Homeनागपूर न्यूजभारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसीविरोधी:प्रवीण कुंटे पाटलांचा थेट आरोप

भारतीय जनता पक्षाचा डीएनए ओबीसीविरोधी:प्रवीण कुंटे पाटलांचा थेट आरोप


बावणकुळे तिकीट नाकारल्यानंतर स्वत:चा थयथयाट विसरलेत का?

भाजपमध्ये ओबीसींचा प्रवेश म्हणजे ‘उधार का सिंदूर’

भाजप येत्या विधानसभेत ७० पेक्षा अधिक जागा जिंकू शकणार नाही:कुंटे पाटील यांचा दावा

‘अब की बार किसान सरकार’मोदी सरकारसारखीच भूलथाप:महाराष्ट्रात बीआरएसचं होणार पानीपत

जिल्हा पातळीवरील अंतर्गत वाद सुटलेले आहेत

नागपूर,ता.२७ जून २०२३:भारतीय जनता पक्षाचा डीएनए हा ओबीसीविरोधी आहे.भाजपचा जन्मच हा ओबीसींच्या विरोधात झाला आहे.भाजपचा डीएनए हा ओबीसी विरोधी नसता तर मंडळ कमिशनचा भाजपने विरोधच केला नसता,असा जळजळीत टिका आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता व सरचिटणीस प्रविण कुंटे(पाटील)यांनी केली.

याप्रसंगी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर टिकेचा भडीमार करीत,मंडळ कमिशनला भाजपचा विरोध हा ऐतिहासिक सत्य आहे मात्र बावणकुळे यांना इतिहास वाचण्याची सवय नाही,त्यांनी इतिहास वाचावा.बावणकुळे हे संघ शाखेत किती वर्ष गेलेत,नाही गेलेत मला माहिती नाही, पण भाजप व जनसंघाचा इतिहास त्यांनी तपासून बघावा,ओबीसीबद्दल,मंडळ आयोगाबद्दल त्यांची मत काय आहे,भाजपचे मुखपत्र ‘ऑब्जरवर‘मध्ये देशाच्या संविधानाबद्दल त्यांची उघड मत काय आहे हे तपासावे मगच भाजप व बावणकुळे यांनी भाजप ही ओबीसींच्या हिताचा पक्ष आहे,हा दावा करावा अशी टिका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल आम्हीच ओबीसी विरोधी असण्याचा दुष्प्रचार व खोटा प्रचार करीत असून,भाजपचे प्रेम हे पुतना मावशीसारखे असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.या देशात ओबीसी समाजाला धार्मिक दंगलीत ढकलून राजकीय स्वार्थासाठी ओबीसी समाजाचे कुणी शोषण करीत असेल तर तो भाजप असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपला ओबीसी समाजाबद्दल प्रेम,जिव्हाळा असता तर राज्यात जेव्हा प्रथमच २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली तेव्हा फडणवीस यांनी ओबीसीचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना का डावलले?असा प्रश्‍न करीत ,भाजपला राज्याला पहीला ओबीसी मुख्यमंत्री देता आला असता.हीच चूक दुरुस्त करण्याची संधी पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातही भाजपला मिळाली होती मात्र उपमुख्यंत्री पद ओबीसी समाजाला न देता आपला बहूजन विरोधी इरादा त्यांनी पुन्हा स्पष्ट केला.

ज्या स्वर्गीय गाेपीनाथ मुंडे यांनी भाजप या राजकीय पक्षाला बहुजन समाजामध्ये प्रस्थापित करण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये वारंवार होणारा अवमान महाराष्ट्रातील जनता बघतच असल्याचे ते म्हणाले.

याउलट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली.इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर दोन वेळा अोबीसी नेते छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली.याशिवाय सुनील तटकरे,मधुकर पिचड यांना संधी देऊन राष्ट्रवादीने ओबीसी व आदिवासी समाजाचा समन्वय साधला असल्याचे ते म्हणाले.आजही विदर्भात आमच्याच पक्षाचे ९० टक्के जिल्हाध्यक्ष हे ओबीसी समाजाचे आहेत.इतिहासाचे वाचन करण्याची सवय नसल्यानेच बावणकुळे यांची गल्लत होत असून तीच गल्लत सातत्याने त्यांच्या विधानातून दिसत असल्याचा टोमणा त्यांनी हाणला.

मंडल आयोगाची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी केल्यानंतर मंडलाच्या विरोधात देश पेटविणा-या भाजपच्या नेत्यांनी ओबीसी प्रेमाची नौटंकी करु नये व शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करुन ओबीसी समाजाची दिशाभूल करु नये,असे ते म्हणाले.

महत्वाचे म्हणजे,मागील विधानसभा निवडणूकीत बावणकुळे तसेच त्यांच्या कुटूंबियांपैकी कोणालाही निवडणूकीचे तिकीटच भाजपातर्फे मिळाले नाही.यावर त्यांनी केलेला थयथयाट व ओबीसी समाजावर झालेला अन्यायाचा वाचलेला पाढा ते विसरले असले तरी ओबीसी समाज विसरणार नाही.अगामी निवडणूकीत भाजपला फक्त ७० जागा मिळणार असून, सर्वेक्षणातून ही गोष्ट त्यांना कळली असल्यानेच त्यांनी ओबीसी नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा सुरु केला आहे.पण हा प्रयत्न त्यांच्या कामी पडणार नसून ओबीसी मतदार भाजपाचे मनसुबे ओळखून असल्याचे ते म्हणाले.

भारत राष्ट्र समिती(बीआरएस)चा प्रभाव राज्याच्या सीमावर्ती भागातील शेतकरी वर्गामध्ये असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता,बीआरएस ही भाजपचीच ‘बी‘टीम असल्याची टिका त्यांनी केली.ज्याप्रमाणे भाजपने ‘अब की बार मोदी सरकार’चा नारा दिला त्याचप्रमाणे बीआरएस देखील ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत आहे.मोदी सरकारप्रमाणेच ही देखील भूलथापच आहे.आज ही ते ६० गाड्या घेऊन पंढरपूरला आलेत.मागच्या निवडणूकीत एमआयएम पक्ष हैदराबादमधून आला होता,यावेळी हैदराबादमधून बीआरएस पक्ष आला आहे.याचे कारण स्पष्ट आहे.महाविकासआघाडी सरकारला प्रचंड यश मिळणार आहे.आघाडीला सत्ता मिळू नये व मतविभाजन व्हावे यासाठी बीआरएस काम करीत आहे.हे राजकीय षडयंत्रच आहे,मात्र अगामी निवडणूकीत बीआरएसचं देखील पानीपत होईल,असे भाकीत त्यांनी वर्तवले.

शरद जोशींनी महाराष्ट्रात शेतक-यांची सर्वात मोठी चळवळ उभारली होती.मी त्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे.चळवळीतून भ्रमनिरास झालेले आजही हयातीत आहेत मात्र ज्यांना जनतेने हद्दपार केले त्यांनाच बीआरएस हाताशी धरत आहे,त्यांना शेतक-यांमध्ये स्थान मिळणे शक्य नाही.आघाडीच्या विरोधात वातावरण तयार करुन भाजपला फायदा पोहोचविण्याचे काम बीआरएस करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.येणा-या काळात बीआरएसची देखील एमआयएमसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होणार असल्याचे ते म्हणाले.मतांमध्ये विभाजन करण्यात त्यांना यश मिळणार नाही.

चंद्रपूरातील अशोक जीवतोडे तसेच अन्य ताकदवर ओबीसी नेते हे भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याकडे लक्ष वेधले असता,जीवतोडे हे फक्त ३ वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत आल्याचे त्यांनी सांगितले.आमचा पक्ष सत्तेत असताना ते पक्षात आले मात्र आम्ही त्यांना ओबीसी नेता म्हणून पक्षात घेतले होते,परंतू ओबीसींच्या प्रश्‍नावर त्यांनी तीन वर्षात एक ही चर्चासत्र घेतले नाही,ओबीसींसाठी एक टक्का ही काम केले नाही.आता ही बाळू धानोरकर यांचे दूर्देवी निधन झाल्यावर चंद्रपूरात संधी साधण्यासाठी ते भाजपामध्ये गेले असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.आमच्या पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारुन त्यांच्यासारख्यांची गरज पक्षाला नसल्याचे ते म्हणाले.आशिष देशमुख यांनी देखील आमचे दार ठोठावले होते मात्र आम्ही त्यांना आत घेतले नसल्याचे सांगत, सध्या ठिकठिकाणी भाजपद्वारे ओबीसी नेत्यांची आयात म्हणजे ‘उधार का सिंदूर’ असल्याची कोटी त्यांनी केली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वारंवार बदलत्या भूमिका याविषयी छेडले असता,ज्या झाडाला फळे जास्त त्यालाच दगडे मारली जात असल्याचे ते म्हणाले.पक्षात फूट पडावी हा विरोधकांचा डाव असल्याचे ते म्हणाले.माध्यमांना हाताशी धरुन तसा देखावा तयार केला जात आहे,मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावणकुळे यांना इतिहास माहिती नाही,यावर पुणे नगरपालिकेत राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता येताच मध्यरात्री मां जिजाऊ जवळील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवून तो तलावात शिरवून देण्यात आला,या इतिहासाविषयी काय म्हणने आहे?यावर बोलताना,राष्ट्रवादीने कधीही कुठल्या जाती-जमातीचा विरोध करण्याचे काम केले नसल्याचे ते म्हणाले.जे ऐतिहासिक तथ्य आहे ते मान्य करण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे.आम्ही इतिहास वाचून पुढे जातो आणि इतिहासाविषयी चुकीचे लेखन जर कोणी केले असेल तर पुर्नलेखन करणा-यांच्या बाजूने आम्ही उभे राहतो.आमचा पक्ष हा ब्राम्हणद्वेषी नसून आमच्या पक्षात अनेक ब्राम्हण कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत.मागील ५०-६० वर्षांपासून पवार साहेब हे राजकारणात आहेत मात्र त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत कुठल्या जातीविशेषच्या विरोधात भूमिका घेण्याचं काम त्यांनी केलं नाही,तुमच्याकडे याविषयी काही तपशील असेल तर तुम्हीच तो द्या,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला येत्या १ जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा आहे,याकडे लक्ष वेधले असता,राज्याची असो किवा केंद्राची,भाजपची सरकार ही हूकूमशाहीच्या दिशेने चालणारी सरकार असल्याची टिका त्यांनी केली.या लोकांचा संवैधानिक मुल्यांवर विश्‍वास नाही.त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्‍वास नाही.या देशातील सर्व तपास यंत्रणा दबावात काम करत आहेत,ते संविधानविरोधी असल्याने न्यायाने वागतील,याची आम्ही देखील अपेक्षा ठेवीत नसल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्या संदर्भात त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी,याविषयी छेडले असता,पक्षातील अंतर्गत वाद आता चर्चेने सुटलेले आहेत,असे ते म्हणाले.मतभेद होते मनभेद नाही.आता मतभेद ही नाही,सगळं काही सुरळीत चाललं असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.

पत्र परिषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार दिनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर,श्रीकांत शिवणकर आदी उपस्थित होते.

२९ जुलै रोजी प्रफुल्ल पटेल यांचा नागपूरात सत्कार-
पुढील महिन्यात २९ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय कार्याध्यक्ष व माजी खासदार प्रफूल्ल पटेल यांचा सत्कार समारंभ शहर व ग्रामीण राष्ट्रवादी पक्षातर्फे नागपूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
………………….

Latest बातम्या