जोशी यांच्या र्दुभाग्याचीच चर्चा रंगली
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२७ एप्रिल २०२३: राजकारण हा अनिश्चितेचा खेळ आहे,असं म्हटल्या जातं.एखाद्याच्या बाबतीत तर ही म्हण चपखळ बसते.भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी महापौर संदीप जोशी यांच्याबाबतीत असेच काहीसे बोलले जाते.ऐन महापौर होण्याची संधी मिळाली मात्र त्याच वेळी भाजपची राज्यात सत्ता स्थापित होऊ शकली नाही,महाविकास आघाडीच्या सरकारमधील कद्दावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी हेतुपुरस्सर फडणवीस यांच्या नगरीतील महानगरपालिकेत राज्यभर आपल्या कडक शिस्तीसाठी व लहरी कारभारासाठी गाजलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मनपा आयुक्त म्हणून नागपूरात पाठवले,त्याच वर्षी ‘न भूतो ना भविष्यती‘ असा चायना मधून जगभर पसरलेल्या करोना नामक भयंकर विषाणूने नागपूरपर्यंतचा पल्ला गाठला,याच वेळी केंद्राने महामारी व आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा देशभर लागू केला,परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थाच काय, अगदी राज्य सरकारला देखील केंद्र सरकारच्या बरहूकूम कार्यभार करने भाग पडले,अशातच पदवीधराची निवडणूक लागली,भाजपच्या दोन कद्दावर नेत्यांना आपालाच उमेदवार द्यायचा असल्यानंतरही,संदीप जोशी यांना भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक लढण्याची व विधी मंडीळात ,विधान परिषदेत जाण्याची संधी मिळाली मात्र,बहूजन समाजातील नेते’जोशी’आडनावाच्या उमेदवाराच्या विरोधात एकजुट झालेत,त्यात भाजपच्या अंतर्गत गोटातून जोशींनी विधान परिषदेत पोहोचू नये म्हणून फटाके लागले,अशातही आपल्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जोशी हे सातत्याने समाजसेवेची कास धरुन असतानाच, ऐन एप्रिलच्या रणरणत्या उन्हाच्या ऋतूत धो धो मुसळाधार कोसळावा आणि जोशी यांच्या सायंकालीन पं.दीनदयाळ पौष्टिक भरड थाळी लोकापर्ण सोहळ्याची धुळधाण व्हावी,यामुळेच समाज माध्यमांवर जोशी यांच्या दूर्देवाच्या फे-यांवर चर्चा झाली नसती तर नवलच!
पदवीधर निवडणूकीवर तर करोनाचे सावट असल्यामुळे सहा ही जिल्ह्यांमध्ये नेमका प्रचार कसा करायचा?ते ही एवढ्या कमी अवधीत?हा यक्ष प्रश्न जोशी यांच्या समोर उभा ठाकला होता.काँग्रेसचे ॲड.अभिजित वंजारी हे महाविकासआघाडीचे देखील उमेदवार होते.त्यांच्या मागे तिन्ही पक्षांनी तसेच ओबीसीचे मोठे नेते बबनराव तायवाडे यांनी आपली संपूर्ण ‘शैक्षणिक ’ताकद झोकून दिली होती.
१ डिसेंबर २०२० रोजी ही निवडणूक पार पडली,२ व ३ डिसेंबर दरम्यान मतमोजणी चालली.एकूण मतदार १ लाख ३२ हजार ९२३ होते.नागपूर,भंडारा,गोंदिया,वर्धा,चंद्रपूर व गडचिरोली हे सहाही जिल्हे मिळून ६४.३८ टक्के मतदान झाले होते.या निवडणूकीत जोशी यांना ४१ हजार ५४० मते मिळाली होती.वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते मिळवून जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव केला होता.

गडकरी यांची पसंद असणारे अनिल सोले यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने गडकरी यांची छूपी नव्हे तर उघड नाराजी,भाजपमधील अंतर्गत धुसफुस,मतविभाजनात अपयश,ओबीसी विरुद्ध जोशी अशी विरोधकांनी रंगवलेली जातीय लढत ही सर्व कारणे संदीप जोशी यांना भोवली होती.भाजपसाठी तर हा धक्कादायक पराभवच होता कारण नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निर्मितीपासून या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व अबाधित राहीले होते.तो विक्रम मोडण्याचा ‘मान’जोशी यांना मिळाला!
दुसरीकडे वंजारी यांच्यामागे महाविकासआघाडीचे संपूर्ण पाठबळ,आघाडीचे सर्वच नेते या निवडणूकीत सक्रीय असणे,वंजारी यांचे निर्विवाद वर्चस्व आणि दोन वर्षां पूर्वीपासूनच सहा ही जिल्ह्यात पदवीधरांमध्ये वंजारी यांनी केलेली तयारी यामुळे ॲड.अभिजित वंजारी यांना हे यश सहज खेचून आणण्यात यश मिळाले होते . दूसरीकडे भाजपमध्ये चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर,भंडारा-गोंदियामध्ये आमदार परिणय फुके व खासदार सुनील मेंढे,वर्धा जिल्ह्यात खासदार रामदास तडस,आमदार पंकज भोयर,नागपूर जिल्ह्यात माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,नागपूर शहरात शहराध्यक्ष प्रवीण दटके,आमदार मोहन मते,कुष्णा खोपडे,विकास कुंभारे,ग्रामीणमध्ये सुमारे पाच हजार मंतांचा गठ्ठा असणारे समीर मेघे पक्षाच्या दिमतीला असतानाही, भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि या पराभवाची चर्चा अनेक महिने समाज माध्यमावर चांगलीच रंगली.
भाजपच्या विरोधासाठी वैचारिक मतभेद असणारे विरोधक एकत्र आले असून ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची नसून पक्षाच्या अस्मितेची असल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागावे असे भावनिक आवाहन,मतदानाच्या अखेरच्या काही दिवसात प्रचारासाठी उतरलेल्या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते.मात्र,भट सभागृहात गडकरी यांच्या ‘सत्तेचा माज जनताच उतरवत असते’या विधानाने कार्यकर्त्यांपर्यंत जो संदेश पोहोचायचा होता तो पोहोचला.फडणवीस यांच्या मतदारसंघात जोशी यांच्या प्रचारासाठी मोठ्या रॅलीचे आयोजन असल्यामुळे व्यासपीठावरुन गडकरी यांचे भाषण सुरु होण्याच्या काही क्षण आधी फडणवीस व जोशी हे सभागृहातून निघून गेल्यानंतर,गडकरी यांनी उपरोक्त सूचक विधान केले होते आणि….सहाही जिल्ह्यातून प्रचार सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना व भरगच्च भरलेल्या सभागृहाला योग्य तो संदेश मिळाल्याची चर्चाही यानंतर रंगली.
दूसरीकडे वंजारी यांच्या विजयासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सर्व सूत्रे हातात घेतली होती.दीनानाथ पडोळे,बबनराव तायवाडे,अनीस अहमद,प्रफूल्ल गुडधे पाटील,तानाजी वनवे,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपासून तर राष्ट्रीय सहसचिवांपर्यंतची चमू ही एकजुटीने लढत होती.वंजारी यांच्या पत्नी स्मिता यांनीदेखील काँग्रेस व मित्र पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची फळी उभारली होती.थोडक्यात पदवीधरच्या या लढाईत ‘आपली पहीली पसंती आपला संदीप जोशी’हे न घडता ’मिशन परिवर्तन’करीत ॲड.अभिजित वंजारी यांनी जोशी यांचे विधान परिषदेत जाण्याचे द्वार बंद केले होते.
जोशी यांचा महापौर पदाचा कार्यकाळ हा तर ‘फिफ्टी फिफ्टी’फॉम्युला सारखा देखील ठरला नाही,कारण फिफ्टी टक्केही कार्यभार त्यांना करण्याची संधीच मिळाली नाही!१८ नोव्हेंबर २०१९ रोजी भाजपने पक्षाचे वरिष्ठ नेते दयाशंकर तिवारी व संदीप जोशी यांना पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कार्यकाळा वाटून दिला.२२ नोव्हेंबर रोजी जोशी यांनी महापौर पदाची निवडणूक एकहाती जिंकली व शहराचे ५३ वे महापौर बनले.भाजपच्या मनीषा कोठे उपमहापौर बनल्या.

यावेळी पदाला किती काळ मिळतो,हे महत्वाचे नसल्याचे संदीप जोशी म्हणाले होते.भाजपमध्ये केवळ भूमिका बदलतात.भाजपचे कार्यकर्ते आजही २४ बाय ७ असे कार्यरत असतात.शहरातील समस्या अवगत असल्याने लोकांमध्ये जाऊन,सूचना घेऊन त्यांचा वेगाने निपटारा करण्याचा प्रयत्न करणार आहे,यासाठी अनेक योजना आखल्या आहेत,त्या कार्यकाळात प्रत्यक्षात येतील,असे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले होते,मात्र नियतीला हे देखील मंजूर नव्हते.
आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील ८७ पेट्रोल पंपावरील प्रसाधन गृहे महिला व पुरुषांसाठी खुली केली.महापौर निधीतून ३२ सुलभ शौचालयाचे भूमिपूजन केले.भंगारातील बसमध्ये प्रसाधनगृहांचा अभिवन उपक्रम हाती घेतला.मुख्यमंत्रीच्या धर्तीवर ‘महापौर सहाय्यता निधी ’ वाटपास सुरवात केली.पैशां अभावी खेळाडू परगावी स्पर्धेत जाऊ शकत नाहीत वा दूर्धर आजारामुळे उपचार करु शकत नाहीत,अशा विविध कारणांमुळे शहरातील गरजूंना आर्थिक पदत म्हणून हा महापौर सहाय्यता निधी खर्च केला जाणार होता.याशिवाय शहरातील विविध घटकांतील प्रतिष्ठित मंडळी,सामाजिक कार्यकर्ते,उद्योजक व शहराच्या विकासाला चालणार देणारे अनेकजण सकाळी उद्यानात फिरायला येतात,त्यांच्याकडून सूचना घेण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी विविध उद्यानात पहाटेच्या वेळी ’वॉक ॲण्ड टॉक विथ मेयर’या उपक्रमाची सुरवात केली. नागरिकांच्या तक्रारी समजून घेण्यासाठी शहरातील १०० चौकात सूचनापेटी लावण्याचा उपक्रम राबविला.फूटपाथ अतिक्रमणाबाबत दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली तिवारी समितीचीही त्यांनी स्थापना केली.
मात्र,२३ मार्च २०२० पासून देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढला,शहरात देखील ठाणबंदी लागू झाली.जोशी यांनी नोव्हेंबर २२ रोजी महापौर म्हणून पदभार स्वीकारुन अवघे दोन-तीन महिनेही होत नाही तर फेब्रुवरीत तुकाराम मुुंढे हे भाजपची कोंडी करण्यासाठी आयुक्त पदी रुजू करण्यात आले.यानंतर कोविड-१९ चा प्रादुर्भाव,मुंढे-महापौर यांच्यातील बेबनाव,पदाधिकारी-प्रशासनातील वाद हा अवघ्या नागपूरकरांनी अनुभवला.
लॉकडाऊन,करोनाच्या प्रादुर्भावाबाबत नागपूर शहराचा रेड झोनमध्ये समावेश,संपूर्ण आर्थिक नाड्या मनपा आयुक्तांच्या हातात समाविष्ट असणे,धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मुंढे यांनाच मिळणे,स्मार्ट सिटीच्या कारभारात मुंढे यांची अनावश्यक लुडबुड,चुकीचे धोरण राबवणे,व्यापा-यांच्या प्रश्नावर मुंढे यांची आघाडी सरकारच्याच नेत्याने घेतलेली विकेट,भावपूर्ण निरोप,ऑगस्ट २८,२०२० रोजी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती व मुंढे यांची मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने, सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदावर अवनत करुन केलेली बदली,अश्या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, संदीप जोशी यांचा महापौर पदाचा ‘फिफ्टी‘वाला कार्यकाळ कधी व कसा संपला हे नागपूरकरांनाही कळलेच नाही.
मात्र,राजकीय डावपेचाच्या व यश-अपयशाच्या या सर्व घडामोडीत संदीप जोशी यांचा विविध सामाजिक कार्यांचा ठसा हा अविरत सुरुच राहीला.झिलपी येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा ‘सोबत‘ हा उपक्रम,करोनामुळे निराधार झालेल्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा उपक्रम,मेडीकल रुग्णालयात पं.दीनदयाल थाळीचा अवघ्या १० रुपयात सुरु केलेला उपक्रम इत्यादी उपक्रमांची दखल नागपूरकर वेळोवेळी घेत आले आहेत.
अशातच काल मंगळवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता मेडीकल येथील पं.दीनदयाल थाली परिसरात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सायंकालीन पौष्टिक भरड धान्याच्या थालीचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता मात्र,ऐन वेळी पावसाने कहर केला.जोशी यांच्या भव्य आयोजनावर पाणी फिरवले.इतके की, वेळेवरही थांबला नाही.परिणामी भव्य मंच,हजारो खुर्च्या तशाच पडून राहील्या व वेळेवर मेडीकलच्या सभागृहात हा लोकापर्णाचा कार्यक्रम घ्यावा लागला.संघाचा कार्यक्रम हा वेळेची शिस्त पाळणारा असल्याने सरसंघचालक हे धो-धो पावसात देखील अगदी ६.३० च्या काट्यावर कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले!कार्यक्रमानंतर त्यांनी दीनदयाळ भरड थालीचा आस्वाद देखील घेतला.
मात्र,संदीप जोशी यांच्याच बाबतीत वारंवार नियतीचा असा फेरा का यावा?अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली.जोशी यांनी आपली कुंडलीच एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखूवन शांती करुन घ्यावी अशी मिश्कीली देखील ऐकू आली तर जोशी यांचे आडनाव ’जोशी’नसून इतर दूसरे काेणते बहूजन समाजाचे असते तर असे कोणतेही अपयश त्यांच्या वाट्याला आले नसते,अशी देखील चर्चा कानावर पडली.
विशेष म्हणजे जोशी यांनी त्यांच्या २० ऑगस्ट या वाढदिवसाच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी, एक अनाकलनीय अशी घोषणा केली,यात ते या पुढे मनपाची कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे म्हणाले.त्यामुळे मनपात आजवर विविध महत्वाचे पद भूषविणारे संदीप जोशी नागपूरकरांना, मनपाच्या कारभारात जरी या पुढे दिसणार नसतील तरी पुढील विधानसभेत नागपूरातील एकूण सहा विधानसभेच्या जागांपैकी कोणत्या मतदारसंघात त्यांची वर्णी लागते व ते अखेर आमदार होऊन विधीमंडळ गाठतात,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
……………….

आमचे चॅनल subscribe करा