
ज्वाला धोटेंचा ज्वालामुखी फूटला विरोधकांवर
पोलिसांच्या गंगाजमुनात भुयारे शोधण्यावर लावले प्रश्नचिन्ह
नागपूर,ता.३० ऑक्टोबर: लकडगंज पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन काल गंगाजमुनावर धाड टाकून या वस्तीतील घरामध्ये ज्या भुया-यांचा शाेध घेतला व भाजपचे नगरसेवक मनोज चापले व राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी पोलिसांच्या या कारवाईनंतर आता ’गंगाजमुना वस्ती बचाव‘च्या प्रणेत्या आपलं नाव बदलतील का असे जे आव्हान दिले त्यावर, माझं नामकरण करणा-यांचेच श्राद्ध व तेरवी होईल असा इशारा राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी दिला. प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी बोलताना ’गाढवां पुढे वाचली गीता आणि गाढव म्हणे कालचा गोंधळ बरा होता’अशी म्हण सांगत पोलिस आयुक्त अमितेश कुमार व लकडगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक पराग पोटे यांची कालची गंगाजमुनामधील भुयारे शोधून काढण्याची कारवाई ही गाढवासारखीच होती,अशी जळजळीत टिका केली.
तळघर किवा भुयारी मार्गांचा अर्थ तरी पोलिस विभागाला कळतो का?असा प्रश्न उपस्थित करीत भिंतीना ड्रील मशीनने फोडून काढणे म्हणजे भुयारी मार्ग शाेधून काढने असे जर पोलिसांचे मत असेल तर कालची घटना म्हणजे ’खोदा पहाड निकली चुहीया’अशी गत पोलिसांची झाली असल्याचे त्या म्हणाल्या.
तळघरे ही जमिनीच्या खाली असतात,वारांगणांच्या घरातील जिना मागचा भागही पोलिसांना भुयारं वाटली,दोन घरांमधील भिंतीचा भागही पोलिसांनी ड्रील मशीनने तोडून भुयारे असल्याचे दर्शवले.एवढी ही महत्वाची भुयारे होती तर पोलिसांनी पुरातत्व विभागाला का पाचारण नाही केले?राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या पुरातत्व विभागाच्या अधिका-यांना बोलावून त्यांना ही भुयारे दाखवा,ती एवढी महत्वाची होती तर त्या घरांवर आज पोलिसांनी फक्त १० रुपयांचे कूलूप का लावले आहेत?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्या ठिकाणी आम्रपाली संघटनेचे सदस्य हजर नव्हते,राजे मुधोजी भोसले,स्वयंसेवी संस्था,रेडक्रॉस सोसायटीचे कर्मचारी,वकील संघटना कोणीही हजर नव्हते परंतू पोलिसांच्या कारवाईदरम्यान नगरसेविका आभा पांडे व भाजपचे नगरसेवक मनोज चापले मात्र हजर होते.
यानंतर मलाच त्यांनी आव्हान केले गंगाजमुनात तळघर सापडले आता ज्वाला धोटे स्वत:चं नाव बदलेल का?शंभर जन्म जरी घेतले तर एकमेव माझं नाव बदलण्याची ताकद विदर्भाचा शेर स्व.जांबुवंतराव धोटे यांच्यातच आहे.तुमची पात्रता नाही माझं नामकरण करण्याची मात्र तुमची तेरवी आणि श्राद्ध घालण्याची ताकद मात्र ज्वाला धोटेमध्ये नक्की आहे, परंतू ते माझे संस्कार नाही,म्हणून मी गंगाजमुनामधील वारांगणांना कोणतीही कायद्याविरोधी कृती करण्यास थांबवले,असे त्या म्हणाल्या.
मूळात ती अल्पवयीन मुलगी ही राजस्थानमधील असल्याचे पोलिसच सांगतात तर तिने राजस्थान पोलिसांची मदत का नाही घेतली?किवा नागपूरच्या पोलिसांनी ही केस राजस्थानच्या पोलिसांकडे का नाही सोपवली?राजस्थानची पोलिस ही कामचोर आहे का?
पोलिस आयुक्तांवर नोंदवणार अट्रासिटीचा गुन्हा-
एकीकडे नागपूरातील एक आदिवासी तरुणी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार करण्यासाठी सीताबर्डी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवतेय,तिची तक्रार पोलिस दाखल करुन घेत नाही,सर्वोच्च न्यायालयाचेच स्पष्ट निर्देश आहेत, पोलिसांकडे बलात्काराची तक्रार येताच आधी गुन्ह्याची नोंद घ्यावी,तपासकार्य नंतर सुरु करावे,या प्रकरणात तर पिडीत बलात्कारित तरुणीकडे तर सज्जड पुरावे देखील आहेत, तरी तिला पोलिस ठाण्यातून हाकलून देण्यात येतं,तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला,पोलिस कूप्रसिद्ध सट्टेबाज अजय बागडी याला पाठीशी घालत आहेत.संपूर्ण मध्य भारतात अजय बागडी हा सट्टेबाज किंग म्हणून कूप्रसिद्ध आहे,नागपूरात अनेक ठिकाणी त्याने बाहेर ‘आयटी कंपनी’चे फलक लावलेत,कार्यालयाच्या आत मात्र बेटिंग होते,त्याला पोलिसांचे अभय आहे का?राजस्थानच्या मुलीला न्याय मिळतो,नागपूरच्या पीडीतेला न्याय का दिला जात नाही?
एका आदिवासी जमातीच्या पीडीतेसोबत पोलिसांकडून जो र्दूव्यवहार झाला त्या विरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विरोधात अट्रासिटीचा गुन्हा नोंदवणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले.
पालकमंत्री बाबासाहेबांचे अनुयायी नाही-
स्वत: नागपूरचे पालकमंत्री हे आदिवासी,अनुसूचित जमाती सेलचे अध्यक्ष आहेत,नागपूर ही पालकमंत्र्यांची कर्मभूमी,संघर्षभूमी आहे.मात्र नागपूरात एका आदिवासी तरुणीवर बलात्कार होतो,सीताबर्डी पोलिस ठाण्यात तिला गुन्हा देखील नोंदवू दिला जात नाही,अश्यावेळी पालकमंत्र्यांनी स्वत:ला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणून घेऊ नये.बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना तत्कालीन सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकला होता.पालकमंत्री आघाडी सरकारच्या तोंडावर पोलिस आयुक्तांच्या विषयावर राजीनामा का फेकत नाही?
‘हा माझं ऐकत नाही!‘अशी हतबलता पालकमंत्री व्यक्त करतात मग पालकमंत्री स्वत:च्या पदाचा राजीनामा का देत नाही?दूसरीकडे जर पोलिस आयुक्त पालकमंत्र्यांचे ऐकतो असे जर पालकमंत्री समर्थन करत असतील तर याचाही अर्थ पोलिस आयुक्तांच्या कृत्याला पालकमंत्र्याचे आर्शिवाद आहे का?
न्यायालयाच्या भीतीने पोलिसांचा भुयारं शोध-
हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत हे प्रकरण संवेदनशील असल्याचे मत नोंदवले व याचिकेचे, जनहित याचिकेत परिवर्तन करण्याचे आदेश दिले.हे बघता पोलिसांचे धाबे आता दणानले आहे कारण पोलिस आयुक्तांनी गंगाजमुना प्रकरणात मानवाधिकाराचेच नव्हे तर संवैधानिक अधिकारांचे देखील हनन केले आहे.ही जागा सार्वजनिक उपयोगाची घोषित करण्यापूर्वी पोलिस आयुक्तांनी मनपा,नागपूर सुधार प्रन्यास या स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेतली आहे का?
निदान भुयारे शोधण्यासाठी ज्या घरांमध्ये ड्रीलमशीने भिंती फोडल्या त्या घरमालकांची तरी परवानगी घेतली का?किमान त्यांना आम्ही तुमचे घर फोडतोय,तोडतोय अशी नोटीस तरी दिली आहे का?हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने आणखी कोणाची नाही परंतू न्यायालयाची तरी परवानगी घेतली का?नागपूरात लोकशाही आहे की पोलिसांचीच गुंडशाही?असा सवाल त्यांनी केला.
मी आधी पण हीच भूमिका घेतली,या वस्तीत चुकीचे काही घडत असेल तर अंकूश लावा,शिक्षा करा,दंड द्या,अल्पवयीन मुली सापडल्या तर कठोर शिक्षा करा,घरे सील करा पण ज्या महिला या आपलं व कुटुंबियांचं पोट भरण्यासाठी,मुलांच्या शिक्षणासाठी देहव्यापार करतात त्यांच्यावर बंदी का?
त्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर‘भारताचे उपजिविकेसाठी अनुकरण करतात आहे,मी देहव्यापाराचे समर्थन करत नाही,जगातल्या कोणत्याही महिलेने या अश्या व्यवसायात येऊ नये मात्र जगातील हे एक ‘वास्तव‘आहे की अश्या वस्त्या प्रत्येक शहरात आहेत आणि जगाच्या अंतापर्यंत राहतील.
नागपूरातच ही अशी बदनाम वस्ती एकमेव नाही आणि वस्तीच हटवायची असेल तर पुण्यासारख्या सांस्कृतिक,ऐतिहासिक व शैक्षणिक शहरात ऐन दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला लागून बुधवारपेठ आहे,आधी ती वस्ती हटवून दाखवा,पुण्यापासून सुरवात करा.दगडूशेठ हलवाईच्या या मंदिराला तर पर्यटन विभागाचा’अ’दर्जा प्राप्त आहे तरीही त्या शेजारी बदनाम वस्ती आहेच ना?
पोलिस आयुक्तांना हटवण्याचे निवेदन आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील दिले असल्याचे धोटे यांनी सांगितले.गृहमंत्र्यांचेही स्वागत नागपूरात २ हत्याकांडाने झाले.गेल्या १० महिन्यात नागपूरात ८० हत्या झाल्या, आता पोलिस आयुक्त ‘अब की बार सौ के पार मर्डर’ची वाट पाहत आहेत का?अशी जळजळीत टिका याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केली.
पोलिस आयुक्तांना शहरातील पांढरपेशा सेक्स रॅकेटला सहयोग करण्यासाठी गंगाजमुना हटवायची अाहे,असा आरोप करीत या वस्तीवर भाजप पुरस्कृत बिल्डर लॉबीचा डोळा असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी याप्रसंगी केला.
वारांगणाच्या या मानवाधिकाराच्या व न्यायाच्या लढाईत शेवटपर्यंत उभी राहणार,असे त्यांनी सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा