शेकडो हेक्टर शेतीवर राखेचे आवरण!कोल वॉशरीजच्या धद्यांत अनेकांची‘टक्केवारी!
पर्यावरणाचा -हास: महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे आश्चर्यजनकरित्या ‘घुमजाव’!
जिल्हाधिकारींतर्फे या गंभीर विषयी देखील ‘बैठकांवर’बोळवण
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हातातून आमदार आशिष जयसवाल यांनी हिसकले शेतक-यांचे निवेदन!
२८ नोव्हेंबर रोजी करणार तीव्र आंदोलन:प्रशांत पवार यांचा इशारा
नागपूर,ता. २३ नोव्हेंबर २०२२: पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खदानी जवळच्या वराडा मौजा,एसंबा गावात कोल वॉशरीमुळे अक्ष शहा:हाहाकार माजला असून, कोल वॉशरीच्या राखेमुळे शेकडो हेक्टर शेतजमीनीवर राखेचे अावरण पसरले असून जमीनीत देखील खोलवर राखमिश्रीत पाणी सातत्याने झिरपत असल्याने या गावातील सगळे जलाशयाचे स्त्रोत प्रदूषित झाली आहेत. येत्या एका वर्षात नागपूर शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणा-या पेंच कालवा नदीपात्रात देखील या कोल वॉशरिजची राख मिसळने न थांबल्यास नागपूरकर नागरिकांना देखील राखमिश्रीत पाणी पिण्याची वेळ येणार असल्याचा इशारा ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रशांत पवार यांनी आज पत्र परिषदेत दिला.
या कोल वॉशरीमध्ये गोंडेगाव कोळसा खदानीतून येणा-या कोळसा धुरामुळे वराडा मौजा येथील जवळपास ३५० हेक्टरच्या वर शेती पूर्णत:प्रदुषित झाली असून येथील शेतक-यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे वास्तव पवार यांनी याप्रसंगी मांडले.
यात महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण बोर्डाची भूमिका देखील अतिशय ‘संशयास्पद’ असून मंडळाच्या ज्या ‘काटे’ नावाच्या अधिका-यांनी या ठिकाणचे परिक्षण करुन २० मे २०२२ रोजी या कोल वॉशरीला क्लोजर नोटीस पाठवली तसेच या ठिकाणचे वीज व पाणी देखील कापण्यात आले त्याच काटे नावाच्या अधिका-यांनी राजकीय दडपणाखाली ६ जून २०२२ रोजी म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात पुन्हा या कोल वॉशरीला सुरु करण्याची परवानगी दिली!
फक्त पंधरा दिवसात या कोल वॉशरीच्या संचालकाने प्रदुषण नियंत्रणाच्या कोणत्या निकषांची पूर्तता केली?असा सवाल प्रशांत पवार यांनी याप्रसंगी केला.जून महिन्यात अतिवृष्टि झाल्याने कोल वॉशरीचे राखमिश्रीत पाणी जवळपास ६०० हेक्टर शेतीवर पसरले यामुळे शेतक-यांचा कापूस,तूर,सोयाबिन,संत्री,मोसंबी, भाजीपाला इत्यादी पिकांवर राखमिश्रित पाणी तुंबले व जगाचा पोशिंदा असणारा या ठिकाणचा शेतकरी अक्षरशहा:देशाेधडीला लागला असल्याचे पवार म्हणाले.
धुळकणांमुळे गावक-यांचे आरोग्य हे धोक्यात आले असून शेकडो हेक्टर पिकांची नासाडी झाली आहे.फक्त एका कोल वॉशरीमुळे हजारो गावकरी कुटूंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात येथील गावक-यांनी कोल वॉशरी बंद करण्यासाठी तीव्र आंदोलन देखील केले.या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या निकषानुसार येथील शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना केली मात्र फक्त ५ ते ६ शेतक-यांच्या खात्यात तुरळक पैसे जमा करण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले.आजपर्यंत राज्य सरकारने शेतक-यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही मात्र या राज्यातील एक खासगी कोल वॉशरी कंपनी ५ ते ६ शेतक-यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करते व ती देखील एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे,यावर आता संशोधन झाले पाहिजे,असा टोला त्यांनी हाणला.
एकीकडे केंद्र सरकार २०२० मध्ये एक अध्यादेश काढून कोळसा धुण्याची काही एक गरज नसल्याचे प्रसिद्ध करते,असे केल्याने कोल स्टोरेज,हेण्डलिंग इत्यादी प्रक्रिये दरम्यान जल प्रदुषणात पराकोटीची वाढ होत असून हे पाणी जमीनीत मुरत असल्याने शुद्ध पिण्याचे स्त्रोत प्रदुषित होत असल्याचे केंद्र सरकारच सांगत आहे.वॉश कोल किवा रॉ कोल वापरल्याने वीज निर्मितीत कोणताही फरक पडत नसल्याचे हे केंद्रानेच मान्य केले असताना देखील, महाराष्ट्रात काही मंत्री व आमदारांच्या ‘संगमताने’ कोल वॉशरीजचा धंदा जाेमाने सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
एवढंच नव्हे तर या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार आशिष जायसवाल यांनी येथील शेतक-यांना कोल वॉशरीमुळे जर पिकांची नासाडी होत असेल तर‘बांबू’लावण्याचा उरफाटा सल्ला दिल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.भविष्यात ही कोल वॉशरी कंपनी बंद पडल्यास बांबू उत्पादनाने या भागातील शेतक-यांना कोणता लाभ होणार?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोल वॉशरीसाखी खासगी कंपनी ही सर्वस्वी शासकीय असणा-या एनडीआरएफचे निकष लागू करते ही आणखी एक आश्यर्चकारक बाब असल्याचा टोला त्यांनी हाणला.येत्या काळात या कोल वॉशरी कंपनीच्या कारभारामुळे हजारो हेक्टर शेतजमीन नापिक होईल व पिण्याचे पाणी ही प्रदुषित होईल,पर्यायाने याचा परिणाम पेंच कालव्यामधून जाणा-या पिण्याच्या पाण्यावर होणार असून येत्या एका वर्षात नागपूरकरांना देखील राखमिश्रीत पाणी पिण्यासाठी सज्ज व्हावे लागणार असल्याचा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला.
एवढ्या गंभीर समस्येवर मात्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाची भूमिका ही अतिशय संशयास्पद असल्याचे सांगून २० मे २०२२ रोजी या कोल वॉशरी कंपनीला क्लोजर नोटीस दिल्यानंतर अचानक जून मध्ये पुन्हा काही शर्तीच्या आधारावर सुरु करण्याचे आदेश शासनाच्या या विभागाने दिल्याने ‘टक्केवारीच्या’या गौडबंगालात शासकीय विभागातील काही अधिकारी व आमदार देखील सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
प्रदुषण विभागाच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्या ऐवजी कोल वॉशरी कंपनीने ‘ पांढ-या कापडाचे आवरण’ लावून कर्तव्याची इतिश्री मानली!या कापडांमुळे शेतजमीनीवरील राखेचे संक्रमण कसे राेखता येणार आहे?आता तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनीच याचे शास्त्रशुद्ध उत्तर, प्रदुषण बाधित शेतक-यांना देण्याचे आव्हान यावेळी प्रशांत पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी हे आएसआय झालेले असतात अश्यावेळी जिल्हाधिकारी एवढ्या महत्वाच्या व संवेदनशील विषयावर फक्त ‘बैठका’लावून इतिश्री मानत असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला.
नुकतेच कृषि मंत्री दादा भुसे यांनी या भागाचा दौरा केला असता या मतदारसंघाचे आमदार आशिष जयसवाल यांनी पिडीत शेतक-यांनी कोल वॉशरी विराेधात भुसे यांना दिलेले निवेदन अक्षरश: भुसे यांच्या हातातून हिसकले असल्याचा आरोप पवार यांनी केला.
संघटनेतर्फे आंदोलन-
येत्या २८ नोव्हेंबर रोजी उद्योग भवना समोरील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासमोर ‘जय जवान जय किसान’संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असून या नंतर बाधित व पीडीत गावकरी व शेतकरी जनतेला घेऊन कोल वाॅशरी बंद पाडल्या जाईल असा गर्भित इशारा याप्रसंगी प्रशांत पवार यांनी दिला.
पत्र परिषदेला ‘जय जवान जय किसान संघटनेचे ’समन्वयक विजयकुमार शिंदे,सचिव अरुण बनकर,सहसचिव अभिनव फटींग,निलिकेश कोल्हे,रविंद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा