
अतिथीस्तंभ

मेघा उन्मेष देशमुख
नागपूर,ता. १३ मे: मॅक्स महाराष्ट्रावर एक बातमी हाेती पत्रकारांना देखील फ्रंट वर्कर्स म्हणून सरकारने घोषित करावे म्हणून,यावर प्रतिक्रियांचा जो पाऊस पडला,त्यात पत्रकारांविषयी अनेक नेटीझ्नसकडून जी अश्लाघ्य भाषा वापरण्यात आली,खूपच घाणेरडे आणि अपशब्द वापरले होते त्यामुळे खूप वाईट वाटलं आणि कुठेतरी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणून हा लेखप्रंपच.चूक की बरोबर माहीती नाही मात्र पत्रकार हा देखील शेवटी माणूसच असतो,त्याला ही कुटुंब असतं,सुखं:दुखं असतात उलट तो कोणत्याही सामान्य नोकरदार माणसापेक्ष्ा जास्त तनावपूर्ण जीवन जगत असतो आणि वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारींना बळी पडत असतो हे एका पत्रकाराची जीवन सहचारिणी म्हणून ठामपणे सांगू शकते.
मॅक्स महाराष्ट्र वर काही लोक वृत्तपत्र कायमचे बंद करा असे म्हणत आहेत. जे पत्रकार कायमच लोकांच्या समस्या मांडत असतात ते स्वतः मात्र स्वतःच्या समस्या मांडू शकत नाही. त्यांनाही अडचणी असतात पण मांडणार कोणाकडे?
लोकांच्या मते पत्रकार हे पाकीट घेणारे, सरकारचे समर्थन करणारे, भरपूर पैसा कमावणा-या क्षेत्रात काम करतात त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणीच नाही! पाकीट घेणारे,आपल्या बातमीशी प्रामाणिक न राहणारे काही पत्रकार असतीलही ,पण सगळेच तसे नसतात. सगळ्यांनाच एकाच माळेत गोवणे योग्य नाही आणि असे कोणते क्ष्ेत्र आहेत ज्यात चांगले-वाईट माणसे काम करीत नाही?
अनेक प्रामाणिक पत्रकार आजही आपल्या मुल्यांशी,तत्वांशी बांधिलकी ठेऊन या क्षेत्रात काम करत आहेत, नकळतपणे आपण त्यांच्यावरही आरोप करत असतो़ हे जग का विसरतं? पत्रकारांनाही कुटुंब असतं, आजच्या काळात त्यांच्याही कुटुंबांना फार हलाखीचे दिवस काढावे लागत आहे ,तुमच्यासारखे ते ही दररोज जगण्या मरण्याच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत पण त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा कोणीच प्रयत्न करत नाही, हे मी स्वानुभवाने सांगत आहे.
एका नामांकित ग्रुपमध्ये माझे मिस्टर काम करत होते. अचानक त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले कारण कंपनीला कोरोनाच्या काळात आर्थिक फायदा नसल्यामुळे कर्मचारी कपात करायची आहे ,असे कारण सांगण्यात आले!एका दिवसात, एका झटक्यात एका ज्येष्ठ पत्रकाराच्या अस्तितवावरच घाव घलण्यात आला.या वयात… या काळात….पुन्हा नव्याने सुरवात करायची होती!
आमच्याही पुढे प्रचंड समस्या उभ्या राहिल्या.. . एकटा माणूस कमावणारा, कर्जाचा डोंगर, दोन मुलांचे शिक्षण, खायचे काय हे सगळे प्रश्न जसे सामान्य लोकांना पडतात तसेच सामान्य पत्रकारांनाही असतात ,हे लोकं का समजून घेत नाही?
एकदम नोकरी गेल्याने पुढे काय करायचे काहीच मार्ग सुचत नव्हता. एक नामांकित कंपनी असे करू शकते, हे सत्य स्वीकारणं खूप जड होतं! बाकीच्या वृत्तपत्रांनी देखील हाच मार्ग अवलंबिला होता. कंपनीला परवडत नाही म्हणून पत्रकारांना नोकरीवरुन काढून टाका, या नावाखाली अनेक मार्ग अवलंबून पत्रकारांची मुस्कटदाबी करणे गेल्या वर्षीपासूनच सुरु झाले. कुठेही नोकरी मिळण्याचे चिन्ह नव्हते मग शेवटी कुटुंब चालवण्यासाठी कमी पगाराची का होईना,कर्ज फेडण्याकरीता व प्रपंच भागविण्यापुरती नोकरी मिळाली़.
असे हे बेभरवशाचे क्षेत्र असूनही काही पत्रकार पत्रकारितेचा वारसा जपत आहेत. आज आपण जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र उपभोगत आहोत त्याचा विसर नेटीझ्नसला पडला. मत व्यक्त करताना अपशब्द वापरुन प्रामाणिक पत्रकरांचा अनादर करू नये,असं मला वाटतं .
पत्रकाराची मुलं बाळ ही जेमतेम आयुष्य जगत असतात .तेव्हा तुम्ही आपल्या बायका मुलांसोबत सण समारंभ साजरे करत असता तेव्हा आम्ही पत्रकारांच्या बायका ‘एकट्याने सण साजरे करत असतो’ तुम्हाला ठराविक काम करून ठराविक तासात काम उरकायचे असते पण पत्रकारांना टाईम बिल्डिंग आणि अचूक न्यूज द्यायची असते. रोजची परीक्षा असते, रोजचा तणाव सहन करावा लागतो .मुलांनाही पुरेसा वेळ देऊ शकत नाही .कामाच्या वेळा व कामाचा तनाव सांभाळत आरोग्याच्या तक्रारी कधी सुरु होतात हे पत्रकारांना कळत देखील नाही!
आज प्रिंट मिडियाला उतरती कळा लागली आहे .त्या प्रिंट मिडियामध्ये काम करणारे पत्रकार, त्यांचे कुटुंब याचा कधी विचार केला गेला आहे,त्यांचे काय होईल? का नुसते म्हणायला वृत्तपत्र हा चौथा स्तंभ आहे ?पण सरकार त्यांची कधी दखल घेते का? पत्रकारांना प्रसंगी जीवघेण्या धमक्या येतात काही पत्रकारांची हत्या करण्यात येते तेव्हा आपण मूग गिळून गप्प बसतो .
सरकारी नोकर यांना पगार,भत्ते सगळं सुरळीत सुरु असतं,पत्रकारांची नोकरी मात्र बेभरवश्याची असते,आज करोनाच्या काळातसुद्धा सरकारने कोणत्या सरकारी नोकरांची पगार कपात केली?त्यातून इतर बेरोजगारांच्या घरी रेशन भरण्यापूरती सोय केली?७० हजार पगार घेणा-या सरकारी नोकर किवा आमदार,खासदार यांच्या पगारातून थोडी कपात करुन देशातील बेरोजगारांच्या आणि बेरोजगार झालेल्या पत्रकारांच्या खात्यात काही पैसे टाकले तर किती कुटुंबांचा प्रपंच चालेल?
पत्रकार हा ना सरकारचा माणूस असतो ना जनतेचा,दोन्हीकडून त्याचच मरण असतं.नुसते पाकीट घेणारे पत्रकार अशी प्रतिमा लोकांपुढे असते पण सगळेच पत्रकार तसे नसतात याचा विसर पडतो, म्हण आहे ना ‘ओल्या बरोबर सुके जळते’ म्हणूनच लोकं प्रतिक्रिया देताना अतिशय घाणेरडी भाषा वापरतात तेव्हा मन कळवळते. खरी परिस्थिती न पाहता बोलणे हे कितपत योग्य आहे याचा विचार करावा….!

आमचे चॅनल subscribe करा