Homeनागपूर न्यूजबावणकुळेंचं विधान धांद्यात खोटं:किशोर गजभिये यांचा आरोप

बावणकुळेंचं विधान धांद्यात खोटं:किशोर गजभिये यांचा आरोप

Advertisements

नरसाळा-हुडकेश्‍वर मनपा हद्दीत काँग्रेसच्या काळात झाला समाविष्ट

३५० कोटींचा बावणकुळेंचा विकासाचा दावा प्रत्यक्षात का दिसत नाही?

३५० कोटी फक्त रस्त्यांवर खर्च केले:कंत्राटदार कोण होते?गजभिये यांचा प्रश्‍न

या भागावर नासुप्रचा अधिकार पुर्नस्थापित झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा:सुरेश भोयर

नागपूर,ता.५ मे २०२२: माजी उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी नुकतेच नागपूर शहरातील नरसाळा-हुडकेश्‍वर भागाबाबत माध्यमांकडे जे विधान केले आहे ते धांद्यात खोटे असून बावणकुळे हे ’खोटे बोला पण रेटून बोला’चा प्रयोग करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच कमेटी उपाध्यक्ष किशोर गजभिये यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.यावेळी बोलताना,माझा स्वभाव हा पत्र परिषदा घेण्याचा नाही मात्र बावणकुळे यांनी जे खोटे विधान केले,या भागाच्या विकासाबाबत जो खोटा प्रचार केला त्याला उत्तर देण्यासाठी आम्हाला ही पत्र परिषद घेणे अनिवार्य होते,असे ते म्हणाले.

बावणकुळे यांनी नरसाळा-हुडकेश्‍वर हा भाग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मनपा हद्दीत समाविष्ट झाला असल्याचे खोटे विधान करुन जनतेची दिशाभूल केली.मुळात हा भाग माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात १४ मे २०१३ रोजी मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला.२०१३ मध्ये राज्यात कोणाची सरकार होती?असा प्रश्‍न त्यांनी विचारला.२०१३ पासून नागपूर मनपा या परिसरातील घरांवर,भुखंडांवर मालमत्ता कर वसूल करीत आहे मात्र मनपाने कोणतीही विकास कामे या भागात केली नाहीत.

या परिसरातील वीज हजार प्लॉट धारक व अंदाजे लाखांच्या जवळ असणारे नागरिक,त्यांचे भुखंड व त्यावरील बांधकामे नागपूर सुधार प्रन्यासकडून अनधिकृत ठरविले गल्याने त्यांच्या भुखंडांना सिटी सर्वे नंबर न पडणे,रस्ते विकास,पाणी पुरवठा,नागरी विकास कामे न होने अश्‍या अनेक समस्या व अडचणींचा सामना गेली ९ वर्षे करावी लागत आहेत.२०१४ पासून २०१९ या पाच वर्षात मनपावर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती,या काळात भाजपच्या नेत्यांनी अनाधिकृत भुखंड धारकांचे गुंठेवारी भूखंड अधिकृत का करुन दिले नाही?त्यांना rl का मिळवून दिले नाहीत?त्यांच्या भूखंडांना सिटी सर्वे क्रमांक का मिळवून दिला नाही?

बावणकुळे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत या भागावर आधीच ३५० कोटींचा विकास भाजपने केला असल्याचा दावा करीत नासुप्रने ५६ रुपये प्रति चौ.मीटर विकास शुल्क लावण्याचा विरोध केला आहे मात्र भाजपने हे ३५० कोटी नेमके कोणत्या कामावर खर्च केले?एवढ्या कोटींचा विकास झाला असता तर नरसाळा-हुडकेश्‍वर येथील नागरिकांना आजही पाणी पुरवठा,अंतर्गत रस्ते,ड्रेनेज लाईन्स,नागरी सुविधा यांच्यापासून वंचित का राहवे लागत आहे?

याचे कारण भाजपने तो संपूर्ण ३५० कोटी फक्त रस्त्यांवर खर्च केला आणि रस्ते म्हणजे विकास असतो का?असा प्रश्‍न गजभिये यांनी उपस्थित केला.मूळात या रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट नेमके कोणत्या राजकीय नेत्याला मिळाले?

आता नासुप्रच्या सभापती यांनी ‘महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमन-२००१ मधील १२ मे २०२१ च्या सुधारणेनुसार अनाधिकृत बांधकामे व मोकळे भुखंड नियमित करण्यासाठी जाहीर सूचना काढली आहे.त्यांनी सूचित केल्याप्रमाणे गुंठेवारीच्या भूखंडांना विकास शुल्क ५६ रु.प्रति चौ.फूट घेण्यात येणार आहे.आमचा या भागातील नागरिकांकडून हा देखील विकास निधी घेण्याला विरोधच आहे मात्र आमच्या सरकारने १२ मार्च २०२१ रोजी गुंठेवारी कायद्यात सुधारणा करुन गुंठेवारी भूखंड नियमितकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली.

या सर्व कायदेशीर बाबी महाविकास आघाडीने व काँग्रेस सरकारने केलेल्या असतानाही भाजपाकडून आता याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याची खरमरीत टिका गजभिये यांनी केली.

भाजप आता विनामुल्य भूखंड नियमित करण्याची मागणी करीत आहे.२०१४ ते २०१९ पर्यंत त्यांचीच सत्ता राज्यात,केंद्रात व जिल्हा परिषदेत होती,त्यांना या परिसरातील भूखंड नियमित करण्यास कोणी रोखले होते?स्वत:बावणकुळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी व भाजप सरकारने हे भूखंड का नियमित करुन दिले नाही?

याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कामठी विधान सभा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी उमेदवार सुरेश भोयर यांनी या भागात अद्यापही पाणी व सांडपाणी यांची समस्या भयंकर असल्याचे सांगितले.नगरविकास खाते हे तर फडणवीस यांच्याचकडे होते,बावणकुळे हे स्वत:नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते,त्यांनी पुढाकार घेऊन का नाही या लाखो नागरिकांच्या दैनदिन जिवनाशी निगडीत असणा-या या ज्वलंत समस्या का नाही सोडवल्या?अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न देखील गंभीर असल्याचे ते म्हणाले.

मनपात सत्ता असतानाही या परिसरातील नागरिकांसाठी काहीच केले नाही,आता आघाडी सरकारने या भागाच्या विकासाची जबाबदारी नासुप्रकडे सोपवताच यांना पोटशूल उठला.जनतेची दिशाभूल केल्या जात आहे.बावणकुळे यांचा ’विनामुल्य’चा मुद्दा हा देखील फक्त देखावा असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.

याप्रसंगी मंचावर विनोद मिसाळ,जयंत दळवी,त्रिशरण सहाय्य,कुर्वेश बोरकर,निलकंठ ढोके आदी उपस्थित होते.

Latest बातम्या