Homeनागपूर न्यूजमतदार यादीत घोळ:भाजपचा आरोप

मतदार यादीत घोळ:भाजपचा आरोप

विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

नागपूर,ता. २४ नोव्हेंबर: पदवीधर मतदार संघातील मतदार यादीमध्ये अनियमिततेचा आरोप करीत आज मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी भाजप आमदार व शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांच्या अध्यक्ष् तेखाली विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात मतदानाच्या दृष्टिने अावश्‍यक व्यवस्था तातडीने उभारण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.या यादीतील अनेक अनियमिततता याकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष् वेधण्यात आले.यात अनेक मतदारांच्या नावाचे,आडनावाचे मुद्रण करताना अपभ्रंश करण्यात आला असल्याची भाजपतर्फे तक्रार करण्यात आली. अनेक मतदारांचे वय वर्षे १८,२० असे दर्शवण्यात आले आहे.अनेक मतदारांच्या वडीलांच्या नावा ऐवजी मतदाराचेच नाव पुन्हा छापण्यात आले.

अनेक मतदारांनी मुदतीमध्ये नाेंदणी करण्याकरिता अर्ज केल्यानंतरही त्यांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये नाहीत,परिणामी अनेक मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत.अनेक मतदारांची नावे एका शहरा ऐवजी दुस-याच शहरात दर्शवण्यात आल्याने याचा मतदानावर फार मोठा परिणाम होईल,असा भाजपचा दावा आहे.

ज्या मतदान केंद्रावर १०० पेक्ष्ा जास्त मतदार आहेत त्या सर्व केंद्रांना अतिरिक्त मतदान केंद्र देण्यात आलेले असून अश्‍या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची विभागणी केंद्राच्या यादीमध्ये प्रसिद्ध न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होणार असल्याचे भाजपने निवेदनात नमूद केले.

ज्येष्ठ नागरिक वय वर्षे ८० वरील तसेच दिव्यांग मतदार यांच्याकडे टपाली मतपत्रिका वेळेपूर्वी पोहोचणे आवश्‍यक आहे,या प्रक्रियेकडे विशेष लक्ष् देणे गरजेचे असल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले.

मतदार यादीतील मुद्रण दोषांमुळे विपरित परिणाम होऊ शकतो.याकरिता मतदान यादीमध्ये छायाचित्र आणि मतदार यांची सांगड घालून मतदारांना मतदान करता यावे याकरिता सर्व केंद्राधिका-यांना आपले लेखी आदेश द्यावे आणि मतदारांना कळवण्याच्या दृष्टिने प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी देण्याची तसेच सर्व उमेदवरांना लेखी कळवण्याची मागणी करण्यात आली .

जे मतदार विविध कार्यालयांमध्ये,आस्थपनेत कार्यरत आहेत त्यांना मतदानाच्या दिवशी त्यांच्या आकस्मिक रजे व्यतिरिक्त विशेष अतिरिक्त रजा घेता येईल असे जाहीर करुन देखील त्याबाबतचे आदेश अद्याप निघाले नसल्याकडे निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांचे लक्ष् वेधण्यात आले.असे आदेश जारी झाल्यास मतदारांना या रजेचा मतदान करण्याकरिता उपयोग होईल असे नमूद करीत वरील सर्व मुद्दांवर गांर्भीयाने विचार करुन मतदारांना व उमेदवारांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या नेतृत्वात माजी आमदार डॉ.मिलिंद माने, संजय भेंडे,संदीप जाधव,गिरीश देशमुख,सुनील मित्रा,राम अंबुलकर,संजय बंगाले,बाल्या बाेरकर,रमेश दलाल,विजय फडणवीस,विनय दाणी,श्‍याम चांदेकर,चंदन गोस्वामी आदी यांचा सहभाग होता.

Latest बातम्या