Homeनागपूर न्यूजनागपूरात ‘विकास’पडला!

नागपूरात ‘विकास’पडला!

Advertisements


कळमना मार्केट जवळील निर्माणाधीन उड्डाण पूलाचा ३० मीटरचा स्लॉट धराशायी

पुलाच्या कामात पराकोटीचा भ्रष्टाचार:राष्ट्रवादीचा आरोप

ईदमुळे कळमना मार्केट बंद:जिवित हानी टळली

नागपूर,ता.१९ ऑक्टोबर: सध्या नागपूरात जेवढ्या झपाट्याने ‘विकास’घडून येत आहे ते बघता सर्वदूर फक्त ‘विकासच विकास’दृष्टिक्षेपात पडतोय मात्र या विकासकामांची ‘गरज आणि दर्जा’याबाबत मात्र पराकोटीचे मौन बाळगले जात असतं.विरोधकांनी या विकास कामांबाबत शंका उपस्थित केल्यास त्यांनाच ‘विकास विरोधी’ठरवण्याची ‘चमत्कारी’ भूमिका सत्ताधा-यांकडून घेतली जाते.कळमना मार्केट जवळील निर्माणाधीन उड्डाण पूल हा देखील असाच २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद् घाटित झाला आहे.४५० कोटींचा हा पूल दोन वर्षात म्हणजे २०१६ मध्येच पूर्ण बनणे बंधनकारक असताना २०२१,हे वर्ष देखील संपत आले असताना या अर्धवट पुलाने नागपूरकर नागरिक व व्यापारी वर्गाच्या सहनशीलतेचा अक्षरश:अंत बघितलेला आढळतो,शेवटी आज रात्री ९ वाजून ३८ मिनिटांला या उड्डाण पुलाचा चक्क ३० मीटरचा अख्खा स्लॉट खाली कोसळला आणि नागपूरकरांची एकच गर्दी घटनास्थळी झाली,घटनास्थळी ‘नागपूरचा विकास पडला’अश्‍या शब्दात संताप व्यक्त केला जात होता.

२०१४ साली देशात ’न भूतो ना भविष्यती‘असे राजकीय परिवर्तन घडून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत पंतप्रधान पदी आसनस्थ झाले. त्यांना तेवढ्याच ताकदीची साथ नागपूरचे खासदार म्हणून निवडून आलेले केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची मिळाली.नागपूरच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या गडकरींनी खासदार होताच त्याच वर्षी जून २०१४ मध्ये नागपूरात १० हजार कोटींची ‘मेट्रो’आणली तर कळमन्याचा ४५० कोटींच्या पूलाचेही उद् घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते आभासी माध्यमातून करवून घेतले.

या पुलाच्या बांधकामाची जवाबदारी गडकरी यांच्या ‘नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया’खात्याकडे होती.या विभागाने या पुलाच्या बांधकामाची जवाबदारी मुंबईतील काळ्या यादीत समाविष्ट असणा-या ‘जेडीसीएल तसेच एमएसएएल’या कंपन्यांकडे सोपवली!या दोन्ही कंपन्या भाजपच्या एका माजी खासदाराच्या असल्याचा दावा राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला आहे.या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून अनेक पिल्लर्सवर भेगा पडत असल्याची तक्रार विरोधकांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे करुन देखील त्या तक्रारींकडे दूर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहे.

मोदींनी पंतप्रधान होताच नागपूरकरांना हीच ‘सौगात‘दिली का?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात होता.कोट्यावधीचा ‘विकास’ नागपूरात कोसळला,अशी संतप्त प्रतिक्रिया घटनास्थळी उमटली होती.दोन वर्षात हा उड्डाण पूल पूर्ण होईल असे करारात नमूद असतानाही आज ६ वर्षे होत आली तरी नागपूरकरांचा जीव टांगणीला ठेऊन ‘विकास काम’सुरुच आहे.कोणताही कंत्राट देत असताना त्यात ‘वेळेचे नियोजन आणि बंधन’करारात लिखित स्वरुपात वर्क ऑर्डर देतानाच समाविष्ट असतं.कामाची गुणवत्ता आणि वेळेची मर्यादा नमूद असून अटी व शर्थीच्या अधीन राहूनच कंत्राटदारांना कामे दिली जातात.

नागपूरातील अनेक उड्डाण पुलांच्याबाबत मात्र कंत्राटदार हे काही राजकीय नेत्यांचे ‘जावई‘असल्याच्याच अर्हिभावात काम करताना दिसतात.नियम व कायदे हे नागरिकांच्या जिवितापेक्षा कमतर ठरवले जातात,त्यामुळेच अश्‍या प्रकारच्या दूर्घटनेला आमंत्रण मिळतं.यात जीव मात्र सामान्य नागरिकांचा जातो.या अक्षम्य अश्‍या मानवी दूर्घटनेत आज ईदच्याच दिवशी अनेक घरात कायमचा अंधार दाटला असता मात्र ‘जाको राखे सायीयां मार सके ना कोय’या उक्तीचा प्रत्यय नागपूरकरांनी आज अनुभवला.

आज ईदच्या पावन दिवशी त्या खुदांलाही त्याच्या नावाला बट्टा लाऊन घ्यायचा नव्हता,त्याने म्हणूनच तो खुदां असल्याचा प्रत्यय मानवाला दिला मात्र माणसांची हाव एवढी वाढली आहे की फक्त आपली तुंबडी भरण्यासाठी उड्डाणपुलांच्या निकृष्ट बांधकामाखाली निष्पाप नागरिकांचे जीवच घेण्याचे आता भ्रष्टाचारी कंत्राटदारांचे काम उरले असल्याची तीव्र प्रतिक्रिया घटनास्थळी उमटली.
विशेष म्हणजे पुलाचा जो जर्जर स्लाॅट निखळून खाली कोसळला त्याच्या आजूबाजूच्या भागात देखील ‘नेत्रदिपक’असे तडे गेले आहेत.हा संपूर्ण रस्ता बंद करुन पुलाच्या बांधकामाचे ऑडीट महाविकास आघाडी सरकारने करण्याची मागणी जोर धरत आहे.

ईदमुळे कळमना बंद:जिवित हानी टळली
आज मुस्लिम बांधवाची ईद असल्यामुळे कळमना मार्केट बंद होते.हे मार्केट सुरु असते तर फार मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झाली असती,असे भाकीत घटनास्थळी उपस्थित असणारे नागरिक व्यक्त करीत होते.एवढंच नव्हे तर ही घटना उद्या घडली असती तर अपरिमित अशी जिवित हानी घडली असती कारण कळमना मार्केट बंद असल्यामुळे दुस-या दिवशी जास्त गर्दी होत असल्याचे बोलल्या जात होते.सुदैवाने हा स्लॉट वर्दळ नसताना व कळमना मार्केट बंद असताना कोसळला, त्यामुळे नागपूरकर नागरिकांचे जीव वाचले.तरी देखील एक ट्रक या कोसळणा-या स्लॉटखाली येता येता वाचला,असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी: दुनेश्‍वर पेठे(शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस)
ज्या पद्धतीने उड्डाण पुलाचा हा ३० मीटरचा स्लॉट खाली कोसळला .आहे, ते बघता पुलाच्या कामात सरळ-सरळ भ्रष्टाचार झाला असल्याचा दिसून पडतोय.पुलाच्या बांधकामाचा दर्जा काय आहे,हे या घटनेने समोर आले आहे.आम्ही वारंवार पुलाच्या कामाचे ऑडिट व्हावे यासाठी एनएचयूआय तसे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले मात्र बांधकाम कंत्राटदारांना फक्त ‘क्लीन चिट’देण्याचेच काम झाले.आज जर जिविताची हानी झाली असती तर याला कोण जवाबदार असते?या कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी,एवढंच नव्हे तर नागपूरातील सर्वच उड्डाण पुलांच्या निकृष्ट कामांचे ऑडिट व्हावे.

महापौर म्हणतात ‘जांच होगी’पण कोणाची?
या घटनेवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी देखील ‘जांच होगी‘अशी नेहमीच्या पठडीतली प्रतिक्रिया व्यक्त केली.मात्र महापौर कोणाची चौकशी करणार?केंद्रिय मंत्र्यांची?त्यांच्या रस्ते बांधकाम विभागाची?काळ्या यादीतील कंत्राटदारांची?की फक्त नागपूरकरांना ते ‘हूल’देत आहेत?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Latest बातम्या