
राबवणार दहा कलमी कार्यक्रम
नागपूर,ता. १८ ऑक्टोबर: राष्ट्रवादी पक्षाच्या २०१९ मध्ये असे लक्षात आले की ग्रामीण भागात समस्या तर आहेतच पण त्याच धर्तीवर शहरी भागाचे देखील अनेक ज्वलंत व धगधगते प्रश्न आणि समस्या आहेत.शहरीकरण झपाट्याने होत असल्याने या प्रश्नांनी गंभीर स्वरुप धारण केले आहे.इतर देशात शहरांचा विकास हा नियोजनबद्धरित्या केला जातो मात्र भारतात शहरे ही अस्ताव्यस्त,अवाढव्य ,अनियंत्रित तसेच नियोजनशून्यरित्या विस्तिारीत होत आहेत.पुढच्या पिढीला जर आरोग्यदायी जिवन द्यायचे असेल तर शहरातील सर्व समस्यांना हात घालावाच लागेल व त्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल ही कटीबद्ध असल्याचे विधान पक्षाच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष व खासदार वंदना चव्हाण यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले,की राज्यात २८ महानगरपालिका आहेत त्यामुळे २८ अर्बन सेलची स्थापना करण्यात आली आहे.प्रत्येक शहराचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत.या प्रश्नांना वाचा कशी फोडायची यासाठी पदाधिकारी नेमले आहेत.यासाठी दहा समित्या नेमण्यात आल्या असून या समित्यांच्या माध्यमातून १० कलमी कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समन्वय,पर्यटन,पर्यावरण,महिलांचे प्रश्न,तरुणाईच्या समस्या,ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या,आरोग्य,शिक्षण,स्वयंसेवी संस्थां,प्रशिक्षणासाठी दहा समित्या काम करणार आहेत.
पर्यावरणाच्या संदर्भात तर आता खूपच उशिर झाला असून ‘जर-तर’ची भाषा कालबार्ह्य झाली आहे.आता पर्यावरणाचे रक्षण ‘करावेच लागेल’असा इशारा देत अर्बन सेलच्या सहकार्याने प्रत्येक शहरातील पर्यावरणाची समस्या ही मार्गी लावावी लागेल.या संदर्भात आज पहीली बैठक पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकी प्रद्युन्न सहस्त्रभोजनी तसेच प्राची माहूरकर उपस्थित होते.त्यांचा पर्यावरणासंबधीचा शास्त्रोक्त अहवाल समजून घेतला.त्यांचा अभ्यास दांडगा असतो मात्र त्यांना व्यक्त होणारा आवाज नसतो.आम्ही हा पूल निर्माण करत असतो.
शहरात वाहने,कारखाने प्रदुषण वाढवित आहेत.कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जाचे केंद्रे शहरे बनत चालली आहे.उपग्रहातून घेतलेल्या छायचित्रात ही शहरे प्रदुषणाच्या धोकादायक पातळीमुळे,भीतीदायक अशी लाल रंगाची दिसतात आहेत.२००५ सालीच मी प्रदुषणाबाबत एक अहवाल तयार केला होता.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याचे जनजागृतीपर सादरीकरण पुण्यात केले.दूर्देवाने आज एवढ्या वर्षानंतर देखील त्या अहवालातील बाबी तश्याच घडत आहे.
पुण्यात टेकड्या फोडून बांधकाम करण्यावर या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक बंधने आणण्यात आली आहे.या टेकड्यांवर घरकूले न बांधल्यास झोपडपटट्याच निर्माण होतील अशी टिका देखील सहन केली.‘क्लायमेट चेंज’ही आता जागतिक समस्या झाली आहे.वाहनांचे प्रदुषण,कच-यातून मिथेन,कॉक्रिट रस्ते यातून संकट वाढले आहे.
भविष्यातील पिढीला आरोग्यदायी वातावरण देण्यासाठी वृक्ष लागवड,कच-याचे विभाजन,वाहनांचा कमीत कमी वापर करणे अत्यावश्यक आहे.जागतिक पातळीवर काम करुन स्थानिक पातळीवर नियोजन करीत काम करण्याची गरज आहे.मेट्रोचा वापर ‘जॉय राईड’साठी न करता शहरातील प्रदुषण कमी करण्याकरीता झाला पाहिजे.खासगी वाहनांच्या वापराला बंधने घालून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे.कार पुलिंगला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,तसेच अर्बन फॉरेस्ट विकसित झाले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
येणारी मनपा निवडणूक बघता उपक्रमाची सुरवात केली आहे का?या प्रश्नावर बोलताना सत्ता नसली तरी प्रश्न मांडणार ,असे त्यांनी सांगितले.भारतात मोठ्या प्रमाणात काचेच्या इमारतींच्या निर्मितीकडे लक्ष वेधले असता,पाश्चिमात्यांचे हे अंधानुकरण खरेच भारतीय पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे त्या म्हणाल्या.यूरोप हा थंड कटिबंध प्रदेश आहे,त्यामुळे उब मिळावी याकरिता काचेच्या इमारती बांधल्या जातात,भारत अगदी त्याविपरीत उष्ण कटिबंध प्रदेश आहे,काचेच्या इमारती बांधल्यास त्या अधिक उष्ण होतात,मग आतील वातावरण थंड करण्यासाठी वातानूकुलीन यंत्रांचा वापर केला जातो,त्यामुळे पुन्हा वीजेचा वापर जास्त हाेतो आणि प्रदुषणात पुन्हा भरच पडते,याबाबत देखील जनजागृती केली जाईल,असे त्यांनी सांगितले.
अर्बन सेलच्या माध्यमातून ट्रांस जेंडर्स यांचे ही प्रश्न सोडवले जाणार असल्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली.
पत्र परिषदेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे,पक्षाचे सरचिटणीस अनिल अहीरकर,सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
अजनीवन व शहरातील तलावांच्या दूर्दशेसाठी उभारणार मोठा लढा:ज्वाला धोटे(अर्बन सेलच्या शहर अध्यक्ष)
नागपूरातील अजनीवन हे या शहरातील नैसर्गिक वैभव आहे.विकासाच्या नावावर हे वैभव नष्ट करण्याचा घाट घातल्या जात आहे.कुठल्याही प्रकल्पासाठी शहरातील वने नष्ट होऊ नये,पर्यावरणाच्या रक्षणासाठी अर्बन सेल हे वन वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करेल.यासोबतच शहरातील तलावांची जी दूर्दशा केली जात आहे,ऐतिहासिक तलावांच्या बंधा-यांवर प्रेक्षक गॅलरी,कमर्शियल कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात बांधले जात आहेत त्या विरोधात देखील मोठा लढा उभारला जाईल.

आमचे चॅनल subscribe करा