

नागपूर,ता. १९ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चार दिवसीय दाैरा विदर्भाच्या कार्यकर्त्यांना,पदाधिका-यांना तसेच नागपूरकर मतदारांना काय देऊन गेला,याची चर्चा आता रंगली आहे.पवार यांच्या सारखा राष्ट्रीय नेता नागपूर जिल्ह्यात येताे हेच कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह भरणारे होते.पदाधिका-यांना त्यांनी एकजूट होऊन लढण्याचा दिलेला संदेश हा देखील मोलाचाच होता.व्यापा-यांसोबत त्यांनी साधलेला संवाद हा उद्योगजगताला त्यांच्या समस्या मार्गी लागणार असल्याशी आशा प्रदान करुन गेला.
पवार यांना जनतेची नस कळते असे म्हटल्या जातं.आपल्या अनेक दशकांच्या राजकारणात त्यांच्यातील ‘चाणक्य नीती’ची प्रचिती अनेक वेळा महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आली आहे. अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत विदर्भात राष्ट्रवादीचा पाया भक्कम करने,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणे,पदाधिका-यांना कामाला लावणे यासाेबतच उद्योजकांच्या समस्यांच्या निराकरण करुन आपली मतदार पेढी भक्कम करने,हे उदिष्ट्य त्यांनी आपल्या या दौ-यात लीलया साधले.
एखाद्या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व जेव्हा निवडणूकीच्या अाधी कार्यकर्त्यांमध्ये येऊन मिसळतं तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये ही जोश निर्माण होतो.कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत असतं.शरद पवार यांनी देखील नागपूरात कार्यकर्त्यांसह चंद्रपूर व गडचिरोलीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला,तुम्ही खूप चांगलं काम करीत आहात,अश्या शब्दात कार्यकर्त्यांना शाबासकी मिळणं ही राजकारणात साधी बाब नसते.
पदाधिका-यांना गटबाजी सोडून, सोबत येऊन पक्ष विस्तारासाठी कामाला लागा,मतभेद मिटवून निवडणूकीला सामोरे जा,अशी सूचना करताना त्यांच्या नजरेसमोर निश्चितच भारतीय जनता पक्षाला शह देण्याचेच ध्येय होते.एवढंच नव्हे तर तिन्ही पक्षांची आघाडी झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही भाजपला सहज हरवू शकतो याचे गणित त्यांच्या मनात घट्ट बसले असल्याचे दिसून पडले.
आघाडी झाल्यास भाजपसारख्या जमिनीस्तरावर मजबूत संघटन असणा-या पक्षाला ही सहज मात देता येते हे पवारांनी अनुभवातून जोखले असल्यानेच नाना पटोले यांच्या वारंवार ‘स्वबळा’च्या घोषणेकडे दूर्लक्ष करुन त्यांनी आघाडीचीच अपेक्षा कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली.
स्थानिक पातळीवर भाजपविरोधात मतदारांचा रोष, आघाडी झाल्यास मतदानामध्ये परिवर्तित करता येतो,आज केंद्रीय तसेच स्थानिक पातळीवर जे काही घडत आहे ते बघता सर्वसामान्य जनता ही संभ्रमात आहेत हे पवार यांच्यासारख्या चाणक्य म्हणून गणल्या जाणा-या नेत्याला माहिती असल्यामुळेच, पश्चिम महाराष्ट्रासारखेच विदर्भात ते ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात त्यांना राजकीय धोबीपछाड देण्यासाठी एवढ्या वयातले शरद पवार उगाच नाही सरसावलेत.
विदर्भात राष्ट्रवादी व शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजली नसली तरी येत्या निवडणूकीत हे चित्र पालटण्यासाठीच पवार यांनी प्रकृती स्वास्थ, साथ देत नसतानाही विदर्भाचा दौरा काढला,अर्थात खूप ईच्छा असून देखील त्यांना यवतमाळ व वर्धा जिल्ह्याचा दौरा ऐन वेळेवर रद्द करावा लागला.
कार्यकर्त्यांसोबतच्या स्नेह मिलन कार्यक्रमात पवार यांनी अनिल देशमुख यांच्याविषयी भावपूर्ण उद् गार काढले.पहीली वेळ होती जेव्हा त्यांच्या विदर्भ दौ-याचे ‘सारथ्य’ करण्यासाठी अनिल देशमुख हजर नव्हते.ते सध्या तुरुंगात अाहेत आणि हीच बोच पवार यांना खोलवर रुतली.म्हणूनच त्यांनी देशमुख यांच्यावरील अन्यायाचा प्रत्येक तासाचा,दिवसाचा हिशेब घेतला जाईल असा इशारा देखील अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना दिला.पवार यांच्या या कार्यक्रमात काटोल मधून देखील कार्यकर्ते हजर होते,पवार यांनी देशमुखांचे नाव घेताच,देशमुख समर्थकांनी ‘अनिल बाबू संघर्ष करो’हे नारे लावले.
देशमुखांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाज निवडणूकीची खिंड लढायची असल्यानेच पवार यांचा हा नागपूर दौरा महत्पवूर्ण ठरला.
आपल्या दौ-यात त्यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे एकवेळा नव्हे तर दोन वेळा कौतूक केले.गडकरी यांचे कौतूक करुन त्यांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना डिवचले मात्र हे बोलताना देखील त्यांनी भाषा -मर्यादेचा तोल कुठेही ढळू दिला नाही.त्यांच्या शब्दांना नेहमीसारखीच धार होती मात्र आवाजातला संयम कायम होता.
व्यापा-यांच्या अडचणी समजून घेतानाही त्यांच्यातील संवेदनशील नेत्याचे दर्शन कार्यकर्त्यांना घडले. नागपूरकर उद्योजकांच्या समस्या फडणवीस काळातच सुटायला हव्या होत्या असा उपहासाचा सूर ही लावायला ते विसरले नाहीत,व्यापा-यांच्या समस्यांना पवार तडीस नेतीलच हा विश्वास ही व्यापारी,उद्योजकांच्या मनात रुजवण्यात ते चांगलेच यशस्वी ठरलेत.
पेठे यांचे या ही वेळी पूर्व नागपूरवरच प्रेम-
राष्ट्रवादीच्या महत्वपूर्ण नेत्यांचा नागपूर दौरा असतो तेव्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे मात्र दर वेळी त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम हे पूर्व नागपूरमध्येच आयोजित करतात हे विशेष!पेठे हे पूर्व नागपूरचे प्रतिनिधित्व करतात याचा अर्थ त्याच भागात उर्वरित नागपूर सोडून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांचे मेळावे प्रत्येक वेळी व्हावे हा त्यांचा अट्टहास या ही वेळेस अनेक कार्यकर्त्यांना ‘खटकला’.

खासदार सुप्रिया सुळे यांची पत्र परिषद देखील त्यांनी गेेल्यावेळी चक्क वर्धमान नगर येथील त्यांच्या घरातील कार्यालयात आयोजित केली!पक्षाचे कार्यालय गणेशपेठ अश्या मध्यवर्ती व सर्वांना सोयीस्कर ठिकाणी असताना,कार्यकर्ते,पदाधिकारी व पत्रकारांनी नागपूरचे एक टोक गाठण्याचा, पेठे यांचा अट्टहास या ही वेळेस शरद पवार यांच्या दौ-यात दिसून पडला.
७ वचन लॉन,वर्धमान नगर,जुना भंडारा रोड हा भाग पेठे यांच्या मतदारसंघात मोडतो त्यामुळे या ही वेळेस राकाँपाचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांच्यासोबत शरद पवार यांच्या दौ-याचे नियोजन करताना पेठे यांनी त्यांच्याच मतदार संघाला प्राधान्य दिले असल्याचे सिद्ध झाले.
येत्या निवडणूकीत राकाँपाला सर्वच प्रभागातून मते मिळवायची आहेत,त्यामुळे राकाँपाच्या शहराध्यक्षाचे फक्त आपल्याच प्रभागापूरती ‘पूतना मावशीचे प्रेम’हे पक्षाला जड जाऊ शकेल,अशी नाराजी अनेक कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत होते.

आमचे चॅनल subscribe करा