
मुंबई: सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्याने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवसभरातील वेगवान घडामोडींनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण देतानाच आज सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यावर प्रतिसाद देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार पावणेसात वाजताच्या सुमारास शिवसेना नेते राज्यपालांकडे पोहचले. शिवसेनेने राज्यपालांकडे आपल्या आमदारांचं सह्यांचं पत्र सादर केलं व सत्तेवर दावा सांगितला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यांच पत्र देण्यासाठी शिवसेनेने तीन दिवसांचा वेळ वाढवून मागितला. मात्र, राज्यपालांनी हा वेळ वाढवून दिला नाही. त्याचवेळी शिवसेनेचा सत्तेवरील दावाही मात्र त्यांनी फेटाळलेला नाही.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार की नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या हाती आहे. त्यावर शिवसेनेला कोणतंही भाष्य करायचं नाही. आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं पाठिंब्याचं पत्र मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्यपालांकडे जाणार आहोत, असेही आदित्य यांनी पुढे नमूद केले. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणत्याही स्थितीत आम्हाला खोटं बोलणाऱ्यांसोबत सरकार आणायचे नाही, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.


आमचे चॅनल subscribe करा