Homeनागपूर न्यूजमोदी विमानात,पत्रकार कोमात,आयोजक,पोलिस जोमात

मोदी विमानात,पत्रकार कोमात,आयोजक,पोलिस जोमात

तब्बल दिड तास प्रचंड वाहतूक कोंडीत पत्रकार अडकले

आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचा नागपूरकरांनाही फटका

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist-

नागपूर,११ डिसेंबर २०२२: बहुप्रतिक्षित असा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा आज आटोपला.गेले अनेक दिवस या दौ-या संबंधी वार्तांकनात पत्रकार मंडळी व्यस्त होती.देशाचे सर्वोच्च आणि शीर्षतम नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा,भरगच्च कार्यक्रम,लोकार्पण,उद् घाटन इत्यादीचे सुरक्षित सोपस्कार पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या झाडून पुसून सर्वच विभाग आणि यंत्रणांनी दिवसाची रात्र केली होती मात्र,पंतप्रधान हे एम्समधून प्रस्थान करताच, हजारोच्या संख्येने उसळलेली गर्दी, यामुळे कार्यक्रमस्थळी एकच तारांबळ उडाली,एवढंच नव्हे तर हजारोंच्या संख्येने वाहने ज्या मैदानात दाटीवाटीने ‘कोंबण्यात’आली होती,ती बाहेर पडूच न शकल्याने, हजारो वाहने जशी त्या तशी जागच्या जागेवरच थांबली,यात पत्रकारांच्याही दोन बसेस यांचाही समावेश होता,तब्बल दीड तास पत्रकारांचीही वाहने एक सेंटीमीटर देखील जागेवरुन हलूच शकली नसल्याने,मोदी विमानात,पत्रकार कोमात आणि कार्यक्रमानंतरचा ताण निवळल्यानंतर आयोजक आणि पोलिस विभाग जोमात असल्याचेच चित्र उमटले.

सकाळी ८ वाजतापासूनच पत्रकारांनी आपापली घर दारे सोडून मोदींच्या कार्यक्रमास्थळी जाण्यासाठी धाव घेतली.ठिकठिकाणचे लोकार्पण,उद् घाटन आटोपून मोदी हे मुख्य कार्यक्रम असणा-या एम्सच्या ठिकाणी उपस्थित झाले.विशेष म्हणजे ‘अभूतपूर्व’सुरक्षा व्यवस्था असल्याने पत्रकारांसह इतरांना देखील पाण्याची बाटलीसुद्धा आत डोममध्ये नेण्याची परवानगी नव्हती.सकाळी आठ वाजता पासून वार्तांकन करणारे पत्रकार आणि छायाचित्रकार,विविध वाहीन्यांचे कॅमरामन यांनीही कार्यक्रम स्थळे गाठत ‘इमाने इतबारे’आपले कर्तव्य चोख बजावले.माेंदीचे भाषण आटोपताच मोदी क्षणात मंचावरुन गायब झाले!

डोमच्या बाहेर पडताना नागपूरकर पब्लिक देखील आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये खूसफूस करीत ‘अरे इतनी जल्दी मोदी कहां से गया रे!’अश्‍या विवंचनेत पडली होती.माेदींसोबच राज्य चालवणारे कर्तबगार महनीय देखील क्षणात अदृष्य झालेत मात्र,डोममधून बाहेर पडण्यासाठीच अर्थात पहील्या ‘पायदानावरच ’ गर्दीला मोकळे रान मिळाले.ज्या दारांवर डोमच्या आत प्रवेश करताना प्रत्येकाची तपासणी करणारी भक्कम पोलिसी यंत्रणा सज्ज होती ,ती देखील मोदींसोबतच क्षणात अदृष्य झाली होती,जणू त्यांची जबाबदारी फक्त मोदी व राज्य कारभार हाकणारे यांचीच सुरक्षा करने एवढीच होती,आग्रहाने हात-पाय जोडून बोलविण्यात आलेल्या मायबाप श्रोत्यांच्या जिवितेशी,सुरक्षेशी या पोलिस नामक यंत्रणेला काही एक सोयरसुतक नव्हते,याचाच प्रत्यय डोमबाहेर निघतानाच प्रत्येकाला आला.

(छायाचित्र: डोममधून बाहेर पडल्यानंतर एम्सच्या रस्त्यावरील गर्दी)

यानंतर एम्सच्या आतमधील रस्त्यांवर देखील तूफान गर्दी हसत,डूलत,बोलत निघत होती मात्र,आयोजकांनी या मायबाप रसिक श्रोत्यांच्या सहनशीलतेचा अंत बघण्यासाठीच एका चिंचोळ्या फाटकावरच गर्दीचा संपूर्ण ताण ढकलला होता,अर्थात बाहेर निघण्यासाठी एकच फाटक ठेवले होते! परिणामी एम्सबाहेर पडताना या मागच्या बाजूतील या चिंचोळ्या फाटकातून गर्दीचा प्रचंड रेटा वारंवार अडकून पडत होता.आयोजकांच्या ‘कल्पक बुद्धिमत्तेचा साक्षात्कार’ येथे ही श्रोत्यांना आणि मोदी भक्तांना घडला.

मात्र,आपल्या लाडक्या पंतप्रधानांना ‘याची देही याची डोळा’बघायला,ऐकायला मिळाल्यामुळे श्रोते यांनी त्या वेळी देखील कोणतीही खदखद व्यक्त केलीच नाही,सहनशीलतेचा कडेलोट मात्र तिथे झाला जिथे आयोजकांनी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या वाहनांसह नागपूरातील श्रोत्यांना देखील घेऊन आलेल्या वाहनांना एकाच ठिकाणी,एकाच मैदानात दाटीवाटीने वाहने ‘कोंबायला’ लावली होती!

यात मोठमोठ्या खासगी बसेस होत्या,शहरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या जाहीराती मिरवणा-या लाल प्रवासी ‘आपली’ बसेस होत्या,पांढ-या जीप्स,खासगी कार,वेगवेगळ्या रंगाढंगाच्या वाहनांनी एम्स मागील ते मैदान तुडूंब ओसंडून वाहत होते!एका ही छोट्या मोठ्या वाहनाला ‘मजाल है’एक इंच ही हलायला जागा मिळेल!

परिणामी सगळी वाहने आडवी-तिडवी,वाकडी-तिकडी,उभी-आडवी,सरळ-पाठमोरी दाटीवाटीने जागच्या जागी उभीच राहीली!ना मागे सरकायला जागा,ना पुढे दामटायला जागा.जगातले सातवे आश्‍चर्य म्हणजे पोलिस किवा वाहतूक विभागातील एक ही ‘जांबाज’ शिपाई तिथे कर्तव्यावर हजर नव्हता,वाहतूक विभागाला किवा पोलिस विभागाला ,गरजच वाटली नाही मोदींचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सुरळीत एका रांगेने हजारो वाहनांना प्रवाश्‍यांच्या सुरक्षेसह बाहेर काढणे ही देखील आपलीच संवैधानिक व कायदेशीर जबाबदारी आहे म्हणून!

प्रचंड गोंधळ आणि हॉर्नच्या कर्कश आवाजांनी एम्स मागील ते अपूरे ‘वाहनतळ’ गळबलून गेले मात्र आयोजकांपैकी कोणीही त्या ’आणिबाणिच्या’परिस्थतीत धाव घेतली नाही,एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचे नेहमीच ‘कर्तव्यदक्ष’असणारे पाच-पन्नास कार्यकर्ते देखील मदतीला धावून आले नाहीत!

पत्रकारांच्याही घशाला कोरड पडली होती,प्रेस क्लबमधून पत्रकारांना घेऊन निघताना ‘बाकायदा’पत्रकारांच्या हातात नाश्‍ताचे पाकीट आणि पाण्याची बाटली टिकवण्यात(ठेवण्यात)आली होती,ती देखील पोलिसांनी डोमच्या आत प्रवेश करण्या पूर्वीच ‘जप्त ’केली होती. कार्यक्रमानंतर मात्र जिल्हा कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने देखील पत्रकारांना चक्क वा-यावर सोडले होते.परिणामी सकाळी आठ वाजता नंतर कोणाच्याही घश्‍यात पाण्याचा थेंब ही नव्हता किवा पोटात काहीतरी ढकलण्याची सोय ही नव्हती,अश्‍यातच प्रचंड वाहतूक कोंडीत पत्रकारांचीही वाहने जागच्या जागेवर अडकून पडल्याने, अनेकांवर ‘कोमात’जाण्याची वेळ उद् भवली होती.एका तरुण महिला पत्रकाराला कार्यक्रम स्थळी भोवळ देखील आली होती.

दीड तास हाच ‘नजारा’त्या मैदानात जिकडे तिकडे होता,अश्‍यात बसमधील एक दोन प्रतिष्ठित दैनिकांच्या छायाचित्रकारांनी व पत्रकारांनी पुढाकार घेत, बाजीप्रभूची ही खिंड यशस्वीपणे लढवली,त्यांनी बस चालकाला मागच्या बाजूने बस दामटण्यास सांगितले,इतर वाहनांना देखील मागे मागे जाण्यास सांगितले,सतत बस मागे मागे नेत थोडयासा मोकळ्या जागेमधून,अगदी कोपरा धरुन निमुळत्या जागेवरुनही बस चालकाने बस मुख्य फाटकाकडे दामटली,दीड तास एक इंचही न हलणारी बस,तब्बल दीड तासांनंतर शंभर इंच हलली व पुढच्या पंधरा मिनिटात मुख्य फाटकामधून ‘निसटली’आणि सर्व पत्रकारांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

मात्र,तोपर्यत पत्रकारांच्या अनेक व्हॉट्स ॲप ग्रूप्सवर आयोजक,जिल्हा परिषदेचे जनसंपर्क कार्यालय, पोलिस विभाग,वाहतूक विभाग,भाजपचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आदींवर चांगलेच ‘शेरे’ फॉरवर्ड झाले होते.
वीस मिनिटांच्या प्रवासासाठी पत्रकारसारख्या सर्वाधिक ‘व्यस्त’जमातीला तब्बल पावणे दोन तासांचा विलंब झाला होता,पोटात कावळे कत्थक करु लागले होते,पाण्या अभावी जीव कासाविस झाला होता,दैनिक कार्यालये गाठून तातडीने सगळे फूटेज,बातम्या,वार्तांकनाची घाई देखील झाली होती.

माेदी नागपूरातून विमानाने निघाल्यानंतर आयोजक व पोलिस विभाग देखील सुटकेचा श्‍वास ‘जोमात ‘ साेडून आपापल्या कर्तव्यस्थळी निघून गेल्याचीच चर्चा होती

.एवढ्या वेळेत तर मोदी हे नागपूरच्या एम्स मधून निघून गोव्यालाही पोहोचले होते,एवढंच नव्हे तर गोव्याचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान हे दिल्लीला आपल्या निवासात शांतपणे पहूडले देखील असावेत,असाच कयास पत्रकारांच्या नशीबी लावण्याचे योग, आज एम्सच्या आयोजकांनी आणि पोलिस विभागाने घडवून आणला होता.

Latest बातम्या