Homeनागपूर न्यूजपटोले,व्हिडीयो आणि जनमानस

पटोले,व्हिडीयो आणि जनमानस

Advertisements

चित्रा वाघांचा आरोप,पटोलेंचे खंडण

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.२० जुलै २०२२:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांच्याशी संबधित एक आक्षेपार्ह्य व्हिडीयो भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी ट्टीटरवर टाकला व ट्टीटरच्या माध्यमातूनच नानांचा प्रश्‍न विचारला,‘काय नाना…तुम्ही पण झाडी,डोंगार आणि हाटीलीत?यात ते एका महिलेसोबत तिच्या खांद्यावर सलगीने हात ठेऊन बसलेले आहेत तर व्हायरल झालेला(करण्यात आलेला)तो व्हिडीयो मार्फ केलेला असून हे भाजपचेच कटकारस्थान असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला.यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत असल्याचेही त्यांनी पडेल चेह-याने सांगितले.

हा व्हिडीयो खरा की मार्फ केलेला,काहीही असो,असा व्हिडीयो व्हायरल करण्याचा एकमेव उद्देश्‍य मात्र नानांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणं,हेच आहे यात वाद नाही.महाराष्ट्राच्या जनतेलाही ते माहिती आहे.असे कृत्य हे ‘आनंदाची’ बाब नसून ’आत्मक्लेषाची ’बाब असते हे देखील राज्याच्या जनतेला कळतं,मात्र राजकारण्यांना कळू नये,ही मात्र खेदाची गोष्ट आहे.

मेघालयाच्या चेरापुंजीमध्ये नाना एका हॉटेलच्या लॉबीमध्ये येताना दिसतात काय!एका महिलेसोबत सलगीने बसतात काय!हे सर्वच अनाकलनीय आणि आश्‍चर्यकारक आहे.सार्वजनिक जीवनात वावरणा-या माणसांनी तर प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकण्याची अपेक्षा असताना, नानांसारखी एका मोठ्या व पुरातन राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठित पदी असणारा व्यक्ती एवढ्या बेजबाबदारपणे वागेल,यावर किमान नागपूरकरांचा तरी विश्‍वास नाही,हे अनेकांच्या आपापसातील चर्चेतून दिसून पडतंय.

नाना पटोले हे नाव लहान नाही तर फार प्रतिष्ठित नाव आहे.खासदार,विधान सभा अध्यक्ष ते आता काँग्रेससारख्या एका मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष.यामुळे विरोधकच नव्हे तर त्यांच्याच पक्षातील अनेक विरोधकांच्याही ते टार्गेटवर होतेच.महत्वाचे म्हणजे नुकतेच त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश समितीवर ज्यांची निवड केली नाही, त्यांच्याही टार्गेटवर ते आहेच.त्यामुळे त्यांची ही क्लिप किवा तथाकथित क्लिप व्हायरल करण्या मागे नेमकं कोणाला आणि काय साधायचं आहे?असा ही प्रश्‍न यातून निर्माण झाला आहे.

मूळात राज्यात सत्ताकारण बदलताच नानांचे हे छायाचित्र बाहेर यावे!आता पर्यंत का नानांच्या विरोधात अश्‍या खालच्या स्तरावरील राजकारण त्यांच्या विरोधकांनी साधलं नाही?कि त्यांच्याकडे पुरावे होते मात्र विश्‍वास नव्हता यंत्रणांवर?नानांसारखा स्पष्टवक्ता आणि निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेसला सतत जिवंत ठेवणारा दूसरा राजकीय नेता नाही,हे मान्य करावंच लागेल,त्यामुळेच नानांच्या विरोधात ईडी,सीबीआय लावण्यासाठी पुरावे सापडले नसल्याने त्यांच्या चारित्र्यहननाचाच डाव साधण्यात आला का?असा प्रश्‍न आता जनतेला पडला आहे.

नानांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे.राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं.त्यांची मुलगी आज सासरी नांदतेय.किमान तिच्या सासरी तिच्या जन्मदात्या पित्याची अश्‍या रंगलेली संबंधी अशी बदनामी व्हावी,हे तिला तरी सहन होईल का?नानांच्या पत्नीने अतिशय खडतर काळात त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहून त्यांच्या यशाच्या वाटेत, आपल्या त्यागाचा वाटा दिला आहे,किमान असे गलिच्छस्तरावरचे राजकारण करताना नानांच्या त्या त्यागमूर्ती पत्नीच्या भावनांचा तरी विचार चित्रा वाघ यांनी करायला हवा होता!आली क्लिप की कर व्हायरल….असे राजकारण किमान महाराष्ट्रातील सुजाण जनता तरी खपवून घेणार नाही. महाराष्ट्राचे राजकारण हे मुद्दांवर,आपापल्या विचारधारेवर आणि नीतीमुल्यांना धरुनच झालं पाहिजे कारण हे बिहार किवा उत्तर प्रदेश नाही,उलट ती राज्ये राजकारणाच्या स्तराबाबत आता आपल्यापेक्षा पुढारली आहे, असेच आता म्हणावे लागेल कारण गेल्या अडीच वर्षात संजय राऊत,राणे,सोमैय्या, ठाकरे आदी विभूतींनी महाराष्ट्रात भाषेचा जो निम्न स्तर गाठला आहे त्यातून हे राज्य पुरोगामी म्हणून घेण्याच्या पात्रतेचा उरला नाही,यावर कोणाचेही दुमत नसावे.

व्हिडीयो खरा कि खोटा?यावर सोशल मिडीया व माध्यमांमध्ये वाद घालण्यापेक्षा मुळात असा व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल करने योग्य की अयोग्य,हा वाद आता महाराष्ट्रातील सुजाण व सुज्ञ नागरिकांमध्ये पेटला आहे. अनेक राजकारणी हे धुतळ्या तांदळासारखे नसतात हे नागरिकांनाही माहिती आहेे,नागरिकांचे हे मत राजकारण्यांच्या आचरणातूनच निर्माण झाले आहे.नागपूरचेच उदाहरण घ्यायचे असेल तर एका राजकीय पक्षातील दोन आमदारांनाच दोन बायका आहेत मात्र हा अत्यंत खासगी व कौटूंबिक विषय असून यावर राजकारण करने जनतेलाही पसंद पडणार नाही.

महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, ज्यांच्याकडे सामाजिक न्याय व कल्याण विभागासारखे अतिशय जबाबदारीचे खाते होते त्यांच्याच चारित्र्याची लक्तरे कशी वेशीवर टांगली गेली हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेच आहे.पहली पत्नी व मुले असताना देखील त्यांनी दूसरे लग्न केले.दुस-या पत्नीच्या दोन्ही मुलांना देखील धनंजय मुंडेंनी पिता म्हणून स्वत:चे नाव दिले,एवढी माणूसकी व मर्दुमकी त्यांनी जपली,हद्द तर तेव्हा झाली या दुस-या पत्नीच्या धाकट्या बहीणीनेही धनंजय मुंडेवर बलात्काराचा आरोप करीत पोलिस ठाणे गाठले.आपल्या या अतिशय देखण्या मेव्हणीलाही धनजंय मुुंडेंनी तिस-या लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते!या विरोधात दुस-या पत्नीने पोलिस ठाणे गाठताच तिलाही आपल्या मंत्री पदाची झूल पांघरत, तुरुंगात डांबले!

विदर्भातील शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांचे प्रकरण तर महाराष्ट्राच्या जनतेच्या अंगावर शहारा आणनारे होते.अवघ्या २४ वर्षीय पुजा चव्हाणचा गर्भपात काय होतो,आत्महत्या काय होते,हत्या कि आत्महत्या याचा शोधही राज्यातील पोलिस विभागाने पारदर्शीपणे न लावता या घटनेला आत्महत्या घोषित करीत फाईलच बंद करुन दिली!याच मंत्री महोदयाला पुन्हा मंत्री बनवा म्हणून त्यांचा समाज व समाजातील धर्मगुरु अगदी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोतोश्रीवर भेटून मागणी काय करतात,हे सर्वच सारासार विवेकबुद्धीला न पटण्यासारखंच आहे.

राजकारण असो किवा सिनेजगत.सार्वजनिक जिवनात वावरताना किमान काही नीती मुल्ये जपायलाच हवी, ही ‘पारंपारिक’ मानसिकता अजून तरी या आधुनिक काळातही नागरिकांची बदललेली नाही आणि म्हणूनच जेव्हा राजकारणातील कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही राजकारणीविरुद्ध अश्‍या स्वरुपाचा प्रचार होतो तेव्हा तो राज्यातील सुजाण नागरिकांना मनोमनी न पटण्यासारखाच असतो.

एका अश्‍याच ’ललना’च्या प्रकरणात महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या दोन वरीष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली नसती तर,राज्यातील एका फार मोठ्या नेत्याला गेल्या विधानसभेच्या अधिवेशना पूर्वीच राजीनामा द्यावा लागला असता….!अशीही चर्चा आता पटोलेंच्या या व्हायरल व्हिडीयो प्रकरणानंतर ऐकू येत आहे.राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं मात्र जावई,मुलगी,मुलीचे सासर,पत्नी असे अतिशय जिव्हाळ्याचे व गुंतागुंतीचे कौटूंबिक नाते ही या अश्‍या वाहियात व्हिडीयोंमुळे अडचणीत येतात,याचे तरी भान चित्रा वाघ यांनी ठेवायला हवे होते.त्यांच्याकडे ज्याने कोणी हा व्हिडीयो पाठवला तो ट्टीटरवर टाकण्यापेक्षा नानांनाच पाठवून, साळसूद प्रश्‍न विचारला असता तर यात त्यांचा मोठेपणा दिसला असता.प्रत्येक गोष्टीत राजकारण होत नाही आणि चारित्र्यहननाच्या प्रयत्नांचे राजकारण तर मुळीच समर्थनीय नाही.याच नानांच्या मुलीच्या लग्नात संजय राऊत,फडणवीस आणि चंद्रशेखर बावणकुळे आपापसात दिलखुलास हसतानाचे व्हिडीयो ही चांगलेच व्हायरल झाले होते.

ते बघून राज्यातील जनता ही सुखावली होती.विरोधक हे निदान एकमेकांच्या खासगी कार्यक्रमात तरी ‘शत्रू‘सारखे वागत नाहीत आणि हेच भारतातील प्रगल्भ लोकशाहीलाही अपेक्षीत आहे.राजकारणी हा फक्त राजकारणी नसतो तर त्याच्या मागे एक संपूर्ण कुटूंब असतं.नाती असतात,प्रतिष्ठा असते.आज ही नागपूरच्या एका बार मध्ये राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यासोबतचा फोटो त्या बार मालकाने अगदी दर्शनी भागावर लावून ठेवला आहे.तीन दशकांपूर्वी पवार नागपूरात आले असता त्या बारला त्यांनी भेट दिली होती.त्यावेळी त्या बारमधील बार डांस हा संपूर्ण नागपूरमध्ये प्रसिद्ध होता.त्यामुळेच निदान पवारांनी अश्‍या ठिकाणी भेट द्यायला नको होती,हे आजही सत्तरीच्या वयातील लोक काळजातून बोलतात!अश्‍या ठिकाणी जाने,अश्‍या गोष्टींचा आनंद घेणे म्हणजे कुठेतरी स्वत:चे चारित्र्य खराब करण्यासारखे ते मानतात!

त्यामुळेच नाना पटोले हे मेघालयाच्या चेरापूंजीत गेले ही असतील तरी कोणा ना कोणाची नजर सतत त्यांच्यावर रोखून आहे याचे भान ते विसरले असतील,यावर विश्‍वास बसत नाही.आताचा काळ हा पूर्णत:स्मार्ट डिजिटल यंत्राचा आहे.किती तरी फूटांच्या अंतरावरुनही स्पष्ट फोटोग्राफी व व्हिडीयोग्राफी करता येते,हे नानांना माहिती नसावे का?त्यांना त्या महिलेसोबत सलगी करायचीच होती तर हॉटेलच्या लॉबीमध्येच का ते बसलेत?खोलीत का नाही गेले?या प्रश्‍नाचे उत्तर त्यांचे चरित्रहनन करणा-यांच्या जवळही नाही.महत्वाचे म्हणजे नाना हॉटेलच्या लॉबीत एक विशिष्ट शर्ट घालून येत असताना दिसतात व त्यानंतर तो शर्ट घातलेला व्यक्ति पूर्णत: पाठमोराच दिसत आहे.वाघ यांनी या दोन छायाचित्रांवरुनच,त्यांच्या पक्षाचा विरोधक असणा-या नानांवर, काय हॉटील,काय झाडी,यासारखा पांचट शेरा मारत ट्टीटरवर ते व्हायरल केले.त्यांच्या सारख्या संवेदनशील महिला राजकारणीने निदान नानांच्या विरोधात आणखी काही पुरावे मिळण्याची तरी वाट बघायला हवी होती.

विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी घरुन निघणारे अनेक आमदार हे अधिवेशनानंतर दररोज कुठे जातात,काय करतात,याचा वेध घ्यायाला जनता बसली तर अनेक आमदारांना सार्वजनिक जीवनातही वावरता येणार नाही,याचीही खूप चर्चा झडते,चित्रा वाघ या अश्‍या जनप्रतिनिधींच्या वागणूकीवर गप्प का असतात?कारण ही त्या काही आमदारांची अत्यंत खासगी बाब असते,त्यामुळे जनतेलाही यात काही रस नसतो.

त्यामुळेच एखाद्याचे चरित्रहनन करने खूप सोपं असतं मात्र एखाद्याची प्रतिष्ठा जपणे हे फार कठीण असतं, मग ती प्रतिष्ठा आपल्या विरोधकांचीही का नसो.भाजपसाठी सध्या तरी महाराष्ट्रात नानाच अडचणीचे विरोधक उरले असावेत,असेही नानांचे समर्थक आता दावा करीत आहेत.मद्य पिणे वाईट आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील अनेक राजकारणी हे मद्य पितात.रात्री ९ च्या ठोक्यानंतर त्यांच्याशी बोलणेही दुरापस्त असतं,एवढ्या धुंधीत ते असतात.जनतेलाही हे माहिती असतं,पण यात जनतेलाही काहीच वावगं वाटत नाही.पण ‘बाई’हा विषयच निराळा आहे.नुकतेच यवतमाळमध्ये भाजपच्या देशमुखांवर आरोप करीत एका महिलेने अगदी त्यांच्या बेडरुममधील व्हिडीयो व्हायरल केला,असे करुन नेमके तिने काय साधले?चित्रा वाघ यांनी या अत्याचार पिडीत महिलेला का ‘ट्टीटवर’ प्रश्‍न विचारला नाही,बाई गं, तू या देशमुखांना पहील्या पत्नीला सोडचिठ्ठी द्यायला लावतेय ,त्या महिलेचा यात काय दोष आहे?तिची का म्हणून तू आपल्या नात्यासाठी फरफट करतेय?

महिलांच्या प्रश्‍नांवर राजकीय पक्ष किवा राजकीय व्यक्ती असा भेदभाव करता येणार नाही. चित्रा वाघ यांचे सगळे ‘वागबाण’ मात्र मोटीव्हेटेड असल्याचे त्यामुळेच जाणवतं.अश्‍या प्रकारचे कोणाचेही चारित्र्यहनन करणारे व्हिडीयो व्हायरल करण्याचे दुष्परिणाम या महाराष्ट्राने भोगले आहेत.अनेक नटींचे न्यूड फोटोज मार्फ करुन या पूर्वीही बदनामी झाल्याने अनेकींने आत्महत्यासारखा मार्ग अवलंबला,म्हणूनच पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे असे व्हिडीयो बघणे हा आनंदाचा विषय न होता आत्मक्लेषाचा विषय होत असतो.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देखील या छायाचित्रांविषयी शंका उपस्थित करुन ही दोन्ही छायाचित्रे मार्फ केलेली असल्याचा आरोप केला.अश्‍या प्रकारचे राजकारण करणार असाल तर कोणीच वाचणार नाही,असा संताप ही ते व्यक्त करतात.ज्या राहूल शेवाळेंना लोकसभेत शिवसेनेचा गटनेता बनवला त्यांच्यावरही नुकतेच एका तरुणीने धक्कादायक अारोप केले आहेत,त्याचे काय?चित्रा वाघ त्यावर गप्प का? पटोले हे कुठेही गेले तरी ते एकटे नसतात.कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवती असतो,सुरक्षा कर्मी असतात.चित्रा वाघ यांनी नानांच्या चारित्रहननाचा पुरावा काय दिला तर मार्फ केलेली दोन छायाचित्रे?भाजप या स्तरावर जाईल असं वाटलं नव्हतं.नानांच्या विरोधात ईडी,सीबीबाय,आयकर विभाग काहीच लाऊ शकले नाही तर चक्क हा स्तर गाठायचा?२०१७ मध्ये नानांचे फोन टॅप केलेत,त्यातही मग नानांच्या विरोधात खूप काही सापडलंच असेल मग तेव्हाच का नानांना बदनाम नाही केलं?

भाजपने तर राष्ट्रीय स्वयंसंघाचे संजय जोशी यांना देखील अश्‍याच पद्धतीने बदनाम करुन त्यांचा काटा काढला,उमा भारती-गोविंदाचार्य यांनाही नाही सोडले,गुजरातमध्ये तर ऐन निवडणूकीच्या आधी हार्दिक पटेलची सीडीच व्हायरल केली,ती ही कोणासोबत?तर जिच्यावर त्याचे प्रेम होते आणि जिच्यासोबत त्याने नंतर लग्न ही केले.आता महाराष्ट्रातही सत्ता येताच भाजप कोणत्या स्तरावर उतरला आहे,हे नानांच्या घटनेवरुन अधोरेखित होतं.

थोडक्यात आपल्या राजकीय विरोधकांना अश्‍या रितीने संपुष्टात आणने म्हणजे हा संवैधानिक लोकशाहीचा मृत्यूच आहे,असे ‘सत्ताधीश’चे ठाम मत असून, लोकशाहीत विरोधक असणे आणि ते ही प्रबळ विरोधक असणे हेच, गेल्या पंचाहत्तर वर्षात भारत या राष्ट्रात सुदृढ लोकशाही नांदण्याचे गमक ही आहे मात्र आज देशात प्रबळ राजकीय विरोधक नसल्यास हा देश हूकूमशाहीप्रमाणे चालणारा देश होण्या वाचून कोणीही रोखू शकणार नाही,आणि याला कारणीभूत अश्‍या लोकप्रतिनिधींना निवडून देणारी जनताच असेल,असेच आता म्हणावे लागेल.

Latest बातम्या