Homeनागपूर न्यूजमध्य भारतातील नागपूरजवळ मोठे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारावे

मध्य भारतातील नागपूरजवळ मोठे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारावे

डॉ.आशिष देशमुख यांची मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

फडणवीस यांच्या माध्यमातून सहकार क्षेत्र सांभाळणारे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासाठी देशमुख यांनी दिले पत्र

नागपूर,ता.२० मे २०२३: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राज्याचे भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी विदर्भाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली.इफको लिमिटेड, गांधीनगरच्या माध्यमातून नागपूरजवळ ,मध्य भारतात एक मोठे इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारणे याबाबत चर्चा झाल्याचे आशिष देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. या विषयावरील एक पत्र आशिष देशमुख यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेले असून ते पत्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठविले असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

नागपूर हे मध्य भारतातील एक आघाडीचे मेट्रो शहर आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा आहेत. GAIL नैसर्गिक वायू पाइपलाईन जी मुंबईपासून ओडिशातील झारसुगुडापर्यंत जाते, ती आता सुरू होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. विविध उत्पादन करणाऱ्या मोठ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्ससाठी लागणारा गॅस या पाइपलाईनद्वारे पुरविला जाऊ शकतो. दूर असलेले प्लांट्स किंवा आयातीच्या पूर्ततेसाठी या पाइपलाईनची नितांत गरज आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गाजवळून येणाऱ्या पाईपलाईनचे ८० टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि २०२४ च्या मध्यापर्यंत औद्योगिक ग्राहकांना त्याद्वारे गॅस पुरवठा सुरू करता येईल. CGD साठी काही वेळ लागू शकतो, परंतु मोठ्या आणि लहान प्रकारच्या ग्राहकांसाठी गॅस उपलब्ध आहे. मार्गाच्या मधे असलेले मोठे कॉम्प्रेसर दाब निर्मिती करून तसेच गॅस प्रवाह वाढवून जास्तीच्या गॅस पुरवठ्याची पूर्तता करू शकतात.

इथे इतर संभाव्य उत्पादनांसह युरिया, अमोनियम नायट्रेट आणि डीएपीला खूप मागणी आहे. नागपूरजवळ स्फोटकांच्या निर्मितीसाठी अंदाजे ५ लाख मॅट्रिक टन अमोनियम नायट्रेट आवश्यक आहे. सर्वस्तरावरून विस्तार केल्यास याची पूर्तता 1 MMTPA पर्यंत होऊ शकते. रॉक फॉस्फेट हे डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) तयार करण्यासाठी आवश्यक असून जवळच्या मध्य प्रदेशात उपलब्ध आहे आणि काही प्रमाणात वेगवेगळ्या देशांमधून आयात केले जाऊ शकते.

चार बंदरे समान अंतरावर असल्याने त्यांचा उपयोग तिथून रॉक फॉस्फेट रेल्वेने आणण्यासाठी होऊ शकतो. रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग आणि इतर वाहतूक मध्य भारतात सर्वोत्तम आहेत आणि खर्च कमी करण्यास मदत करतात. जमीन, वीज, पाणी, मनुष्यबळ, परिसरातील वापराच्या वस्तू यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा नागपुरात सहज उपलब्ध आहेत. तसेच सद्यस्थितीतील राज्य सरकार गुंतवणूकीसाठी अनुकूल आहे आणि अशा प्रकारच्या शेतकरी-अनुकूल आणि फॉरेक्स-बचत प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी नेहमीच तयार आहे.

प्रकल्प शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी व उत्तम व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी सरकार नैसर्गिक वायूच्या प्रशासित किंमतीवर काही सूट देण्याचा विचारही करू शकते. तथापि, औद्योगिक गरजांमुळे अमोनियम नायट्रेटलाही चांगली किंमत मिळू शकते. शासनातील सबसिडी, लॉजिस्टिक आणि वितरण खर्च यांवर होणाऱ्या बचतीमुळे हा प्रकल्प अधिक फायद्याचा ठरू शकतो,असे देशमुख यांनी आपल्या पत्रात विशद केले.

विदर्भात मोठे गॅस आधारित खत संकुल उभारण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा सरकारला होणारा मोठा फायदा. कारण यामुळे दशकभरापासून दूरच्या प्लांट्सपासून होत असलेली खरेदी किंवा आयात कायमची थांबेल आणि सरकारी अनुदाने, विदेशी मुद्रा या सर्व बचतीतून या प्रकल्पासाठी दिलेल्या गॅसच्या प्रशासित किमतींची भरपाई होऊ शकते.

दुसरे कारण असे आहे की, गॅसवर आधारित अनेक फर्टिलायझर प्लांट्स आहेत जे मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश सारख्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आधीच कार्यरत आहेत परंतु मध्य भारत वंचित पडला आहे. खरंतर अशा प्रकल्पाची येथे नितांत गरज आहे. मध्य भारतामध्ये कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात सर्वप्रकारच्या दर्जेदार खतांची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे,या प्रकल्पामुळे ही मागणी पूर्ण करता येईल,अशी खात्री देशमुख देतात. मी या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागेच्या संदर्भात अधिक माहिती देऊ शकतो; तुम्ही या प्रकल्पाची योग्यता तपासणार, अशी आशी ही त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

या भेटीत फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या लायब्ररीतील पुस्तकांचे अवलोकन केले आणि काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. विदर्भाला प्राधान्य देण्याचे काम असो, विकासाचे प्रकल्प असोत, शेतकऱ्यांचे हित, रोजगार या विषयांवर फडणवीस नेहमीच विदर्भाला झुकते माप देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास आशिष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

Latest बातम्या