

काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचा राजीनामा
समर्थकांचा डोळा आता संघटनात्मक निवडणूकीवर
नागपूर,ता.२ जून २०२२: कॉंग्रेसचे राष्ट्रीय चिंतन शिबिर नुकतेच उदयपूर येथे पार पडल्यावर आता साईबाबांची नगरी शिर्डी येथील प्रादेशिक शिबिरात ‘एक व्यक्ती एक पद’चा फॉर्म्यूला जरी मांडण्यात आला व पाच वर्षांपासून ज्यांच्याकडे पदे आहेत त्यांनी जरी पद सोडले असले व यात काँग्रेसचे नागपूरचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याही समावेश असला, तरी ऑक्टोबरमध्ये होणा-या नागपूर महानगरपालिकेची निवडणूक ही आ.विकास ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष पदी विराजमान असताना लढल्या जाणार असल्याचा विश्वासत ठाकरे यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.
काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक या दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्याची घोषणा कॉंग्रेसचे (Congress) महासचिव एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिर्डीत केली. मात्र ऑगस्टमध्ये काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणूका पार पडणार आहेत.या निवडणूकीत पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदाची माळ आ.विकास ठाकरे यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे ठामपणे सूत्र सांगत आहेत.उदयपूरच्या चिंतन शिबिरात ’एक व्यक्ती एक पद’ठराव पारित झाल्यानंतर लगेच आ.विकास ठाकरे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सोपवला होता,तो राजीनामा आता शिर्डी येथील शिबिरादरम्यान स्वीकारण्यात आल्या असल्याचे समाेर आले आहे.
असे असले तरी महाराष्ट्राच्या उपराजधानीत गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती,पुढील निवडणूकीत भाजपला ’एंटी इन्कम्बंसी’चा फटका बसण्याची शक्यता वर्तिवली जात असताना महापौर पद भूषविणारे आ.विकास ठाकरे यांच्या अनुभवी नेतृत्वाला विद्यमान प्रदेशाध्यक्ष हे हात लावणार नाहीत अशी देखील शक्यता वर्तविली जात आहे.
आ.विकास ठाकरे यांनी राजीनामा दिल्याची वार्ता धडकताच भावी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची नावेही माध्यमात चर्चिली जात आहेत मात्र यात तथ्य नसल्याचे बोलले जात आहे.भाजपसारख्या मजबूत पक्षाला ज्या पक्षाच्या संघनात्मक बांधणीला तोड नाही अश्या पक्षाला येत्या निवडणूकीत तोंड देण्यासाठी ऐन निवडणूकीच्या तोंडावर नेतृत्वबदल होणार नाही,असा दावा विकास ठाकरे यांचे समर्थक करीत आहेत.
तसेही आमदार असणे हे पक्षाचे पद नसल्यामुळे व ’एक व्यक्ती एक पद’या निर्णयाचा मान राखित पुन्हा एकदा विकास ठाकरे यांनाच शहराध्यक्ष पदी नियुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे.त्यांना असणारा मनपा निवडणूकींचा अनुभव,संघटनेवर पकड,समर्थकांची फौज व आर्थिक क्षमता या सर्व जमेच्या बाजू बघता ऐन निवडणूकीच्या तोंडावर शहरात काँग्रेस पक्ष नेतृत्व बदल करणार नसल्याचे बोलले जात आहे.
शिर्डी येथील शिबिरात महाविकासआघाडीसोबत युती करण्यावर देखील विचारमंथंन झाले.आज मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील पक्षातंर्गत बैठकीत महाराष्ट्रातील १४ मनपा निवडणूकीत आघाडी करण्याची स्पष्ट सूचना केली आहे,ते पाहता नागपूरात नवे नेतृत्व अशी आघाडी झाल्यास, जागावाटपावरुन काँग्रेसला कोंडीत न येऊ देण्याची क्षमता सिद्ध करतीलच याबाबत पक्षाच्या पदाधिका-यांनाच शंका आहे.त्यामुळे सध्यातरी शहरात नेतृत्व बदल न करण्याचा निर्णय घेतला जाईल,असा आशावाद ठाकरे समर्थक व्यक्त करतात.
मागील निवडणूकीत विकास ठाकरे यांनी तिकीटवाटपाची जबावदारी समर्थपणे पेलली होती.’बी’फॉर्मचा घोळ,रुसवे,फूगवे,असंतुष्टांची फौज,दगा-फटका,पक्षांतर या सर्वबाबी कोणत्याही निवडणूकीतील अपरिहार्यता असल्यामुळे नवे शहराध्यक्ष या सर्व बाबींवर मात करुन काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या दुपटीवर कश्यारितीने नेऊ शकतील?याबाबत पक्षातील श्रेष्ठींच सांशक असल्याने ,संघनात्मक निवडणूकीनंतर ऐन निवडणूकीच्या तोंडावर नागपूर सारख्या अति महत्वाच्या शहराचा अध्यक्ष बदलून आंधळी कोशंबिर खेळण्याबाबत श्रेष्ठींच विचार करणार नाहीत,त्यामुळे विकास ठाकरे यांची पुन्हा एकदा शहराध्यक्ष पदी ,नियुक्ती केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय नागपूर शहरात काँग्रेस पक्षाला वाळवीप्रमाणे पोखरणारी ‘गटबाजी’ याला देखील आ.विकास ठाकरे आणि त्यांचा गट पुरुन उरला असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे देखील निदान नागपूरात तरी नेतृत्वबदलाची शक्यता फारच अंधूक असल्याची चर्चा ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये रंगली आहे.साईबाबांच्या ’श्रद्धा आणि सबुरी’वर आ.विकास ठाकरे यांच्या समर्थकांचा विश्वास यामुळे ठलकपणे अधोरेखित होतो.
राजेंद्र मुळकसुद्धा पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून नागपूर जिल्हा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी होते. त्यामुळे त्यांनीही तात्काळ आपल्या पदाचा राजीनीमा दिला आहे. ग्रामीणमध्ये मात्र नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकतात,अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमचे चॅनल subscribe करा