
चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या ध्वज वितरण व वेबसाईटचे विमोचन
शहरातील क्रीडा संघटनांनी मैदाने दत्तक घ्यावी:गडकरींचे आवाहन
नागपूर,ता.१ मे २०२२: ‘झुंड‘चित्रपटाचे प्रेरक प्रा. विजय बारसे यांच्यासारखे प्रशिक्षक हे केवळ नागपूरचे नव्हे तर संपूर्ण देशाचा अभिमान असल्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.आज रविवार दि.१ मे रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे सायंकाळी पार पडलेल्या चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांच्या घोषणा,ध्वज वितरण व वेबसाईटच्या विमोचनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,क्रीडा महोत्सवाचे संयोजक व माजी महापौर संदीप जोशी,आ.कृष्णा खोपडे,मोहन मते,विकास कुंभारे,माजी आ.सुधाकर देशमुख,भाजप शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके,मा.आ.ना.गो.गाणार,माजी महापौर दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बारसे यांचा गडकरींच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले,की आपल्या नागपूर शहरातील विजय बारसे असोत,भाऊ काणे असाेत किवा भोळे असोत यासारख्या खेळाप्रति समर्पित असंख्य प्रशिक्षकांची आज शहराला गरज आहे.विविध क्रीडा संघटनांनी आपापसातील हेवेदावे विसरुन फक्त खेळाला प्राधान्य देण्याची गरज आहे.हा महोत्सव आणखी प्रगत झाला पाहिजे,शाळा,महाविद्यालयांच्या मैदानांवर खेळांची स्पर्धा रंगली पाहिजे.मी अनेक उद्योजकांकडे खेळांच्या प्रोत्साहनासाठी बोलत असतो.
मधल्या काळात करोनामुळे खूप अडचणी आल्या मात्र आता पुन्हा क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ होत आहे,याचा नितांत आनंद वाटतो.मला आज घरोघरी लहान-लहान मुलांच्या हातात मोबाईलवर गेम खेळतानाचे दृष्य दिसतं याचा मला अत्यंतिक राग येतो व मुलांच्या हातातून मोबाईल घेऊन तलावात फेकून देण्याची ईच्छा होते असा संताप त्यांनी व्यक्त केला.पालकांनी मुलांना तरणतालावर पाठवावे,मैदानी खेळात रमवावे,क्रीडा मैदानात सोडून द्यावे, खेळांची गोडी लावावी.यामुळे शारिरीक स्वास्थाबरोबरच व्यक्तीमत्व विकसित होण्यास देखील मदत होते.आयुष्याला वळण व शिस्त लागण्यासाठी जिवनात खेळ हा महत्वाचा असतो.आता नागपूरात खासदार क्रीडा महोत्सव १६ दिवस चालणार आहे.४६ मैदानांवर विविध क्रीडा स्पर्धा भरणार आहेत.१ हजार ६४ चमू या महोत्सवात सहभागी होणार आहेत.४२ हजार खेळाडू यात रममाण होणार असून ९ हजार २३६ स्पर्धा पार पडणार आहेत.५६० चषक दिले जाणार असून ७ हजार ८३० मॅडल्स प्रदान केले जाणार आहेत.१२ मे ते २८ मे दरम्यान हा क्रीडा महोत्सव पार पाडल्या जाणार आहे.यात नागपूरवासियांनी अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बावणकुळे हे पालकमंत्री असताना शहरात २०० मैदाने खेळासाठी विकसित करण्यात आली होती.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या मैदानांच्या विकासासाठी त्यांनी ५० कोटींचा निधी दिला.आता शहरात ३५० मैदाने तयार केली जात आहेत.नागपूर सुधार प्रन्यासद्वारे ज्या घाण पाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध केले जाते ते पाणी या मैदानाच्या देखभालीसाठी वापरल्या जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
१२१ मैदानांवर बोअरवेल खोदून वीज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील ज्या-ज्या क्रीडा संघटनांना,मंडळांना मैदाने हवीत ती त्यांना खेळांच्या विकासासाठी दिली जाईल मात्र समर्पित भावनेने त्यांनी खेळांचा व क्रीडा पटूंचा विकास साधावा
खेळ ही एक अशी बाब आहे ज्यात ‘राजकारण’नको,अशी कानटोचणी देखील याप्रसंगी गडकरी यांनी केली.
नागपूरातील भव्य क्रीडा महोत्सवापासून प्रेरणा घेऊन आता भंडारा येथे क्रीडा महोत्सवाला सुरवात झाली.वर्धा येथे देखील हा महोत्सव पार पडणार आहे.आपल्या शहरात जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी,मनपाच्या नगरसेवकांनी आपापल्या मतदार संघात क्रीडा मैदाने विकसित करावी अशी सूचना त्यांनी केली.
आजच काँग्रेसनगर येथील जिमखानासमोरुन जात असताना मला ते जुने वैभव आठवले.याच इंडियन जिमखान्याच्या मैदानात मी एकेकाळी क्रीकेट खेळायचो.मला आठवतं मी याच मैदानावर ’छक्का’देखील मारला होता.आज मात्र तिथे अतिक्रमण झालं आहे,अतिशय खराब अवस्था त्या मैदानाची झाली आहे.हा जिमखाना नागपूर महानगरपालिकेच्या अधीन येतो.शहरातील असे जुने वैभव वाचविल्या गेले पाहिजे,अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सवाची सांगता २८ मे रोजी होणार असून यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाची सांगता होणार आहे.गेल्या वेळी जुबैन नावाच्या गायकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,तरुणाईने तो स्टेडियम अक्षरश: फूलून गेला होता.क्रीडा महोत्सवाच्या समारोपाला यशवंत स्टेडियममध्ये क्रीकेटचा देव सचिन तेंदूलकर याने देखील वर्णी लावली होती.हा महोत्सव अधिकाधिक प्रगत झाला पाहिजे,नागपूर शहराच्या घरोघरी पोहोचला पाहिजे असे मनोगत त्यांनी व्यक्त करीत,यशवंत स्टेडिमयमध्ये ज्येष्ठ नागरिकांची क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.पन्नास-साठीच्या पलीकडील ज्येष्ठ नागरिकांनी ज्या उत्साहाने त्या स्पर्धेत सहभाग नोंदवला तो अविस्मरणीय असल्याचे ते म्हणाले मात्र नागपूरातील रणरणती उन बघता या वेळी ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा सकाळी ६ ते ८.३० तसेच सायंकाळी ६ ते ८.३० दरम्यान ठेवण्याची सूचना याप्रसंगी गडकरी यांनी केली.
तेलंगखेडी येथे लेझर शोमध्ये इंग्रजी कॉमेंट्रीसाठी शतकाचा महानायक अमिताभ बच्चनने नि:शुल्क आवाज दिला असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.प्रा.विजय बारसे यांच्या जिवनावर आधारित ‘झुंड‘चित्रपटात अमिताभ बच्चन यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे हे विशेष! याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते रिमोट दाबून क्रीडा महोत्सवाच्या वेळा पत्रकाचे विमोचन करण्यात आले.विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींना गडकरी यांच्या हस्ते ध्वज वितरण करण्यात आले.बटन दाबून वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी चकाकत्या चंदेरी चषकाचे अनावरण प्रा.विजय बारसे यांच्या हस्ते करण्यात आले.
खेळ हवा राजकारण नको:संदीप जोशी-
नागपूरात खासदार क्रीडा महोत्सवाचे चौथे पर्व १२ मे पासून सुरु होणार असून २८ मे रोजी महोत्सवाची सांगता होईल.या महोत्सवात एकूण ३५ खेळ राहणार असून ४० क्रीडांगणांवर ही स्पर्धा पार पडणार आहे.या स्पर्धेत ५६० चषक विजेत्यांना प्रदान केले जाणार असून ७ हजार ८३० मेडल्स प्रदान केले जाणार आहे.या स्पर्धेत ४० हजार खेळाडू सहभागी होणार असून ९३ लक्ष रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या खासदार क्रीडा महोत्सवाचे, खासदारांच्या बैठकीत स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली .गोंदियात देखील खासदार क्रीडा महोत्सवाची सुरवात झाली असून या महोत्सवाला आणखी विस्तृत पातळीवर साकारण्यासाठी ऑन-लाईन पद्धतीने क्रीडा संघटनांची या पुढे नोंदणी केली जाणार आहे.यावेळी मात्र ऑफ लाईन व ऑन लाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करण्यात आली,पुढील वर्षी ही नोंदणी फक्त ऑन लाईन होईल
.‘खेळाडूंपर्यंत आपणच जावं’ हा उद्देश्य या क्रीडा महोत्सवाचा आहे मात्र काही क्रीडा संघटनांमध्ये अंतर्गत राजकारण दिसून पडतंय.एकाच खेळाच्या तीन-तीन संघटना नोंदणी करतात.ज्या चमूला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली त्या खेळाडूंना पुढील वेळी आम्ही खेळू देणार नाही,अशी भावना खेळ विश्वात अतिशय दूर्देवी आहे.आम्हाला निकोप स्पर्धा आणि निकोप स्पर्धक हवेत.खेळात ‘राजकारण’चालू देणार नाही.आपली कोती वृत्ती काही संघटनांनी जर बदलली नाही तर पुढील वर्षी त्यांना यजमान पद दिले जाणार नाही.आम्हाला या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंचा विकास करायचा आहे,संघटनांच्या राजकारणात आम्हाला रस नाही.

आमचे चॅनल subscribe करा