Homeनागपूर न्यूजयांना लाज कशी वाटत नाही.......!

यांना लाज कशी वाटत नाही…….!

नागपूर,ता. २२ एप्रिल:धंतोलीतील एका सुप्रसिद्ध खासगी रुग्णालयात ३३ वर्षीय करोनाबाधित तरुण परवा उपचारासाठी भरती झाला.आज रात्री ९ वा.तेथील डॉक्टरांनी रेमडिवीरनंतर ज्या इंजेक्शनचा शहरात सर्वात जास्त तुटवडा आहे त्या इंजेक्शची चिठ्ठी रुग्णाच्या नातेवाईकांना लिहून दिली.आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने त्याची स्तनदा पत्नी सैरभैर झाली .. तिचे नातेवाईक गेले अनेक तास संपूर्ण शहर पालथे घालत आहे मात्र हे इंजेक्शन त्यांना कोणत्याही फॉर्मसीमध्ये सापडत नाही,तिचा जीव पतीच्या श्‍वासात अडकला असून ती अक्ष् र:कोलमडून पडली आहे.ती….तिच्या साढे पाच महिन्याच्या चिमुकलीसह करोना पॉझिटीव्ह आहे……!

५० हजार रुपयांच्या या इंजेक्शनसाठी ते एक लाख नाही तर १० लाख रुपये ही द्यायला तयार आहेत….!धंतोलीतील सर्व नामांकित फॉर्मासीमध्ये ते खूप अपेक्ष्ेने फिरले,आता मध्यरात्र झाली तरी त्यांना ते जीवनदायी इंजेक्शन कुठेही सापडले नाही…!
एका ज्येष्ठ डॉक्टरांना ‘सत्ताधीश’ने या इंजेक्शनच्या माहितीसाठी फोन लावला असता त्यांनी सांगितले हे इंजेक्शन नागपूरात काय पूर्ण भारतात ही आजच्या तारखेला उपलब्ध नाही….!

धंतोलीतील या नामांकित रुग्णायलाच्या ऑन ड्यूटी असणारे डॉक्टर यांना फोन लावला असता त्यांचा ही संताप ऐकून घ्यावा लागला…तुमचा हा ओळखीचा रुग्ण जेव्हा आमच्या रुग्णालयात परवा भरती होण्यासाठी आला तेव्हा त्याची ऑक्सीजन लेवल फक्त ६६ होती आणि जगातील कोणतेही रुग्णालय या ऑक्सीजन लेवलच्या रुग्णाला जोखिम पत्करुन भरती करुन घेत नाही मात्र फक्त त्याचे अतिशय तरुण वय बघता एक अतिरिक्त बेड त्याला उपलब्ध करुन दिला,ऑक्सीजन सुरु केले मात्र….आता त्याची परस्थिती आणखी गंभीर झाली असल्यानेच त्याच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आम्ही लिहून दिले…हे माहिती असताना की त्यांना या शहरात कुठेही हे इंजेक्शन मिळणार नाही मात्र डॉक्टरचं काम आहे रुग्णाला कोणत्या औषधांची गरज आहे ते नातेवाईकांना लिहून देणे,ते आम्ही केले….!
बोलताना त्या डॉक्टरने सहज सांगितले मॅडम आमच्या रुग्णालयात कोणी गडकरींचा नातेवाईक असतो कोणी फडणवीसांच्या जवळचा असतो….त्यांना मात्र हे दुर्मिळ इंजेक्शन माहिती नाही कसे,कुठून उपलब्ध होतात….!

तुम्ही खासगी रुग्णालयांना आणि डॉक्टरांना दोष देता मात्र गेल्या १४ महिन्यांपासून आम्ही देखील याच विषाणूच्या प्रार्दुभावात काम करत आहोत,आता तर हा संसर्ग माझ्या एका महिन्याच्या मुलीपर्यंत,पत्नी आणि वृद्ध आईपर्यंत पोहोचला असून मी आताच रुग्णालयातून कर्तव्य बजावून रात्री घरी आलो,माझ्या आईच्या छातीत दूखत असतानाही मी आपल्याशी बोललो……..!
या इंजेक्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला असता,धंतोलीतील या रुग्णालयाने तर आज या इंजेक्शनचे डिमांड पत्र आमच्याकडे पाठवले नसल्याने त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात आले नसल्याचे सांगितले.उद्या त्यांना डिमांड पत्र पाठवायला सांगा,रात्री ७-८ वाजेपर्यंत त्या रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध होऊन जाईल…..!

या डॉक्टरसोबत पुन्हा संपर्क केला असता….३३ वर्षीय त्या तरुण रुग्णाला १५ मिनिटांच्या आत त्या इंजेक्शनची गरज होती,पण आता जे डॅमेज व्हायचे होते ते झाले आहे,उद्या हे इंजेक्शन मिळून देखील त्याचा काही उपयोग होईल जर चांगलंच आहे,या रुग्णाने घरीच आठ दिवस घालवले ते त्याच्यासाठी घातक ठरले.तसेही आमच्या रुग्णालयातून फक्त रेमडिसिवीरसाठीच डिमांड पाठविले जातात,हाच नियम आहे.इतर इंजेक्शन्चे रेशनिंग जिल्हाधिका-यांकडे नाही……!असे त्यांनी सांगितले.

तरीही मध्य रात्री रेमडिसीवीरसाठी एखाद्या रुग्णालयातील रुग्णाला गरज वाटली तर?तर जिल्हाधिकारी कार्यालय हे सातवा वेतन घेऊन देखील आणि हा महामारीचा काळ असून देखील,देशात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग कायद्याची अंमलबजावणी लागू असताना देखील ‘चोवीस बाय सात’सेवा देण्यास इच्छूक नाही….हे वास्तव समोर आले.

हे जिल्हाधिकारी कार्यालय फक्त दिवसभरात त्यांच्याकडे ज्या खासगी रुग्णालयांनी डिमांड पाठविल्या त्या अनुषंगाने डिमांडच्या किती तरी कमी रेमडिसिवीरचा पुरवठा करते…..!एमआयडीसीतील एका खासगी रुग्णालयाच्या ज्येष्ठ डॉक्टरकडे याबाबत विचारणा केली असता,२० कोविड बेड असल्यास सध्यातरी जिल्हाधिकारी कार्यालयातून ५ च रेमडिसिवीर उपलब्ध होत आहेत,जे जास्त गंभीर आहेत त्यांना मग आम्ही हे इंजेक्शन लाऊन देतो,इतरांना चिठ्ठी लिहून देतो,बाहेरुन आणा..आमच्याकडे इतर कोणताही पर्याय नाही….!
आजच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली,महाराष्ट्रात रेमडिसीवीरचा योग्य तो पुरवठा करा,त्यासाठी वाटल्यास आम्ही तुमचे हात जोडतो,पाया ही पडतो…मात्र केंद्राने आज महाराष्ट्राच्या वाट्याचा आणखी १० हजार रेमडिसीवीर व्हायल्सचा कोटा कमी करुन ३६०००वरुन तो आज दि.२२ एप्रिल रोजी २६००० हजारवर आणला…..!

मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील माेदींना पत्र लिहले रेमडिसीवीरचे वितरण हे राज्यशासनाच्याच हातात असू द्यावे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने या दूर्मिळ झालेल्या किंबहूना साठेबाजार करणा-यांनी दूर्मिळ केलेल्या इंजेक्शनचा योग्य वाटप होऊ शकेल…मात्र मोदींना महाराष्ट्रातील रेमडिसिवीरचे नियंत्रण दररोज हजारो मृत्यू रेमडिसिवीरच्या अभावी महाराष्ट्रात होत असतानाही आपल्याच हातात ठेवायचे आहे…कारण….त्यांच्या गुजरातमध्ये एका रुग्णा मागे ३५ रेमडिसिवीरचा पुरवठा होत आहे महाराष्ट्रात त्याची टक्केवारी २ रुग्णांच्या मागे १.७ एवढी आहे!असे आकडे सांगतात.

अन्न व औषध नियंत्रण विभाग सर्वाधिक भ्रष्ट!
शहरातील एका ज्येष्ठ व सन्मानीय डॉक्टरने नागपूरात रेमडिसिवीर तसेच या इंजेक्शनच्या तुडवड्यासाठी सर्वाधिक दोष दिला तो अन्न व औषध नियंत्रण विभगातील काही भ्रष्ट अधिका-यांना!

वाझे’ फक्त मुंबईलाच नाही मॅडम,वसूली अधिकारी व टक्केवारी तर नागपूरात देखील आहे.यात एफडीआयकडे ही वसूली सोपविण्यात आली असून या विभागाच्या काही अधिका-यांचे फॉर्मसीसोबतची टक्केवारी ठरली आहे.याच टक्केवारीतून काही राजकीय नेत्यांची देखील टक्केवारी निश्‍चित आहे…!

काय कारण आहे गेल्या एकाच महिन्या करोनावर जिवनदायी ठरणा-या या दोन्ही इंजेक्शन्सचा अचानक शहरात एवढा तुटवडा झाला?गेल्या एका महिन्यात मागणी व पुरवठ्यात एवढा फरक पडला?कोणी केली साठेबाजी?काय झाली कारवाई?

मनपा आयुक्तांच्या अखत्यारीत असणारा एफडीआय हा विभाग सध्या साथरोग प्रतिबंध कायद्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अधीन काम करतोय.कुठे आहे जिल्हाधिकारी यांचे या विभागावर नियंत्रण?आज दिवसभरात अन्न व औषध नियंत्रण विभागाचा काय लेखाजोखा आहे,कोण तपासणार?सर्व काही अांनदीआनंद आहे,मरण फक्त….सामान्य रुग्णाचं …!

साठे बाजारी,वसूली,टार्गेट आणि टक्केवारीच्या या जीवघेण्या खेळात एखाद्या ३३ वर्षीय साढे पाच महिन्याच्या चिमुकलीच्या पित्याच्या जीवाची किंमतच ती काय?डॉक्टर्सच सांगतात..असे तर खूप येतात……!एवढंच की नागपूरात असे अनेक ‘वाझे’समोर नाही,पाठीमागे रॅकेट चालवतात…!

त्या स्तनदा मातेचा आज टाहो होता…५० हजार नाही,१० लाख घ्या पण…माझ्या नव-याचा जीव वाचवा हो!आज सुंदरबन ले आऊट मधील एक घर असेही आहे ज्या घरात करोनामुळे ५० वर्षाच्या आतील पती-पत्नीचा एकसाथ मृत्यू झाला….आता घरात त्यांचा एकूलता एक २४ वर्षीय करोना पॉझिटीव्ह मुलगा आहे…ज्याला आपल्याच जन्मदात्यांचे अंतिम संस्कार करण्याचीही संधी मुदार्ड व भ्रष्ट प्रशासनाने नाही दिली ना तो त्यांच्या अस्थि वेचायला घराबाहेर निघू शकतो…..!या दाम्पत्याला गेल्या वर्षीच करोना होऊन गेला होता मात्र गेल्या वर्षी त्या प्रादुर्भावातून दोघेही सुखरुप बाहेर पडलेत…हा २०२१ चा करोना आहे…एकदा संसर्ग झाला की सरळ फूफ्फसच निकामी करतो…….!एकेका श्‍वासालाही मोहताज करतो…!

आपल्या जन्मदात्यांशिवाय हा तरुण त्या उजाड आणि भकास घरात आता विष्णन्न अवस्थेत वावरतोय..शेजारच्यांना मात्र त्याची काळजी वाटतेय…..!

द्या माेदी यांनी बंगालची प्रचार सभा रद्द करुन करोनावर आपात बैठक बोलावली आहे…पुन्हा बैठकीत वांझोटी चर्चा हाेणार,ऑक्सीजन पुरवठावर,रेमडिसीवीरच्या वाटपावर….मात्र मरगळलेली नोकरशाही चुस्त दुरुस्त नाही करणार…..!नुकतेच मोदींनी केंद्रिय कर्मचा-यांना गेल्या वर्षी रद्द केलेला महागाई भत्ता या वर्षी पुन्हा लागू केला.कोट्यावधींचा बोजा तिजोरीवर पडणार असला तरी…गेल्या १४ महिन्यांपासून नाभिक,शिंपी,कलावंत,हॉकर्स,चहा टपरीवाले,नाश्‍ता पाॅईटवाले,सभागृहवाले, बॅक स्टेज कलावंत,फूलवाले सगळे भिकेला लागलेत,त्यांचे चिल्लेपिल्ले उपाशी मरतात आहे,उधार उसणवार घेऊन आपल्या बालबच्च्चयांच्या तोंडात ते घास ढकळतात आहे मोदींना मात्र केंद्रीय कर्मचा-यांना महागाई भत्ता देणे सर्वाधिक गरजेचे वाटले…..!

आजच हायकोर्टाने त्रागा व्यक्त केला…हतबलतेची लाज वाटतेय…..!बाधितांच्या मृत्यूवरुन प्रशासनाला फटकारले….!रेमडेसिवीर,ऑक्सिजनचा तुठवडा या पार्श्वभूमीवर तात्काळ रेमडेसिवीर इंजेेक्शनच्या दहा हजार व्हायल्स नागपूरला पुरविण्याचा आदेश दिला होता परंतु,प्रशासन या आदेशाची पूर्तता करण्यास अपयशी ठरले.कुणालाही कायद्याची भीती राहीली नाही,अशा पापी समाजाचा आम्ही देखील एक घटक असून रुग्णांसाठी काहीच करु शकत नसल्याची हतबलतेची आम्हाला लाज वाटतेय….’अशी मौखिक टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली….!

आजच सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारचे ऑक्सीजीनच्या पुरवठ्याबद्दल कान उपटले.

मात्र आम्हाला लाज वाटत नाही आम्ही ‘उपजराजधानीला मिळणार ऑक्सीजनचे ५ टॅकर्स’अश्‍या मथळ्याखाली जिल्हाधिकारीसोबतच्या बैठकीतले छायाचित्रे प्रसिद्ध करतो,‘ऑक्सीजनची वाहतूक होणार वेगवान’महाराष्ट्राला रोज ९७ मे.टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होणार म्हणून बातमी प्रसिद्ध करतो,सोशल मिडीयावर आपल्या भक्तांकडून आरती ओवाळून घेतो मात्र….त्याच वेळी….एखाद्या खासगी रुग्णालयात एखादा ३३ वर्षाचा तरुण,एखाद्या साढे पाच महिन्याच्या चिमुरडीचा बाबा….तरुण पत्नीचं सौभाग्य…इंजेक्शनच्या अभावी…मृत्यूच्या गूढ दाढेत ढकलल्या जात आहे…याची आम्हाला लाज वाटत नाही…..?

Latest बातम्या