Homeराजकारणफडणवीसांच्या ‘राजकीय’ पत्राचे ‘पुरातन’ कवित्व

फडणवीसांच्या ‘राजकीय’ पत्राचे ‘पुरातन’ कवित्व

(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१० डिसेंबर २०२३:  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुुरुवारपासून नागपूरात सुरु झाले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये कवित्व रंगले ते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावरील उपस्थितीला घेऊन.नवाब मलिक सत्ताधा-यांच्या मांडीला मांडी लावून बाकावर बसण्याचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टिकात्मकरित्या उपस्थित केला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच तडफेने सभागृहात याला प्रतिउत्तर दिले,इतकंच नव्हे तर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चक्क एक पत्र लिहले,ते सोशल मिडीयावर व्हायरल केले आणि या पत्राचे राजकीय कवित्व महाराष्ट्रात चांगलेच रंगले.

या सर्व ‘पत्र’बाजीला एक फार मोठी ‘ऐतिहासिक’राजकीय पार्श्वभूमी आहे,हे अद्याप महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात २३ फेब्रुवारीपासून ईडीच्या कोठडीत होते.वैद्यकीय कारणातून त्यांना जामीन मंजूर झाला व ते सध्या जामीनावरच असून, विधीमंडळाच्या कामकाजात लोकप्रतिनिधी म्हणून सहभागी झाले आहेत.

(छायाचित्र :  फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहलेले व व्हायरल केलेले हेच ते पत्र)

राज्यात २०१९ च्या विधान सभा निवडणुकीनंतर सर्वाधिक १०५ जागा निवडून येऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाची सरकार स्थापन न होता अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकासआघाडीचे सरकार सत्तारुढ झाले.यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे अल्पसंख्यांक मंत्री झाले.भाजप व नवाब मलिक यांच्यातील वाकयुद्ध व आरोप-प्रत्यारोपांचा वाद हा तेव्हापासूनचा व तितकाच ‘पुरातन’आहे.१२ नोव्हेंबर २०२१ मध्ये भाजपच्या एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जागा हडप केली असल्याचा धक्कादायक आरोप करुन, हे प्रकरण बाहेर काढणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला होता.तर दुसरीकडे मलिक यांच्याविषयीची सर्व माहिती आपण सक्तवसुली संचालनालय(ईडी) कार्यालयास देणार असल्याचा इशारा भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी दिला तसेच नवाब मलिक हे नवीन वर्ष तुरुंगात साजरे करणार ,असा दावा केला होता.

मलिकांनी केलेल्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे ईडीकडे सुपूर्द करणार असून त्यात कसाईवाड्यापासून फर्जीवाड्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल.कुर्ल्यातील चरस मलिक कोण आहे?हे देखील बाहेर येईल,असा इशारा अराफत यांनी दिला होता.

ऑक्टोबर २०२१ च्या शिवसेनेच्या दस-या मेळाव्यानंतर फडणवीस व शरद पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.आघाडी सरकारने वसुलीसाठी सॉफ्टवेअर तयार केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला तर वसुलीची ती चीप अथवा सॉफ्टवेअर असेल ,तर त्यांनी दाखवावे,आमच्या ज्ञानामध्ये भरच पडेल,असे आव्हानच शरद पवार यांनी केले. यात आणखी भर घालत, सरकारचे अर्धेच काय पूर्ण मंत्रीमंडळ तुरुंगात टाका,आम्ही कोणालाही घाबरणार नाही,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिला.इंग्रजाच्या जुल्मी अत्याचाराच्या विरोधात लाल-बाल-पाल यांनी क्रांती केली होती,त्याची पुनरावृत्ती भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र,पश्‍चिम बंगाल आणि पंजाब या तीन राज्यातून उभी राहील,अश्‍या शब्दात मलिक यांनी राज्यपातळीवरील वादात, केंद्र सरकारला ही खेचले होते.

एवढंच नव्हे तर महाविकासआघाडी सरकार आणि भाजपच्या वादात मलिक यांनी देवेंद्र फडणवीस हे ड्रग्ज रॅकेट चालवतात,असा आरोप करीत खळबळ माजवून दिली .फडणवीस आणि ड्रग्ज माफिया जयदीप राणा यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप करीत मुंबईतील ‘ड्रग्ज रॅकेट’ची न्यायालयीन चौकशी करावी,अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती.

मलिक म्हणाले की,फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या पत्नीने मुंबई नदी संरक्षण अभियानातंर्गत एक गाणे तयार केले होते.सोनू निगम यांनी हे गाणे गायले होते.फडणवीस यांच्या पत्नीने अभिनयासह गाणेदेखील गायले होते.या गाण्याचे मुख्य आर्थिक पुरवठादार जयदीप राणा होते,त्यामुळे जयदीप राणा यांना ओळखत नाही अशी पळवाट भाजप नेत्यांना काढता येणार नाही.राणा आणि फडणवीस यांचा गणपती दर्शन घेतानाचे एक छायाचित्र देखील माध्यमांना मलिक यांनी दाखवले होते.

फडणवीस यांचा एक ‘वाझे’ मुंबईत राहतो,असा दावा मलिक यांनी केला होता.नीरज गुंडे नामक व्यक्तीचे माजी मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध होते.पोलिसांच्या बदल्या त्यांच्या मार्फत होत होत्या.त्या माध्यमातून पैसे उकळले जात होते.यावर,माझ्यावर आरोप करणा-या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत.दिवाळीनंतर या संदर्भातील सर्व पुरावे देत आपण बॉम्ब फोडणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता.हा संपूर्ण कलगीतुरा १ नोव्हेंबर २०२१ रोजी रंगलेला अवघ्या महाराष्ट्राने बघितला होता.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले होते की,‘रिव्हर मार्च’ या संस्थेने त्यांच्या प्रसार मोहिमेसाठी एक ‘कंटेंट टीम’भाडेतत्वावर घेतली.‘नदी बचाओ’या अभियानाशी माझी पत्नी सुद्धा जोडलेली होती.त्यावेळी त्या चमूतील कर्मचा-यांनी सेल्फी काढली.‘रिव्हर मार्च‘सोबत आलेल्या कुणाशीही आमचा संबंध नाही.छायाचित्रावरुन संबंध जोडायचे असतील तर मलिक यांचा जावईच ड्रग्ज प्रकरणात सापडला आहे.मग संपूर्ण ‘राष्ट्रवादी’हा ड्रग्ज माफियांचा पक्ष म्हटला पाहिजे,पण मी तसे म्हणनार नाही,असे फडणवीस म्हणाले होते.

समीर दाऊद वानखेडे यांची बदली करण्यामध्येही फडणवीस यांचा हात आहे.निरपराध लोकांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी वानखेडे यांना आणले.ड्रग माफिया तसेच काशिफ खान,रिषभ सचदेवा,आमीर फर्निचरवाला,प्रतीक गाभा यांना साेडून देण्यात आले.फडणवीस यांच्या इशा-यावरुन ड्रग्जचा व्यवसाय सुरु आहे.प्रतीक गाभा काेण आहे?तो कुणासाठी पार्ट्या आयोजित करतो?हे सर्व येणा-या दिवसात जगजाहीर करण्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला होता.ज्यांचा भाजपशी संबंध आहे अशा आणखी ड्रग्ज माफियांची छायाचित्रे पुढील काही दिवसांत समोर आणणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

यावर,मी आजवर कधीही विनापुरावे आरोप केले नाहीत आणि केलेले कोणतेही आरोप मी मागे घेतलेले नाहीत.केवळ ’एनसीबी’दबावात यावी आणि स्वत:चा जावई सुटावा,यासाठी मलिक यांचा आटापिटा सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.नीरज गुंडे हे माझ्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मित्र असल्याचे फडणवीस म्हणाले.ते दररोज राष्ट्रवादी काँग्रेसचेच गैरव्यवहार बाहेर काढतात,त्यामुळे हिंमत असेल तर त्यांच्यांवर कारवाई करावी,‘वाझे‘पाळण्याची सवय त्यांना आहे,आम्हाला नाही,असे उत्तर फडणवीसांनी दिले होते.

तर, अमृता फडणवीस यांनी मलिक यांना उद्देशून ‘हे तर बिगडे हूवे नवाब आहेत,महाराष्ट्र पुढे जायचा असेल तर या बिगड्या नवाबांना त्यांच्या बॉस किवा सुपर बॉसनी समजवावे’असे उद् गार काढले.मर्द असाल तर,मला लक्ष्य न करता त्यांनी त्यांची राजकीय लढाई देवेंद्र फडणवीसांशी लाढवी,असे आवाहन केले.

नीरज गुंडे यांच्या चेंबुरच्या घरी बसून फडणवीस त्यांचे मायाजाल टाकत असत,असा उल्लेखही मलिक यांनी केला.मायाजालचा उल्लेख होताच प्रसिद्धी माध्यमकर्मींनी गुंडे यांचे घर गाठले मात्र,काहीही बोलणार नसल्याचे उत्तर गुंडे यांनी दिले.मंत्रालयातला भ्रष्टाचार अन मुंबई परिसरातील अधिका-यांचे हितसंबंध यावर नीरज गुंडे हे कायम ट्टीट करीत असतात.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील(एसआरए) एका व्यवहाराबद्दल गुंडे यांनी ट्टीट करताच तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगेचच विभागीय चौकशीचे आदेश दिले होते.

९ नोव्हेंबर २०२१ रोजी फडणवीस यांनी आरोप करीत,सरदार शहा वली खान हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार,तर मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा सहकारी आहे,अशा मुंबई बॉम्बस्फोटातील मारेक-यांशी अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध असून त्यांच्यात जमीन व्यवहार झाल्याचा आरोप विधानसभेतील तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.या दोघांकडून नवाब मलिक यांनी कोट्यावधींची जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचे फडणवीस म्हणाले.या आरोपांच्या पुराव्यादाखल कागदपत्रे सादर करीत,ही सर्व कागदपत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सरदार शहा वली खान हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटा मालिकेतील गुन्हेगार असून त्याच्या जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

यावर,मी जी काही जमीन विकत घेतली ती रितसर आहे,मी गैरमार्गाने दबाव टाकू कुठलीही संपत्ती घेतली नाही.अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचा असेल तर,अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कासरकरचे कोकणातील घर सनातन संस्थेने घेतले असून,त्यांचे व दाऊदचे संबंध आहेत असे समजायचे का?असे प्रतिउत्तर नवाब मलिक यांनी दिले.लवकरच अंडरवर्ल्डशी संबंधित ‘हायड्रोजन बॉम्ब’फोडण्याचा इशाराही मलिक यांनी दिला.
फडणवीस तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे.परंतु लवकरच हायड्रोजन बॉम्ब मुंबईत फोडून अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मुंबई शहराला कसे ओलीस ठेवले.एक व्यक्ती विदेशात बसून कोणासाठी खंडणी वसूल करीत होती.तो अधिकारी कोणाचा खास होता,याचा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.फडणवीस यांनी दिवाळी नंतर फटाके फोडण्याची घोषणा केली होती परंतु,त्यांचे फटाके भिजल्याने फटाक्यांचा आवाज झाला नाही,फक्त वातावरण तयार करण्यात आले,अशी कोटी ही नवाब मलिकांनी केली होती.

सन १९९९ मध्ये फडणवीस प्रथमच आमदार म्हणून मुंबई शहरात आले.माझ्या ६२ वर्षांच्या जीवनात,२६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत असे गंभीर आरोप कोणी लावले नाहीत,परंतु तुम्हाला ज्याने माहिती दिली तो कच्चा खेळाडू आहे,असे सांगत,त्या दीड लाख फूट जमीनीवर एक मदीना तुल अमान को-ऑपरेटीव्ह सोसायटी आहे.१९८४ मध्ये तयार झालेली ही इमारत गोवावाला कंपाऊंड या नावाने ओळखली जाते.ज्यामध्ये मुनिरा पटेलने रस्सीवाला याला विकासक करण्याचा अधिकार देऊन १४०-१५० सदनिका बनवून सर्वसामान्य लोकांना विकल्या.त्या मागे जमीन आहे.त्यावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे.त्या ठिकाणी आमचे गोडाऊन आहे.ज्याची जागा सॉलिड्स इन्वहेंस्टमेंट कंपनीला लीजवर देण्यात आली होती.या सर्व सत्याला फडणवीस यांनी ‘राईचा पर्वत’बनवण्याचा प्रयत्न केला,फडणवीस यांचे आरोप खोटे असल्याचा दावा मलिक यांनी केला.बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केली नाही.वॉचमेनने आपले नाव त्या जमीनीवर लावले होते,ते रितसर पैसे देऊन कमी केले गेले हे सत्य आहे,अशी कबुलीही मलिक यांनी दिली होती.

यावर,मुंबई ही सलीम-जावेदची गोष्ट नाही,ना कोणत्या मध्यांतरणानंतरचा सिनेमा असल्याचे फडणवीस म्हणाले.हा अत्यंत गंभर आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा आहे.मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिक यांनी जागा कशी विकत घेतली?असा सवाल फडणवीस यांनी केला.सध्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा सरदार वली शहाने मुंबई शेअर बाजार आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्याबाबतचे सर्वेक्षण केले होते.टायगर मेमनच्या घरी शिजलेल्या कटाच्या वेळी तो उपस्थित होता.त्यानेच मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरले.तर दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा हसीना पारकरचा सहकारी आहे.त्याला पुढे करुन संपत्ती बळकावण्याचे काम ती करायची.या दोघांकडून नवाब मलिक यांच्या कंपनीने जागा खरेदी केल्या.

हसीना पारकरला जेव्हा अटक झाली तेव्हा सलीम खानलाही अटक झाली.दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नावाने सलीम पटेल वसुली करायचा.कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवरील जवळपास ३ एकर जागा शाहवाली आणि सलीम पटेल यांनी सॉलिड्स नावाच्या कंपनीला विकली.सॉलिड्स इन्व्हेसमेंट प्रा.लि.यांच्या वतीने फराज मलिकांनी यावर सही केली.काही काळ मंत्री नवाज मलिक स्वत: कंपनीचे संचालक होते.नंतर ते कंपनीतून निवृत्त झाले.शाहवली आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिड्सला ही जागा ३० लाखांमध्ये विकली आणि त्यातील २० लाख रुपये दिले गेले.या जागेचे सॉलिड्स कंपनीला एक कोटी रुपये दर महिना भाडे मिळत आहे.त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मलिकांनी जमीन का खरेदी केली?असा सवाल फडणवीस यांनी केला.मलिकांचा फक्त एकाच नव्हे तर थेट संबंध चार मालमत्तांमध्ये अंडरवर्ल्डच्या लोकांशी आहे.ही सर्व कागदपत्रे मी सुयोग्य प्राधिकरणाकडे सोपविणार आहे,असे फडणवीस म्हणाले होते.

यावर,दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला रियाझ भाटी हा फडणवीस यांच्यासोंबत भोजन कसा करतो,असा प्रश्‍न नवाब मलिक यांनी केला.नोटाबंदीच्या काळात फडणवीस यांच्या पाठिंब्याने बनावट नोटांचे रॅकेट सुरु होते,त्यातून ‘बीकेसी’तील नोटांचे प्रकरण दाबले गेल्याचा आरोपही मलिक यांनी केला.मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी अनेक गुंडांना सत्तेतील पदे दिल्याचा मुद्दाही मलिक यांनी उपस्थित केला.भाटीकडे दोन पासपोर्ट असतानाही फडणवीस यांच्यामुळे त्याला दोनच दिवसांत सोडून देण्यात आले.त्याला का सोडले?याचा खुलासा फडणवीस यांनी केला पाहिजे.भाजप,पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्या कार्यक्रमात तो दिसत होता,तो फडणवीस यांच्यासोबत कसा फिरायचा?बनावट नोटांच्या प्रकरणातील आरोपींच्या भावाला भाजपात घेऊन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष पद देण्यात आले,या प्रकरणाबाबत गृहखात्याकडे तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.तेव्हा गृहखाते हे अनिल देशमुख यांच्याकडे होते,हे विशेष.

मलिक यांच्या या आरोपांनंतर फडणवीस यांनी ट्टीटर एक पोस्ट केली ’साहित्याचे नोबेल पुरस्कार विजेते लेखक जार्ज बर्नाड शॉ म्हणतात डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये,तसे केले तर तुम्हाला घाण लागते आणि त्याबरोबर डुकरालाही ते आवडायला लागते’अर्थात या पोस्टमध्ये त्यांनी मलिक यांचा कुठेही उल्लेख केला नाही.

याशिवाय,मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरी अमलीपदार्थ सापडल्याचे जाहीर वक्तव्य केल्याप्रकरणी मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.फडणवीस यांच्यामुळे माझ्या कुटूंबाची बदनामी झाली असून त्याची भरपाई म्हणून त्यांनी ५ कोटी रुपये द्यावेत व जाहीर माफी मागावी,अशी मागणी निलोफर यांनी केली होती.फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील अवमाननाकारक ट्टीट केल्याबद्दल नवाब मलिक यांना नोटीस बजावली होती.

गुजरातच्या द्वारका येथे ३५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते.त्या आधी मुंद्रा एअरपोर्टवर ३ टन अमलीपदार्थ सापडले होते,ज्याची किंमत २७ हजार कोटी होती.या प्रकारात मनिष भानुशाली,धवल भानुशाली,के.पी.गोसाावी,सुनिल पाटील हे किरिटसिंह राणा यांच्याकडे वारंवार का जात आहे?हे सगळे गुजरातच्या पंच तारांकित हॉटेलमध्ये कशासाठी राहत आहेत? असा सवाल मलिक यांनी विचारला होता.

समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात अमलीपदार्थांचा व्यापार चालतो,हे आता सिद्ध झाले अाहे,असा आरोप करीत मलिक यांनी केंद्र सरकारच्या वर्मावर घाव घातला होता.या व्यापारामागे कोण आहे?याचा खुलासा एनसबीबी आणि एनआयए या संस्थांनी करावा,अशी मागणीही त्यांनी केली होती.

मुंबईत दोन,चार ग्रॅम अमली पदार्थ पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे,असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

दाढीवाला काशिफ खान याच्याकडे कोणाकोणाचे पैसे आहेत,याची कसून चौकशी झाली तर त्यामागील मोठे गौडबंगाल बाहेर येईल,माझ्याकडे माहितीचा प्रचंड दारुगोळा आहे.मात्र,अधिवेशनाच्या आधी बोललो तर काही मंडळी कोर्टकचे-या करतील.त्यामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात माझ्यावरील आरोपांना सडेतोड उत्तर देईल,त्यानंतर भाजपच्या नेत्यांना राज्यात तोंड दाखवणे कठीण होईल,असे ऑक्टोबर २०२१ मध्ये नवाब मलिक यांनी इशारा दिला होता.

यासंदर्भात भाजप नेत्यांची नावे आज सांगत नाही.माझ्यावर अधिवेशनात हल्ला झाल्यावर मोठमोठी नावे जाहीर करेन.एका सैतानाचा जीव पोपटात अडकला असून,तो पोपट तुरुंगात जाण्याची शक्यता असल्यामुळे राक्षसी विचारांचे भाजपचे काही लोक घाबरले असून,त्यांची प्रकरणे बाहेर येणार असल्याचा दावा मलिक यांनी केला होता.महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान समीर वानखेडेंच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला हाेता.

(भाग-२ उद्याच्या बातमीत)

 

Latest बातम्या