

दाऊदी बोहरा समाज जागतिक सेवाभावी शाखेचा वर्ल्ड व्हिजन इंडियासोबत सहभाग
नागपूर, १४ सप्टेंबर: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्यांसाठी गाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्ये नाल्याचे खोलीकरण, चर खोदणे आदी जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून यावर्षी झालेल्या भरपूर पावसाने या भागातील जलाशय आणि विहीरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याची माहिती प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत दाऊदी बोहरा समाजाचे शेख सय्यद फिदवी आणि शब्बीर नजमुद्दीन यांनी दिली.याप्रसंगी मंचावर वर्ल्ड विजनचे सोनी थॉमस उपस्थित होते.
या उपक्रमाची सुरवात ६ मार्च २०२० रोजी करण्यात आली मात्र करोना महामारीमुळे यात खंड पडला.याशिवाय शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या घेण्याचे देखील सोपस्कार पार पाडावे लागले.ग्राम पंचायती,सरपंच यांची परवनागी प्राप्त करुनच या उपक्रमाला सुरवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना काळात या भागातील बहुतांश कामे थांबली होती, यवतमाळ जिल्ह्यातील चिंचघाट, वडनेर,शिवणी आणि मार्थड या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गावातील मुलांमध्ये कुपोषण आणि गावक-यांचे राहणीमान अतिशय खालावले होते, ही बाब लक्षात घेता, समाजाने सामाजिक उत्तरदायित्व अभियानाचा भाग म्हणून या गावांचे सर्वेक्षण केले आणि त्याठिकाणी जलसुरक्षा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.
त्यात सर्वप्रथम गावातील नाल्यांचे खोलीकरण,स्वच्छता, नाल्याच्या संरक्षण भिंतींचे बांधकाम, नाल्यांमध्ये छोट्या विहीरी तसेच या भागात शेतानजीक चर खोदण्यात आले. यावर्षी झालेल्या पावसाने नाले, विहीरी, चर आदी ठिकाणी पाणी साचले असून परिसरातील ३३ विहीरींची पातळी देखील वाढली आहे, पाण्याच्या उपलब्धतेमुळे या गावांमध्ये काही अंशी समृद्धी दिसू लागली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामांमुळे परिसरातील ५०० शेतक-यांना व दोन हजार कुटूंबियांना लाभ झाला तसेच शेतमजूरांना रोजगार देखील उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले. या भागात एकूण ७७ ग्रॅब्रीयन बंधारे तयार करण्यात आले आहेत, ही सर्व कामे लक्षात घेता ८०० एकरातील शेतीला याचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे, भविष्यात देखील याठिकाणी लाभदायी उपक्रम राबविण्यात येतील यासोबतच कोणत्याही सामाजिक संघटनेने, राज्यभरातील वंचित क्षेत्राची माहिती दिल्यास त्याठिकाणी देखील असाच प्रकल्प राबवून, त्या भागाचाही कायापालट करण्याचे काम करण्याचा मानस यावेळी दाऊदी बोहरा समाज सेवाभावी शाखेच्या पदाधिका-यांकडून व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सोनी थॉमस म्हणाले,की भारतातील बहुतांश ग्रामीण जनता ही पावसावर अवलंबून असून त्यांचा चरितार्थ अल्प तसेच अनिश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या कृषी अर्थव्यवस्थेवरच अवलंबून आहे .दूसरीकडे पर्यावरणीय असंतुलनामुळे मातीची गुणवत्ता तर खालावली आहेच त्याचबरोबर जलस्रोत कमी झाल्यामुळे त्यांची दुर्दशा वाढली आहे.

(छायाचित्र: पत्र परिषदेत यवतमाळ जिल्ह्यातील दाऊदी बोहरा समाज सेवाभावी शाखेच्या उपक्रमामुळे प्राप्त झालेल्या समृद्धिची गाथा सांगताना शेतकरी)
महाराष्ट्रातील यवतमाळच्या शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या प्रमुख साधनावर सकारात्मक परिणाम करणारा पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यासाठी दाऊदी बोहरा समाजासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे . या कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण झाल्याने मुलांचे सर्वांगीण विकास होईल आणि मुलांना उज्वल भविष्य देखील मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शब्बीर नजमुद्दीन , प्रोजेक्ट राईज वरिष्ठ अधिकारी आणि बुरहानी फाउंडेशनचे उपाध्यक्ष म्हणाले ,की हवामान बदलाच्या संकटामुळे जगभरात दुष्काळ आणि पूर यांसारख्या पाण्याशी संबंधित आपत्ती उद्भवत आहेत . जलस्रोतांची कमतरता , ही विदर्भात , विशेषतः शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मोठी चिंतेची बाब आहे . पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि या भागातील लोकांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चार गावांमध्ये हा दीर्घकालीन पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल आम्हाला विशेष अभिमान वाटतो.

याप्रसंगी प्रोजेक्टरवर यवतमाळ जिल्ह्यातील या चार गावांमधील जलसंधारणाचा प्रकल्प व त्यात मिळालेल्या यशाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी हा प्रकल्प राबविण्यात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या सकारात्मक बदलांविषयीचे मनोगत व्यक्त केले.हा प्रकल्प होण्यापूर्वी त्यांच्या गावांमध्ये दुष्काळ तसेच पाण्याच्या दूर्भिक्षाला सामोरे जावे लागत होते.भू-जलाची पातळी ही फक्त ७ ते ८ फूटांवर होती.दाऊदी बाेहरा जागतिक सेवा शाखा व वर्ल्ड विजन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या गावात हा जलसंधारणाचा हा उपक्रम राबविल्यामुळे यंदा पावसाचे हजारो मिलीलीटर पाणी हे धरणामध्ये नेहमीप्रमाणे वाहून न जाता,बंधा-यामुळे साचले व आजूबाजूच्या जमिनीत मुरले.यामुळे विहिरीतले पाणी १५ ते २० फूट वर आले तसेच त्यांच्या गावातील विहिरी पाण्याने काठोकाठ भरल्या, त्यामुळे शेतीला भरपूर पाणी उपलब्ध झाले.
परिणामी आता फक्त खरीपाचेच पिक न घेता रब्बीमध्ये ही वर्षातून किमान पाच पिके घेत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.यात कापूस,गहूं,चणा,तूर व सोयाबिन या पिकांसह बारा मास आता सोबतच भाजीपाला देखील उगवला जात असल्याचे सांगितले.उन्हाळ्यातही आता गावात पाण्याची टंचाई जाणवत नसल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आरीफ तय्यब, उमेजा, समाजाचे धर्मगुरू , सैयदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्यासह बोहरा समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा