Homeनागपूर न्यूजनागपूरला ‘मोवाड’होऊ देणार नाही:अंबाझरी पूर पिडीतांचा आक्रोश

नागपूरला ‘मोवाड’होऊ देणार नाही:अंबाझरी पूर पिडीतांचा आक्रोश

नाग नदीरुपी आई कोमात,नेते औषधाऐवजी घालतात आहे दागिने: पूर पिडीतांचा संताप

कॉंक्रिटने काढत आहेत काँक्रिटचे सोल्यूशन:वाह रे कल्पकता!

पुन्हा पूर आल्यास जबाबदारी कोणाची?जनरेट्यातून करणार निश्‍चित

स्केटिंग रिंकची २५ फूटांची तुटकी भिंत रहीवाश्‍यांसाठी ठरली कर्दनकाळ

ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मितच आपत्ती:पिडीत रहीवाशी या निर्णयावर ठाम

२३ दिवसांनंतरही प्रशासन ढिम्म!

भरतवनाचा अट्टाहास पूर्ण झाला असता तर?

अंबाझरी बंधा-याचे आयुष्य ७ वर्षांपूर्वीच संपले:राजकीय धुरीण व प्रशासकीय अधिका-यांनी केले अक्षम्य दूर्लक्ष

गडकरींची १२ लोकांची समिती म्हणजे ‘हाेयबा’समिती:पूर पिडीतांचा रोष

फडणवीसांच्या लेखी आश्‍वासनानंतरही दोनच दिवसात स्केटिंग रिंक नासुप्रने केले नागरिकांसाठी खुले!

या वेळी सामान गेलं पुढल्या वर्षी आपण जाऊ!पूर पिडीतांना आठवतोय अद्यापही जलप्रलयाचा तो थरकाप

नाग नदीचा समावेश पुन्हा हेरिटेज मध्ये करण्यात यावा:पूरपिडीत रहीवाश्‍यांची मागणी

मुद्दा मदतीसोबतच जीव वाचविण्याचा आहे:ज्येष्ठांचा घरे सोडण्याचा आग्रह!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१३ ऑक्टोबर २०२३: शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबरची मध्यरात्र जणू अंबाझरी तलावापासून वाहणा-या नाग नदी परिसरातील अनेक वस्त्यांसाठी कर्दनकाळच ठरली होती.साखर झोपेत असताना अनेकांच्या घरात नाग नदीचे पाणी शिरले आणि बघता बघता मानेपर्यंत पानी पोहोचले.चार चाकीच्या वर चार चाकी तरंगत असतानाचे दृष्य नागपूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.शहरातील भाग्यविधाते नेते,प्रशासकीय अधिकारी यांच्या लेखी हजारोंच्या आयुष्याच्या क्षणार्धात पाला पाचोळा करणा-या या महापूराचे कवित्व ,फक्त चार दिवस होते,पंचनामे,उपाययोजनेसंबंधीच्या घोषणा,प्रशासनाला दिशानिर्देश अश्‍या नेहमीचाच सरकारी खाक्याशिवाय गेल्या तेवीस दिवसात इतर काहीही न घडल्याने या महापूराचा सर्वात जास्त फटका ज्या डागा ले आऊट,यशवंत नगर,कारर्पोरेशन कॉलनी,वर्मा ले आऊट,अंबाझरी ले आऊट आणि शंकर नगर भागाला बसला तेथील सुज्ञ नागरिक हे गेल्या आठ दिवसांपासून दररोज कारपोरेशन कॉलनीतील हनुमान मंदिरात बैठक आयोजित करीत असून,भविष्यात असे अघटित घडू नये यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या किंबहूना करुन घ्यावा,याचा उहापोह करीत आहेत.

‘सत्ताधीश’ने आज या बैठकीचा मागोवा घेतला असता,२००६ साली मोवाडमध्ये जो महाप्रलय आला तो मानवनिर्मित असून प्रशासनाला चार वर्षांपूर्वीपासून याविषयीचा अहवाल मिळाला असताना, त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने अख्खी गावे त्या महापूरात पाण्याखाली बुडाली व हजारोंचा जीव गेला व राज्यात एकच हाहाकार माजला,अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्याने केवळ ४ तासांच्या पावसाने आठ तास दोन माणूसभर पाणी तुंबले,अंबाझरीचा कमकुवत झालेला बंधाराच वाहीला तर धंतोलीपर्यंतचा परिसर ४० फूट पाण्याखाली जाईल व लाखों लोकांचाच जीव क्षणार्धात जाईल,परिणामी नागपूरला आम्ही ‘मोवाड’ होऊ देणार नाही,यासाठी प्रशासनाला कामाला लावणार,असा निर्णय आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

नागपूर सुधार प्रन्यासच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंकच्या बाजूलाच नाग नदीमध्ये लहान पूल आहे.दोन तासात ११६ मिलीलीटर पाणी लावा गावात बरसल्याने ते पाणी अंबाझरीत शिरले व तिथून नाग नदीद्वारे वाहू लागले मात्र नासुप्रने स्केटिंग रिंक बांधतानाच नाग नदीच्या प्रवाह या ठिकाणी अवरुद्ध केल्याने पाणी नाग नदीवरील याच तुटलेल्या पुलावरुन आजूबाजूच्या वस्तीत शिरले व ‘न भूतो ना भविष्यती’असे अपरिमित नुकसान हजारो नागरिकांचे झाले.परिणामी,नासुप्रने पुरासाठी कारणीभूत ठरलेला हा पूल तोडावा यावर बैठकीत आग्रह धरण्यात आला.यासोबतच अंबाझरी धरणा समोरच सार्वजनिक जागेवर क्रेझी कॅसल हा तद्दन व्यवसायिक प्रकल्प बांधण्याची परवानगी हल्दीरामला मिळाली,या प्रकल्पाचे बांधकाम करताना नाग नदी प्रवाहाचा श्‍वासच कोंडल्या गेल्या असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले.त्यामुळे सार्वजनिक जागा ही नागरिकांची जागा असल्यामुळे ती पुन्हा नागरिकांच्याच हितासाठी वापरण्यात यावी,असा प्रस्ताव मांडण्यात आला.

महामेट्रोने पिल्लर बांधताना ज्याप्रकारे नाग नदीच्या नैसर्गिक स्त्रोतांना हानी पोहोचली ते देखील स्त्रोत तातडीने मोकळे करण्यात यावे,अशी मागणी पुढे आली.

सर्वात महत्वाचे म्हणजे अंबाझरीच्या बंधा-याचे आयुष्य संपले असल्याचा अहवाल ‘मेरी’ (संकल्पन,प्रशिक्षण जलविज्ञान,सुरक्ष्तता,महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था)या संस्थेच्या महासंचालकांनी ६ वर्षांपूर्वी २६ ऑगस्ट २०१७ रोजी नोंदवले होते.तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही केल्या होत्या.सिंचन विभागाच्या २१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मनपाच्या स्थायी समितीने ३ वर्षांपूर्वीच प्रशासकीय मान्यता ही दिली होती.खर्च अधिक असल्याने प्राधान्यक्रम ठरवून ३ टप्प्यात हे काम करण्याचे योजन्यात आले होते.मात्र,गेल्या सहा वर्षांपासून राजकीय तसेस प्रशासकीय स्तरावर कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने, २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री जे घडले त्याला नैसर्गिक आपत्ती न मानता मानवनिर्मित आपत्तीच मानावी लागेल,असा सूर बैठकीत उमटला.

सर्वात महत्वाचे म्हणजे नाग नदीच्या किना-यावर घरे नसावी,हा निसर्गनियम असताना कारर्पोरेशन कॉलनी वसविण्यात आली.आता घरे झाली मात्र पाणी शोषूण घेणारी व्यवस्थाच निर्माण झाली नाही.त्यामुळेच क्रेझी कॅसलच्या ठिकाणी मेट्रोकरवी आता कोणतेही ‘सेव्हन वंडर्स’ सारखा प्रकल्प न राबवता नाग नदीचे पाणी शोषून घेण्यासाठी क्रेझी केसलची जागा मोकळी ठेवावी.नाग नदीच्या या काठी वसत्या वसल्या असल्यामुळे व्हीएनआयटी,पीकेव्ही(पंजाबराव कृषि विद्यापीठ)च्या जागेवर हे ‘स्पंज झोन’ निर्मित करावे.जिथे जागा मिळेल तिथे पाणी वाहू द्या.अन्यथा या वेळी दाेन माणूसभर पाणी ओसरायला आठ तास लागले,पुढल्यावेळी आठ दिवस लागतील आणि ती परिस्थिती किती भयाण असेल याचा अंदाजही वर्तविला जाणार नाही,अशी शक्यता बैठकीत तज्ज्ञांनी वर्तवली.

मनपाच्या ऐन निवडणूकीच्या तोंडावर अतिशय घाईघाईने अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंटवर विवेकानंद स्मारक २०१७ मध्ये बांधण्यात आले मात्र, या बांधकामामुळे पाण्याचा प्रवाह अडला व लोकांच्या घरात पाणी घुसले,त्यामुळे हे स्मारक तोडण्यात यावे व प्रवाहाला मोकळे करावे,अशी सूचना मांडण्यात आली.स्मारकाचे बांधकाम तेवढीच लांबी ठेऊन करण्यात आले असल्याचे नेते किवा मनपा प्रशासनाचे ‘बोलवचन’ हे तद्दन फसवे असल्याची टिका करण्यात आली.काँक्रिटने काँक्रिेटचे सोल्यूशन काढू शकत नाही.

पूर्ण नाग नदीच्या बाजूची हिरवी पट्टी ही पाण्याच्या प्रवाहासाठी वापरायची कि पैसे कमवायचे?या शहराचा सर्वाधिक सत्यानाश माजी मनपा आयुक्त टी.चंद्रशेखरराव यांनी केला असल्याचा ठपका बैठकीत करण्यात आला.चंद्रशेखर राव यांनी स्लॅब बांधण्याची परवानगी दिली.येथील सुज्ञ नागरिकांनी भविष्यातील धोका ओळखून या विरोधात न्यायालयात धाव घेतली मात्र,निर्णय मनपाच्या बाजूने लागला आणि २२ सप्टेंबर २०२३ रोजी त्या निर्णयाचे परिणाम हजारो नागरिकांना भोगावे लागले.नाग नदीचा समावेश पुन्हा एकदा हेरिटेजमध्ये करण्यात यावा कारण ती पुर्वी हेरिटेज मध्ये होती,टी.चंद्रशेखर राव यांनी ती हेरिटेजमधून बाहेर काढली.या विरोधातील याचिकेवर न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी ताे निर्णय दिला होता…..!

कारर्पोरशेन कॉलनीतील नागरिक नाग नाल्यांमुळे घरात बसून सुखाने जेवण देखील करु शकत नाही,इतकी दूर्गंधी या भागांमध्ये वसली आहे.महत्वाचे म्हणजे नदी किवा नाल्याचे पाणी वाहते असणे गरजेचे असताना, या भागातील नाग नाल्यांमध्ये ४ फूट पाणी सतत तुंबलेले असते.हीच परिस्थिती संपूर्ण शहराची अाहे.परिणामी,नागपूर शहर हे डेंग्यूच्या शहरामध्ये का परिवर्तित होणार नाही?दर वर्षी पावसाळ्या पूर्वीची नाले स्वच्छता ही कागदांवरच कशी असते,याचा पुरावाच या महापुराने दिला.

कारर्पोरेशन कॉलनीतील नाग नदीवर लाखो रुपये खर्च करुन दोन अतिशय छोटे सिवेज ट्रिटमेंट प्लान्ट बसविण्यात आले,या प्लान्टमधून दोन घरांतील सिवेज देखील स्वच्छ होणार नाही.हे ‘शो पीस’ प्लान्ट जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून, कोर्टात विविध विभागाचे अधिकारी चक्क खोटे प्रतिज्ञापत्र सादर करतात.त्यामुळेच पुन्हा पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता ‘विविध विभागाच्या अधिका-यांवरच जबाबदारी निश्‍चित केली जाईल.’यात जलप्रदाय विभाग,उद्यान विभाग,पाटबंधारे विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,मनपा व नासुप्रचे अधिकारी यांचा समावेश असेल,हे निश्‍चित करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाचा दौरा केला असताना लिहून दिले की नासुप्रच्या स्केटिंग ग्राऊंडवर १५ दिवस हालचाल होणार नाही मात्र,नासुप्रने गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा हे ग्राऊंड खुले केल्याने पालकांसोबत पाल्य हजर असल्याचे दिसून पडतंय!फडणवीस यांनी लेखी आश्‍वासन शाई उडून जाणा-या पेनने दिले होते का?अशी टिका करीत धोरणकर्ते नेते शेरा लिहताना लाल पेन,हिरवा पेन किवा नीळा पेन का वापरतात,याचा ही चांगलाच उहापोह बैठकीत झाला.पेनमधील शाईच्या रंगावरुन नेत्यांच्या सूचनेचा अर्थ प्रशासकीय नोकरशाही नेमकी समजत असते,हे विशेष!

आता त्याच नाला झालेल्या नाग नदीचे पुर्नजीवन व सौंदर्यीकरणावर तब्बल १७०० कोटींचा खर्च केला जाणार आहे.नाग नदीरुपी आई कोमात गेली असताना तिला दागिने करुन देण्याची तयारी सुरु आहे,तिला दागिन्यांची नाही औषधांची गरज असल्याची खरमरीत टिका बैठकीत उमटली.

बंधा-याचे आयुष्य सहा वर्षांपूर्वी संपले आहे मात्र केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी बंधा-याची उंची वाढवण्याची तसेच कॅचमेंटध्ये खोलीकरणाची संकल्पना मांडली आहे,यामुळे पूराचा धोका अधिक वाढणार असून पडणारा पाऊस तिथेच मुरेल का?हे त्यांनी अाधी सिद्ध करावं!खडकवासल्याची दारे दरवर्षी उघडली जातात आणि पुणे शहर पाण्याखाली तुंबतं.नागपूरात तो प्रयोग नको.त्यापेक्षा बंधारा मजबूत करा आणि नाग नदीचा श्‍वास अतिक्रमणे काढून मोकळा करा,अशी मागणी करण्यात आली.

कहर म्हणजे, मनपाच्या कर्मचा-यांनी या भागांमध्ये तुंबलेला कचरा काढण्या ऐवजी तो टिनांनी झाकून ठेवला आहे!का?या ठिकाणी माणसे राहत नाहीत का?त्यांना आरोग्याच्या वेगळ्याच अडचणींना सामोरे जावं लागत आहे.अनेकांच्या अंगावर वेगळीच पुरळ व लाल चट्टे आले असून उरलासूरला पैसा आता त्वचेच्या रोगावर खर्च केला जात आहे!घरातील ओल आज २३ दिवस झाल्यानंतरही गेली नाही.पूर पिडीत नागरिकांना तातडीने स्वच्छ परिसरात जीवन जगू देण्याची जबाबदारी कोणाची आहे?नवनियुक्त मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यावर मुळीच गंभीर नसल्याची टिका बैठकीत उमटली.

पंचनामे फक्त खालच्या मजल्यावरील नागरिकांच्या घरांचे करण्यात आले मात्र वरच्या मजल्यावर राहणा-या नागरिकांच्या दूचाक्या,चारचाक्या या तर खाली जमीनीवरच होत्या ना?एकावर एक चारचाकी चढल्याने त्या आता भंगारात देखील कोणी घ्यायला तयार नाही,हे मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांचे नुकसान नाही का?याची भरपाई कोण देणार?

मुलाचे लग्न ठरल्याने अतिरिक्त खोली बांधण्यासाठी काढली.सोने व अन्नधान्य घेऊन ठेवले.दोन तासांच्या पावसाने सगळेच हिरावले.नव्याने कूठून सुरवात करावी?असा प्रश्‍न एका अंबाझरी पूर पिडीत महिलेने मांडला,तर मनपाच्याच शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने हे ठिकाण आता राहण्यासाठी धोकादायक झाले असून घर विकून शहरात दूसरीकडे कुठेही चला,असा घोशा मुलाकडे लावला आहे.मनपातील अति भ्रष्ट कारभाराचा चांगलाच अनुभव असल्याने त्यांनी जास्त धास्ती घेतली आहे,हे विशेष!

मनपाचे लाडके कंत्राटदार गुरुबक्क्षानी यांनी तुम्ही सिमेंटची घरे बांधता तर सिमेंटच्या रस्त्यांचा काय त्रास होतो?असा उरफाटा सवाल नागरिकांना केला असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले!

बैठकीत पूरपिडीतांमध्ये सर्वात आधी अंबाझरीच्या कालबार्ह्य झालेल्या व सर्वाधिक धोकादायक परिस्थितीत पोहोचलेल्या बंधा-याविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी लवकरच एक सभा घेण्यात येईल यात काही ठराव मांडले जातील.या सभेत विविध विभागांच्या जबाबदार अधिका-यांना बोलविण्यात येईल.अतिक्रमणाच्या संदर्भात मोठी लढाई लढली जाईल.पूरानंतर संपूर्ण भागांमध्ये जी वेगळीच रोगराई पसरली आहे,ती नष्ट करण्यासाठी मनपावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.नाग नदीमध्ये चार फूट तुंबलेले पाणी प्रवाहित करण्यासाठी बाध्य केले जाईल.अामची कॉलनी भांडेवाडी नाही त्यामुळे सिवेजची समस्या तातडीने सोडविण्यात यावी.

‘चला जाणू या नदी ला’यासारख्या सरकारी उपक्रमात दिखाऊ सहभागिता दाखविणा-या मनपा आयुक्तांनी ‘चला जाणू या अंबाझरीच्या धोक्याला’यावर लक्ष केंद्रित करावे,गडकरी यांनी जी १२ जणांची समिती तरुण व बुद्धीमान आयएएस अधिका-यांची जरी नेमली आहे तरी ती सर्वस्वी ’होयबा ’लोकांची समिती असून या समितीकडून प्रभावी उपाययोजनांची अपेक्षा नाही.

परिणामी पूर पिडीतांमध्ये जनजागृती,२५ दिवसांनतरही झोपलेले प्रशासन,मदतीच्या निकषामध्ये झोल, पूरपिडीतांच्या व्यथा मांडण्यासाठी व उपाययोजनेसाठी मोठ्या सभेचे आयोजन,सभेत विविध विभागातील जबाबदार अधिका-यांना निमंत्रित करने,यानंतर लगेच पत्रकार परिषदेचे आयोजन,तलावाचे उंचीकरण नव्हे तर मजबुतीकरणावर भर,क्रेझी कॅसलची जागा मुक्त करणे,नासुप्रच्या स्केटिंग ग्राऊंडचा वापरात बदल करने, अंबाझरी पसिरातील मेट्रोची अतिक्रमणे काढणे,सभेची माहिती विविध व्हाॅट्स ॲप ग्रूप्सवर टाकण्याची व पुढील सभेच्या अधिसूचनेची जबाबदारी आजच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आली.

बैठकीत सुप्रसिद्ध वास्तूविशारद प्रद्यमुन्न सहस्त्रभोजने]महेंद्र चांडक,अमोल देव, सुनंदा वांद्रे, प्रल्हाद चरपे,नरेंद्र काजणे,संदीप कोल्हे (डागा ले आऊट)रामेश्‍वरी बनसोड(यशवंत नगर)प्रिती माटे,प्रसिद्ध वास्तूविशारद अनुराधा टिकस व जयंत टिकस , विजय लाखे,विद्या लाखे,प्रसाद माटे (कारर्पोरेशन कॉलनी),डॉ.राधा जाजू,सत्यनारायण जाजू(अंबाझरी ले आऊट),प्राची माहूरकर(शंकर नगर)अनुसूया काळे-छाबरानी,डॉ.आशिष बनसोड,डॉ.अनुप्रिता भडागे, आदी उपस्थित होते.

…………………………………….

 

.

Latest बातम्या