Homeनागपूर न्यूजयोग्य वेळी सावरकरांच्या मुद्यांवर याेग्य उत्तर देऊ: सुनील केदार

योग्य वेळी सावरकरांच्या मुद्यांवर याेग्य उत्तर देऊ: सुनील केदार


नागपूरात १६ एप्रिल रोजी आघाडीची ‘वज्रमूठ’सभा

नागपूरातील सभा अभूतपूर्व सभा राहील:केदार यांचा दावा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

नागपूर,ता.४ एप्रिल २०२३:नागपूरच्या सभेत पन्नास ते साठ हजार लोक येणार असल्याचा दावा आघाडी पक्षातर्फे केला जात आहे,त्यांच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा उचलला जाईल का?राहूल गांधी यांनी सावरकरांवर जे विधान केले, देशभरात यावर चर्चा होत आहे, महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे पाच ते सहा नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत,त्यामुळे सावरकरांच्या मुद्दावर काँग्रेस आपली भूमिका नागपूरच्या सभेत स्पष्ट करणार का? यावर बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील केदार म्हणाले, की ज्या मुद्दाबाबत तुम्ही विचारणा करीत आहात त्यावर चर्चा होत आहे मात्र, या मुद्दावर देखील आमचा पक्ष योग्य वेळी उत्तर देईल.प्रत्येक मुद्दावर योग्य वेळी उत्तर दिले जाईल आणि ते ही पूर्ण उत्तर दिले जाईल,अर्धवट उत्तर दिले जाणार नाही,नागपूरच्या सभेत सावरकरांच्या मुद्दावर उत्तर दिले जाईल का?यावर पुनश्‍च केदार म्हणाले की प्रत्येक मुद्दावर उत्तर दिले जाईल व योग्य उत्तर दिले जाईल.
आज प्रेस क्लब येथे महाविकास आघाडीतील पक्षातर्फे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.

नागपूरातील सभेचे नियोजन कसे राहील?यावर बोलताना,या सभेत प्रेम पाहायला मिळेल,विश्‍वास पाहयला मिळेल,अभूतपूर्व अशी ही सभा असणार आहे,असा दावा त्यांनी केला.

पंतप्रधानाची पदवी हा काही विषय नाही असे अजित पवार म्हणाले यावर केदार यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी ही प्रश्‍न टोलवला व आजची पत्र परिषद ही वेगळ्या विषयाला धरुन असल्याचे सांगितले. संभाजी नगरच्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती,याकडे केदार यांचे लक्ष वेधले असता,एखाद्या सभेत प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थितीचा विषय हा काही गवगवा करण्याचा विषय नसल्याचे ते म्हणाले.त्या सभेत बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती याकडे लक्ष त्यांनी वेधले.

नागपूरच्या सभेत साधारणत:किती गर्दी जमविण्याचे टार्गेट आहे?यावर बोलताना टार्गेट शब्द योग्य नसून नागपूरातील जनतेने माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयींचीही सभा बघितली आहे,अनेक राजकीय सभा बघितल्या आहेत.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचं प्रेम आहे,मुख्यमंत्री पदी असताना त्यांनी जनतेसाठी केलेलं काम पाहीलं आहे,विद्यमान सरकारचं गेल्या आठ नऊ महिन्यांपासूनचं काम हे फक्त ‘घोषणे‘चे असून हे सरकार फक्त घोषणेचं सरकार असल्याचा टोला त्यांनी हाणला.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे राज्याचं काम केलं,त्याचं प्रतिबिंब नागपूरच्या सभेत पहायला मिळेल,असा दावा केदार यांनी केला.

नागपूरच्या सभेत कोणकोणते विषय राहतील?या प्रश्‍नावर बोलताना,राजकीय विषयाशिवाय बेरोजगारीचा मोठा विषय राहणार आहे,शेतक-यांचा विषय राहणार आहे,कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संभाजी नगरच्या सभेत मंचावरील उद्धव ठाकरेंच्या वैशिष्ठपूर्ण खूर्चीविषयी छेडले असता,एकदम उद्धव ठाकरेंच्या खूर्चीवर जाऊ नका असे म्हणत,उद्धव ठाकरे यांची फार मोठी शस्त्रक्रिया झाली आहे,त्यांच्या आरामाच्या अनुषंगाने खूर्चीची बनावट करण्यात आली असून त्यांचे पाय कुठे टेकले पाहिजे,पाठीचा कणा कसा टेकू शकेल,याचा विचार करण्यात आला आहे.एवढी मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही उद्धव ठाकरे हे बाहेर पडले आहेत,मिडीयाने त्यांच्या वैशिष्ठपूर्ण खूर्ची ऐवजी त्यांच्या ईच्छाशक्तीची दखल घेतली पाहिजे,असा अनाहूत सल्ला ही याप्रसंगी केदार यांनी माध्यमकर्मींना दिला.

महाविकास आघाडीच्या नागपूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती सभेचे समन्वयक माजी मंत्री सुनील केदार यांनी याप्रसंगी दिली.

ही सभा १६ एप्रिलला, केडीके कॉलेज समोरील दर्शन कॉलनी येथील पटांगणावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे. सभेला पूर्व विदर्भातून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्‍या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा अभूतपूर्व ठरेल असा दावा केदार यांनी केला. सभा निवडणुकीच्या प्रचाराची नाही. सर्व सामान्य जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष यातून व्यक्त होणार असल्याचे ते म्हणाले.

सध्याची राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारची हुकमशाही, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ज्याप्रमाणे शिक्षा ठोठावून अपात्र ठरवण्यात आले त्यावर आसूड उगारला जाणार आहे. या सभेबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाणार आहे. सोबत महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि अतुट असल्याचा संदेश सत्ताधाऱ्यांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या सभेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी पूर्व विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. वर्धा जिल्ह्याची जबाबदारी खासदार बाळू धानोरकर, चंद्रपूर राजेंद्र मूळक, गडचिरोली अभिजित वंजारी, गोंदिया-भंडारा विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सोबत राहणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला सुनिल केदार यांच्यासह ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी, काँग्रेसेच मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हा प्रमुख राजेंद्र मूळक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, जि.प. सदस्य सलील देशमुख, महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, तानाजी वनवे, माजी आमदार अशोक धवड, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार, ईश्वर बाळबुधे, रमण ठवकर आदी उपस्थित होते.
……………………

Latest बातम्या