Homeनागपूर न्यूजमहिलांचे सामाजिक जीवन घड्याळीच्या काट्यात बंदिस्त का असावे?

महिलांचे सामाजिक जीवन घड्याळीच्या काट्यात बंदिस्त का असावे?


शंकर नगर चौकात महिलांनी चुकवला बाराचा ठोका:रात्री बारा वाजता उडवला चहा-काॅफीचा बार

संवेदनशील विषयाला मात्र ‘इव्हेंट’चे स्वरुप! सजून धजून उपक्रमात सहभाग!

थकल्या भागल्यानंतर रात्री पुरुष घरा बाहेर जातात तनाव घालवायला,महिलांनाही अधिकार पाहिजे ही संकल्पना

एकविसाव्या शतकातील तिस-या दशकात सत्यात उतरणार का?

थकला भागला वर्गच नदारद! उपक्रमात अनेक मध्यमवर्गीय महिला नवरे मुलांसोबत हजर!

गप्पा टप्पा ऐवजी फोटो सेशन:राजकीय महिलांचीही हजेरी!

महिला पोलिसांनाही केले उपक्रमात आमंत्रित! सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरही हजर

नागपूर,ता.२४ मार्च २०२३ :स्त्री पुरुष समानतेचे युग, हे भारत या देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित झालेल्या समितीद्वारे निर्मित संविधान लागू झाल्याबरोबर २६ जानेवरी १९५२ रोजी संवैधानिकरित्या सुरु झाले, मात्र संविधान लागू होऊन आज ७१ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी पार पडल्यानंतर देखील, स्त्री-पुरुष समानता ही किमान सामाजिक व मानसिक पातळीवर तरी अद्याप स्थापित झालेली आढळून येत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना समान काम,समान वेतन,कामाच्या ठिकाणी समान सन्मान आणि अर्थातच स्त्रियांची सुरक्षा व आदर अपेक्षीत असून, आपल्या अनेक भाषणात जाहीरपणे, त्यांनी या बाबींचा पुरस्कार केला आहे.मात्र समाज,जाती किवा वर्ग कोणताही असो आज देखील स्त्रियांना बाबासाहेबांना अपेक्षीत सन्मान व सुरक्षा मिळालीच नाही,दररोजच्या वृत्तपत्रांतील स्त्रियांप्रतीच्या गुन्हेगारीच्या घटना याची साक्ष देत असतात.याच पार्श्वभूमीवर नागपूरात काल मध्यरात्री एक आगळावेगळा उपक्रम पार पडला.

स्त्री पुरुष समानतेच्या युगात आजही महिलांना पुरुषी दबावाखाली वावरावं लागतं,दिवसभर नोकरी करणारी व कुटुबांच्या जबाबदा-या पार पाडल्यानंतर तिला मनासारखे काहीच करता येत नाही.एक स्त्री म्हणून तिला तिच्या इच्छा आतल्या आत दाबून टाकाव्या लागतात.या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी आणि मनाला आनंदी वाटेल असं वावरण्यासाठी महिलांना एक संधी मिळावी,कामकाजी,घरगुती अशा सर्वच गटातील महिलांना रात्री घराबाहेर पडण्याच्या दहशत आणि भीतीतून मुक्त करुन आम्हीही निर्भय आहोत हे दाखवून देण्यासाठी सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाऊंडेशनतर्फे ‘नाईट टी विथ आजादी‘चा उपक्रम काल दिनांक २४ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री शंकर नगर चौकात पार पडला.

या कार्यक्रमाच्या संयोजिका व ह्यूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या प्रमुख ॲड.स्मिता सरोदे सिंगलकर आणि सहयोग ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ.रवींद्र भुसारी हे होते.

‘सत्ताधीश‘ने ॲड.सिंगलकर यांच्याशी या संकल्पनेविषयी संवाद साधला असता त्या म्हणाल्या,की आपल्याला नेहमी असं दिसतं की कौटूंबिक तसेच नोकरीच्या जबाबदा-या सांभाळताना बरेचदा महिलांना काही तनाव जाणवतो किवा कुटुंबातील सदस्यांचे आजारपण आहेत,समस्या आहेत,लग्न सोहळे आहेत तेव्हा त्या तनावातून थोडसं शांत व्हावसं वाटतं आणि कुठेतरी एकटं बसावं,किवा चहाच घेऊन येऊ दे,किवा फूटाळाच्या किनारी थोडा वेळ जाऊन बसून येऊ दे किवा लाँग ड्राईवला जावसं वाटतं किवा कॉफी किवा आईस्क्रीम खावसं वाटतं पण हे करत असताना, महिलांना घडयाळाकडे लक्ष द्यावं लागतं की या वेळी मी निघू शकते का?अशा वेळी महिलांना मदत मागावी लागते घरातल्या कुठल्या तरी पुरुषाची की माझ्यासोबत चल!मात्र ते पण नको असेल तरी अशा वेळी घराबाहेर पडल्याने लोकं वेगळ्या दृष्टिने बघत असतात,वेगळा विचार करतात,आजच्या या उपक्रमातून मला हेच सांगायचं आहे, की महिला या चहा टपरीवर दिवसा दिसू देत किवा रात्री अपरात्री दिसू देत,मी चांगल्या घरातली,चांगल्या वागणूकीचीच महिला आहे.महिलांना फक्त घड्याळीच्या काट्यानुसार तोलू मोलू शकत नाही आणि शेवटी कुठलाही ताणतनाव हा आरोग्याशी देखील निगडीत असतो.तुमचं मानसिक स्वास्थ चांगलं असेल तर शारीरिकरित्याही तुम्ही तंदुरुस्त राहता,तुमच्या कामामध्येही उर्जावान राहता.त्यामुळेच मला हेच अधोरेखित करायचं आहे, की महिलांमधील मानसिक आनंद हा खूप महत्वाचा आहे मात्र महिलांच्या मानसिक,आर्थिक,शारीरिक स्वास्थाकडे सतत दूर्लक्ष होत असतं.यामुळेच चौकट तोडून,बाहेर पडण्याचं हे छोटसं पाऊल उचललं आहे.एक छोटा सा चहा,याने आज सुरवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

हा संदेश तुम्ही नागपूरकर पुरुषांना दिला आहे का की रात्री बारा वाजताही मी चहा टपरीवर दिसू शकते?या प्रश्‍नावर बोलताना,नुसतं पुरुष नाही,पुरुष करतात म्हणून मला त्यांच्याशी स्पर्धा करायची आहे,असा देखील या उपक्रमाचा हेतू नाही,स्त्री असू दे किवा पुरुष,ते माणूस आहेत.आपल्या विदर्भात तर माणूस म्हणजेच पुरुष,अशी व्याख्या आहे,माणसाच्या व्याखेत स्त्रिया कुठेच येत नाही,पण आपण माणसेच आहोत,संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहे,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा सर्वात मोठा अधिकार आहे, मात्र महिला या एकस्प्रेस ऐवजी सप्रेस करतानाच आढळतात,त्यांची मते ही व्यक्तच होत नाही,म्हूणनच मला वाटतं हे पाऊल अभिव्यक्तीसाठी आहे,जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा आपण स्वस्थ राहतो. आपल्याला स्वस्थ राहायचं आहे,आपलं आयुष्य पुढे आनंदात जगायचं आहे,तोच आनंद आपण या ठिकाणी सगळ्यांच्याच चेह-यावर बघतोय मला वाटतं तो फारच महत्वाचा आहे,असं त्या म्हणाल्या.

या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांच्यासोबत या उपक्रमला हजेरी लावली.‘सत्ताधीश’ने त्यांच्यासोबत संवाद साधत,नागपूरमधला हा उपक्रम आगळावेगळा व कदाचित पहीलाच उपक्रम असल्याचे सांगून याबाबत मत विचारले असता,हा अतिशय सुंदर असा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करणा-या महिला,आय टी क्षेत्रात काम करणा-या महीला असोत त्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडावं लागतं.रात्रीच्या वेळी घरा बाहेर पडताना मात्र समाज म्हणून खूप बंधने या महिलांवर घातलेले आहेत म्हणून ‘चाय पे चर्चा ’म्हणत रस्त्यावरणं बाहेर पडत,ख-या अर्थाने जगण्याचा आनंद घेणारा एक नवीन उपक्रम ॲड.स्मिता सिंगलकर यांनी सुरु केला आहे.या त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते.पुण्यात तसेच मुंबईत ‘नाईट बाईक रॅली’च्या माध्यमातून आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो,की चोवीस तास तुमचे आहेत,स्वातंत्र्याचे आहे,सुरक्षेचे आहे,तुमच्या करिअरचे आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा जगण्याचा अधिकार आहे जो तुम्हाला घटनेने दिलेला आहे,तुम्हाला जगता यावं यासाठीच आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश देण्यासाठीच या उपक्रमात उपस्थिती दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नागपूरातील सुप्रसिद्ध लेखिका व नाट्य क्षेत्राशी संबंधित ज्योतसना पंडीत यांच्याशी संवाद साधला असता,आम्ही हे अनेक वर्षांपासून उपभोगतोय आणि अगदी खरं सांगायचं तर खूप एन्जॉय करत असल्याचे त्यांनी सांगितलं, कारण आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या नाटकांमध्ये शेवटची घंटा जेव्हा वाजते तेव्हा मध्यरात्रच उजाडली असते.मग आम्ही कुठे तरी चहाचा ठेला शोधतो मात्र याची सवय सहसा नाही आहे.पुरुषांना ही नाही व महिलांही देखील हा ‘सवयीचा भाग’नसतो.तो एक टॅबू विषय आहे कि निघावं का?कारण आपल्याकडे काहीही म्हटलं तरी ‘संस्कार‘खूपच लवकर मध्ये येतात!हे ब-या पैकी सुरु झालं होतं पण परकूलेट झालं नव्हतं त्याला आता प्रसिद्धी मिळाल्यास, ज्यांच्या कुणाच्या मनात असेल की असं केव्हाही घराबाहेर जाता येत नाही त्यांच्यासाठी सगळी दारे या उपक्रमानंतर खूली होतील.

यावेळी नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध व गुणी रंगकर्मी वैदेही-चोरे सातोकर हिच्याशी संवाद साधला असता,तिने या उपक्रमाला परिवर्तनाची नांदी,असे संबोधले.इथून सुरवात झाली आहे आणि ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे कारण प्रत्येक जण आज येथे एन्जॉय करताना दिसतोय,मध्यरात्रीचा चहा आणि लोकांचा विचार बदलणे यासाठी कुठेतरी सुरवात व्हायला हवी आणि ती इथून झाली आहे आणि ही सर्वात सर्वोकृष्ठ गोष्ट मला वाटतेय,असे ती म्हणाली.

थोडक्यात काल मध्यरात्री पार पडलेल्या या उपक्रमाविषयी चांगलेच चर्वितचवर्णही समाज माध्यमात घडले. अनेकांनी सांगितले ही संकल्पना आवडली म्हणून सहभागी झालो.मात्र मूळ संकल्पना ही मनातील तानतणाव घालवण्यासाठी ‘एकटीने’ घराबाहेर पडणे ही असताना अनेक महिला हे आपापल्या नवरा-मुलांसोबत उपस्थित झाल्या!

यात कष्टकरी महिलांचा वर्ग सहभागीच झाला नसून चार चाकीतून आलेल्या उच्च मध्यमवर्गीय महिलांचा सहभाग सर्वाधिक होता.विचारांची देवाण-घेवाण,एकमेकांची ओळख,एखादा ग्रूप फॉर्म करुन पुढील उपक्रमातील सहभाग,यावर चर्चाच झाली नाही तर फक्त ‘चहा’चा घोट घेण्यातच व आपापल्या ओळखीच्या महिलांसोबत संवाद साधून या उपक्रमाची सांगता झाली.

तनाव घालवण्यासाठी, घरातून चहा पिण्यासाठी किवा फेरफटका मारण्यासाठी सजून धजून महिला बाहेर पडत नाहीत,यावर ही चांगलेच तोंडसुख घेण्यात आले.

सर्वच क्षेत्रातील महिलांसाठी प्रेरणादायी संकल्पनेच्या या उपक्रमात राजकीय वर्तुळातील महिलांनी सहभाग नोंदवला परिणामी या संकल्पनेला एखाद्या ‘इव्हेंट’चे स्वरुप लाभले!

खरे तर‘ती‘च्या मधल्या ‘स्व‘साठी ‘आज ही’ घरातच हवा एखाद्या तिचा सुरक्षीत ‘कोपरा’जिथे ती तिच्या आनंदाचे,आवडीचे आणि स्वातंत्र्याचे क्षण जगू शकते,उपभोगू शकते.तिचे छंद जोपासू शकते,मुक्तपणे मित्र-मैत्रीणींसोबत मनसोक्त गप्पा मारु शकते.

कारण…‘नाईट टी विथ आजादी’ही संकल्पना कितीही कौतुकास्पद आणि चांगली असली तरी….आज ही देशपांडे सभागृहातून रात्री ९ वाजता सुरु होणारे नाटक साढे बारा वाजता संपतं … नागपूर शहराच्या एखाद्या कोप-यात राहणा-या तिच्या घरी रात्री एक वाजताच्या अंधारलेल्या,सामसूम रस्त्यांवरुन जाण्याचे धाडस ती आजही करु शकत नाही मग एखाद्या चौकात मैत्रीणींसोबत चहाचा घोट घेणे तर खूप दूरची गोष्ट ठरते कारण… आज ही पोटात दारु रिचवून उन्मत झालेले दहा पंधरा टार्गट मुलांचे टोळके याच रस्त्यांवरुन हूल्लडबाजी करीत मध्यरात्री फिरतानाचा अनुभव अनेकांना येतोच….पोलीस यंत्रणा प्रत्येकाला वैयक्तीक सुरक्षाही पुरवू शकत नाही त्यामुळे मनावरील तनाव घालवण्यासाठी घरातील एक जिव्हाळ्याचा कोपरा व कुटुंबियांच्या मनात, काळजीचा एक जिवंत कोपरा हा आज ही तिच्यासाठी सर्वाधिक सुरक्षीत व तनाव घालवणाराच ठरताना दिसून पडतो….!

तरी देखील… रात्री-अपरात्री महिला एकटी रस्त्याने जात असल्याचे बघून नागपूरकरांनीही आपली मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.महिला रात्री एकट्या जात असल्याचे बघण्याची ‘सवय’झाली पाहिजे इतक्या महिलांनी रात्री घराबाहेर निघण्याचे धाडस करावे,एवढ्या संख्येने महिला आपल्या विरुंगळ्यासाठी रात्रीच्या वेळी रस्त्यावर निघत राहतील तर इतर ही महिलांना त्या एकट्या नाहीत व त्यामुळे त्या सुरक्षित देखील आहेत,अशी जाणीव होईल हाच या उपक्रमाचा हेतू आहे.

आज पुणे-मुंबईसारख्या विकसित मानसिकतेच्या शहरात रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत महिला या बेधडक घराबाहेर पडून चहा-कॉफी शॉपमध्ये गप्पा मारतानाचे दृष्य हे खरोखरंच मनाला सुखावणारे वाटतात,एकट्या दुकट्या महिलांना रात्रीच्या तीन वाजता ही घराबाहेर पडताना बघून, तेथील लोकांना आश्‍चर्य वाटत नाही किंबहूना या गोष्टीची दखल घेण्यास पुणे-मुंबईकरांना ‘सवड आणि सवय’ दोन्ही ही नाही.नागपूर व संपूर्ण विदर्भात अशी विकसित व आधुनिक मानसिकतेची मुहूर्तमेढ करण्यासाठीच जणू ‘नाईट टी विथ आजादी’चा कालचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता,असेच आता म्हणावे लागेल.

………………………………………..

Latest बातम्या