
शरद पवार यांची जाहीर कबुली
नागपूर,ता. १७ ऑक्टोबर: नुकतेच नाशिक येथील पत्र परिषदेत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अमरावती,मालेगाव इ.शहरातील दंगलींसाठी भाजपवर दोषाराेपण केले होते,या दंगली हेतुपुरस्सर घडवून आणण्यात आल्या असल्याचे विधान त्यांनी केले होते,मात्र याच भाजपसोबत २०१४ च्या निवडणूकीनंतर पवारांनी भाजपच्या सत्तेला विना अट पाठींबा जाहीर केला होता,पुढे २०१९ च्या नोव्हेंबर मधील विधान सभेच्या निवडणूकीनंतर त्यांनी शिवसेना व काँग्रेसच्या संख्याबळाच्या आधारावर महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थानापन्न केले,भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदूत्ववादी मानले जात असताना, यावेळी भाजपसोडून सेनेसोबत सरकार कसे स्थापन केले,हीच भाजपा,भाजपाची तथाकथित ‘दंगलखोर’ विचारधारा २०१४ मध्ये पवार यांना कशी अनुकुल वाटत होती?या प्रश्नावर बोलताना यावेळी शिवसेना व भाजप एकत्र येऊ नये यासाठीच हा उद्योग केला असल्याची जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत दिली.
शरद पवार यांचा तीन दिवसीय विदर्भ दौरा आयोजित करण्यात आला आहे.आज बुधवार दि. १७ नोव्हेंबर रोजी ते नागपूरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी मुक्कामी होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.पवार यांनी स्वत: जाहीर केले होते की त्यांनीच मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात बैठकीत उंचावला होता.दंगलखोर म्हणून ज्या पक्षाची त्यांनी भर्त्सना केली त्याच पक्षासोबत २०१४ मध्ये ते सत्तेसाठी युती करण्यासही उत्सूक होते,२०१९ मध्ये मात्र त्यांनी भाजपचे विधानसभेत १०५ आमदार असतानाही ५८ आमदार असणा-या शिवसेनेला जवळ केले,नेमकी या मागे त्यांची कोणती व्यूहरचना होती?यावर पत्रकारांनी आज त्यांना बोलते केले,यावरच त्यांनी हिंदूत्ववादी विचारधारेवर बोलणे व स्पष्टीकरण देणे टाळून अत्यंत चातुर्याने ‘शिवसेना व भाजप यांनी २०१४ प्रमाणे सत्तेसाठी एकत्र येऊ नये यासाठीच हा उद्योग केला’असल्याची जाहीर कबुली दिली.
अमरावती येथील दंगलीसाठी भारतीय जनता पक्षाच्या युवा सेनेवर ठपका ठेवला जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना ,हा अत्यंत संवेदनशील विषय आहे ,याबाबत मला फक्त ऐकीव माहिती आहे,सत्यतेची पडताळणी अद्याप झाली नसल्याने या विषयावर आताच काही बोलणे योग्य होणार नसल्याचे पवार म्हणाले.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मी विनंती केली आहे की त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावे आणि जमीनी हकीकत समजून घ्यावी,बेकसूर लोकांच्या नुकसानीसाठी जे कोणी जवाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.समज,गैरसमज,अफवाह यातून काही परिस्थिती बिघडली असेल तर ती दुरुस्त करावी.दुर्देवाने दोन समुदायामध्ये ही तेढ निर्माण करण्यात आली असून काही लोकांनी कायदा हातात घेतला.काहींनी हेतुपुरस्सर सांप्रदायिक विचार प्रसूत केल्याची शंका येते,यात आणखी खोलात जाण्याची गरज नसल्याचे पवार यांनी विशद केले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या मुस्लिम ध्रृवीकरणाविषयी केलेल्या विधानाबाबत विचारणा केली असता,फडणवीस यांची कालची प्रतिक्रिया ही अतिशय ‘उथळ’असल्याची घणाघाती टिका पवार यांनी केली.मी स्वत:प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री पदावर होतो मात्र या पदावरील जनप्रतिनिधीला पक्ष अभिनिवेशापलीकडे राज्य,समाजकारणाचा विचार करने अपरिहार्य आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला फारसे गांर्भीयाने घेण्याची गरज नाही मात्र मुख्यमंत्री पद भूषविलेल्या व्यक्तिने असे बोलणे योग्य नव्हते,त्यांची अस्वस्थता इतक्या टोकाला जाऊ नये,असे पवार म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच राष्ट्रवादी एका जागेवरच आहे ती देखील शून्यावर आणू,त्यांच्या या विधानावर प्रश्न विचारला असता ,शेवटी आमची गांधी-नेहरु यांची विचारधारा एकच आहे.मनात ज्या भावना उमटतात त्याच्याशी सुसंगत भूमिका बांधतो,भाजपच्या विचारधारेचा माणूस हा विधी मंडळात जावो की संसदेत,त्याची पार्श्वभूमी, त्याची विचारधारा तो बदलू शकत नाही,हीच गोष्ट राष्ट्रवादी व काँग्रेसवर देखील लागू होत असल्याचे ते म्हणाले.
जेव्हा-जेव्हा शरद पवार यांची सत्ता महाराष्ट्रात येते तेव्हाच राज्यात दंगली घडतात,या प्रश्नावर पवार यांनी बोलणे टाळले तर अश्या दंगली राज्यात घडणं यात गृहखात्याचं अपयश आहे का?यावर बोलताना,विशिष्ट लोकांनी विशिष्ट विचारधारेतून या दंगली घडवल्या असल्यामुळे यात गृहखातं अपयशी ठरलं,असं मला वाटत नाही,असं पवार म्हणाले.
स्थानिक निवडणूकांमध्ये आघाडी होणार का?या प्रश्नावर बोलताना प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला आपले संघटन मजबुत करण्यासाठी स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्याचा हक्क आहे,यामुळे एकत्र लढलो की नाही हा मुद्दा गौण ठरतो,असे ते म्हणाले.
देशात प्रभावी विपक्ष निर्माण व्हावा यासाठी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वखाली संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रित येणार का?यावर बोलताना, कोणाच्या नेतृत्वात फॉर्मालिटी सेक्शन घडतं हे महत्वाचे नाही,प्रबळ विरोधी पक्षाचा विकल्प देणे हे महत्वाचे असल्याचे पवार यांनी विशद केले.
एवढ्या थंडीत एसटी कर्मचा-यांचा संप सुरु आहे,यावर तोडगा काय?यावर बोलताना तुम्ही सेवेत आलात,तुमच्यावर एक जवाबदारी सोपविण्यात आली,महामंडळ वेगळे व सरकार ही वेगळी बाब आहे.या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत.नोकरी एका संस्थेत स्वीकारली,आता दुस-या संस्थेत विलीनीरकण करा अशी मागणी करने योग्य नाही.अनेक मागण्या त्यांच्या मान्य झाल्या आहेत,या ही मागणीवर विचार केला पाहिजे मात्र या मागणीमुळे इतर देखील सेक्टरवर याचा परिणाम होईल,ते देखील पुढे त्यांचा समावेश शासकीय सेवेत करण्याची मागणी करतील,यावर अंतिम काही पर्याय आहे का याचा विचार ‘स्टेप बाय स्टेप ’ करावा लागेल,विलगीकरणासाठी देखील एक निश्चित कालावधी लागतो,जे या संपाचे नेतृत्व करीत आहेत व ज्यांना या संबंधीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी एकत्रित बसून यावर मार्ग काढावा.
कंगणा रानौत यांच्या भारताच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता ,बेजवाबदार विधाने करण्याची काही लोकांना सवयच असते,त्याकडे दुर्लक्ष करनेच योग्य असल्याचे ते म्हणाले.
येत्या निवडणूकीत उत्तर प्रदेशात कोणाची सरकार येतेय?यावर बोलताना ‘मी काही ज्योतिषी नाही’अशी कोटी त्यांनी केली.
गडकरींच्या हाताविषयी मोदींना विचारा-
विकासाचे राज्य करायचे असेल तर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे हात आणखी मजबूत करावे लागतील का?या प्रश्नावर बोलताना हा प्रश्न मोदींना विचारावा लागेल त्यांना गडकरी यांचे हात मजबूत करायचे आहेत का?अशी कोटी त्यांनी केली.
देशमुखांवर अन्यायच-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेसंबंधी प्रश्न विचारला असता,सुरवात कशी झाली?मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी अनिल देशमुखांबाबत मुख्यमंत्र्यांना एक लेखी निवदेन दिले,मला ही भेटून त्यांनी निवेदन साेपवले, ज्यात पोलिस खात्यातील सदस्यांना रक्कम गोळा करण्याविषयी सूचना असल्याचे नमूद आहे,यावर मी परमबिरसिंग यांना हाच प्रश्न विचारला ’तुम्ही यावर अंमलबजावणी केली का?’त्यांनी ’नाही’असे उत्तर दिले.अनिल देशमुख यांच्या सूचना कायद्याला,शिस्तीला धरुन नसल्याने त्यावर अंमलबजावणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र आज ज्यांनी ही तक्रार केली तेच परांगदा झालेत!आरोप करणारे गेले कुठे?याचा शोध लागत नाही.जे गृहस्थ आरोप करतात आता तेच माहिती देत नाहीत,काहीही आरोप करायचे त्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी सामोरे जायचं नाही,देशमुखांना मात्र कारागृहाची कोठडी मिळाली,देशमुखांवर अन्यायच झाला आहे पण यावर कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्यामुळे यावर जास्त बोलू इच्छित नसल्याचे पवार म्हणाले.
’

आमचे चॅनल subscribe करा