेच त्यांच्या गेल्या १५ वर्षांच्या भ्रष्टाचारी कारभाराचे जे वाभाडे काढले होते ते एेकून अजित पवार हे देखील स्तंभित झाले होते!

मनपाच्या शाळांमध्ये ५ संडास मंजूर करुन त्यातील २ संडास ही भाजप नेते पळवतात!याबाबत अजित पवार यांनी आपल्या भाषणात आश्‍चर्य व्यक्त केलं होतं.एवढंच नव्हे तर आभा पांडे यांच्यासारख्या राजकारणी या ‘महापालिका निवडणूकीसाठी नव्हे तर विधीमंडळात येण्यासाठी बनलेले आहेत’असे उघडपणे बोलून त्यांनी आभा पांडे यांच्या समर्थकांच्या उपस्थितीतच त्यांच्या विधान सभेचा मार्ग मोकळा केला होता.प्रफूल्ल पटेल यांनी देखील आभा पांडे यांच्या कार्यकर्तृत्वाची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती.

हे पण वाचा….

नाही कोणाशी वादावादी आता आम्ही राष्ट्रवादी!

बसपचे मोहम्मद जमाल तसेच भाजपचे सतीश होले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष् तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे शहरात उपस्थित असताना भेट घेतल्याने ते देखील राष्ट्रवादीत प्रवेश घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र हा प्रवेश टाळण्यात आला.मध्यस्थांच्यामार्फत काही भाजप नेत्यांनी देखील जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला मात्र प्रदेशाध्यक्ष् जयंत पाटील यांनी त्यांचा बायोडाटा व्हॉट्स ॲपवर मागवून घेतल्याने पुढे हा विषय थंडबस्त्यात जमा झाला.भाजपचेच विलास करांगळे,मारवाड समजाचे संजय सोमाणी, स्टील चेंबरचे राजा शेखरन,अग्रवाल समजाचे चंद्रकांत सुरभेवार,अनिल पांडे आदी अशी अनेक नावे पक्षाकडून देण्यात आली होती मात्र त्यांचा पक्ष् प्रवेश झाला नाही.‘इन्कमिंगला‘ब्रेक लागल्याचा इन्कार करीत पक्षात प्रवेश करणा-या इच्छूकांचे स्वतंत्र प्रवेश व्हावे अशी ईच्छा असल्याने व गृहमंत्री अनिल देशमुख करोनामुळे विलगीकरणा असल्याने नजीकच्या काळात टप्प्याटप्प्याने पक्ष् प्रवेश होतील असा दावा अहिरकर यांनी केला होता.

मात्र आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशासाठी पूर्व नागपूरची निवड करणे यामागे देखील फार मोठे राजकारण दडले असल्याची चर्चा होती. पूर्व नागपूरकरवर दावेदारी करण्याचे अनेक कारणे आहेत.आघाडी झाल्यास हाच मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून दुनेश्‍वर पेठे यांचेच नाव गेल्या विधानसभा निवडणूकीतही देखील आघाडीवर होते मात्र काँग्रेसने शेवटपर्यंत जागा सोडली नाही.यानंतर आपण उगाच आग्रह सोडल्याची खंत प्रफूल्ल पटेल यांनी अनेकदा नागपूर येथील विविध कार्यक्रमात बाेलवूनही दाखवली.त्यामुळेच येत्या विधानसभेत राष्ट्रवादी पुन्हा याच मतदारसंघातून जोर लावणार असून शहराध्यक्ष् अनिल अहिरकर यांनी या मतदारसंघातून आभा पांडे यांचा पक्ष् प्रवेश घडवून आणून पक्ष्ांतर्गत विरोधक दुनेश्‍वर पेठे यांची या मतदार संघातून दावेदारी संपवली असल्याचे बोलले जात आहे.

(छायाचित्र-शहराध्यक्ष् अनिल अहीरकर व नगरसेवक दुनेश्‍वर पेठे)

लोकसभा व विधानसभा निवडणूकीनंतर दुनेश्‍वर पेठे यांनी उघडपणे शहराध्यक्ष् अनिल अहीरकर यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हातात घेतला होता.‘हटाव’मोहिमेत ते सक्रीय झाले होते.जयंत पाटील व अजित पवार यांचे नागपूरतील दौरे संघटनात्मक फेरबदल करण्यासाठी नव्हे तर स्थितीचा आढावा घेण्यासाठी असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता.

हे पण वाचा….

महापालिकेत नाही तुम्ही विधी मंडळात पाहीजे:अजित पवार

पूर्वमध्ये भाजपचे आमदार कृष्णा खोपडे सध्या विद्यमान आमदार आहेत.आभा पांडे यांचा मध्य नागपूरात जबरदस्त प्रभाव आहे मात्र हा मतदारसंघ हलबा व मुस्लिम बहूल असल्याने प्रभागाच्या शेजारीच असणा-या पूर्व नागपूरातून त्या आमदार कृष्णा खोपडे यांना जबरदस्त टक्कर देतील असे त्यांचे समर्थक सांगत आहे.आभा पांडे यांची अगदी जमिनीस्तरावर जबरदस्त मतदारांची व समर्थकांची फळी बघता यावेळी आ.कृष्णा खोपडे यांना ही जागा काढणे एवढे सोपे जाणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादीमध्ये ही सर्व घडामोड या वर्षीच्या सुरवातीला जानेवारी महिन्यातच सुरु झाली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष् जयंत पाटील यांच्या ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौ-याअंतर्गत शहर व ग्रामीण कार्यकारीणींची आढावा बैठकांचा त्यांची धडाका लावला होता.सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी स्वतंत्र संवाद साधला होता.शहर अध्यक्ष् अनिल अहिरकर व जिल्हाध्यक्ष् बाबा गुजर यांनी या बैठकांची जय्यत तयारी केली होती.

राजकारणात ताकद महत्वाची असते तरच दखल घेतली जाते असा मंत्र देऊन जयंत पाटील यांनी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्येक वॉर्डात बूथ बांधण्याची सूचना केली होती.महापालिकेच्या निवडणूकीत याला-त्याला जागा मागण्यापेक्षा ‘स्वबळावर’ लढण्याची तयारी ठेवण्याचा सूचक इशारा देखील त्यांनी दिला होता.शहरात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे हाच धागा पकडून जयंत पाटील यांनी आगामी महापालिकेची निवडणूक लढवायची असेल व पक्षाची ताकद वाढवायची असेल नगरसेवकांची संख्या वाढवावी लागेल त्यासाठी प्रत्येक बूथवर ताकद निर्माण करावी लागणार असल्याचा मंत्र दिला होता.

महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला गृहित धरुन दहा-बारा जागा दिल्या जात असेल तर ते आता खपवून घेतले जाणार नसल्याचे अहिरकर यांनी अाधीच इशारा दिला होता.राज्यात महाविकासआघाडीची सरकार स्थापन झाल्यानंत राष्ट्रवादी हा आता राज्यात काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष् झाला आहे.आमच्या आमदार आणि मंत्र्यांची संख्या ही जास्त आहे.शहरात आमची काहीच ताकद नाही असे वारंवार दर्शवून यापूर्वी काँग्रेसने नेहमीच आम्हाला दुय्यम स्थान दिले असल्याची नाराजी देखील जाहीरपणे त्यांनी व्यक्त केली होती.विधानसभेत एक ही उमेदवार दिला नाही,महापालिकेच्या निवडणूकीत शेवटपर्यंत ताटकळत ठेऊन जिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फारसा जोर नाही अशा जागा सोडल्या जातात.काँग्रेसच्या तुलनेत आमच्या वाट्याला निम्म्यासुद्धा जागा नव्हत्या.१०० जागा लढवून फक्त १८ नगरसेवक निवडून आले अशी नाराजीही अहीरकर यांनी यांनी व्यक्त केली होती.चांगले व्यक्ति व चांगले राजकारणी म्हणून अनिल अहीरकर यांना मानणारा राष्ट्रवादीत एक मोठा वर्ग आहे.

(छायाचित्र-जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष् व राष्ट्रवादी नेते प्रशांत पवार)

आता अहीरकर यांनी राजीनामा दिल्याने नव्या शहराध्यक्षाची चर्चा सुरु झाली आहे.यात प्रामुख्याने ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांचे नाव आघाडीवर आहे मात्र दुनेश्‍वर पेठे गटातील समर्थक यांना पेठेच नवे शहराध्यक्ष् असतील अशी आशा आहे.प्रशांत पवार यांनी याच वर्षी जानेवारीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.प्रेस क्लब येथे पार पडलेल्या या पक्ष् प्रवेश सोहळ्यात प्रफूल्ल पटेल यांनी प्रशांत पवार यांच्याकडून अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या.विदर्भात पक्ष्ाचा प्रभाव वाढवण्यासाठी जनतेमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणा-यांना प्रामुख्याने प्रवेश दिला गेला.‘जय जवान जय किसान संघटनेने’ केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्ष्ी प्रकल्प असणा-या महामेट्रोतील कोट्यावधीचा भ्रष्टाचार वारंवार बाहेर काढला मात्र मेट्रोमधील जुगार व तृतीय पंथीयांच्या नृत्याने पवार व पेठे चांगलेच चर्चेत आले होते.उभय नेते हेच शहराध्यक्ष् पदाचे प्रबळ दावेदार मानले जात असताना त्यांच्या या कृतीविरोधात पक्ष्ातील अहीरकर गट सक्रिय झाला व प्रदेश सचिव दिलीप पनकुले यांनी स्थानिक नेत्यांपासून पक्षाध्यक्ष् शरद पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

मात्र नागपूरातील सहापैकी एकही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे नाही.चंद्रपूरमध्येही हीच परिस्थिती आहे.यवतमाळ जिल्ह्यात पुसदची एकमेव जागा असल्याने अडचण होते.या मर्यादित जागांमुळे पक्ष् मागे आहे.विदर्भात राष्ट्रवादीला सक्ष् म करायचे असेल तर १० पेक्षा अधिक जागा लढावाव्या लागतील अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रफूल्ल पटेल यांनी घेतली होती.याच पार्श्वभूमीवर पक्षा ची ताकद वाढवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने प्रशांत पवार व आभा पांडे यासारख्या दिग्गज विभूतींचा राष्ट्रवादी पक्ष् प्रवेश पार पडल्याचे बोलले जात आहे.

परिणामी येत्या विधानसभेत किमान ३ जागा व ग्रामीणमधील २ जागांवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याचे खासगीत बोलले जात आहे.यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्ष्णि-पश्‍चिम,काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा पश्‍चिम तसेच भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.प्रशांत पवार यांना फडणवीस यांच्या विरोधात मैदानात उतरवून राष्ट्रवादी फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा दाव खेळणार आहे.दुनेश्‍वर पेठे व आभा पांडे यांना देखील विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे खात्रीलायक सूत्राचे म्हणने आहे.

मात्र अवघ्या ६ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष् ‘स्वबळावरच‘लढण्याची भाषा करीत असल्याने गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असणारा व बूथ लेवलवर संघटनात्मकरित्या अतिशय सक्ष् म असणा-या भाजपसोबत लढण्यास हे तिन्ही पक्ष् स्वबळावर कितपत सक्ष् म आहे?हा संशोधनाचा विषय आहे.गेल्या १५ वर्षांपासून भाजपचा संपूर्ण भ्रष्ट कारभार घरोघरी पोहोचवल्या जाईल असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहे तर नागपूरचेच असणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले हे मनपा निवडणूकीत नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे ही जनतेचे लक्ष् लागले आहे.

भाजपला हरवायचे असेल तर तिन्ही पक्षांनी आघाडी करुनच लढले पाहिजे असे अनेकांचे मत आहे.मात्र नाना पटोले यांनी देखील अलीकडेच काँग्रेस ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचा सूतोवाच केला होता,त्यामुळे ही शक्यता देखील धूसर होते.आघाडीतील शिवसेना ही अद्यापही आपल्या अस्तित्वासाठी विदर्भात चाचपडत असल्याचे दिसत आहे.तेच चित्र बहूजन पक्षाच्या बाबतीत ही उमटले आहे.

एकीकडे दोन दशकांहून अधिक काळ झाल्यानंतरही उपराजधानीत जम बसवण्यात अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची आगामी निवडणूक फारच गांर्भीर्याने घेतली असून प्रफूल्ल पटेल व अनिल देशमुखसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक नेते,कार्यकर्ते व विविध क्ष्ेत्रातील मान्यवरांच्या घरी भेटी देत जनाधार मिळवण्याचा प्रयत्न जानेवारीपासूनच सुरु केला मात्र आता शहराध्यक्ष् अनिल अहीरकर यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली तर विरोधी गट हा आनंदी झाला आहे.

मनपा निवडणूकीपूर्वी पक्षात अशीच गटबाजी कायम राहल्यास भाजपसारख्या, मनपात गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असणा-या व १०८ संख्याबळ असणा-या ताकदवर पक्षाला हरवणे व स्वत:ची सत्ता स्थापने दुरापस्तच ठरणार आहे.म्हणूनच प्रश्‍न निर्माण होतो राष्ट्रवादीने शहरात भाकरी तर फिरवली मात्र यामुळे विस्कटलेली घडी नीट होणार का?

Latest बातम्या