
८० टक्के नागरिक रस्त्यावर २० टक्के घरात
नागपूर,ता. ५ सप्टेंबर: शहरात शनिवार व रविवार हे दोन दिवस ‘जनता कर्फ्यू‘ लावणार असल्याची चर्चा असताना महापौर संदीप जोशी यांनी जनता कर्फ्यूची शक्यता फेटाळून लावत,नागपूरकर जनतेने स्वयंशिस्तीने शहरवासीयांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते.मात्र महापौरांच्या या अावाहनाला दूर्लक्ष्ून नागपूरकर जनतेने शहर ‘व्यवस्थित’सुरु राहील याचीच ‘व्यवस्थित’ काळजी घेल्याचे चित्र आज शहरात सर्वदूर बघायला मिळाले. इतर दिवसांच्या तुलनेत आज गर्दी कमी होती तरी देखील ८० टक्के जनता ही रस्त्यावर,बाजारात होती तर २० टक्के प्रामाणिक जनतेने शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता घरातच राहणे पसंद केले.


विशेष म्हणजे एवढ्या महिन्यांच्या लॉक डाऊननंतर इतवारी,महाल,खामला,धंतोली इ.ठिकाणी पाणीपुरी व नुडल्सचे स्टॉल रस्तोरस्ती लागले हाेते. या स्टॉल्टसवर नागपूरकर नागरिक मोठय्ा चवीने करोनाचा प्रादुर्भाव विसरुन नुडल्स व पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसत होती. ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’या अंदाजात अनेक खव्वैयांनी तोंडावर मास्क देखील लावला नव्हता.रस्त्याच्या कडेला गप्पांच्या मैफिलीही रंगल्या होत्या. अनेक दूकानांसमोर नेहमीसारखीच गर्दी ही होती. विशेष म्हणजे शहरातील रेस्टॉरेंट हे अद्याप बंदच आहेत परिणामी नागपूकर नागरिकांनी हा वीकेण्ड रस्त्याच्या कडेवरील पाणीपुरीवर, रेस्टॉरेंटची तहान भागवली. उपद्रव शोध पथकांना देखील जणू या स्टॉल्सवरुन करोना पसरत नाही,याची खात्री झाली असावी!

एकीकडे सरकारनेच सांगितले आहे ’आता जनतेला करोनासोबतच जगायचे आहे’जणू या उक्तीचाच सराव आज नागपूरकर जनतेने शनिवारी शहरात ठिकठिकाणी केला. घरात राहून आर्थिक संकट तर बाहेर पडून रोगराईचे संकट,दोन्ही पातळीवर संकट असणारच,परिणामी घराबाहेर पडून जनतेने,व्यावसायिकांनी,दूकानदारांनी रोगराईच्या संकटाशी जणू मुकाबला करण्याचे एकदिलाने ठरवले!
सरकारी नोकरदारांना पगार मिळतो परिणामी त्यांना दोन दिवसांच्या असो किवा दोन महिन्यांचा, जनता कर्फ्यूमुळे तिळमात्र फरक पडत नाही मात्र हातावर पोट असणारे जीव मात्र जीव मुठीत घेऊन आज शनिवारी देखील घराबाहेर पडलेच.
धक्कादायक बाब म्हणजे आता आर्थिक चटके हे फक्त निम्न वर्गालाच जाणवत नाही तर मध्यम वर्गही करोनामुळे चांगलाच भरडला गेला आहे. काही बँकांचा तपशील तपासल्यास मध्यमवर्गीय हा मोठ्या प्रमाणात आपला भविष्य निर्वाह निधी मोडायला बँकांच्या चकरा मारित असल्याचे लक्ष्ात आले. ५० हजारांची एफडी असेल तर ३० हजार फिक्समध्ये ठेऊन २० हजार घरी घेऊन जात होते. शेवटी प्रपंच हा सर्वांनाच आहे.

मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,महापौर यांना पैश्यांची विवंचना नसली तरी जनसामान्यांना आहे. ‘मार्च ते जून ’चार महिन्यांच्या प्रदीर्घ लॉक डाऊननंतर घराची,कुटुंबियांची,व्यवसायाची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी का होईना आज महापौरांनी केलेल्या आवहानानंतरही जनता ही बाहेर पडलीच,शहरातील आजचे दृष्य बघता असेच म्हणावे लागेल.
(सर्व छायाचित्रे ‘सत्ताधीश’ फोटो जर्नलिस्ट बोनी)
(छायाचित्रांचे ठिकाण-गिट्टीखदान,भरत नगर,रविनगर,धरमपेठ,केटी नगर,पोलीस लाईन टाकली,फेंड्रस कॉलनी)

आमचे चॅनल subscribe करा