Homeनागपूर न्यूजमंदिर,करोना आणि राजकारण

मंदिर,करोना आणि राजकारण

Advertisements

(संपादकीय)

नागपूर,ता.९ ऑगस्ट: देशात दोन दिवसांपूर्वीच शनिवार दि.७ सप्टेंबर रोजी ४२ हजार ६१८ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर ३३० मृत्यूमुखी पडलेत.या आकड्यासोबतच देशाची एकूण कराेना संसर्गिंतांची रुग्ण संख्या ही ३ कोटी २९ लाख ४५ हजार ९०७ वर पोहोचली तर करोना मृतकांची संख्या ४ लाख ४० हजार २२५ वर पोहोचली.मृतकांचा हा आकडा छोटा नाही,करोनाच्या संसर्गामुळे कुटुंबात एकाचाही मृत्यू हा धक्कादायक असतो.मात्र याचे कोणतेही सोयरसूतक न ठेवता सध्या काही राजकीय पक्ष्ांकडून मंदिरे उघडा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या नावाने जोरजोरात शंख वाजवणे सुरु आहे.यासाठी मास्क न घालता आंदोलने ही केली जात आहेत,आपणच एकमेव हिंदूंचे कैवारी असून आघाडी सरकार मंदिरे बंद ठेऊन कश्‍याप्रकारे राज्यातील हिंदू समुदायावर अन्याय करत आहे,हे भाविकांच्या मनात आंदोलनांच्या माध्यमातून बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र जगभरात करोनाच्या तिस-या लाटेने जो कहर केला,त्याविषयी मात्र हे ‘आंदोलनजीवी’राजकीय पक्ष् जनतेला कोणत्याहीप्रकारे सावध करण्यास हिरीरीने सरसावत असताना दिसत नाही आणि हीच खरी शाेकांतिका आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे करोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्यांनाही डेल्टा प्लसने आपल्या विळख्यात घेतले असल्याने आपण दोन्ही लसी घेतल्या आहेत,आपल्याला डेल्टा प्लस तर काय त्या पुढील ही व्हेरियंट देखील कोणतीही बाधा पोहोचवू शकत नाही,हा भ्रमाचा भोपळा देखील यामुळे चांगलाच फूटला आहे.आजच नागपूरात ज्या १३ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली ते सर्व दोन्ही लसी घेऊन चुकले आहेत,यावर कहर म्हणजे या १३ जणांमध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे आणि हेच अतिशय काळजीचं कारण आहे.

नुकतेच उच्च न्यायालयानेही गर्दी न रोखल्यास गंभीर स्थिती उद् भवेल म्हणून राज्य सरकारला चांगलेच खडसावले आहे.करोनाचे संकट कायम असताना मुंबईतील जुहू,चौपाटी,गिरगाव चौपाटी,मरिन ड्राईव्ह अशा ठिकाणी गर्दी का होत आहे?आपण कोरोनाच्या पहील्या व दुस-या लाटेपासून काहीच शिकलो नाही का?वीकेण्डला होणारी लोकांची गर्दी रोखली नाही तर पुन्हा गंभीर स्थिती उद् भवेल अशा इशारा नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

सरकारी रुग्णालये व आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांवर वेळेत उपचार न झाल्यास किंवा वेगवेगळ्या विभागात फिरण्याची वेळ येऊन मृत्यू झाल्यास रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिका-यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचा कठोर निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने मागच्या आठवड्यात घेतला.यावरुन सरकारने व प्रशासनाने तिस-या लाटेची किती धास्ती घेतली आहे,हे स्पष्ट होतं.

विशेष म्हणजे राज्यातील ६ जिल्हे अजूनही हॉटस्पॉट आहेत.दुस-या लाटेचा जोर अद्याप ओसरला नसल्याने मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येत सतत चढ-उतार होत आहेत.या जिल्ह्यांमध्ये दिवसाला १०० ते १५० मृत्यू होत आहेत!पुणे,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगढ या ६ जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूचे प्रमाणत सर्वाधिक आहे.या हॉटस्पॉट असणा-या जिल्ह्यांमधून गणेशोस्तवाच्या उत्सवासाठी जास्तीत जास्त नागरिक इतर ठिकाणी प्रवास करतील त्यामुळे अन्य व्हेरियंटचा संसर्ग इतरत्र आणला किवा नेला जाईल त्यामुळे राज्यात करोनाची स्थिती पुन्हा गंभीर होण्यास वेळ लागणार नाही.

असे असताना काही राजकीय पक्ष् हे मंदिरे,.हिंदूत्व इ.मुद्दे घेऊन सर्रास आंदोलने करतात आहेत.करोनाच्या दुस-या लाटेत महाराष्ट्रसह नागपूरात अतिशय भयावह स्थिती असताना हेच राजकीय पक्ष् कोणत्या बिळात दडून बसले होते?तेव्हा का नाही पडलेत बाहेर सर्वसामान्य जनतेला हॉस्पीटल्समध्ये बेड्स मिळवून देण्यासाठी?ऑक्सीजन अभावी तडफडून अनेक कुटुंबात कोणीतरी प्राण सोडत असताना का नाही केली व्यवस्था वेळेवर ऑक्सीजनची?रेमडिस्विहर इंजेक्शनने तर उच्छाद मांडला होता,रात्र-रात्र भर उपराजधानीत ही लोकांनी आपल्या आप्त-स्वकीयाचा जीव वाचवण्यासाठी हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रांगेत झोप घेतली आहे,तेव्हा किती राजकीय पक्ष् बिळातून बाहेर पडून त्यांच्या मदतीला धावले?

आज मंदिर उघडण्यासाठी निरर्थक आंदोलन करण्याऐवजी ही वेळ राज्य सरकारला सहकार्य करण्याची नाही का?उद्या पुन्हा तिस-या लाटेचा कहर ओढवेल तर हेच राजकीय पक्ष् पुन्हा सर्वसामान्य भाविकांना ‘भगवान भरोसे’सोडणार आहेत आणि राज्य सरकारच आम जनतेचा जीव वाचवण्यात कशी कमी पडली याचे पाढे वाचण्यास सुरवात करतील, कराेनाने आता आम जनतेला चांगलेच ‘राजकारण’शिकवून दिले असल्यानेच राजकीय पक्ष्ांच्या या आंदोलनांना सर्वसामान्य जनतेचा,भाविकांचा पाठींबा मिळत नसताना दिसून पडतंय.

आज हिदूं मंदिर उघडण्यासाठी आणि हिंदू समुदायावर आघाडी सरकारकडून होणा-या तथाकथित अन्यायाविरुद्ध रान पेटवणारे घेतील का करोनाच्या तिस-या लाटेत तरी करोनाबाधितांचा कैवार?गेल्या वर्षी देखील गणपती उत्सव,दूर्गोत्व यासारख्या सणांदरम्यान गर्दी वाढली आणि करोनाच्या पहील्या लाटेला अनेक भाविकच बळी पडलेत.न्यायालय म्हणते तशी यावरुन देखील राजकीय पक्ष् कोणतीही शिकवण घेणार नसतील तर उबंरठ्यावर येऊन ठेपलेल्या करोनाच्या तिस-या लाटेत जाणा-या हकनाक जीवांची जबावदारी हे आंदोलनजीवी घेणार आहेत का?

सरकारचा निषेध करून गणेश टेकडी मंदिर येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलन केले. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशनुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने नागपूर तर्फे गणेश टेकडी मंदिरा समोर महिला सेनेच्या शहर प्रमुख मनीषा पापडकर व सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात अाज हे आंदोलन पार पडले.या आंदोलनात एका ही आंदोलनकर्त्यांच्या तोंडावर मुखपट्टी(मास्क)नव्हती!केवढा हा देवावरील दुर्दम्य विश्‍वास!

नागपूर येथे सर्व व्यवसाय सुरू असताना हिंदु धर्माचे आणि सर्व धर्माचे मंदिर, मज्जिद, बंद करून ठेवलेले आहेत. मंदिरतले पुजारी, हार फुले विकणारी दुकानदार, यांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. लवकरात लवकर मंदिरे सुरु करावे. हिंदु विरोधी सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करताना शहर अध्यक्ष अजय ढोके, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, शहर उपाध्यक्ष प्रशांत निकम, शहर सचिव अर्चणा कडु, विभाग अध्यक्ष मंजुषा पाणबुडे अनेक महिला कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली,यापेक्ष्ा या फूल,नारळ विक्रेत्यांसाठी काही भरीव असे विधायक कार्य हे आंदोलनजीवी का करत नाहीत?

नुकतेच भारतीय जनता पक्ष्ातर्फे देखील मंदिरे उघडण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन पार पडले मात्र करोना या जीवघेण्या विषाणूला ना धर्म कळत ना जात कळत,ना भाषा कळत ना प्रांत कळत,ना वय कळत ना लिंग कळत,ना वर्ग कळत ना देशाच्या सीमा कळत तरीही आम्ही दोन्ही जीवघेण्या करोना लाटेपासून कोणताही बोध न घेता सगळंच उघडा,जास्तीत जास्त गर्दी होऊ द्या,बाधितांची संख्या वाढू द्या,रुग्णालयात बेड्सची कमतरता पुन्हा भासू द्या,दहनघाटांवर मृतदेहांनाही अनेक तास रांगेत थांबून राहण्याची अतिशय भयाण अवस्था भोगू द्या,अशीच मागणी हे आंदोलनजीवी देवाकडे मागत आहेत का?असेच आता म्हणावे लागेल.

-डॉ.ममता खांडेकर

Latest बातम्या