Homeनागपूर न्यूजपूल एक ’राजकीय’ उद् घाटन दोन!

पूल एक ’राजकीय’ उद् घाटन दोन!

जरीपटक्यातील इटारसी पूलाचे कवित्व

व्यापा-यांनीच केले पुुलाचे उद् घाटन: भाजपाची श्रेयवादासाठी केविलवाणी धडपड

ना गडकरी आले ना फडणवीस:कुकरेजा यांचा मंच सूना-सूना

नागपूर,ता.१ नोव्हेंबर २०२३: मागील तीन वर्षांपासून जरीपटका येथील इटारसी पुलाचा मार्ग चांगलाच रखडला होता.८० कोटींच्या या पुलाच्या बांधकामामुळे येथील नागरिक व व्यापारी वर्गाला तब्बल तीन किलोमीटरचा लांब फेरा मारुन मानकापूर किवा मेकोसाबागच्या पुलावरुन इप्सित स्थळी पोहोचावे लागत होते.नागरिकांना स्वत:चे घर गाठणे तसेच व्यापा-यांना आपली दूकानदारी सुरु ठेवण्यासाठी हा फेरा मारणे क्रमप्राप्त असले तरी ,ग्राहकांना अशी कोणतीही मजबुरी नसल्याने व्यापारी वर्ग हा कमालीचा आर्थिक अडचणीत सापडला असताना या पुलाचे कवित्व संपता संपत नव्हते,अखेर काल येथील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने स्वत:च होम हवन करुन प्रदीर्घ काळ नेत्यांच्या ‘शुभ’ हस्ते उद् घाटनासाठी प्रतिक्षारत असणारा हा मार्ग खुला करुन घेतला व या पुलावरुन आवागमनही सुरु झाले.

या संपूर्ण घडामोडीत काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांनी पुढाकार घेऊन हा मार्ग जनतेसाठी खुला केल्याने याच भागाचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र उर्फ विकी कुकरेजा यांनी आज १ नोव्हेंबर रोजी याच पुलाचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रात्री आठ वाजता लोकापर्ण सोहळा आयोजित केला. यासाठी बाकायदा मंच वगैरे उभारण्यात आला.डीजे वाजवण्यात आला.केंद्राच्या निधीतून या पूलाचे निर्माण कार्य होत असल्याने याचे उद् घाटन नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्याच हस्ते झाल्याचे कुकरेजा यांना न रुचल्याने, त्यांनी पुनश्‍च या पुलाच्या उद् घाटनाचा घाट घालून संपूर्ण श्रेय हे भाजपलाच मिळावे यासाठी सर्वतोपरी आटापिटा केला मात्र,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुकरेजा आयोजित उद् घाटन सोहळ्यात अखेरपर्यंत फिरकलेच नाही!

महत्वाचे म्हजे हा पूल दोन फेजमध्ये निर्माण होत असून दोन्हीकडे फ्लाईंग्स आहे.यात भाजपच्याच एक नेत्याचे रमेश वानखेडे यांचे घर अगदी रस्त्यालगत असल्याने व या प्रकल्पात त्यांचे घर जाणार असल्याने त्यांनी या डिझाईनलाच,जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात आव्हान दिले.यामुळे या पुलाचे बांधकाम चांगलेच रखडले.जनहित नव्हे तर स्वहितासाठी टाकलेल्या याचिकेमुळे व यामुळे हायकोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे या भागातील नागरिक व व्यापारी चांगलेच मेटाकुटीला आल्याचे बोलले जात आहे.

याच पुलाच्या बांधकामात आणखी एक अडथळा ठरला तो बेझनबाग पाण्याच्या टाकीच्या मोठ्या पाईपलाईनवर पुलाचा येणारा पिल्लर.पाण्याच्या पाईपचे स्थानांतरण करण्याचे नियम असल्याने ‘युटिलिटी चेंज’साठी कंत्राटदाराने(Banka Company,Mumbai) १५ कोटींची रक्कम नागपूर महानगरपालिकेत भरली होती मात्र १६ महिने यावर कोणतीही कारवाई मनपातील भाजपच्या पदाधिका-यांनी केली नाही.२०१८-१९ मध्ये याच प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे कद्दावर नगरसेवक व नेते विकी उर्फ विरेंद्र कुकरेजा हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते,हे विशेष!तरी देखील येथील व्यापारी तसेच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी कोणतीही प्रभावी उपाययोजना केली नाही,अशी टिका केली जात आहे.

२०१९ मध्ये राज्यात सत्तांतरण घडले व काँग्रेसचे आमदार नितीन राऊत हे शहराचे पालकमंत्री झाले.त्यांनी रविभवनात या विषयावर मनपाच्या अधिकारी श्‍वेता बॅनर्जी व संबधित अधिका-यांसोबत बैठक घेतली.या बैठकीनंतर ४५ दिवसात युटिलिटी शिफ्टींगची प्रक्रिया पार पडली.साईट क्लिअर होताच पुलाच्या पिल्लरचा मार्ग मोकळा झाला.

रेल्वे ट्रॅकच्या वरुन ब्रिज क्रॉसिंग असल्याने या ठिकाणी ६ गर्डर बसविण्यात येणार होते.गर्डरच्या कामासाठी रेल्वे ब्लॉक करने अपरिहार्य असते.मात्र,रेल्वेच्या नियमाप्रमाणे दर वर्षी पावसाळ्याच्या निमित्ताने १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे ब्लॉक केले जाऊ शकत नाही.परिणामी,येथील नागरिकांच्या अथक प्रयत्नातून,प्रसंगी क्रेन उपलब्ध करुन देण्यात आली व १ जूनच्या आधीच तब्बल तीन रात्र अहोरात्र प्रयत्नातून दोन,दोन,दोन असे सहा ही गर्डर बसविण्यात आले.हे काम १ जून पूर्वी झाले नसते तर नागरिकांना १५ ऑक्टोबरपर्यंत वाट पहावी लागली असती.यानंतर आणखी पुढील सहा महिने याच कामात वाया गेले असते.

अखेर येथील नागरिक व व्यापारी वर्गाच्या अथक प्रयत्नातून तसेच रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अखेर या पुलाचा मार्ग मोकळा झाला मात्र,राजकीय उद् घाटनाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेत हा पुला आवागमनासाठी अडकल्याने, येथील रहीवाश्‍यांचा व व्यापारी वर्गाचा संयमाचा बांध फूटला व काल सकाळी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांच्या नेतृत्वात येथील व्यापारी वर्गाने पुलावर होम हवन करुन स्व: पुलाचे उद् घाटन केले व आवागमन सुरु केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाला या घडामोडीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जग्यासी यांच्याशी संपर्क साधून, पुलावर अद्याप सुरक्षेच्या दृष्टिकोणातून थोडे काम शिल्लक असल्याने केवळ एक दिवसाचा वेळ मागून घेतला,परिणामी,काल तीन तासांच्या आवागमनानंतर पुन्हा हा मार्ग बंद करण्यात आला.

आज सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्यांचे काम पूर्ण झाल्याची सूचना मिळताच,पुन्हा या पुलावरुन रहदारी सुरु झाली मात्र,कुकरेजा यांनी जरीपटका दूकानदार संघातर्फे याच पुलाचे गडकरी यांच्या हस्ते रात्री आठ वाजता भव्य लोकापर्ण सोहळा अायोजित केला.मात्र,या दोन्ही मोठ्या नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली व ‘झूठ की पंतग कट गई’अश्‍या आशयाचे मिम्स समाज माध्यमांवर चांगलेच रंगले.

एकीकडे भाजप हा सातत्याने विकासाची कास धरणारा पक्ष म्हणून जाहीर करतो.स्वत: गडकरी हे विकासाच्या बाबतीत पक्ष विरहीत राजकारण करीत असल्याचे वारंवार सांगतात.मात्र,त्यांच्याच पक्षाचा एक पदाधिकारी, नागरिकांच्या ज्वलंत समस्येचा मार्ग मोकळा होत असताना देखील पक्षीय राजकारणासाठी व श्रेयवादासाठी केविलवाणी धडपड करताना दिसून पडले,अशी टिका उमटली.

जे काम कुकरेजा यांनी मनपात भाजपची सत्ता असताना करने क्रमप्राप्त होते ते काम, इतर कोणी केले तरी कुकरेजा यांना राजकारण किवा श्रेयवादापेक्षा येथील व्यापारी वर्गाची समस्या जास्त महत्वाची नाही वाटली का?असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

करोना काळातून अद्याप येथील व्यापारी वर्ग सावरला नसून, झिंझर मॉलमधील दूकानदार पुन्हा जरीपटक्यात परत येत असल्याचे चित्र उमटले आहे.कराेना नंतर येथील व्यापारी वर्ग आधीच पराकोटीच्या अडचणीत आला असून,ऑन-लाईन खरेदीमुळे येथील व्यापारी वर्ग मेटाकुटीस आला आहे.जरीपटकाची कापड मार्केटचे हब म्हणून ओळख होती,ती हळूहळू पुसल्या जात आहे.लग्नाच्या खरेदीचे पसंदीचे ठिकाण म्हणून जरीपटका येथे खरेदीलाच नागपूरकर प्राधान्य देत होते.हे चित्र आता पार पालटले आहे.अशावेळी उरले सुरले ग्राहक तब्बल तीन किलोमीटरचा फेरा मारुन, ते ही तब्बल तीन वर्षांपर्यंत खरेदीसाठी प्रतीक्षा करतील,अशी अपेक्षा करने म्हणजे ‘मूर्खांच्या नंदनवनात’ वावरण्यासारखी बाब असल्यानेच, येथील नागरिकांचा व व्यापारी वर्गाचा संयम संपला व काल बहूप्रतिक्षीत ‘राजकीय’उद् घाटना ऐवजी येथील नागरिकांनी स्वत: पुलाचे लोकापर्ण करुन मार्ग खुला करुन घेतला.

तरी देखील एकाच पुलाचा दोनवेळा ‘राजकीय ’लोकापर्णचा घाट आज समाज माध्यमात चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

 

Latest बातम्या