Homeनागपूर न्यूजनिवेदनातून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा होऊ शकत नाही

निवेदनातून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा होऊ शकत नाही

Advertisements

राजकीय आरक्षणाकरीता गठीत झालेल्या समर्पित आयोगाच्या कार्यप्रणालीवर माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरेंची टिका

पिंपरी-चिंचवड,ता.२४ मे: राज्य शासनाने राजकीय आरक्षणासाठी स्थापित केलेल्या समर्पित बंठीया आयोगाच्या कार्यप्रणालीनुसार ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा होऊ शकत नाही असे ओबीसी समाजाला संबोधित करताना अविनाश ठाकरे म्हणाले.

माळी महासंघाने महाराष्ट्रभरात संपर्क अभियानाला सुरुवात केली असून राजकीय आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, बेरोजगारी, शेतीविषयक आर्थिक प्रगती या विषयांबाबत माळी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी १५ मे पासून नागपूर येथून जनसंपर्क यात्रा सुरू करण्यात आली असून ही जनसंपर्क यात्रा रविवारी २२ मे रोजी पुणे येथे पोहोचली. पिंपरी चिंचवडमध्ये अभियान सभा पार पडली,या सभेत अविनाश ठाकरे बोलत होते.

या प्रसंगी बोलताना ते म्हणाले,की २०१० च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने गठित केलेल्या समर्पित आयोगाने ग्राम,पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका स्थरावर इम्पेरियलक डाटा गोळा करून, त्याची विभागणी करून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला किती जागा राहू शकतात याची माहिती गोळा करून तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करणे अपेक्षित आहे. परंतु सध्याची जी समर्पित आयोगाची कार्यप्रणाली आहे, त्या कार्यप्रणालीनुसार समर्पित आयोगाचे सदस्य जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सामाजिक संस्था, सामाजिक आणि राजकीय प्रतिनिधीकडून निवेदन आणि आवेदन स्वीकारत आहे.

या पद्धतीद्वारे गोळा केलेला एम्पिरिकल डाटाची माहिती सर्वोच्च न्यायालयात टिकेल का? असा सवाल सवाल उपस्थित करताना २०१३-१४ साली मराठा आरक्षणावेळी राणे समितीने सुद्धा अशाच प्रकारे माहिती गोळा करून न्यायालयाला अहवाल सादर केला होता तो न्यायालयामध्ये मान्य झाला नाही. या सर्व प्रकरणांमध्ये सरकारने लक्ष घालून समर्पित आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात टिकेल असा अहवाल सादर करावा अन्यथा माळी महासंघातर्फे रस्त्यावर उतरून लढाई लढविण्यात येईल असा इशारा दिला आहे.

या कार्यक्रमाला माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष गायकवाड, ज्येष्ठ नेते वसंत नाना लोंढे, माजी महापौर अनिता परांबे,अपर्णा डोके, वैशाली लोंढे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक आणि माळी समाज बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी स्थायी समिती सभापती संतोष नाना लोंढे यांच्या नेतृत्वात हिरामज्ज भुजबळ, प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष शुभांगी लोंढे, विभागीय अध्यक्ष अतुल शिरसागर, शहराध्यक्ष प्रदीप जगताप यांच्यासमवेत माळी महासंघ पिंपरी-चिंचवड कार्यकारणीद्वारे करण्यात आले होते.

Latest बातम्या