खोके घेतले असल्याचा पुरावा १ तारखेपर्यंत द्यावा अन्यथा परिणामांना सामोरे जा
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनाही पाठवणार नोटीस!
बच्चू कडू यांचा राणांना इशारा:आठ आमदार देखील घेऊ शकतील वेगळा निर्णय
‘वर्षा’बंगला पुन्हा सामान्यांसाठी खुला याचा आनंद
नागपूर,ता.२६ ऑक्टोबर २०२२: दहीहांडी पासून अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर काही बेछूट आरोप केले आहेत,ते आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत.आतापर्यंंत विरोधकच ‘खोक्यांची‘ओरड करीत होते मात्र विरोधक असले आरोप करीतच असतात त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले मात्र आपल्याच सत्तेतील एक आमदार जो आता मंत्रीपदाच्या देखील रांगेत आहे,असा घरातलाच एक आमदार आमच्यावर पैसे घेण्याचा आरोप करतो तेव्हा लोकांपर्यंत फार चुकीचा संदेश जात असतो,त्यामुळेच राणा यांनी १ तारखेपर्यंत आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत पुरावे द्यावे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,असा इशारा आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला.
आमदार राणा यांनी नुकतेच बच्चू कडू व प्रहारचे दूसरे आमदार राजकुमार यांच्यावर गुहावटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, कोणाच्याही आयुष्यात कष्टाशिवाय काहीच मिळत नसतं.मी तर वीस-वीस वर्षे अपंगांच्या,अनाथांच्या,शेतक-यांच्या सेवेत घालवली आणि सर्व बिगर पक्षाचं,बिगर झेंड्यांचं,बिगर धर्माचं ,बिगर पैशांचं चार वेळा निवडणूकीत आम्ही निवडून आलो.चार वेळा म्हणजे वीस वर्षांच्या आमच्या राजकीय कारकीर्दीला पणाला लाऊन एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन राणा हे जेव्हा आरोप करतात ते आता थेट आम्हाला मनाला लागलं आहे.त्यामुळेच राणा असा का बोलला?असे बोलण्याची त्याची एकट्याची कुवत नाही,तो कोणाच्या भरवश्यावर बोलताेय?हे तपासणं फार महत्वाचं आहे.
राणाच्या आरोपामुळे फक्त एका बच्चू कडूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला नाही तर शिंदे गटातील पन्नास आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.त्यामुळेच पन्नास आमदारांवर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तेव्हा पर्यायाने मुख्यमंत्र्यांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार,उपमुख्यमंत्र्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतोय,एवढंच नव्हे तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान यांच्या देखील विश्वाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
राणांनी आरोप केला आहे की गुहावटीला नेलेले आमदार हे पैश्यांनी नेले आणि पैसे कोणी दिले?असे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. माझ्याकडे येत्या चार-पाच दिवसात एका बैठकीतला एक व्हिडियो येणार असून त्यात बच्चू कडूला आता थंड कसं करायचं!याला उघडं कसं पाडता येईल!कश्या पद्धतीने याच्यावर वेगवेगळे आणि चुकीचे आरोप लावायचे!यावर भाष्य केलं आहे.तो व्हिडियो माझ्यापर्यंत आल्यानंतर माध्यमांना तो मी देणारच आहे,त्यात तर हे देखील म्हटल्या गेले आहे की बच्चू कडूला अडचणीत आणण्यासाठी काही गोष्टी अश्या करायच्या की राज्य सरकारकडून मदत जर होत नसेल तर केंद्र सरकारकडून मदत घेऊन करऊन घ्यायचा! मात्र जोपर्यंत हा व्हिडीयो आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर आम्ही काही बोलणार नाही मात्र राणा याने जो पैसे घेण्याचा आरोप आमच्यावर केला आहे त्याचा पुरावा त्याने १ तारखेलापर्यंत आम्हाला द्यावे.
पुराव्याशिवाय कोणी बोलत नसतो,असा आपल्याकडे एक समज आहे आणि पुराव्याशिवाय बोलू नये अशी आपली धारणा असते त्यामुळेच आतापर्यंत ‘खोके’ घेतले इथपर्यंत आम्ही आरोप सहन ही केला कारण खोके म्हणजे काय हे लोकांना इतकं माहीती नसतं मात्र राणा याने सरळसरळ ‘पैसे’घेतल्याचा आरोप केला आहे.त्या विरोधात आम्ही न्यायालयात तर जाणारच आहोत मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ही आम्ही नोटीस देणार असल्याचे ते म्हणाले.
पैसे घेतले असा आरोप जर आमच्यावर राणा करीत आहेत तर याचा अर्थ आम्हाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पैसे दिलेत,तुम्ही किती दिलेत?दिले असेल तर ते सांगा,दिले नसेल तर ते पण स्पष्ट करा कारण आता प्रश्न राजकारणाचा नाही.गुवाहटीला आम्ही गेलो असतो-नसतो तरी राज्यात सत्तांतर होणारच होते.मात्र आम्ही यासाठी गेलो की मतदारसंघातले अनेक प्रश्न सुटतील.दिव्यांगाच्या प्रश्नावरही आमच्या मतदारसंघात आंदोलने झाली आहेत,त्यांच्या संदर्भात ब-याच गोष्टी अद्याप झाल्या नाहीत.काही गोष्टी मागच्या अधिवेशन काळात झाल्या नाहीत.रोजगार मंत्रालय असेल,शेतीच्या संदर्भातील प्रश्ने असतील त्या सोडविण्याच्या हेतूनेच आमची चर्चा झाली व या हेतूनेच आम्ही गुवाहटी गाठण्यांच पाऊल टाकलं.
मात्र राज्याचा खुंटलेल्या विकासाच्या संदर्भात आम्ही पाऊल टाकलेला असताना आता प्रश्न आमच्या राजकीय अस्तित्वाचा आहे.कारण इथं मंत्री पद महत्वाचं नाही,विकास देखील आपण बाजूला ठेऊ पण आमच्या राजकीय अस्तित्वालाच घरातला कोणी माणूस जर बोट दाखवित असेल तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा कडू यांनी दिला.
यासाठीच आम्ही १ तारखेपर्यंत राणाला वेळ दिला असल्याचे ते म्हणाले.तो कसा निवडून आला?कोणत्या पक्षांच्या पाठींब्यातून निवडून आला.विमानात बसल्यानंतर दिल्लीत उतरल्यानंतर कोणत्या पक्षाला पाठींबा दिला,हा विषय महत्वाचा नाही,राजकारणाचा आहे.जो तो आपापल्या राजकीय सोयीने निर्णय घेत असतो,हा वेगळा भाग आहे.पण कोणावर अाराेप करताना,अश्या पद्धतीने आरोप करणं आणि त्याचं अस्तित्वच पणाला लावणं ,हे फार चुकीचं आहे आणि म्हणूनच आम्ही राणा याला १ तारखेला पुरावे मागितले आहेत.
१ तारखेपर्यंत राणानी पुरावे द्यावे.जर ते एका बापाची औलाद असतील तर ते पुरावे देतील,असे धक्कादायक विधान करीत,नाही पुरावे दिले तर त्याच्या नावाची एक घोषणा करणार असे सांगून,सध्या शिंदे गटातील सात ते आठ आमदार आमच्या संपर्कात आहेत कारण त्यांच्यासाठी देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे कडू म्हणाले.आज बच्चू कडूवर सत्तेतल्या आमदाराने आरोप केला,उद्या ज्यांना आम्ही पाठींबा दिला तीच वेळ आमच्यावर देखील येईल.कारण सत्ता बदल झाल्यानंतर राजकारणाची पातळी किती घसरली आहे हे राज्यातील जनता अनुभवच असल्याचे कडू म्हणाले.
आतापर्यंत आमच्यावर ‘अरे खोकेवाला आला’असा आरोप होत होता मात्र राणा याने यावर बेछूट आरोप करीत शिक्कामोर्तब केली.आम्ही काही पक्ष किवा पैश्यांतून निवडून आलो नाही तर ‘वन मॅन आर्मी‘म्हणून आम्ही धावत गेलो आणि कार्यकर्त्यांनीही खस्ता खालला,गावक-यांनी साथ दिली व एका अपक्ष आमदाराला एक वेळा नाही चार वेळा आमदार म्हणून निवडून आणले,असे सांगत कडू यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांना टोमणा मारला,जे विविध राजकीय पक्षांच्या समर्थनातून निवडून आले आहेत.
राणा याच्या आरोपावर आमचा आक्षेप असून १ तारखेपर्यंत जर यावर निर्णय झाला नाही तर आमचा व त्या सात-आठ आमदारांचा निर्णय १ तारखेनंतरच आम्ही जाहीर करु,असा सूचक इशारा यावेळी बच्चू कडू यांनी दिला.अनेक आमदार हे देखील अश्या आरोपांमुळे नाराज आहेत,आमची बैठक होईल व बैठकीत निर्णय घेतला जाईल कारण अश्या प्रकारचे आरोप सहन करीत गावात जाणं,अश्या वातावरणात लोकांचे कामं करणं,त्यात गावातील लाेकांच्या मनात वेगळं काही चालेल,वर्गणी मागायला आले कोणी तर म्हणतील की तुम्ही तर ५० खोके घेतलेत,आम्हाला का ५ हजार वर्गणी देत नाही?हे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे आणि म्हणून, कायमचा हा प्रश्न मिटला पाहिजे,कारण जो डाग आमच्यावर लावला आहे तो मिटायलाच हवा.
सत्तांतर होत राहतात मात्र सत्तांतरणात जे चुकीचे आरोप लावले जातात,त्याच्यात काही तथ्य नसतं,विरोधक जेव्हा आरोप करतात तिथपर्यंत ठिक आहे पण आपल्या घरातील माणूस असे आरोप करतात तेव्हा अश्या आरोपांमुळे सगळे बदनाम होत आहेत.अगदी मुख्यमंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्रीही त्यातून सुटले नाहीत त्यामुळे हे निकाली लागले पाहिजे असं आमचं मत आहे,असं कडू म्हणाले.
मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही अश्या आमदारांसोबत तुमची बैठक होणार आहे का?असा प्रश्न विचारला असता,प्रश्न मंत्री पदाचा नसून आमच्या राजकीय अस्तित्वाचा असल्याचे कडू म्हणाले.चार वेळा अपक्ष म्हणून ज्याला जनतेने निवडून दिले त्याच्याच राजकीय अस्तित्वावर राणा याने प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याचे ते म्हणाले.
तुमचा काय अंदाज आहे,कोणाची फूस आहे राणांच्या मागे?या प्रश्नावर बोलताना मी इतका हूशार नाही,असतो तर मी मुख्यमंत्री राहीलो असतो,अशी कोपरखळी त्यांनी मारली.
या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांचा फोन आला होता का?या प्रश्नावर त्यांचा नव्हे तर मीच त्यांना फोन केला असल्याचे कडू यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’बंगल्याच्या दालनात हजारो नागरिक आपापले प्रश्न घेऊन आलेले मी बघीतले आहे.पूर्वी आमच्यासारख्या आमदारांना देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आधीनोंदणी, चिट्ठी,वाऊचर घेऊनच ‘वर्षा’मध्ये प्रवेश मिळत होता,आता मात्र पुन्हा सामान्य जनतेसाठी ‘वर्षा’बंगला खुला झाला,याचा विशेष आंनद झाला असल्याची पुश्ती जोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडू यांनी टोला हाणला.

आमचे चॅनल subscribe करा