
समाज माध्यमांवर उमटली तीव्र नाराजी
वैदर्भिय प्रदेधाध्यक्षांवर थोरातांचे गलिच्छ ‘राजकारण’
नागपूर,ता.४ फेब्रुवारी २०२३: विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आज पत्र परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप केले ते बघता थोरात-तांबे या पश्चिमी महाराष्ट्राच्या नेत्यांना, वैदर्भिय नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद किती डोळ्यात खूपतंय याचा प्रत्यय आला,तांबे यांचा आरोपांना थोरात यांचा छूपा पाठींबा दिसत असल्यानेच, अनेक वैदर्भिय नेत्यांनी पटोले यांनी थोरातांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केल्याचा संताप समात माध्यमात उमटला आहे.
काँग्रेस पक्ष ही जणू काही थोरात तसेच पश्चिमी नेत्यांचीच मक्तेदारी असल्यासारखी वागणूक वैदर्भिय पटोले यांच्या नियुक्तीनंतर समोर आली होती.नाशिक पदवीधराच्या निवडणूकीनिमित्त पटोले यांच्या विरोधात आपले इप्सित साधण्याची जणू या मामा-भाच्याला संधीच मिळाली,एबी फॉर्मवरुन पटोले यांनाच आता कठघरात उभे करण्याची नामी संधीच तांबे यांनी साधली.
मूळात थाेरात हे काँग्रेसचे की राष्ट्रवादीचे?असा प्रश्न विदर्भात त्यामुळेच सातत्याने विचारला जात असतो.थोरात सतत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चमच्याने दूध पिणारे व्यक्तिमत्व असल्याची देखील चर्चा त्यामुळेच सोशल मिडीयावर रंगते.शरद पवार यांना देखील वैदर्भिय नाना पटोले यांना एवढे महत्वाचे पद मिळाल्याने दू:खच झाले होते कारण पूर्वासूरीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या सर्व राजकीय धोरणांना अनूकुल असेच धोरण राबवित होते.
परिणामी,शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांचे पंख छाटण्याचा जणू विडाच उचलला असल्याचा आरोप आता केला जात आहे.पटोले हे नेहमी पक्षाची भूमिका मांडतात,पक्ष मजबूत करण्यासाठी धोरणे राबवितात याचाच अडसर शरद पवार व थोरातांना होत असल्यानेच भाचा सत्यजित तांबे याला हाताशी धरुन नाशिकमध्ये ही ‘न भूतो न भविष्यती’अशी राजकीय खेळी खेळण्यात आल्याचे बोलले जात आहे
महत्वाचे म्हणजे या संपूर्ण निवडणूकीत थाेरात ,प्रकृतीच्या कारणावरुन राजकीय अज्ञातवासात गेले होते मात्र,आपल्या चार चाकी रुपी’रथ’सर्रास सत्यजित तांबे यांच्या प्रचारासाठी लावल्या,यावरुन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांना जो संदेश द्यायचा होता तो देण्यात ते यशस्वी ही झाले.‘मी अद्याप ही काँग्रेसीच’म्हणारे सत्यजित तांबे यांनी कश्यारितीने पक्षाशीच दगाबाजी केली हे अवघ्या महाराष्ट्राने बघितले आहे,प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवले,या निवडणूकीत त्यांच्याशिवाय काँग्रेससारख्या पक्षाकडून उमेदवारच उभा होऊ न देण्याचे कटकारस्थान रचले,त्यांच्या तोंडी ‘मी काँग्रेसीच’सारखी भाषा शोभून दिसत नाही,असे देखील काँग्रेसी राजकीय जाणकार उघडपणे बोलत आहे.
काँग्रेसच्या एका माजी प्रदेशाध्यक्षांचा भाचाच चक्क पक्षाशी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी अर्ज भरतो अश्यावेळी मग ‘आघाडी’च्या उमेदवार म्हणून शुभांगी पाटील यांच्याविषयी थोरांताची काय भूमिका होती?पाटील या थोरातांच्या दारावरुन परत आल्या मात्र आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे एका महिलेला घरात घेण्याचे व पाण्याला विचारण्याचे सौजन्य देखील थोरातांच्या दारावरच्या चौकीदारांनी दाखवले नाही.माध्यमांमध्ये या ही बाबीची बरीच चर्चा झाली होती.
आघाडीचा धर्म म्हणून तरी थोरात यांनी पाटील यांच्या प्रचारात सहभाग नोंदवला का?किवा तसा काही संदेश समाज माध्यमांतरी व्हायरल केला का?हीच जर विधान सभेची निवडणूक असती व थोरातांना शारीरिक इजा असती तरी अंथरुणावरुन ही त्यांनी स्वत:चा प्रचार करण्याचे सोडले असले का?असा प्रश्न आता समाज माध्यमात उपस्थित केला जात आहे.
राजकारण,राजकीय भूमिका या वेगवेगळ्या असू शकतात मात्र एखादा वैदर्भिय माणूस हा पक्षाच्या सर्वोच्च पदावर बसतो तेव्हा याच पश्चिम महाराष्ट्राच्या काही राजकारण्यांच्या पोटात असूयेचा शूल उठतो.कायमच पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना विशेषत:राष्ट्रवादीच्या नेत्यांना वैदर्भिय जनता,विदर्भाचा विकास,विदर्भाचे प्रश्न यांच्याशी काही एक देणेघेणे नव्हते,फक्त आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी हे सर्व मुद्दे ते प्रचारात उपस्थित करीत असतात,यावर वैदर्भिय जनतेचा दृढ विश्वास बसला आहे.
गेल्या वर्षी शरद पवार यांनी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे शहरातील व्यापारी,उद्योजकांसोबत बैठक घेतली असता,त्यावेळी देखील त्यांनी नाना पटोले यांच्याविषयी खोचक विधान केले होते.भाजपमध्ये जाऊन परत आलेले नाना यांना कितपत महत्व द्यायचं?असा सूर त्यांनी आवळला होता.त्यांच्या राजकीय कारकार्दीत त्यांनी मात्र किती पक्ष बदललेत?याचा हिशेब निश्चितच राजकारणातील त्यांची ज्येष्ठता बघता कोणीही घेण्याच्या भानगडीत पडत नाही,निदान वैदर्भिय तर नाहीच नाही.
थोरात व तांबे या मामा-भाच्याचे पटोले यांच्या विरुद्ध कटकारस्थातून पटोले यांच्यापेक्षा पक्षाचे नुकसान होत आहे,याचा देखील विचार करण्यात आला नाही.आधीच काँग्रेस देशभरात गलितगात्र होत आहे,उरली सुरली काँग्रेस असे काही महत्वाकांक्षी नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अश्या रितीने वापरत असेल तर देशभरात व महाराष्ट्रात प्रचंड ‘बाहूबली’ झालेल्या भारतीय जनता पक्षासोबत कसा लढा देणार आहे?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उघडपणे सत्यजित तांबेंना पाठींबा दिला असल्याचे सांगितले,यावर पटोले यांनी हा आघाडीचा धर्म नसून अजित पवार यांचे हे विधान दूर्देवी असल्याचे म्हटले.‘आघाडी’ ही फक्त राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठीच निर्मित झाली आहे का?याचे उत्तर मात्र अजित पवार देत नाहीत.शुभांगी पाटील या आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचे शिवसेनेने जाहीर केल्यानंतर देखील, अजित पवार हे सत्यजित तांबेंना समर्थन दिल्याचे सांगतात!याचा अर्थ राज्यातील जनतेने काय घ्यावा?
सिंचनाच्या प्रश्नाबाबत शेतक-यांच्या वेदनांवर भर सभेत ‘तलावात मूतू का?’असे विधान करणारे अजित पवार यांच्यात आघाडीचा धर्म व नीतीमत्तेविषयी तरी किती संवेदनशीलता आहे,याचाच त्यांनी सत्यजित तांबेंना उघडपणे दिलेला पाठींबा,पुर्न प्रत्यय देतो.
राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही नेत्यांना विदर्भाची सर्व नैसर्गिक संसाधने पश्चिम महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी हवीत,वीज हवी,महसूल हवा मात्र विदर्भाची जनता,विदर्भाचे नेते,भूमिपूत्र चालत नाही.थोरात यांनी ज्याप्रकारे या संपूर्ण प्रकरणात ‘बघ्याची’ भूमिका घेतली ते पाहता नाना पटोले यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत तात्काळ पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी काही वैदर्भिय नेत्यांनी केली आहे.
अतुल लोंढे यांना प्रदेश प्रवक्ते पद दिल्यानंतर असाच प्रकारचा जळफळाट मुंबईतील एका काँग्रेस नेत्याने उघडपणे माध्यमांकडे व्यक्त केला होता.अरविंद सामंत यांनी उघडपणे लोंढे यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याचे अद्यापही वैदर्भियांच्या स्मरणात आहे.काँग्रेस पक्षात सर्व महत्वाची पदे पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत:मुंबईतील नेत्यांनाच मिळावी,हे काँग्रेस पक्षाचा संविधानात लिहले आहे का?असा प्रश्न आता वैदर्भिय नेत्यांनी उपस्थित केला आहे.
सत्यजित तांबे यांनी आज विजयी उन्मादात, पत्र परिषद घेत, नाना पटोले यांच्यावर काही गंभीर आरोप केले.त्यांच्या माणसाला पटोले यांनी १२ तास बसवून ठेवले,मग सीलबंद लिफाला दिला,त्यात औरंगाबाद व नागपूरचे एबी फॉर्म होते,त्यांना वडील डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी मिळूच द्यायची नव्हती,वगैरे वगैरे.
यावर माध्यमकर्मींनी नाना यांना त्यांची भूमिका विचारली असता,याचा खुलासा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेच करतील असे त्यांनी सांगितले.याशिवाय तांबे यांच्याविरुद्ध बराच ‘मसाला’असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी केले.
लोंढे यांनी या संपूर्ण आरोपाबाबत खालील प्रमाणे खुलासा केला-

सत्यजित तांबेंना वेळेवर व योग्य असाच AB फॉर्म पाठवला!: अतुल लोंढे
सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षावर केलेले आरोप चुकीचे व तथ्यहिन.
तांबेंनी वेळेवर अर्ज दाखल का केला नाही? शेवटपर्यंत ते कोणाची वाट पहात होते ?
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे ओएसडी सचिन गुंजाळ यांनी मोबाईलवरून पाठवला होता, त्यामुळे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्ष व एबी फॉर्म संदर्भात जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे आहेत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिले आहे.
सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष व काँग्रेस प्रदेशाध्यांवर केलेल्या आरोपाचा अतुल लोंढे यांनी समाचार घेतला. लोंढे पुढे म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघातून कोणी निवडणूक लढायची याचा निर्णय तांबे कुटुंबाने घ्यावा अशीच भूमिका पक्षाने घेतली होती, कौटुंबिक पातळीवरचा निर्णय त्यांनी का घेतला नाही? वेळेवर जाऊन फॉर्म का भरला नाही?, शेवटपर्यत ते कोणाची वाट पहात थांबले होते? सुधीर तांबे यांनी फॉर्म का भरला नाही? कोरे एबी फॉर्म असताना सत्यजित तांबे यांनी आपल्या अर्जासोबत एबी फॉर्म का जोडला नाही? अर्ज भरताना कार्यकर्ते का बरोबर घेतले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारा पक्षाचा एबी फॉर्म हा कोरा व योग्य तोच पाठवला होता, त्यात कोणतीही चूक नव्हती. बाळासाहेब थोरात यांचे OSD सचिन गुंजाळ यांच्याकडे कोरे एबी फॉर्म पाठवले होते व त्यांनी ओके असे उत्तर दिले होते, याचे पुरावेही लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. एबी फॉर्म मध्ये काही चुकीचे होते अशी त्यांची तक्रार होती तर ते एबी फॉर्म सत्यजित तांबे यांनी बदलून का घेतले नाहीत? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला होता पण फोन लागला नाही हा त्यांचा आरोपही चुकीचा आहे. नाना पटोले १० जानेवारी रोजी कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नागपूरमध्ये होते त्यांनतर दुसऱ्या दिवशी अमरावतीला काँग्रेस उमेदवाराचा फॉर्म भरण्यास ते गेले होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी यांच्या फोनवरून सुधीर तांबे यांच्याशी व आमदार वजाहत मिर्झा यांच्या फोनवरून सत्यजित तांबे यांच्याशी नाना पटोले यांची चर्चा झाली होती. ते दोघेही यासंदर्भात माहिती देऊ शकतात.
सत्यजित तांबे यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा व त्यानंतर तांबे यांची भाजपाबरोबर जवळीक होत आहे याची माहिती अजित पवार यांनी बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली होती. अहमदनगरचे राजकारण व विखे पाटील यांचा भाजपातील वाढता दबदबा पाहता आता भाजपा आपल्याला पक्षात प्रवेश देणार नाही असे दिसत असल्यानेच सत्यजित तांबे यांनी ही खेळी खेळली आहे का?
उमेदवारीसंदर्भात जो निर्णय घेतला जातो तो वरिष्ठ पातळीवरच घेतला जातो. सुधीर तांबे यांचे नाव सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर केले होते. ते बदलायचे होते तर त्यांनी तसे सांगितले असते तर तेही करण्यात आले असते. तांबे यांचा प्रदेशाध्यक्षांवर राग का आहे हे तांबेनींच सांगावे. सत्यजित यांनी पक्षाच्या व्यासपीठावर बोलणे आवश्यक होते पण त्यांनी मीडियात बोलून पक्षावर व माननीय प्रांताध्यक्षांवर आरोप करणे चुकीचे आहे. सत्यजित तांबे यांनी त्यांना विचारलेल्या एकाही प्रश्नाला सरळ उत्तर दिले नाही, असेही लोंढे म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा