
ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख
समता पर्वानिमित्त पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळा उत्साहात
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजन
नागपूर,ता.२९ नोव्हेंबर:: शासनाच्या काही योजना व्यापक जनहीताच्या असतात. अशा योजना दत्तक घेतल्याप्रमाणे लोकांपर्यंत पोहोचवून समाजहीत साधावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आज पत्रकारांसाठी ‘शासकीय वृत्तांकन व पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नागपूर समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्यासह विविध प्रसार माध्यमातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागपूरमध्ये सर्वंकष अभ्यास असणारे पत्रकार आहेत. अशा अभ्यासपूर्ण पत्रकारितेचा आमचा वारसा आहे. हाच कित्ता समाजकल्याणच्या योजनांबाबत आम्ही गिरवू शकतो.काही योजनांना दत्तक घेतल्याप्रमाणे प्रसिद्धी देऊ शकतो. सामाजिक न्याय विभागाच्या शिशू ते ज्येष्ठ नागरिक अशा समाजाभिमुख अनेक योजना आहेत. पत्रकारांनी प्रत्येक योजनेचा अभ्यास करून योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांनी केले.
वाचकांना माहिती पुरवणे, वाचकांचे प्रबोधन आणि मनोरंजन करणे ही माध्यमांची प्रमुख उद्दिष्टे आहेत. शासन संस्थांवर देखरेख ठेवणे आणि त्यात सुधारणा घडवून आणत लोककल्याणाचे काम व्हावे यासाठी प्रयत्न करणे हा पत्रकारितेचा उद्देश आहे. सध्याच्या माध्यमांचा कल हा राजकारण, गुन्हेगारी आणि मनोरंजनाच्या वार्तांकनाकडे असलेला पाहायला मिळतो. यासोबतच माध्यमांनी सामाजिक विषयाला न्याय देण्याची आवश्यकता आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शिशू ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक योजना आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका निर्णायक ठरत असून यासाठी माध्यमांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे ते कार्यशाळेत पुढे बोलताना म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कीर्ती यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. सामाजिक न्याय विभाग हा दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्यरत आहे. या घटकाला लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या माध्यमांनी अधिकाधिक प्रसिद्धी देण्याची गरज आहे. काळानुरूप सोशल मीडियासह विविध माध्यमे अस्तित्वात असली तरी नागरिकांचा मुद्रित माध्यमांवरील विश्वास हा अजून कायम आहे. हा विश्वास कायम ठेवण्याची प्रत्येक पत्रकाराची जबाबदारी आहे. पत्रकारांनी ही जबाबदारी ओळखून समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून काम करावे, असे ते यावेळी म्हणाले.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी नागपूर समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाची स्थापना ही स्वातंत्र्योत्तर पूर्व काळात करण्यात आली आहे. तळागाळापर्यंत पोहोचणारा हा विभाग आहे. विशिष्ट निधी राखून असणारा हा राज्यातील एकमेव विभाग असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ‘शासकीय योजना व पत्रकारांची भूमिका’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
सुरुवातीला कार्यक्रमाच्या आयोजक सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी पत्रकारांच्या कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट व्यक्त केली. पत्रकारांच्या बहुसंख्य उपस्थितीबद्दल आभार मानले. प्रादेशिक उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करीत समाज कल्याण विभागाच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक,स्वाधार योजना, कर्मचारी कल्याण समिती, शाळेत जात प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम,, सफाई कर्मचा-यांसाठी सुरू केलेली शाळा, शिष्यवृत्ती योजनांची त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी जयश्री धवराळ यांनी केले. तर आभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी मानले.

आमचे चॅनल subscribe करा