Homeनागपूर न्यूजडॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणा-या दोषींविरुद्ध गुन्हा दाखल का होत नाही?

डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडणा-या दोषींविरुद्ध गुन्हा दाखल का होत नाही?

पर्यटन विकास महामंडळाच्या अभियंताला कोण घालत आहेत पाठीशी?

मनपाने सभागृहात ठराव पारित करुन ४४ एकर जागा का घातली खासगी विकासकाच्या घशात?

महसूल विभागाचा सहभाग व पर्यटन विकास महामंडळाचा कोणता होता ‘डाव’?

नागपूर शहराच्या वैभवशाली पर्यटन स्थळाला कोणाची लागली ‘राजकीय’ नजर?

नासुप्रचा गरुडापेक्षा दुप्पट रक्कम देण्याचा प्रस्ताव का नाकारण्यात आला?’

आमदार विकास ठाकरे विधीमंडळात करणार प्रश्‍न उपस्थित

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.३० नोव्हेंबर २०२२: अंबाझरी येथील नागपूरचे एकेकाळचे वैभवशाली पर्यटन स्थळ असणारे अंबाझरी उद्यान हे गरुडा कंपनी नामक खासगी विकासकाच्या घश्‍यात २०१७ मध्ये घालण्याचा ‘करार‘ पार पडला.याच अंबाझरी उद्यानावर नागपूर महानगरपालिकेने जवळपास जनतेच्या करातून ५० कोटीं रुपये खर्च केले होते मात्र, हॅरिटेज असणा-या तलाव व हिरव्यागार वृक्षांनी नटलेल्या या उद्यानाच्या ४४ एकर जागेवर अनेकांची ‘राजकीय’ नजर होती.परिणामी भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता असलेल्या नागपूर मनपाने २०१७ साली सभागृहात ठराव पारित करुन ही जागा महसूल विभागाल‘हेतूपुरस्सर’ परत करण्याची खेळी केली.

कोणताही वेळ न दवडता महसूल विभागाने उद्यानाची जागा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विकसित करण्यासाठी हस्तांरित केली.तेवढ्याच तत्परतेने पर्यटन विकास महामंडळाने या उद्यानाचा पर्यटन स्थळात विकास करण्यासाठी निविदा काढल्या कारण या स्थळाच्या विकासकासाठी जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षीत होता व तेवढी दानत या शासकीय महामंडळाची नव्हतीच.

त्यामुळे यात गरुडाच्या ‘वेगाने’ ‘गरुडा’कंपनीची एन्ट्री झाली.त्यांनी तत्परतेने ही जागा ताब्यात घेऊन अंबाझरी उद्यानाच्या फाटकाला ‘मोठे’कूलूप ठाेकले व या सर्व ‘राजकीय’ उद्योगामुळे नागपूरकर हिरमुसले!लहान मुलांच्या खेळण्याचे,मोठ्यांच्या मनोरंजनाचे,शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीचे एकमेव हक्काचे सुंदर ठिकाण हे एकाएक ‘खासगी’ विकासकाच्या घश्‍यात गेले.पहाट पक्ष्यांचा देखील विकासकांच्या रखवालदारांसोबत यामुळे वाद वाढला.त्यावर कहर म्हणजे जून महिन्यात पावसाच्या बहाण्याने एका रात्रीत आंबेडकरी जनतेच्या अस्तित्व व अस्मितेची श्रद्धेय वास्तू,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जमीनदोस्त करण्यात आले!

विकासकाच्या या कृत्यामुळे शहरातील आंबेडकरी जनता पेटून उठली.धरणे,आंदोलने,निषेध,जिल्हाधिकारी यांना निवेदने अश्‍या विविध स्वरुपाच्या लोकशाही मार्गाने गरुडा कंपनीच्या या तुघलकी कारवाईविरोधात अद्यापही नागपूरात आंदोलने सुरु असून या आंदोलनाची धग दिवसागणिक वाढतच आहे.

अंबाझरी येथील २० एकर अश्‍या विस्तिीर्ण जागेवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे आंबेडकरी जनतेसाठी फक्त विटा सिमेंटची वास्तू नसून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पादस्पर्शाने पावन झालेले एक जाज्वल्य असे स्मृतिस्थळ होते.१४ ऑक्टोबर १९५४ रोजी दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर अंबाझरी येथील याच सभागृहात डॉ.आंबेडकरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी डॉ.आंबेडकरांनी उपस्थितांना आपल्या ओघवत्या शैलीतील शब्दांची ‘दीक्षा‘ दिली होती.

मनपाने त्या आठवणीचा वारसा जपण्यासाठी आंबेडकरी सांस्कृतिक भवनात [#Dr.Babasaheb sanskrutuk bhavan Nagpur ]त्या सभागृहाचे रुपांतर केले होते. हे आंबेडकरी भवन गरुडा कंपनीने कोणत्याही शासकीय परवागीशिवाय जमीनदोस्त केले.ना या कंपनीने मनपाची परवानगी घेतली ना नासुप्रची ना जिल्हाधिकारी कार्यालयाची.कोणत्या शासकीय परवानग्या न घेण्याचे ‘धाडस‘ एका खासगी विकासकाला येणे,यातच ‘राजकीय वजनाच्या ‘नेत्यांच्या आर्शिवादाचे वास्तव दडल्याचे या कृतीमागे ठरकपणेच अधोरेखित होतं. याच विरोधात आंबेडकरी जनता सातत्याने आंदोलन व उपोषण करीत असून जिल्हाधिकारी यांना देखील शेकडो निवेदने देऊन झालीत.जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटन विकास महामंडळाला फक्त दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्र व्यवहाराचा ‘सोपस्कार’पार पाडल्या जात आहे व पर्यटन विकास महामंडळाच्या नागपूरातील कार्यालयाने देखील अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्याचे ‘सौजन्य‘दाखवलेले नाही!

परिणामी,या संपूर्ण गौडबंगालात सहभागी असल्याचा आरोप असणारे नागपूर कार्यालयातील अभियंता विनय वावधने यांच्यावर आंबेडकरी जनतेचा पराकोटीचा रोष ओढवला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २ डिसेंबरपासून साखळी उपोषन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वावधने यांनी नागपूरच्या कार्यालयात‘गोटी‘ फिट करुन मुंबईच्या पर्यटन महामंडळाच्या मुख्यालयातून’सूत्रे हलवली असल्याचा आरोप केला जात आहे.मूळात सर्वस्वी मनपाच्या मालकीचा असणा-या अंबाझरी उद्यानाला एवढ्या तातडीने भाजपच्या सत्ताकाळात, महसूल विभागाला परत देण्याची ‘लगीन घाई’का झाली होती?असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासने देखील अंबाझरी उद्यानाची जागा त्यांना हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला होता तसेच गरुडा कंपनीपेक्षा दुप्पट रक्कम देण्यास नासुप्र तयार होती मात्र पर्यटन विकास महामंडळाने नासुप्रला ही जागा देता येणार नसल्याचा अभिप्राय कळवला!

फक्त एका ठेकेदारासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना काही राजकीय नेत्यांनी अक्षरश:वेठीस धरल्या असून या बाबतीत येत्या हिवाळी अधिवेशनात पश्‍चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हे लक्षवेधी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.दोषींवर तातडीने कारवाई करण्याबाबत नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्याने आंबेडकरी वास्तू बांधून देण्याची विकासकाची हमी: पर्यटन विभाग

याबाबत ‘सत्ताधीश’ने पर्यटन विभागाशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर ,खासगी विकासक १० हजार चौ.मी. जागेवर नव्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे निर्माण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाशी निगडीत आर्ट गॅलरी देखील राहणार असल्याचे सांगण्यात आले.अशी हमी गरुडा कपंनीकडून बैठकीत घेण्यात आली असल्याचे हा विभाग सांगतो.

याबाबत ‘सत्ताधीश’ने पर्यटन विभागाशी संपर्क साधला असता नाव न छापण्याच्या अटीवर खासगी विकासक १० हजार चौ.मी. जागेवर नव्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे निर्माण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनाशी निगडीत आर्ट गॅलरी देखील राहणार असल्याचे सांगण्यात आले.अशी हमी गरुडा कपंनीकडून बैठकीत घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

२०१५ मध्ये विधीमंडळात तत्कालीन नगरविकासमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्या समोर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विषय मांडला गेला होता.या ठिकाणी रखरखाव अभावी संपूर्ण उद्यानाची दूर्दशा होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते.अनेक अवैध गतिविधी या ठिकाणी होत होती.तरुण-तरुणींची जोडपे या ठिकाणचा गैरफायदा घेत होते.एवढ्या महत्वाच्या जागेचा विकास का करीत नाही असा प्रश्‍न तत्कालीन आमदार प्रकाश गजभिये यांनी उपस्थित केला होता.यावर नगरविकास मंत्री रणजीत पाटील यांनी या जागेचा विकास करणार असल्याचे आश्‍वासन विधीमंडळात दिले होते.मूळ प्रस्ताव पर्यटन विकास महामंडळाचा नव्हता.

या अनुषंगाने या जागेचा एकत्रित पर्यटन विकास करण्याकरिता २०१७ मध्ये अध्यादेश काढण्यात आला.विविध शासकीय विभागाच्या परवानग्यांसाठी १ रुपया नाममात्र शुल्क ठेवण्यात आले.अध्यादेशातील तरतुदीप्रमाणे या जागेच्या विकासाच्या मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी ‘सल्लागाराची’नेमणूक करण्यात आली.सल्लागारने बनवलेल्या मास्टर प्लॅननुसार या प्रकल्पावर सुमारे १०० कोटींची गुंतवणूक लागणार होती.१०० कोटींचा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राबविणे अशक्यप्राय असल्याने दूसरा पर्याय निवडण्यात आला व पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप(पीपीपी)च्या अनुषंगाने ग्लोबल टेंडर काढण्यात आले.

या टेंडरला सेकेण्ड अटैण्ड रिस्पॉन्स मिळाला व २०१९ साली गरुडा कंपनीला ही जागा ताब्यात देण्यात आली.६ जून २०१९ रोजी या ठिकाणचे आंबेडकरी भवन पडले.मात्र ते भवन पाडण्यात आल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या.हे सांस्कृतिक भवन १९६५ साली बांधण्यात आले होते व नागपूर महानगरपालिकेने कोणतीही देखभाल न केल्याने जीर्ण अवस्थेत होते.

विकासकाने ही जागा ताब्यात घेतली त्यावेळी आंबेडकरी भवन हे महामेट्रो गोडाऊन म्हणून वापरत होते!मेट्रोचे पत्रांचे शेड,सिमेंटचे पोते इत्यादी साहित्यांनी हे सांस्कृतिक भवन भरलेले होते.मात्र हे भवन पाडल्याचा तक्रारी आल्यानंतर नागपूरातील पर्यटन विभागातील रिजनल ऑफिसरला याबाबत विचारणा करण्यात आली.

त्यांनी ही वास्तू क्षतीग्रस्त असल्याने पावसाळ्यात कोसळली असल्याचा अभिप्राय दिला.विशेष म्हणजे ही वास्तू विकासकाकडून पाडण्यात आल्याचे साक्षीदार म्हणून कोणीही समोर आले नाहीत!

जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील पर्यटन महामंडळाला वारंवार विचारणा होत आहे.जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकींमध्ये व्हीडीयो कॉन्फरेंद्वारे प्रत्येक वेळी या मुद्दांवर चर्चा झाली असून, विकासकासोबतच्या बैठकीत देखील ‘तुझ्या स्वखर्चाने नव्याने ही वास्तू बांधून दे’अशी सूचना करण्यात आली अाहे,विकासक १० हजार चौ.मी.जागेवर नव्याने स्वतंत्र असे डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधून देणार असून या ठिकाणी एक आर्ट गॅलरी देखील राहणार असल्याची माहिती हा विभाग देतो.

हाच निर्णय आम्ही राज्य शासनाला देखील कळवला आहे.त्यामुळे हा वादग्रस्त विषय थांबवला गेला पाहिजे. आम्ही समाधान देण्याचा प्रयत्न केला असल्याचे संबंधित विभाग सांगत आहे.

 

Latest बातम्या