Homeनागपूर न्यूजआम्ही नाही पाडली,अंर्तविरोधाची सरकार होती,पडली!:फडणवीस

आम्ही नाही पाडली,अंर्तविरोधाची सरकार होती,पडली!:फडणवीस

Advertisements

‘मिट द प्रेस’कार्यक्रमात साधला पत्रकारांशी संवाद

नागपूर,५ जुलै २०२२: : प्रेस क्लब येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला.या वेळी पत्रकारांवरच कोपरखळी मारताना नागपूरकर पत्रकारांचे माझ्यावर विशेष प्रेम असल्याने कोणीही मला चुकीचे प्रश्‍न विचारुन ‘अडचणीत’ आणनार नाही कारण आपल्या नागपूरकरांनाही माहिती आहे पाहूणा म्हणून बोलावल्या जातं त्यांना अडचणीत आणायचं नसतं,असं ते म्हणाले.

प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, प्रवीण दटके, मोहन मते, टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी यावेळी उपस्थित होते.

कालच आम्ही विश्‍वास मत प्रस्ताव प्रचंड बहूमतानं जिंकला असल्याचे ते म्हणाले.१६७ मते आम्हाला पडली तर विरोधकांना शंभरीही गाठता आली नाही त्यांना फक्त ९९ मते मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.खरं तर २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या युती सरकारलाच सत्ता स्थापनेसाठी कौल दिला होता.पण आमचा कौल हा छद्मीपणे पळवून नेण्यात आला आणि अनैसर्गिक अश्‍याप्रकारची आघाडी तयार झाली.ही आघाडी झाली त्याचवेळी मी सांगितलं की अशी अनैसर्गिक आघाडी फार काळ चालत नसते.

मी मुख्यमंत्री झालो नाही याचं मला दु:खं नव्हतं मात्र आलेल्या आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला पूर्णपणे ब्रेक लावून विकासाचे सर्व प्रकल्प थांबवले.शेतकरी हिताचे निर्णय थांबवण्यात आले.औद्योगिक विकासावरही त्याचा परिणाम झाला.मी वारंवार ज्याचा उल्लेख केला त्या विदर्भ व मराठवाडासारख्या मागास भागावर आघाडी सरकारने प्रचंड अन्याय करने सुरु केले.

वैधानिक विकास मंडळे गुंडाळून ठेवली,प्रकल्प ठप्प केले.औद्योगिक उद्योगांच्या विजेची सबसिडी संपवून टाकली म्हणून मला सरकार गेल्याचं,मुख्यमंत्री पद गेल्याचं दु:खं नव्हतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच अब्ज अर्थविकासाच्या ध्येयात, एक अब्ज अर्थ विकासाचे महाराष्ट्र जे योगदान देऊ शकला असता आणि सामान्यांची स्वप्न पूर्ण करु शकला असता तो महाराष्ट्र कुठे तरी थांबला याचं दु:खं मला रोज असायचं.

एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून मी काम करीत राहीलो,करोनाच्या काळातही एक ही दिवस मी घरी बसलो नाही.प्रत्येक जिल्हात,आयसीयूतही जीवाची पर्वा न करता गेलो.लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे हा प्रयत्न केला.यात मला देखील करोना झाला होता पण मी सामान्यांसारखेच सरकारी रुग्णालयातच उपचार घेतले,बरा झालो आणि सातव्या दिवशी बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्राचा दौरा केला.

सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करीत असताना या सरकारमधला अंर्तविरोध दररोज मला दिसत होता.शिवसेनेतील घुसमट मला दिसत होती.सरकार बनले होते,मंत्री ही बनले होते पण दररोज त्यांच्यासमोर हा प्रश्‍न असायचा बाळासाहेबांनी जे हिंदूत्व, राज्यात व संपूर्ण देशात प्रत्यक्षात आणून दाखवलं,त्याच्यापासणं पूर्ण फारकत घेऊन आणि बाळासाहेबांनी ज्यांच्याबद्दल म्हणाले होते की काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत मला जावं लागलं तर मी आपली दूकान बंद करील,त्यांच्यासोबत त्यांना रोज बसावं लागत होतं.

हीच अस्वस्थता शिवसैनिक आमदारांमध्ये प्रचंड होती आणि त्याच अस्वस्थेच्या जिवावर इतर पक्ष हे शिरजोर होत होते,ही शिरजोरी आमदार,खासदार,नेते आणि कार्यकर्तेही बघत होते.यातूनच शिवसेनेत उठाव झाला आणि त्या उठावाला भाजपने साथ दिली.ते बंड नव्हतं तर उठाव होता.शिवसेना आमदारांना ही चिंता खात होती की आमचा पक्ष राहणार नाही,विचार राहणार नाही.ज्या हिंदूत्वाच्या विचारधारेवर इतकी वर्षे आम्ही काम केलं,ती विचारधाराच आघाडीत तुडवली जात आहे,आपापल्या मतदारसंघात २०२४ मध्ये कोणता चेहरा घेऊन जाणार?

त्यामुळेच ते आमच्यासोबत आलेत पण आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेकरिता हपापले नाही आहोत.आमचे ११५ आमदार हाेते आमचा मुख्यमंत्रीही करता आला असता, पण आम्हाला सत्तेसाठी मिळालेला कौल हा जे आरोप करुन २०१९ मध्ये चोरुन नेण्यात आले,त्यामुळेच आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु असं ठरवलं.

खरं तर हे प्रपोजल मीच दिल्लीश्‍वरांकडे नेलं कि शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही ते मान्य केलं.त्यावेळी मी मंत्रीमंडळा बाहेर राहील हेच ठरलं होतं.पत्र परिषदेतही मी त्याचा उल्लेख केला होता.

मात्र राज्यपालांना पत्र देऊन मी जेव्हा घरी गेलो त्यावेळी नड्डा यांनी फोन करुन कळवले की मी सरकारमध्ये राहीलो पाहिजे.अमित शहा हे देखील बोलले.माझी मानसिक तयारी त्यावेळी नव्हती कारण मी ठरवलं होतो या सरकारला बाहेर राहून संपूर्ण मदत करायची, पण दिल्लीश्‍वरांचे हे धोरण होते की बाहेरुन पाठींबा देऊन सरकार चालत नसतात.संवैधानिकरित्या सरकारच्या आत राहूनच निर्णय प्रक्रिया यशस्वीरित्या राबवली जाऊ शकते.

माझ्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ मी घेतली आणि मला याची कोणतीही खंत नाही.एकनाथ शिंदे माझे सहकारी आहेत,माझ्यासोबत काम केलं आहे,आज ते नेते पदी आहेत.त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय,माझं संपूर्ण सहकार्य त्यांना असणार आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालेच पाहिजे आणि ते होतीलच,याकरिता सर्वात जास्त पाठींबा मी देणार आहे आणि आम्ही दोघं मिळून विशेषत: महाराष्ट्राची जी विकासाची पटरी खाली उतरली आहे तिला पुन्हा रुळावर आणू.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुन्हा देशातला क्रमांक एकचं राज्य करु,हे आम्ही केल्याशिवाय राहणार नसल्याचे फडणवीस म्हणाले.

पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर शिवसेनेतील अंतर्गत खदखद पहील्या दोन महिन्यातच माझ्या लक्षात आली होती असे ते म्हणाले.मी त्यावर नजर ठेऊन होतो.योग्य वेळी योग्य गोष्ट करणं यालाच राजकारण म्हणतात,असे ते म्हणाले.

मंत्री मंडळाच्या विस्तारासंदर्भात बोलताना ते म्हणाले की अद्याप विस्तारासाठी वेळ मिळाला नाही,लवकरच आम्ही एकत्रित बसू आणि निर्णय घेऊ.आधी आम्हाला आमच्या मतदारांचे आभार मानण्यासठी आपापल्या मतदारसंघात येणे गरजेचे होते.ते काल ठाण्यात गेलेत मी आज नागपूरला आलो.आज कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाण्याजोखा होता,असे ते म्हणाले.

यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंचा ही फडणवीसांनी उल्लेख करुन, त्यांनी अतिशय प्रेरणादायी पत्र लिहले असल्याचे सांगितले.मला अश्‍यावेळी ते पत्र मिळाले ज्यावेळी मला आम्ही एक कोणतातरी निर्णय घेऊन सत्तेवर आलो होतो.अश्‍यावेळी त्यांच्या पत्राने प्रेरणा दिली.राजकारणात अनेक वेळा आम्ही सोबत असतो,अनेक वेळा विरोधातही असतो पण त्यांच्या पत्रातले जे प्रेरणादायी शब्द हाेते त्याने फार मोठा दिलासा मिळाला.मी फोन करुन राजला हेच सांगितले,एक दिवस झाला मी तुमच्यासारखे शब्द शोधतोय पण मला ते न सापडल्यानेच मी फोन करुन आभार मानतोय.तसंही त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे,त्यांना मी आता मुंबईला गेल्यावर भेटायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले मात्र लगेच आमच्या भेटीचे अन्वायर्थ काढू नका,अशी कोपरखळीही याप्रसंगी फडणवीस यांनी मारली.

यावेळी बोलताना महाराष्ट्रात आम्ही काेणतंही ’ऑपरेशन लोटस‘राबवलं नाही एक अंर्तविरोधतली सरकार होती त्यामुळे ती टिकली नाही असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी बोलाना त्यांनी शिवसेना आम्ही संपवली असा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले.शिवसेना म्हणजे काय?शिवसेना हा केवळ एक पक्ष नाही तर एक विचारधारा असल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना पत्रकारांना आश्‍वासन देत,तुम्ही मुक्त मनाने सरकारच्या कारभारावर टिका करा,आमची सरकार तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही,असा टोला त्यांनी आघाडी सरकारला हाणला.

खरी शिवसेना कोणाची?निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार?या प्रश्‍नावर बोलताना,बाळासाहेबांच्या विचारांवर ठामपणे उभी असणारी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची शिवसेना असल्याचे ते म्हणाले.उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपत्र आहेत त्यामुळे कौटूंबिक वारसा निश्‍चितच त्यांच्याकडे आहे मात्र पक्ष चालवायला पारिवारिक नव्हे तर ‘वैचारिक’वारसा लागत असल्याचा टोला त्यांनी हाणला.अर्थात तो बाळासाहेबांचा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे निघाले आहेत,त्यामुळे या संदर्भात कुठलंही भविष्य मी सांगणार नाही आणि कुठलंही भाष्य करणार नाही,असे त्यांनी सांगितले.

शेतक-यांचे जीवन समृद्ध करणा-या योजना या,या सरकारचे प्राधान्य असणार अाहे,असे ते म्हणाले.पूर स्थितीकडेही आमचे लक्ष असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांनीही जनतेच्या काळजीची विचारपूस केली तर मी देखील रात्री १ वाजता जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.वशिष्ठ नदीची पातळी धोक्याच्या पातळीपासून साढेचार फूट खाली अाल्याची माहिती मिळताच मी फोलोअप घेणे बंद केले,अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

आम्ही एकमेकांना देणार आहोत,घेणार नाहीत-
उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांकडे ‘फडणवीस यांनी काल ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरुन पत्र परिषदेत माईक खेचला ते बघता ते पुढे काय-काय खेचतील याचा नेम नाही’असा टोला हाणला होता, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फार काळ अधिवेशनात आलेच नाहीत,मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर आधी मुख्यमंत्री कधीही बोलत नसतात तर आभार व्यक्त करण्यासाठी शेवटी बोलत असतात,असे फडणवीसांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणून माझी जवाबदारी होती,अभिनंदनाचं पहिलं भाषण मी केलं पाहिजे,ही प्रथा परंपरा आहे त्यामुळे विश्‍वास मत अभिनंदनाचं भाषण पहिले मी केलं तरीही उद्धव ठाकरें यांनी आमची चिंता करु नये,आम्ही एकमेकाला देणार आहोत,एकमेकांकडून घेणार नसल्याचा टोला त्यांनी हाणला.

उपहासाला उत्तर द्यायचं नसतं-
‘सामना’मध्ये आज देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री होण्यापासून कोणी रोखलं?यावर संपादकीय आल्याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता,‘सामनाला’मी मुख्यमंत्री झालो नाही याचं दूूूूूूूूूूूूूूूूूूू:खं आहे का?तर ते दू:खं नसून उपहासच आहे आणि अश्‍या उपहासाला उत्तर द्यायचं नसतं,असे फडणवीस म्हणाले.

मंत्री भ्रष्टाचारी नाहीत तर भ्रष्टाचाराचा आरोप सामुहिक सरकारवर-
एका प्रश्‍नाच्या उत्तरात आघाडी सरकार ही महाभ्रष्टाचारी असल्याचे फडणवीस यांनी वारंवार आरोप केले,दोन मंत्री तुरुंगात आहे,आता त्याच सरकारमधील ९ मंत्री शिंदे सरकार मंत्रीमंडळात घेणार याचा अर्थ संपूर्ण सरकार भ्रष्ट आहे असा होत नाही.सरकार ही सामुहिकस्तरावर काम करीत असते.त्यात अनेक घटक असतात.शेवटी हे काम प्रमुखाचं आहे.मी सरकार चालवली आहे.प्रमुखाने ठरवलं तर सरकार पाददर्शीपणे सरकार चालवू शकतं आणि प्रमुखाने ढिल दिली तर सरकार भ्रष्टाचार करतं.

उपमुख्यमंत्री पदही संवैधानिकच-
उपमुख्यमंत्री असं कोणतंही पद संविधानात नसलं तरी उपमुख्यमंत्री शेवटी संविधानाचीच शपथ घेत असतो त्यामुळे मी असं कधीच म्हटलं नाही की उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही.मुख्यमंत्री हा प्रमुख असतो तर उपमुख्यमंत्री पद हे पॅरलल नसतं.आमचे प्रमुख हे एकनाथ शिंदेच असल्याचे फडणवीस म्हणाले.

आमचा तर अजेंडाच विदर्भ विकासाचा-
महाराष्ट्राचा विकास हा तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत विदर्भाचा,मराठवाड्याचा विकास होऊ शकत नाही.आमचा अजेंडा मागास भागांचा विकासाचाच असणार आहे,असे ते म्हणाले.विदर्भ व मराठवाडा या मागास भागांच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागांच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.विदर्भातील ८९ सिंचन प्रकल्पांना यापूर्वी मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ही ते म्हणाले..

महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याचा संकल्प असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या मागास भागांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सिंचन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रासाठी असलेली वीज दर सवलत तसेच वैधानिक विकास मंडळे  पुनर्जीवित करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेती आणि शेतकरी यांचा अधिक शाश्वत विकास करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, सौर कृषिपंप यासारख्या योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यापासून शेती व शेतकरी वाचविण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासोबतच मानवी चुकांमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. आवश्यक तेथे वेगाने मदत पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेला मदत करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवू-

राज्याच्या काही भागात पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा सर्वांगीण विकास करताना बारा बलुतेदार समुहातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करुनच परिपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येईल. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे, याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले. प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. संजय तिवारी यांनी आभार मानले.

समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग-

विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या विकासाला पोषक असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग देवून निश्चित कालावधी हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच मिहान प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेयात येईल.

Latest बातम्या