Homeनागपूर न्यूजमैदानातच नागरिकांचा विरोध डावलून विरुंगळा केंद्र बांधले त्याचे काय?काँग्रेसचा सवाल

मैदानातच नागरिकांचा विरोध डावलून विरुंगळा केंद्र बांधले त्याचे काय?काँग्रेसचा सवाल

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची आघाडीच्या ‘वज्रमूठ ‘सभेची परवानगी रद्द करण्याची मागणी

आघाडीची पूर्व नागपूरातील सभा यशस्वी होण्याची खोपडे यांना भिती:ठाकरे गट शिवसेनेचा आरोप

संभाजी नगरसारखी नागपूरात दंगे घडवणे शक्य नसल्यानेच सभा रद्द करण्याचा डाव:दुनेश्‍वर पेठे

मैदानाच्या विकासात आमदार खोपडे यांच्या एका फूटकी कौडीचेही योगदान नाही: तानाजी वनवे

नागपूरर,ता.७ एप्रिल २०२३: महाविकास आघाडीतर्फे येत्या १६ एप्रिल रोजी महाविकास आघाडीतर्फे वज्रमूठ सभा पूर्व नागपूरच्या केडीके कॉलेजसमोरील दर्शन कॉलनीतील पटांगणावर होणार असल्याचे निश्‍चित झाल्याने तसेच या ‘वज्रमूठ‘सभेसाठीच्या सर्व शासकीय परवानग्या मिळाल्यानंतर देखील पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती यांना,या पटांगणावर राजकीय सभा पार पडल्यास क्रींडागणाचे नुकसान होऊन पर्यायाने खेळाडूंचे नुकसान होईल,अश्‍या आशयाचे पत्र पाठवल्याने भाजपच्या या पवित्र्यावर आता आघाडीतील तिन्ही पक्षाकडून टिकेची झोड उठली आहे.

भाजप आमदाराची आघाडीची वज्रमूठ सभा रद्द करण्याची मागणी म्हणजे आम्हाला ‘घाबरले’असल्याचा खरमरीत टोला काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला असून आमदार कृष्णा खोपडे यांना आताच कसे हे खेळाचे मैदान असल्याचे आठवले?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.या मैदानात सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम पार पडतात तेव्हा होत नाही का क्रीडा मैदानाचे नुकसान?सर्वात महत्वाचे म्हणजे या भागातील नागरिकांनी या मैदानात हट्टाने व अट्टहासाने निर्माण करण्यात आलेले विरुंगळा केंद्र बांधू नका म्हणून अक्षरश:सत्ताधा-यांकडे गयावया केली मात्र तरी देखील हे केंद्र बांधण्यात आले,आता हे केंद्र ज्येष्ठ नागरिकांना देखील शुल्क भरुनच उपलब्ध होत आहे,तेव्हा या मैदानाची उपयोगिता आमदार खोपडे यांना लक्षात राहीली नाही का? विरुंगळा केंद्र बांधणारा कंत्राटदार व त्या मागील मलाई लाटणारे अदृष्य हात कोणाचे आहेत?हे या भागातील जनतेला ही चांगल्याने माहिती आहे.खेळाडूंच्या नुकसानीची परवाह करणा-या आमदारांनी या भागातील नागरिकांच्या आंदोलनाची देखील दखल घेतली नव्हती,आता आमची सभा रद्द करण्यासाठी पत्र व्यवहार करणारी कृती म्हणजे, भाजपवाल्यांची फ्रस्ट्रेशन असल्याची जळजळीत टिका अतुल लोंढे यांनी केली.

तर संभाजी नगर,खेडसह आघाडीच्या व्रजमूठ सभेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघता, भाजप हा हादरला असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी केली.आमदार खोपडे यांना याची जाणीव आहे की त्यांच्या मतदारसंघात आघाडीची सभा यशस्वी झाल्यास त्यांची सीट धोक्यात येणार आहे,त्यासाठीच त्यांनी सभा रद्द करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.संभाजी नगरच्या सभेत भांडण तंटे घडवून आणण्यात आले,नागपूरात असे काहीच घडू शकणार नाही हे भाजपवाल्यांना चांगल्याने माहिती आहे.नागपूरची जनता ही खूप सुजाण आहे.त्यामुळेच सभाच रद्द करण्याचा डाव रचल्या जात आहे मात्र,सभेसाठी आम्ही सर्व शासकीय परवानग्या घेतल्या आहे,नागपूरची ही सभा देखील यशस्वी करुन दाखवू.

वास्तवतेत हे मैदान नागपूर सुधार प्रन्यासने लीलावात काढले होते मात्र तत्कालीन आमदार दिनानाथ पडोळे यांनी तो लीलाव थांबवला होता.तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांनी देखील पत्र पाठवले होते.मनपाच्या सभागृहातच या ठिकाणी प्रायमरी शाळेच्या आरक्षणाचा ठराव संमत झाला आहे.या साठी स्वाक्षरी अभियान देखील राबवण्यात आले आहे.त्यामुळेच कलम ३७ ची कारवाई,सभागृहाचा प्रस्ताव हा राज्य सरकार,एडीटीपीकडे गेल्या दहा वर्षांपासून धूळ खात पडला आहे, छोटू भोयर यांच्या कार्यकाळात या ठिकाणी संरक्षण भिंतींचे बांधकाम झाले.समाज भवन,अध्यन केंद्र १९८५ साली माझ्या कारकार्दीत झाले,असे मनपातील माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे सांगतात.

विशेष म्हणजे क्रीडेच्या मैदानाविषयी आपुलकी दाखविणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्याचकडे या मैदानावर सायकल-पोलो खेळणा-या खेळाडूंनी हा खेळ खासदा क्रीडा महोत्सवात सहभागी करावा याची मागणी केली होती मात्र खेळांवर व खेळाडूंवर ओसंडून प्रेम वाहणा-या आमदारांनी या खेळाचा समावेश खासदार क्रीडा महोत्सवात करण्यासाठी काहीच केले नाही,असा आरोप तानाजी वनवे करतात.

दर्शन कॉलनीच्या या पटांगणाच्या विकासावर याच भागाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपच्या आमदारांनी गेल्या पंधरा वर्षांपासून एक फूटकी कौडीही खर्च केली नाही.जो काही निधी दिला तो केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या खासदार निधीतून खर्च केला आहे.खोपडे हे दोन-तीन कोटी रुपये खर्च करुन सभागृह बनवले असल्याचा जो दावा करत आहे तो खासदार निधीतून फक्त ५० लाख रुपयांमध्ये बनला आहे.या ठिकाणी सातत्याने लग्न समारंभ,सामुहिक विवाह साेहळे,सांस्कृतिक,धार्मिक उत्सव होत असतात तेव्हा हे पटांगण खराब होत नाही का?

महत्वाचे म्हणजे आमदार खोपडे यांना नागपूरातील खेळाडूंच्या क्रीडा मैदानांची इतकीच काळजी आहे तर त्यांनी रेशिम बाग येथील मैदान जे न्यू इंग्लिश शाळा,सी.पी ॲण्ड बेरार तसेच डी.डी नगर शाळेतील खेळाडूंसाठी आरक्षीत आहे ते रेशिम बाग खेळाडूंसाठी मोकळे करावे यासाठी खोपडे यांनी आंदोलन करावे,उपोषणाला बसावे नंतर दर्शन कॉलनी येथील पटांगणाची काळजी वहावी,असा उपरोधिक टोला ही तानाजी वनवे हाणतात.

पंधरा वर्षात पूर्व नागपूरात एक रुपयांचे देखील विकास कार्य न करणारे आमदार कृष्णा खोपडे हे इतरांच्या निधीतून राबविण्यात आलेल्या प्रकल्पांवर दावा करण्यापलीकडे काहीही करत नाही.आता महाविकास आघाडीची व्रजमूठ सभा होत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.विशेष म्हणजे ज्या खेळाच्या मैदानाची काळजी आमदार खोपडे वाहत आहे ते मैदान देखील गडकरी यांच्याच खासदार निधीतून साकारण्यात आले आहे.

खोपडे यांनी पूर्व नागपूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच आता कोणत्याही राजकीय सभा होऊ नये यासाठी आंदोलन करावे,असा सल्ला देत,या प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक आहेत त्यांचा ही प्रयत्न आमची सभा रोखण्याचाच असल्याचा आरोप या प्रभागातील काँग्रेसचे एकमेव नगरसेवक असणारे तानाजी वनवे यांनी केला भाजपचे हरीश डिकोंडीवार यांचा तर हा प्रभाग देखील नाही.ते प्रभाग क्रमांक २८ मध्ये डायमंड नगरमध्ये राहतात मात्र प्रभाग क्रमांक २७ मध्ये आई व कुटूंबिय असल्याने या प्रभागातून निवडणूक लढवतात,यावरुन भाजपची आपल्या नागरिकांप्रतिची आस्था कळते.नासुप्र सभापती व पोलिसांची परवानगी आघाडीतील पक्षांना प्राप्त झाली असून भाजपने कितीही प्रयत्न केले तरी नागपूरातील आमची वज्रमूठ सभा ही अविस्मरणीय राहणार असल्याचा दावा तानाजी वनवे करतात.

तर उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे प्रवक्ते नितीन तिवारी हे देखील भाजप या मुद्दावर राजकारण करीत असल्याचा आरोप करतात.ही सभा यशस्वी होणार असून त्यांचा जनाधार यामुळे ढासळणार असल्यानेच ते सभा रद्द करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.विशेष म्हणजे याच मैदानावर भाजप पक्षाचेच अनेक राजकीय कार्यक्रम पार पडले आहेत त्यावेळी नाही झाले का क्रीडा मैदान खराब?असा सवाल ते उपस्थित करतात.

थोडक्यात,आमदार खोपडे यांच्या या पत्र व्यवहारामुळे नागपूरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आमदार कृष्णा खोपडे यांच्या या मागणीविरोधात त्यांच्याच पक्षातील शीर्ष नेत्यांनी विरुद्ध मत व्यक्त केले आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी सभा रद्द करण्याचा भाजपचा कोणताही विचार नसल्याचे सांगितल्याची चर्चा आहे.

ही सभा १६ एप्रिलला, केडीके कॉलेज समोरील दर्शन कॉलनी येथील पटांगणावर सायंकाळी सहा १६ एप्रिल रोजी वाजता होणार आहे. सभेला पूर्व विदर्भातून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्‍या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा अभूतपूर्व ठरेल असा दावा नुकतेच एका पत्र परिषदेत काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केला. सभा निवडणुकीच्या प्रचाराची नाही. सर्व सामान्य जनतेच्या मनात खदखदत असलेला असंतोष यातून व्यक्त होणार असल्याचे ते म्हणाले होते.

सध्याची राजकीय परिस्थिती, केंद्र सरकारची हुकमशाही, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ज्याप्रमाणे शिक्षा ठोठावून अपात्र ठरवण्यात आले त्यावर आसूड उगारला जाणार आहे. या सभेबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली जाणार आहे. सोबत महाविकास आघाडी अधिक मजबूत आणि अतुट असल्याचा संदेश सत्ताधाऱ्यांना दिला जाणार असल्याचे केदार यांनी सांगितले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या सभेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. वर्धा जिल्ह्याची जबाबदारी खासदार बाळू धानोरकर, चंद्रपूर राजेंद्र मूळक, गडचिरोली अभिजित वंजारी, गोंदिया-भंडारा विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सोबत राहणार आहेत,अशी माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या नागपूर येथे होणाऱ्या वज्रमूठ सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती सभेचे समन्वयक माजी मंत्री सुनील केदार यांनी याप्रसंगी दिली होती.

……………………

Latest बातम्या