Homeनागपूर न्यूजमागच्या दाराने ‘अदानी’ काेराडीत! कोळसा खान अदानीची,प्रकल्प कोराडीत

मागच्या दाराने ‘अदानी’ काेराडीत! कोळसा खान अदानीची,प्रकल्प कोराडीत

जनसुनावणीत आरोप-प्रत्यारोपांचा ‘राडा’

कोराडीच्या प्रस्तावित प्रकल्पालर समर्थन करणारे ग्रामस्थ की कार्यकर्ते?

रोजगार आणि राखेच्या तलावाने गाजली जनसुनावणी

उर्जा विभागात कोणाच्या काळात साढे तीन-तीन लाख रुपयांची लाच देऊन मिळाली नोकरी?जनसुनावणीत सहभागी नागरिकांचा खुलेआम आरोप

पर्यावरणवाद्यांवर खालच्या स्तरावर टिकेचा भडीमार: आता न्यायालयात मागणार दाद:पर्यावरणवाद्यांचा निर्धार

काँग्रेस,आपचा प्रकल्पाला विरोध:भाजप,प्रहारचे समर्थन

महाराष्ट्राचे वीज प्रकल्प बंद करुन कोराडीतच का?विशाल मुत्तेमवार

प्रदुषणाचा भार नागपूर जिल्ह्यात,विदर्भावरच का?आमदार विकास ठाकरेंचा सवाल

जिल्हाधिकारी इटनकर यांच्यावर नाराजीचा ‘सूर’

पत्रकार आशिष रॉय यांना समर्थकांनी बोलण्यापासून रोखले

ग्रामस्थांच्या माहितीसाठीचा संपूर्ण अहवाल इंग्रजीत!मराठीत फक्त संक्षिप्त चौकट !

प्रकल्प ठरलेलाच:जनसुनावणी फक्त धुळफेक:जनसुनावणीत अनेक वक्त्यांचा उघड आरोप

कोराडीतील १३ ही ग्राम पंचायतींचा प्रकल्पाला पाठींबा:स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा लाऊन धरला

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२९ मे २०२३: कोरेकलपा(छत्तीसगड)मधली कोळसा खाण चालवतो कोण?ही खाण अदानी ग्रूप्सला देण्यात आली आहे.आता त्या खाणीतला कोळसा काेराडी येथील प्रस्तावित १३२० यूनिट वीज निर्मिती प्रकल्पासाठी वापरल्या जाणार आहे.६०० किलोमीटर अंतरावरुन कोराडी येथे अदानीचा कोळसा आणण्याचे काय प्रयोजन आहे?असा थेट सवाल रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी आज कोराडीतील कॉन्फरेन्स हॉल,जनरेशन कन्सट्रक्शन कार्यालयातील परिसरात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित जनसुनावणीदरम्यान केला.प्रचंड पोलिस बंदोबस्तात पार पडलेल्या या जनसुनावणीत काँग्रेस व आम आदमी पक्षासह शहरातील विविध पर्यावरणवादी संघटनांच्या सदस्यांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका मांडली तर भारतीय जनता पक्ष,प्रहारच्या कार्यकर्त्यांनी वीज प्रकल्पाच्या बाजूने भूमिका रेटून धरली.एवढंच नव्हे तर पर्यावरणवाद्यांवर अतिशय खालच्या स्तरावर शेरेबाजी करण्यात आली,त्यांच्या वक्तव्यात वारंवार अडथळे आण्याचे काम भाजपच्या कार्यत्यांनी केले.

प्रकाश जाधव यांनी आपल्या भाषणात प्रकल्प व महाजनकोच्या एकंदरित कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले.त्यांच्याही भाषणादरम्यान राजकीय कार्यकर्त्यांनी शेरेबाजी करुन व्यत्य आणण्याचा प्रयत्न केला मात्र,माझे मुद्दे मी कोणालाही न जुमानता पूर्ण मांडणार असल्याचे सांगून, प्रदुषणाबाबत ही जनसुनावणी असताना जिल्हाधिकारी हे प्रकल्पाबाबत बोलण्याची सूचना कशी करु शकतात?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकल्पांमुळे आज चंद्रपूरमधील प्रदुषणाची काय अवस्था आहे?नागपूर शहर व पूर्ण जिल्ह्याला कन्हान नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो,त्याचेच पाणी या प्रस्तावित १३२० यूनिट वीज निर्मिती प्रकल्पासाठी घेण्याचे योजिले आहे.कन्हान नदीमुळेच संपूर्ण जिल्ह्यातील विहीरीत पाणी झिरपत असतं.निसर्गाचे हे चक्र प्रदुषित होणार नाही का?काय सांगतो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा कायदा?नद्यांपासून किती अंतरांवर असावे प्रदुषण करणारे प्रकल्प?हा निकष ,हे बंधन या प्रकल्पाबाबत पाळण्यात आले आहेत का?आज जो अहवाल जनसुनावणी सुरु झाल्यावर औष्णिक वीज केंद्राचे अधिकारी यु.बी.बहादूरे यांनी वाचून दाखवला त्यात हवा,पाणी,प्रदुषण,वृक्षारोपणवर भरभरुन बोललेत,हा अहवाल कोणी तयार केला?अहवाल तयार करणारे हवा,पर्यावरणतज्ज्ञ होते का?या प्रकल्पामुळे हवा किती प्रदुषित होणार?किती जणांचे जीव घेणार?प्रदुषण होऊ नये यासाठी किती,कोणती बंधने टाकणार?जो माणूस हवा,पाणी आणि प्रदुषणावर बोललाच नाही,ती जनसुनावणी कशी होऊ शकते?जो तज्ज्ञ सल्लागार तुम्ही अहवालासाठी नेमला,त्याने अहवालात या विषयी जे जे मांडले ते लोकांसमोर का मांडले नाही?

आज बहादूरे यांनी जो अहवाल वाचून दाखवला तो तर लिपिक ही वाचून दाखवू शकतो,जे दावे बहादूरे यांनी अहवाल वाचनात केले,त्यांनी कधी नदीला भेट तरी दिली आहे का?पर्यावरण मंडळानुसार कन्हान नदीत किती कन्वेंटर बेल्ट बांधण्याची परवानगी होती?फक्त वीस.बांधली किती?तर चक्क ९६!नदीच्या आत क्रांक्रिटचे एवढे पिल्लर बांधण्याची परवानगी नसताना ज्यांनी बांधली ते जेलमध्ये जाण्यास तयार आहेत का?विदर्भाचा उत्तराखंड करायचा आहे का?परवानगी नसताना ते बेल्ट बांधण्यासाठी ५०० कोटींचा खर्च कसा केला?स्वत:जिल्हाधिकारी इटनकर हे पर्यावरण टास्क फोर्सचे सदस्य आहेत,हे फार जवाबदारीचे पद आहे,कोण्या ‘भडव्याने’नदीच्या आत ते ९६ पिल्लर बनवले?त्याच्यावर कारवाई करणार आहे का?कोराडी,नांदातील शेत ही राखमिश्रीत करुन टाकली आहे.माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत बैठकीत शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याचे महाजनकोने मंजूर केले,आजपर्यंत एक पैसा देखील नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही.प्रकल्प तुम्ही आणनार,राख त्यांच्या शेतीची करणार?

नागपूरात एकच राष्ट्रसंत तुकडोजी कैंसर रुग्णालय होते,आता सहा कैंसर हॉस्पीटल बनवणार का?अनेकांची जीव घेणारी मशिनरी कोराडीत आणताय का?या प्रकल्पाबाबत ग्राम पंचायतींमध्ये पत्रक वाटण्यात आले.जिल्हाधिकारी यांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले.२५ पानांच्या इंग्रजी अहवालात मराठीत फक्त संक्ष्प्त चौकट!सरकारी अधिका-यांना मराठी मोठी वाटते की इंग्रजी?गावक-यांना इंग्रजी समजते का?या अहवालात स्पष्ट लिहलं आहे,प्रस्तावित १३२० यूनिटच्या वीज प्रकल्पासाठी २७५ फूटांची चिमणी उभारणा आहेत.कोळश्‍यावर आधारित धूव्याला वजन असतं.हा धूवा फक्त १० किलोमीटरपर्यंत नाही तर संपूर्ण नागपूर शहर विषारी प्रदुषणाच्या कवेत घेणार आहे.नागपूर शहरातील पिण्याचे पाणीही प्रदुषित होण्यापासून वाचणार नाही.महाजनकोचे अधिकारी हे गावोगावी जाऊन का बोंबलले नाही?कैंसरचा खर्च महाजनको उचलणार का?

केंद्राच्या पर्यावरण विभागाची जी मंजूरी काेराडी प्रकल्पांसाठी मिळाली होती त्यात ४५ मीटर रुंदीचा हिरवा पट्टा तयार करण्यास सांगितले होते.मात्र,महाजनकोने ही अट न पाळता खापरखेडा,हिरवा पट्टा दिसावा म्हणून कोराडी येथे बांबूची झाडे लावली!आता पुन्हा प्रस्तावित प्रकल्प आणायचं ‘ठरलंच’असेल तर न्यायालयात जाऊ.कोराडीतील जुन्याच प्रकल्पांमध्ये प्रदुषण नियंत्रित करणारी यंत्रणा गेल्या ३० वर्षात लावली नाही तर आता नव्या प्रकल्पांमध्ये काय लावणार?अहवालाच्या सादरीकरणात फक्त सांगण्यासाठीच असे शब्द असतात.ही जनसुनावणीसुद्धा फक्त एक फास आहे.ही जनसुनावणी म्हणजे ‘लावारिस’जनसुनावणी आहे.

नाशिक,परळीचे यूनिट जे बंद झाले,तेथील कामगारांचे काय झाले?अदानीच्या काेळश्‍यासाठी कोराडी येथे प्रस्तावित वीज प्रकल्पाचा निषेध त्यांनी केला व यानंतर कोळसा खान छत्तीसगडमध्ये अदानीची ,प्रदुषण करणारा प्रकल्प मात्र कोराडीत,अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली.कोराडीत मागच्या दाराने अदानी काेराडीत पोहोचल्याची चर्चा ही यानंतर रंगली.

याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी नव्या वीज प्रकल्प येण्यापूर्वी आधीच्या वीज प्रकल्पांविषयीच्या काही तक्रारी आहेत का प्रदुषण मंडळाकडे अशी विचारणा केली.या विषयी अनेक आमदारांनी विधान सभेत अनेक प्रश्‍न उपस्थित केले असल्याचे सांगितले.जुन्या वीज प्रकल्पांमुळे आधीच काेट्यावधी टन साठवणारे राखेचे तलाव निर्माण झालेत.ती राख कोलार नदीत मिळसत असून कोलार नदीचे पाणी नागपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या पेंच नदीत मिळसत आहे.याचाच अर्थ जुनेच वीज प्रकल्प हे प्रदूषण करीत असताना अजून प्रचंड प्रदुषणात भर टाकायला निघाले आहेत.वीज येथे निर्मित करायची,लोड शेडिंग मात्र विदर्भात राबायचं.त्यामुळेच जुन्या प्रकल्पांमुळे होणारे प्रदुषण आधी थांबवावे,त्याचा अहवाल आधी सादर करावा त्यानंतरच नवीन प्रकल्पाला सुरवात करण्याची मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी काँग्रेसचे सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार यांनी देखील महाजनको व प्रदुषण मंडळाला त्यांनीच जनसुनावणीत वाचन केलेल्या अहवालातील मुद्दांवर कोंडीत पकडले.काँग्रेसचे संदेश सिंगलकर यांनी देखील ही जनसुनावणीच कशी बेकायदेशीर आहे,यावर टिका केली.कोणताही प्रकल्प येण्या आधी जनसुनावणी होत असते.हा तर प्रकल्प आधी मंजूर झाला,त्यावर काम सुरु झाले यानंतर जनसुनावणीचा घाट घालण्यात आल्याची टिका त्यांनी केली.मनपा,नासूप्र आणि एमएमआरडीला अहवालाची प्रत देण्यात आली नसल्याचे सांगून रेडीयो व दूरदर्शनवर जाहीराती न देता फक्त दोन वृत्तपत्रात जाहीरात प्रसिद्ध करण्या मागे कोणता हेतू होता?असा सवाल उपस्थित केला.याशिवाय आतापर्यंत प्रदुषण मंडळ नागपूरात उद्योग भवनात जनसुनावणी घेत होती आज मात्र कोणत्या हेतूने नवतपा सुरु असताना एवढ्या उन्हात ते ही दूपारी १२.३० वाजता कोराडीच्या औष्णिक केंद्रात जनसुनावणी घेत आहे?असा सवाल त्यांनी केला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशिष रॉय यांनी देखील काही प्रश्‍न उपस्थित केले.महाजनको आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉरपोरेशन(एनटीपीसी) द्वारे धुळे जिल्हातील दोंडाई येथील ३ हजार ३०० मेगावॉटचा औष्णिक विद्युत प्रकल्प स्थानिकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला.आता तेथे सौर उर्जेचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.त्याच धर्तीवर काेराडी येथे प्रस्तावित औष्णिक विद्युत प्रकल्पा ऐवजी सौर उर्जेवर आधारित प्रकल्प का आणत नाही,असा सवाल करत, संबंधित विभागांकडे मी उपस्थित केलेल्या लेखी प्रश्‍नांना अद्याप उत्तर मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना या प्रकल्पा मागे एका स्थानिक आमदाराच्या हेतूचा विषय त्यांनी काढताच, त्या आमदाराच्या समर्थकांनी जोरदार विरोध केला.आशिष रॉय यांनी आमदाराची माफी मागावी,अशी मागणी त्यांनी लाऊन धरली,जिल्हाधिकारी इटनकर यांनी मध्यस्थी करत,राजकीय उल्लेख टालून फक्त प्रकल्पावर बोलण्याची सूचना केल्याने आशिष रॉय यांनी आपले मुद्दे पूर्ण करुन परत आपल्या जागेवर बसत असतानाच डॉ.इटनकर यांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.ज्यांना आता बोलायचे आहे त्यांच्यासाठी समोरची जागा रिकामी करा अशी अजब सूचना त्यांनी आशिष रॉय यांच्यासारख्या एका ज्येष्ठ पत्रकाराला केली.परिणामी यानंतर रॉय हे जनसुनावणी सभेतून तडक निघून गेलेत.

यानंतर पत्रकार हे नागरिक नसतात का?आपली मते मांडण्याचा त्यांना संवैधानिक व लोकतांत्रिक अधिकार नसतो का?असा सवाल अनेकांनी आपापसातील चर्चेत उपस्थित केला.यावेळी पर्यावरणवाद्यांनी जिल्हाधिकारी यांच्या ‘पारदर्शी’ भूमिकेवर देखील जनसुनावणीनंतर सवाल उपस्थित केले.आम आदमी पक्षाचे प्रताप गोस्वामी यांनी प्रकल्पाचा विरोध करीत, नैसर्गिक संसाधने ही नागपूरातील कुण्या आमदार,खासदारांची जागीर नसल्याचे सांगताच भाजपच्या समर्थकांनी त्यांचा ही जोरदार विरोध केला.इटनकर यांनी हा राजकीय मंच नसल्याची तंबी देत फक्त प्रकल्पाविषयी बोला असे सुनावले.

हाच धागा पकडत माजी खासदार प्रकाश जाधव यांनी ही जनसुनावणी प्रदुषणावर असल्याचे बोल इटनकरांना सुनावले.

इटनकर यांनी पर्यावरणवाद्यांना बोलण्याची संधी तर दिली मात्र वारंवार तोच तोच मुद्दा चर्चिला जाऊ नये अश्‍या सूचना वारंवर केल्याने देखील पर्यावरणवादी चांगलेच नाराज झाले.प्रत्येकाचा अभ्यास वेगळा असतो,सक्षम अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना प्रत्येकाला ऐकणे बंधनकारक असल्याचे बोलले गेले.अभ्यास करुन आलेले व फक्त प्रकल्पाच्या समर्थनासाठी ‘बोलावल्या’गेलेल्यांना ऐकणे, यात फार मोठा फरक असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणने होते.

छत्तीसगड मधून कोळसा वाहतूक करुन ६०० किलोमीटर दूर कोराडीत येणार,यात कोणाकाणाचे ‘भले‘होणार!एका पक्षाचे काही राजकीय वजनदार नेते,कंत्राटदार,वाहतूकदार,खाण मालक गब्बर होतील,प्रदुषणाची कोणाला पडली आहे,जनता जाओ भाडीत…..!फक्त ५३६ राेजगार या प्रस्तावित प्रकल्पातून मिळणार आहे मात्र योजनाबद्धरित्या ‘रोजगाराचा’मुद्दा स्थानिकांच्या गळी पट्टीच्या राजकीय कार्यकत्णार्त्यांनी उतरवला असून विषारी प्रदुषणामुळे ये-या पिढीची काळजी कोणाला आहे?आपली तुंबडी बारा हजार कोटींनी भरली की झाले!असा संताप याप्रसंगी काही पर्यावरणवाद्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

जनसुनावणीसाठी संबंधित ग्रामीण भागातून हजारो महिला या सकाळी ८ वाजतापासूनच कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या.काही महिला पर्यावरणवादी या, त्या महिलांजवळ जाऊन बसल्या असता, शुभम नावाचा एक ‘कार्यकर्ता’याने त्या ग्रामीण महिलांना संबोधून या पर्यावरणवाल्यांच्या….घूसता का?अशी अश्‍लील शेरेबाजी केली.यामुळे त्या महिला देखील संतप्त झाल्या.आम्ही पण समर्थन द्यायला आलो आहोत पण तुझी बोलण्याची भाषा चांगली ठेव,असा समज त्या ग्रामीण महिलांनी शुभम नावाच्या त्या तरुण कार्यकर्त्याला दिली.

पर्यावरणवादी महिलांना शुभम नावाच्या त्या तरुणाच्या अश्‍लील शेरेबाजीने चांगलाच संताप दिला.पर्यावरणवाद्यांना उपस्थित राजकीय कार्यकर्ते हे ‘ठरऊन’टार्गेट करीत होते.नागपूरात एक कोटीच्या फ्लॅट मध्ये राहणारे पर्यावरणवादी आम्हाला येथे येऊन प्रदुषण शिकवित आहेत,त्यांची पोट भरली आहेत त्यामुळे आमच्या रोजगाराचा विचार न करता आम्हाला शहाणपणा शिकवित आहेत इत्यादी शेलक्या शब्दात अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी या जनसुनावणीत फक्त पर्यावरणवाद्यांनाच टार्गेट केल्याने,जनसुनावणीत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांऐवजी राजकीय कार्यकर्त्यांचाच भरणा असणार आहे,ही पर्यावरणवाद्यांची शंका खरी ठरली,इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या बाजूने मत मांडण्यासाठी त्यांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली असल्याची चर्चा देखील जनसुनावणीचा एकंदरित नूर पाहता रंगली.महत्वाचे म्हणजे कोराडी जवळील सर्व १३ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच महिला,पुरुषांनी प्रकल्पाच्या बाजूने रट्टू तोतासारखी हिरीरिने ‘रि’ओढली.

जनसुनावणीचा नूर पाहता पर्यावरणवाद्यांनी प्रकल्पाच्या विरोधात आता न्यायालयात जाणार असल्याचे माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.

अशी ही ‘पत्रकारिता!’
वाहीन्यांना काही तरी ब्रेकिंग लागते हे जरी खरे असले तरी बातमी ‘मिळणे’ व ब्रेकिंगसाठी बातमी ‘क्रिएट ’करने यात जमीन असमानाचा फरक असतो.जनसुनावणीच्या वेळी काही वाहीन्यांच्या प्रतिनिधींचा असाच हव्यास अनेकांना चांगलाच खटकला.जनसुनावणीत मोठ्या प्रमाणात काही माध्यमकर्मींच्या एका ‘खास’आमदाराचे समर्थक मोठ्या प्रमाणात ठिय्या मांडून बसले असता व प्रकल्पाच्या विरोधात बाेलणा-याना टार्गेट करीत असल्याचे बघून‘’हीच आपली बातमी’या समजूतीतून त्या ‘झूंड’ला पँडोलच्या बाहेर बोलवून, त्यांच्या मुखात बूम कोंबून, प्रकल्पाच्या समर्थनार्थ ‘नारे’लावण्याची ‘कल्पकता‘शूट करणारी पत्रकारिता आज अनेकांनी बघितली व एका प्रसिद्ध नाटकाचे शीर्षक नकळत त्यांना आठवून गेले.‘डॉक्टर…तुम्हीसुद्धा’असे त्या नाटकाचे नावे होते,येथे तर ‘पत्रकार…तुम्ही सुद्धा!’म्हणायची वेळ आली…. प्रिंट मधील काही पत्रकारांनी, वाहीन्यांच्या या काही पत्रकारांच्या, या अश्‍या पत्रकारितेवर कपाळाला हात मारुन घेतला…..!

……………………………

(क्रमश: उद्याचा बातमीत वाचा प्रकल्पाच्या समर्थनार्थ व विरोधात कोण काय म्हणाले?)

Latest बातम्या