Homeनागपूर न्यूजबूंद से गई वो...!

बूंद से गई वो…!

Advertisements

(शुक्रवार स्तंभ-कहानि पुरी फिल्मी है)

रेवती जोशी-अंधारे

राजा अकबर आणि चतुर बिरबलाच्या अनेक प्रसिद्ध गोष्टींपैकी एक ही गोष्ट ! अकबर बादशहाचे ऐश्वर्य काय सांगावे? रेशमी कपडे, मेवा-फळे, पक्वान्न, मद्य, नोकर-चाकर आणि उंची अत्तरांचा घमघमाट ! एका जंगी मेजवानीत अनेक सरदार मनसबदारांच्या उपस्थितीत बादशहाच्या हातून दुर्मिळ अत्तराचा थेंब खाली पडला. बादशहाच्या मेजवानीत पाऊल रुतेल, असे गुबगुबीत गालिचे अंथरलेले होते. खाली पडलेला अत्तराचा तो थेंब उचलण्यासाठी बादशहा झटकन खाली वाकला. तो का वाकला? हे बघण्यासाठी सगळेच खाली वाकून इकडे-तिकडे बघू लागले. पण, अत्तराचा थेंब तर कधीचाच गालिच्यात शोषला गेला होता. तरीही, बादशहाने बोट फिरवून अत्तर उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाच. अत्तराच्या एका थेंबासाठी बादशहाची ही धडपड बघून, मेजवानीत खसखस पिकली. इतका मोठा बादशहा आणि अत्तराच्या एका थेंबासाठी वाकतो म्हणजे काय!

दबक्या आवाजात ही चर्चा रंगली. बादशहाला संकोच वाटला आणि आपला मोठेपणा पुन्हा कसा सिद्ध करता येईल? याची संधीच तो शोधू लागला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. पुन्हा अशाच एका मेजवानीचे आयोजन होते. यावेळी, बादशहाने अत्तराने हौदच भरला आणि वर त्यात कारंजेही केले. सुगंधी फवा-यांनी वातावरण गंधाळून गेले. तरीही मेजवानीत खसखस पिकली. दबक्या आवाजात चर्चा आणि हसण्याचे आवाज बादशहाच्या कानावर पडलेच. तो आवाज जणू त्याच्या प्रतिष्ठेला आव्हानच देत होता. चवताळलेल्या बादशहाने बिरबलाला बोलावणं धाडलं. इतका मोठा अत्तरी हौद-कारंजं केलंय तरी लोक त्या थेंब प्रकरणाला विसरले नाहीत, बिरबल! लोकांच्या हसण्याचा आवाज माझ्या मनाला टोचण्या लावतोय. सांग बरं पटकन! हुआ क्या है? बादशहाच्या या सगळ्या प्रश्नावलीवर बिरबलाने एकाच वाक्यात उत्तर दिलं, बुंद से गई, वो हौद से नहीं आती !

या गोष्टीचा एक नवा संदर्भ गेल्या आठवड्याभरात पुढे आला. सुशांतसिंह राजपूत आणि त्याची सहायक दिशा सालियान यांचा संशयास्पद मृत्यू, ड्रग्ज कनेक्शन, कंगनाच्या ऑफीसवर कारवाई, बॉलीवूडमधील मोठमोठ्या (?) सेलिब्रिटींचे नशेडी-गंजेडी स्वरूप, सिनेसृष्टीच्या थाळीला पडलेली असंख्य छिद्र, त्यावरून आरोप-प्रत्यारोपांची सिनेस्टाईल फेकाफेकी ! अशी अनेक थेंबं गेल्या काही दिवसात टपाटप खाली पडत गेली. ती सावरण्याचा प्रयत्नही बादशहाप्रमाणे अनेकांनी केला. माझ्यासारखा सामान्य चित्रपट रसिक दररोज हा तमाशा बघत राहीला आणि पडणारा हा प्रत्येक थेंब बुद्धीच्या गालिच्याने अलगद शोषून घेतला.

कलाकार मनस्वी असतात, थोडेसे एखाद-दुसरे व्यसन प्रत्येकालाच असते मग हे तर कलाकार आहेत, चालायचंच… वगैरे विचारांनी या सिनेकलाकारांवर आलेलं वैचारीक मळभ दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. पण, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये युवतीची हत्या आणि कथित बलात्कार प्रकरणाची बातमी येताच, झाडून सगळे सिनेकलाकार ट्विटपंची करू लागले. पीडीतेला न्याय द्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, हा महिलांचा अपमान आहे, भारत की बेटी वगैरे घासून गुळगुळीत शब्द पुन्हा वापरात आले. आज महात्मा गांधी आणि शास्त्रीजींना श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचा शहाजोगपणाही दिसलाच. त्यांचा हा सराईतपणा पाहूनच बादशहाची गोष्ट आणि बिरबलाने दिलेले सूत्र आठवले. बूंद से गई, वो हौद से नहीं आती !

सौंदर्यवती दीपिका पदुकोण हिच्या मोबाईल चॅटमध्ये तिने, माल है क्या? असं विचारलंय. त्यावर, एनसीबी अधिका-यांनी चौकशी केली तर, माल म्हणजे ड्रग्ज नाही तर सिगारेट्स! असं साळसूद उत्तर तिने दिलं. खरोखरच ती एक चांगली अभिनेत्री आहे. म्हणूनच तर एनसीबीचे अधिकारी म्हणजे मुर्खशिरोमणी आहेत, असे समजूनच ती बोलली ! पाच टक्के कमिशन घेऊन हॉलीवूडला ड्रग्ज सप्लाय केल्याचा उल्लेख त्याच चॅटमध्ये होता. त्याविषयीदेखील तिने अशीच येडा बनून पेडा खाणारी उत्तरे दिलीत. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही अशीच ड्रामेबाजी ! चौकशीसाठी तिघी जणी अशा काही अंगभर कपडे घालून, वेण्या-अंबाडे बांधून, खांद्यावरून ओढणी वगैरे घेऊन आल्या होत्या की, ज्याचं नाव ते! कमी कपड्यात फिरण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त सेटवरच वाटतं. आणि, यांचे कपडे बघून प्रत्यक्षात चार लोकांमध्ये फिरणा-या मुली यांची फॅशन फॉलो करतात. आणखी चार-दोन वेळा एनसीबीने यांना समन्स बजावून चौकशीला बोलावलं ना तर ओढणीसह सलवार-कुडते पुन्हा फॅशनमध्ये येतील.

आता कितीही देशप्रेमाच्या बाता मारल्या काय आणि कायदा-सुव्यवस्थेचे डोज पाजले काय? नशेच्या अंमलात असलेल्या बॉलीवूडची ९० टक्के खात्री तर पटली आहेच. एका सुशांसिंह राजपूत आणि सोबतच्या सगळ्या प्रकरणांनी बॉलीवूडची इतकी पोलखोल केली आहे की, आता यांनी कितीही आव आणला तरी अस्सल रसिकांच्या मनातून हे उतरलेत ते कायमचेच!
……..

Latest बातम्या