Homeराजकारणदेशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण!

देशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण!

Advertisements

(अतिथीस्तंभ)

नितीन चौधरी
(राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा)

नागपूर,ता. २९ जून: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील ३० वर्षांच्या कार्यकाळात पारदर्शक कामे केली आहेत. गृहमंत्री पदाच्या जवळपास दीड वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करूनही खोट्या प्रकरणात अनिल देशमुख यांना भाजपकडून अडकविण्यात आले. यामागे भाजपचं सूडबुद्धीचं राजकारण आहे. देशमुख यांना गोत्यात आणण्यासाठी भाजपने रचलेला हा आधीच प्रस्थापित केलेला सुनियोजित डाव आहे. सारं काही आलबेल असताना भाजपने सुडाच्या भावनेतून खोटेनाटे आरोप करून देशमुख यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी चालविलेले षडयंत्र आहे,असे माझे स्पष्ट मत आहे.

राजकीय सूडबुद्धीतून कोणाचीही राजकीय कारर्कीद संपुष्टात आणण्यासाठी, भारतीय जनता पक्षाला ओळखले जाते. देशमुख यांच्या प्रकरणावरून भाजपचेेेे हे सुडाचे राजकारण ठलकपणे अधोरेखित झाले एवढंच! मागील ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पारदर्शक कारभार करूनही ‘सीबीआय’ आणि ’ईडी’ सारख्या संस्था देशमुखांविरोधात कश्‍याप्रकारे हात धुऊन मागे लागलेल्या आहेत,हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघतच आहे.

सूडाच्या या राजकारणातूनच काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.विदर्भाच्या वाट्याला आलेली ही शोकांतिकाच आहे. त्यात सचिन वाझे यांच्याकडून १०० कोटी घेतल्याचा खोटा आरोप देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावला. त्यानंतर एकापाठोपाठ कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अनिल देशमुख यांना गोवण्याचा खोटा प्रयत्न भाजपकडून सातत्याने केला जातोय.

देशमुख यांचे घर,कार्यालयांवर सीबीआय व ईडीकडून सतत छापेमारी सुरु आहे. त्यात काहीही सापडलेले नाही. १०-१५ वर्षापूर्वीच्या गोष्टी बाहेर उकरून काढल्या जात आहेत. ज्यात काहीही तथ्य नाही मात्र जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे.

आघाडीच्या मंत्र्यांविरोधात कटकारस्थान रचून त्यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचे कंत्राट भाजपने घेतले आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच व्यक्त केली.राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखाद्या अधिकारी आरोप करु शकतो.त्यामुळे जे घडतंय ते राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचं आहे.राजकारणातील लोकांना अशा पद्धतीने भीती दाखवली जाऊ लागली,तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल,असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

अंबानी यांच्या ॲटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी एनआयएने मुख्य लक्ष्य केंद्रित केले पाहिजे.मात्र त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तींकडून काही वदवून घेऊन त्यानुसार सार्वजनिक जीवनात काम करणा-या लाेकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार भाजपने देशात सुरु केला असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी परवा २७ जून रोजी केला.
वादग्रस्त परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतरच त्यांनी आरोप केलेले आहेत.याचा अर्थ त्यापूर्वी त्यात तुमचाही सहभाग होता काय?असा सवाल ही जयंत पाटील यांनी उचलला होता.

आतापर्यत अनिल देशमुख यांच्यावरच कारवाई का केली जात आहे? या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना केंद्रीय गृहमंत्रालय मोकळीक का देत आहे ? सिंग यांच्याकडे बेहीशेबी मालमत्ता आहे. तरीही, साधी विचारणा सीबीआय किवा अन्य संस्थेकडून झालेली नाही, याचे आश्चर्य वाटते. जणूकाही केंद्र सरकारने सिंग यांना क्लीन चिट दिल्याचे दिसत आहे. याचा अर्थ देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी परमवीर सिंग आणि केंद्र सरकारमध्ये ‘करार’ तर झाला नसावा? “केवळ धाडी टाकून सर्व यंत्रणेचा दुरुपयोग केंद्र सरकार करीत आहे”, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी ही केला.

महत्वाचे म्हणजे माजी पोलिस आयुक्त व राज्य गृहरक्ष् क दलाचे परमबीर सिंह हे दीर्घकालीन रजेवर गेले आहेत. ५ मे पासून गैरहजर असलेल्या परमबीर सिंह यांनी आजारपणामुळे रजा घेत असल्याचे सांगितले आहे.

एका बाजूला अनिल देशमुख प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होत आहे आणि दुस-या बाजूला एनआयएने पुन्हा सुरु केलेले अटकसत्र यामुळे ते दीर्घ रजेवर निघून गेलेत.ते सध्या चंडीगडमध्ये असून तेथील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी सादर केल्याचे म्हटले जात आहे.परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे अनेक अारोप असून त्याचा तपासही वेगवेगळ्या यंत्रणांना देण्यात आलेला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आलेल्या प्रकरणाचा तपासही अंतिम टप्प्यात आहे.त्यामुळे परमबीर सिंह हे कोणत्या कारणाने एवढ्या प्रदीर्घ रजेवर आहेत,हा प्रश्‍न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष्ाने जवाबदारीने वागले पाहिजे आणि ही जनतेची अपेक्ष्ा आहे. पण ती जवाबदारी पाळत नसाल,तर याचा अर्थ आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत.याचा अर्थ आपल्यात कमतरता आहेत हे सिद्ध होतं.या कारवाया चुकीच्या पद्धतीने होत आहेत.सत्ता गेल्यावर त्यांना नैराश्‍य आले,याच नैराश्‍यातून आणि वैफल्यातून अशा प्रकारच्या चौकश्‍या सुरु करण्यात आला असल्याचे सांगत सत्ताधारी पक्ष्ाच्या नेत्यांवर ‘ठरवून’कारवाई केली जात असल्याचा थेट आरोप राऊत यांनी देखील केला आहे.
केंद्रिय पथके दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करत आहेत आणि हे भारताच्या संघराज्य पद्धतीला हानिकारक आहे असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाचे म्हणजे नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी देखील नुकतेच अनिल देशमुख यांच्या प्रकरणी पक्ष् ज्या प्रकारे त्यांच्या मागे उभा असायला पाहीजे होता त्याप्रमाणात उभा राहीला नसल्याचे मनातले शल्य बोलून दाखवले.याच पार्श्वभूमीवर आज मंगळवार दि. २९ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार साहेबांनी त्यांची महत्वाची भेट ही घेतली.भाजप,डावपेच,ईडी व माजी गृहमंत्री यांची संभाव्य अटक याच्या संदर्भात आज मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या बैठकीला महाराष्ट्रात अभूतपूर्व असे महत्व प्राप्त झाले आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट तरीही छापेमारी कशी?

“मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम राजकीय हेतूपोटी सुरु आहे”,असे वक्त्यव्य अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. सीबीआयला राज्यात महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय तपास करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची चांगलीच गोची झाली होती. परिणामी, सूडबुद्धीतून राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचा डाव भाजप खेळत आहे. आधी सीबीआय व आता ईडीने मुंबई, नागपूर येथील देशमुख यांच्या कार्यालयावर आणि घरांवर छापेमारी केली आहे. मात्र, अजूनही काहीही सापडलेले नाही. निव्वळ नाहक त्रास देऊन बदनामी करण्याचा खेळ भाजप खेळत आहे.

परमबीर सिंग यांनी याचिका दाखल करून देशमुख यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही, सीबीआय व ईडी देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी कंबर कसत आहेत.वारंवार समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगत आहेत. हे सर्व निव्वळ आणि निव्वळ सूड उगारून जनतेमध्ये देशमुख यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.

Latest बातम्या