Homeनागपूर न्यूजछप्पर फाडके मतदान:पदवीधराची पुनरावृत्ती होणार का?

छप्पर फाडके मतदान:पदवीधराची पुनरावृत्ती होणार का?


शिक्षक मतदारांचा कल:‘परिवर्तन’ होणारच

चंद्रपूरमध्ये खरी लढत भाजप पुरस्कृत उमेदवार-आघाडीत नसून आप आणि आघाडीत!

‘जुनी पेंशन’मुद्दाभोवती शिक्षकांचे भरघोस मतदान

सीबीएससी शिक्षकांची ‘पारंपारिक’ वाट:खासगी शाळेतील शिक्षक संभ्रमातच

बिंझाणी मतदार केंद्रात व्यवस्थेचा बोजवारा:अनेक शिक्षकांनी मतदान न करता धरला घरचा रस्ता

प्रशासनाचा भोंगळ कारभार:एका केंद्रावर १८० तर दुस-या केंद्रावर १४०० मतदान!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.३० जानेवरी २०२३: नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले.या मतदारसंघात एकूण २२ उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले असले तरी प्रमुख लढत ही भारतीय जनता पक्ष समर्थित उमेेदवार नागो गाणार तसेच आघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात झाल्याची दिसून पडतेय.विशेष म्हणजे ‘सत्ताधीश‘ने अनेक मतदान केंद्रातील शिक्षक मतदारांचा कौल समजून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘परिवर्तन’घडणार असल्याची ‘सूचक’प्रतिक्रिया उमटली.महत्वाचे म्हणजे नागपूर जिल्ह्यात छप्पर फाडके म्हणजे एकूण नागपूरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ८६.२३ टक्के मतदान झाले आहे,इतक्या संख्येने शिक्षकवृंद मतदानासाठी बाहेर पडल्याने प्रस्थापितांना धडकी भरली असून ही परिवर्तनाची नांदी तर नाही ना?या चर्चेला उधाण आले आहे.

या निवडणूकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे व भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार,शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे व महाविकासआघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यासह आपचे देवेंद्र वानखेडे,राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सतीश इटकेलवार,बसपच्या निमा रंगारी,वंचितचे दीपराज खोब्रागडे आदींसह एकूण २२ उमेदवार रिंगणात होते.

नागो गाणार यांच्या निवडणूकीची संपूर्ण दारोमदार दक्ष्ण नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मते यांच्यावर सोपविण्यात आली होती तर अडबाले यांच्या पाठीशी पदवीधर प्रमाणेच काँग्रेसचे सावनेरचे आमदार सुनील केदार,विधान परिषदेचे आमदार ॲड.अभिजित वंजारी,आ.विकास ठाकरे यांच्यासह विशेषत्वाने ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी संपूर्ण जोर लावला.याशिवाय एकूण ३२ संघटनांचे समर्थन अडबाले यांना प्राप्त झाले होते.

कधी नव्हे ते या निवडणूकीत महाराष्ट्र इंग्रजी स्कुल ट्रस्टीज असोसिएशनने(मेस्टा) देखील उडी घेत इंग्रजी शाळांना आरटीईचा परतावा मिळावा,याकरिता जवाहर वसती गृहात आघाडीतर्फे आयोजित अडबाले यांच्या प्रचारसभेत अडबाले यांना समर्थन जाहीर केले होते.नागपूर जिल्ह्यात ४०० शाळा या मेस्टाशी जुळलेल्या असल्याने इंग्रजी शाळेतील शिक्षकांच्या मतदानाचा कौल ही ‘पारंपारिक’ गणिते बिघडवू शकणारा ठरु शकतो,असे बोलल्या जात आहे.

या निवडणूकीत सर्वात कळीचा ठरला तो ’जुनी पेंशन’चा मुद्दा.२००५ पासून काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षकांना जुनी पेंशन योजना बंद करण्यात आली होती.वारंवार मागणी करुन देखील ना काँग्रेस ना भाजपच्या सरकारने शिक्षकांची ही मागणी मान्य केली.उलट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागो गाणारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ’जुनी पेंशन लागू करणार नसल्याचे‘विधान करुन शिक्षकांमध्ये रोष निर्माण केला .जुनी पेंशन लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर बारा लाख कोटींचा बोजा पडेल असे सांगून ‘तरीही ही पेंशन लागू करण्याची ‘धमक’ फक्त आमच्या सरकारमध्ये आहे‘असे आमिष ही शिक्षकांना दाखवले.

फडणवीस यांच्या या विधानाचा परिणाम काय झाला?याचाही निकाल येत्या २ फेब्रुवरी रोजी मत मोजणीच्या दिवशी लागणार असल्याचे बोलल्या जात आहे.

अडबाले यांच्या मागे सुनील केदार हे पदवीधर निवडणूकीप्रमाणे उघडपणे समोर आले.त्यांच्या सावनेर मतदार संघातच शिक्षकांची साढे तीन हजारपेक्षा जास्त मते होती तर अडबाले यांनी गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर जिल्हयात प्रचारात बरीच आघाडी घेतली होती.चंद्रपूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध आघाडी अशी लढत झाली नसून आघाडीविरुद्ध आप अशी लढत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.याचा ही सोक्षमोक्ष २ फेब्रुवरी रोजी होऊ शकेल.

विशेष म्हणजे आपच्या उमेदवाराने जय-पराजयापेक्षा एकूण किती मते खेचली?यावर या पक्षाचे भवितव्य येत्या पुढील निवडणूकींवर परिणामकारक ठरणार आहेत.

याशिवाय झाडे की अडबाले?कोणाला समर्थन द्यायचे या विवंचनेत बराच काळ लोटल्यानंतर अडबाले यांना आघाडीचे समर्थन जरी जाहीर करण्यात आले असले तरी झाडे यांनी आपली उमेदवारी कायम राखत निवडणूकीत रंगत भरली.या मत विभाजनाचा फायदा निश्‍चितच भाजपला होणार असून आशिष देशमुख यांनी झाडे यांच्या मागे आपले बळ उभे केले होते तर नागपूर विभागातील संभाजी ब्रिगेडने अडबाले यांना समर्थन दिले आहे.

गाणार यांची स्वच्छ प्रतिमा,र्निव्याज मत,साधी राहणी व शिक्षकांच्या प्रश्‍नांवर विधी मंडळात घेण्यात येत असलेली ठोस भूमिका या जमेच्या जरी बाजू असल्या तरी या वेळी मागील दोन निवडणूकांप्रमाणे त्यांना भाजपकडूनच संपूर्ण पाठबळ मिळाले नसल्याची देखील चर्चा आहे.भाजपकडून अनेकांना विधान परिषदेत जाण्याची या वेळी अपेक्षा होती मात्र घेतलेल्या सर्वेक्षणातून भाजपने अट्टहासाने आपला उमेदवार उभा केल्यास त्याचे देखील ‘पदवीधर’होईल,हे स्पष्ट झाल्याने भाजपने गाणार यांनाच पुन्हा पाठींबा जाहीर केला.

मात्र,यामुळे अनेकांची नाराजी लपून राहीलेली नाही.याचा ही विजयाच्या दावेदारीवर परिणाम होऊ शकेल.याशिवाय गेल्या दोन टर्ममध्ये गाणार यांना संधी देऊनसुद्धा शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा यक्ष प्रश्‍न ‘जुनी पेंशन’या मुद्दावर गाणारांना विधी मंडळात काही ठोस करता न आल्याची उघड नाराजी देखील आज पार पडलेल्या मतदानात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गाणार यांनी जरी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या डोक्यावर ‘एकच मिशन जुनी पेंशन’ही टोपी परिधान करुन उमेदवारी अर्ज भरला असला तरी ‘जुनी पेंशन’ हा एकच कळीचा मुद्दा अडबाले हॅक करण्यात यशस्वी झाले असल्याची चर्चा आहे.

आघाडीचे उमेदवार अडबाले यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थितही बरेच काही अधोरेखित करणारी ठरली.त्याच वेळी अडबाले यांच्यासाठी बबनराव तायवाडे,आ.केदार,आ.अभिजित वंजारी,काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे,किशोर गजभिये यासारख्या मातब्बर नेत्यांच्या बैठकांचा दौर सुरुच होता.याचा ही फायदा त्यांना मतदानात होताना दिसून पडू शकतो.

आज पार पडलेल्या मतदानात बरेच फॅक्टर धक्कादायक ठरणार आहेत.सीबीएससीच्या शिक्षकांनी केंद्रीयस्तरावरील ‘पारंपारिक’मतदान केल्याचीही चर्चा आहे तर विनाअनुदानित खासगी इंग्रजी शाळेतील अनेक शिक्षकवृंद अतिशय संभ्रमित मनोवस्थेत मतदानाचा सोपस्कार पार पाडताना दिसले.‘सत्ताधीश’ने त्यांना बोलते केले असता जुनी पेंशन किवा सरकारी अनुदान हे आमच्या खासगी शिक्षकांसाठी गैरलागू मुद्दे असल्याचे ते म्हणाले.मात्र,शिक्षक हा समाजाला सुशिक्षीत करण्याचे कर्तव्य पार पाडत असतो,याशिवाय आपल्याच मुलांना मतदानाचे महत्व समजावे हा आदर्श देण्यासाठीच मतदानासाठी आलो असल्याचे अनेकांचे मत होते.

उमेदवारांविषयी विचारले असता उमेदवार कोण-कोण आहेत हे देखील माहिती नसून फक्त एक दोन राजकीय पक्षांची माहिती असल्याचे ते सांगतात.एका महिला मतदाराने तर महिला असल्यानेच एक महिला उमेदवाराला मत दिले असल्याचे सांगितले!पदवीधरमध्ये देखील मतदानाचे हक्क बजावले आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत देखील लोकशाहीतून मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करण्यासाठी आलो असल्याचे सांगून अनेक शिक्षक मोकळे झालेत!

याशिवाय पहील्यांदाच मतदान करणारे शिक्षक मतदारांचा उत्साह देखील काही वेगळाच होता.शिक्षकांना सार्वजनिक सुटी जाहीर झाली असल्याने व शिक्षक हा समाजातील एक आदर्शवत घटक असल्यानेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत दरवेळी ८० टक्क्यांच्या पल्ल्लयाड मतदान होत असल्याचे सांगितले जात आहे.

आजच्या मतदानाचे वैशिष्ठ म्हणजे उमेदवारांनी ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.अनेक मतदारसंघात उमेदवार हे आजुबाजुलाच असल्याचे दिसून पडलेत.फक्त सकाळच्या वेळी मोहता सायंस मतदान केंद्रात अडबाले हे गळ्यात संघटनेचा दुपट्टा घालून आल्याने भाजपच्या कार्यकर्त्याने यावर तीव्र आक्षेप नोंदवला.

(छायाचित्र:मोहता सायंस समोरील अडबाले यांचे बूथ)

मोहता सांयस समोर गाणार,डबाले,झाडे तसेच आपचे वानखेडे यांचे बूथ लावण्यात आले होते.आप ने सर्वात आधी सकाळी आपला बूथ २०० मीटर अंतरावर लावला असताना देखील पोलिसांनी त्यांना आणखी चौकापर्यंत हूसकावून लावले!परिणामी बूथ मधील महिलांनी चौकातच काही काळ खूर्च्या लावल्या.यानंतर पुन्हा त्यांना निर्धारित पॅण्डोलमध्ये बसण्याची मुभा पोलिसांनी दिली.दूसरीकडे गाणार,अडबाले व झाडे यांचे बूथ मात्र अगदी मोहता सायंसच्या मुख्य फाटकासमोर १०० मीटरच्या अंतरावर होते,त्यांना मात्र संपूर्ण मुभा देण्यात आल्याची नाराजी आप च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

(छायाचित्र:मोहता सायंस समोरील नागो गाणार यांचा बूथ)

प्रशासनाचे ढिम्म नियोजन-
निवडणूकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करणा-या प्रशासनाची पोल आज अनेक केंद्रातील ढिसाळ नियोजनातून चांगली उघड पडली.बिंझाणीमध्ये शिक्षकांना तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागल्याने अनेक शिक्षक हे परत गेलेत.गिट्टी खदान येथील केंद्रावर शिक्षकांची तौबा गर्दी बघून जवळपास ७५ शिक्षक रांगेतून निघून परत गेल्याची माहिती आहे.एकीकडे मनपा मुख्यालयासारख्या एखाद्या बूथवर फक्त २७० मतदार होते तर एखाद्या बूथवर तब्बल १४०० मतदारांची नावे टाकण्यात आली होती.

(छायाचित्र:मोहता सायंस समोरील शिक्षक भारती यांचा बूथ)

एवढंच नव्हे तर अनेक केंद्रांवर अतिशय हळूवार मतदान सुरु होते,तासनतास रांगच पुढे सरकत नसल्याची ओरड अनेक केंद्रांवर शिक्षकांनी केली व प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनेवर ताशेरे ओढले.मनपा मुख्यालयात एका महिला शिक्षक मतदाराने मोबाईलमध्ये आधार व पॅन कार्ड दाखवला,जो बूथवरील अधिका-यांने अमान्य केला.या खोलीच्या बाहेर बूथवर बसलेल्या महिलेने या महिला मतदाराला मोबाईलवरुन प्रिंट काढून आणल्यास मतदान करता येईल,असा उरफाटा सल्ला दिल्याने मानकापूर मधून आलेल्या या महिला शिक्षक मतदाराला मोठा दिलासा मिळाला.

एका ओळखीच्या माध्यमातून त्यांनी लगेच मनपाच्या समिती विभागातून मोबाईलमधील आधार व पॅनकार्डची झेरॉक्स मिळवली.मात्र,मतदान करण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर हे झेरॉक्स अमान्य करण्यात आले,त्यावेळी मतदानाची वेळ संपण्यासाठी फक्त १२ मिनिटांचा अवधी शिल्लक होता.

(छायाचित्र:मोहता सायंस समोरील आपचे देवेंद्र वानखेडे यांचा बूथ)

यावर या महिला शिक्ष्केने आपल्या मुलाला फोन करुन शाळेतील तिची नेहमीची दुसरी मोठी बॅग घरुन आणण्यास सांगितले.वा-याच्या वेगाने त्या मुलाने आपल्या आईला घरुन ती बॅग आणून दिली.बूथ अधिका-याने सांगितले की वेळ संपण्यापूर्वी त्या परिसरात आत आल्या असल्याने कितीही उशिर झाला तरी त्यांना मतदानाचा हक्क बजावू देण्यात येईल, या महिला मतदाराच्या शाळेतील मुख्याध्यापक यांचा आदेश असल्याने सर्व शिक्षकांना मतदान केल्याचे चिन्ह फोटोसह शाळेच्या व्हॉट्स ॲप ग्रूपमध्ये टाकणे बंधनकारक असल्याने व इतर सर्वांनी ते टाकले असल्याने काही काळ या महिला मतदार अक्षरश: भांबावून केल्या होत्या.असाच घोळ याच मनपा केंद्रावर दुस-या महिला मतदारासोबत देखील ओरिजनल आधार कार्डबाबत घडला.

(छायाचित्र:मनपा मुख्यालयातील मतदान केंद्रातील दारासमोर भांबावलेल्या महिला शिक्षक मतदार)

थोडक्यात सर्वच उमेदवारांनी आजच्या मतदानाचा कौल हा आपापल्या विजयासाठीचा असल्याचा दावा केला असला तरी २ फेब्रुवरी रोजी खरंच ‘परिवर्तन’घडतं का?आमदार मोहन मतेंचीच ‘मते’विभाजली जातील का?अडबाले हे गेम चेंजर ठरतील का?झाडे आणि आपचे देवेंद्र वानखेडे किती मते खेचू शकलेत?वंचित व बसपमध्ये किती आंबेडकरी मतांचे विभाजन झाले?वाढलेल्या मतांची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार?आघाडीच्या ‘नियोजनातून’ या ही निवडणूकीत पदवीधराची ‘पुनरावृत्ती ’होणार का?राष्ट्रवादीचे बंडखोर सतीश इटकेलवार किती मतांना सुरंग लावण्यात यशस्वी ठरलेत?किंबहूना सर्व ‘जर-तर’ वर मात करुन गाणार यांचा पुन्हा एकदा निर्धोक विजय सुनिश्‍चित होणार ?या सर्वांची उत्तरे मिळवण्याकडे आता शिक्षक मतदारांसोबतच नागपूर जिल्ह्यातील समस्त जनतेचे लक्ष लागले आहे.

 

Latest बातम्या