

–धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा संदेश
नागपूर,२९ ऑगस्ट: जगासमोर महामारी, युद्ध आणि भूकेसारखा प्रश्न निर्माण झाला असताना जलवायू परिवर्तनाने मानवी अस्तित्वाचे संकट निर्माण केले आहे. या जलवायू परिवर्तनाचा मानवच नाही तर समस्त पृथ्वीला धोका आहे. या संकटाला ओळखून मानवाची पावले परिवर्तनाच्या दिशेला पुढे सरकली पाहिजे. मूल्यांचे हनन होणा-या काळात सर्वांनी संकुंचित बेड्यांना तोडून धम्मपथावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण करीत भविष्याला प्रकाशवाट निर्माण करण्यासाठी वर्तमानाचे संकट ओळखून स्वत:च्या अंतरगात दीप चेतवा. असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी इंदोरा बुध्द विहार येथे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी अनुयायांना दिला.
जीवन फुलालांसारखे सुंदर असले तरी आयुष्य संकटात सापडले आहे. एकीकडे माणूस सुखासाठी धडपडतो तर दुसरीकडे संकटाच्या जगात माणसांचा संघर्ष सुरूच आहे. ‘जगाला युद्ध नको, बुद्ध हवा पण जगभरात घडणाèया घडामोडी मानवी मन अन् मेंदू विचलीत करणाèया आहेत. मात्र, मानवाने विचलित न होता संकटाचा सामना करावा. असे सांगून ससाई म्हणाले तथागत बुद्धांचा मार्ग नवी दृष्टी प्रदान करण्यास उपयुक्त आहे. या दृष्टीतून निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्गही शोधता येईल. कारण बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर गाठता येईल. व्यवस्थेसोबत चालत आलेली जीवनदृष्टी किंवा जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करा, हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे.
सत्य शोधणारा बुद्ध हा जगातील पहिला शास्त्रज्ञ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैज्ञानिक सत्यावर आधारित बुध्द धम्माची पुनर्रचना केली आणि जगमान्य झाले. बुद्ध हा जगाचा पहिला तत्वज्ञानी आहे. बुद्ध तत्वज्ञान हे जगाच्या पाठीवरचे पहिले समतेचे, न्यायाचे, बंधुतेचे तत्वज्ञान आहे. प्रतित्यसमुत्पाद हा बुद्ध तत्वज्ञानाचा पाया आहे. बुद्ध तत्वज्ञान माणसाला सुंदर करणारे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान समतेचे, बंधुत्वाचे, स्वातंत्र्याचे तत्वज्ञान आहे.
ससाई पुढे म्हणाले, वाईटाने वाईटावर कधीही मात करता येत नाही. तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवले जाऊ शकते. त्यामुळे आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको, हीच स्थायी शांततेची नांदी ठरू शकेल. तुम्ही भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका, भूतकाळात गुंतू नका, केवळ वर्तमान काळावर लक्ष्य केंद्रीत करा. जीवनात आनंदी राहण्याचा हा एकमेव योग्य मार्ग आहे, असेही भदंत सुरेई ससाई म्हणाले.
बाबासाहेबांच्या विचाराने जगभरात प्रेरणा निर्माण करा-
अंधकाराच्या विळख्यात सापडलेल्या जगाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता मानवी शांतता निर्माण करू शकतो, असे सांगून धम्म संदेशात ससाई पुढे म्हणाले, कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा आणि जगभरात प्रेरणा निर्माण करा, माणसाला माणूस समजले तर जगाचा उद्धार निश्चित आहे. कुणाचाही द्वेष करू नका. प्रेम निर्माण करा. कारण आज जगाला शांतता, करुणा आणि प्रज्ञाची गरज आहे.

आमचे चॅनल subscribe करा