Homeनागपूर न्यूजनागपूरात काँग्रेसच्या आंदोलनात पंतप्रधानांवर खालच्या शब्दात टिका

नागपूरात काँग्रेसच्या आंदोलनात पंतप्रधानांवर खालच्या शब्दात टिका

Advertisements

भारतीय जनता पक्षातर्फे गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांना मोदींची तुलना ‘श्‍वाना’सोबत करने पडले महागात

पंतप्रधान अविवाहित असल्यावर देखील आंदोलनात खालच्या पातळीवर ताशेरे:मंचावरील नेत्यांची चमकत राहीली ‘दंतपंक्ती’

नागपूर,ता.१४ जून २०२२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारख्या देशातील एवढ्या जुन्या व गरिमामय राजकीय पक्षातील काही राजकीय नेत्यांची भाषा,भाषेचा स्तर एखाद्या आंदोलनात कश्‍याप्रकारे खालच्या पातळीवर घसरतो याचे उत्तम उदाहरण काल सिव्हिल लाईन्स येथे ईडीच्या कार्यालयासमोर पार पडलेल्या नागपूर काँग्रेसच्या आंदोलनाचे सांगता येईल.उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत व आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनातील मंचावर, पंतप्रधान मोदी यांच्यावर तोंडसुख घेताना अनेक नेत्यांनी भाषेची मर्यादा ओलांडली मात्र तरी देखील मंचावरील अनेक कद्दावर नेते यांनी त्यांना समज देण्या ऐवजी आपली ‘दंतपंक्ती’ झळकवण्यात धन्यता मानली.

काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसैन यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना श्‍वानाशी करताना ‘नरेंद्र मोदी तेरा वही हाल होगा जैसे कुत्ते की मौत होगी वैसे नरेंद्र मोदी की मौत होगी‘अश्‍या आपत्तीजनक शब्दांचा वापर करुन काँग्रेसचा नागपूरातील आंदोलनाच स्तर दाखवून दिला.

एका महाभागांनी तर राहूल गांधी यांच्यावरील ईडीच्या कारवाईची तुलना ‘नामर्दानगी’सोबत केली.ते ‘नामर्द’ आहेत याचा पुरावा हाच आहे की त्यांनी लग्नच केले नाही!जर ते ‘मर्द’ असते तर समोर येऊन लढले असते,अश्‍या भाषेत देशातील सर्वोच्च अश्‍या संवैधानिक पदावरील पंतप्रधानांचा उद्वार केला.

माजी आमदार वसंत पुरके यांनी तर आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात ‘नरेंद्र मोदी खतम झाल्याशिवाय राहणार नाही’या शब्दांचा प्रयोग केला.

मूळात पंतप्रधान हे पद काेणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाचं पद नसतं,ते कोणत्याही सार्वभौम देशाचं प्रतिनिधित्व करणारं पद असतं.काँग्रेससारख्या एवढ्या जुन्या पक्षातील नेत्यांना देखील या पदाची गरिमा चांगल्याने माहिती असताना देखील, भाजप व मोदींना दुषणे देताना भाषेची गरिमा राखता आली असती मात्र ती राखल्या गेली नाही.

सध्या राज्यात महाविकास आघाडीची सरकार सत्तारुढ आहे.या आघाडी सरकारमधील शिवसेना व राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यातील गेल्या अडीच वर्षांपासून रंगलेला कलगीतुरा महाराष्ट्राची जनता दररोज अनुभवतच आहे यात आता कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या अर्वाच्य भाषेचाही समावेश झाला असेच आता म्हणावे लागेल.

राहूल गांधी यांच्यावर भाजप व पंतप्रधानांनी केंद्रिय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कश्‍याप्रकारे अन्याय केला,निश्‍चितच हे जनतेसमोर मांडण्याचा अधिकार काँग्रेसला आहे,आंदोलने,नारे-निदर्शन करण्याचाही अधिकार आहे मात्र,आपल्या विरोधकांप्रति भाषेची मर्यादा सोडून अतिशय खालच्या पातळीवर बोलणे ही काँग्रेससारख्या पक्षासाठी भूषणावह बाब निश्‍चितच नव्हती.

आज भाजपचे आमदार व माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे व शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात गिट्टीखदान पोलिस ठाण्यात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसैनच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सकाळी तक्रार नोंदविण्यात आली होती व सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल न केल्यास गिट्टीखदान पोलिस ठाण्यातच भाजपचे कार्यकर्ते ठिय्या मांडतील असा इशारा बावणकुळे यांनी दिला होता.

शेख हुसैन हे काँग्रेस पक्षाच्या अतिशय जबाबदारीच्या पदावर राहीलेले व माजी आमदार असताना त्यांनी केलेले वादग्रस्त,बेजबाबदार व अतिशय अपमानजनक वक्तव्य जाणुनबुजून केले असल्याचा आरोप आपल्या तक्रारीत भाजपने केला आहे.हुसैन यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले.

हुसैन यांचे भाषण सुरु असताना मंचावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे,उर्जा मंत्री नितीन राऊत,माजी उर्जा मंत्री राजेंद्र मुळक,महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे,मंत्री विजय वडेट्टीवार,माजी मंत्री सुनील देशमुख,वसंत पुरके,ॲड.अभिजित वंजारी,विशाल मुत्तेमवार आदी अनेक आजी-मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते,हे विशेष!

या सर्वांच्या उपस्थितीत हुसैन यांनी जाणीवपूर्वक द्वेषमुलक भाषण केले जेणेकरुन जनसामान्यांमध्ये,विविध राजकीय पक्षात व संघटनेत द्वेष निर्माण व्हावे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण व्हावा,असा अारोप भाजपने केला आहे.

हुसैन यांच्या भाषणामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानांना मारहाण करण्याचा व त्यांच्या जिवावर हल्ला करण्याची उत्तेजना मिळाली, त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार पंतप्रधानांच्या बाबतीत नागपूरात,महाराष्ट्रात व देशात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे भाजपने तक्रारीत नमूद केले.

पंतप्रधानांविषयी अश्‍या प्रकारचे वक्तव्य करुन हुसैन यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली.याप्रसंगी आ.कृष्णा खोपडे,माजी महापौर दयाशंकर तिवारी,माजी आमदार सुधाकर देशमुख,डॉ.मिलिंद माने व भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अंबाझरी पोलिस ठाण्यात विनोद दामोदर कन्हेरे यांच्या तक्रारीवरुन हुसैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Latest बातम्या