Homeनागपूर न्यूजचौथ्या स्तंभातील ‘ते’बातमीस्थळी न जाताच भाजप आमदाराच्या बाजूने प्रसूत केली बातमी!

चौथ्या स्तंभातील ‘ते’बातमीस्थळी न जाताच भाजप आमदाराच्या बाजूने प्रसूत केली बातमी!

नागपूरातील त्या ‘चार’ चौघांविषयी पत्रकार जगतात तीव्र संताप

नागपूर,ता.१६ ऑक्टोबर २०२३: माणूस म्हणून जन्माला आल्यावर त्याच्या अंगी षड्रिपू असणे (काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर)नैसर्गिक मानले जाते मात्र, संस्कारातून,आचरणातून आणि नीतीमत्तेतून यावर मात करुन ‘माणूस’म्हणून जगणे हे कोणत्याही धर्मशास्त्राला अपेक्षीत असून, या विकारावर मात न केल्यास याला मानस रोग समजल्या जातं.लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणा-या पत्रकारितेच्या पवित्र व्यवसायात तर ‘लोभ’ हे फक्त पत्रकाराच्या वैयक्तिक प्रतिष्ठेलाच तडा देत नाही तर,समाजाच्या अस्तित्वारच कुठाराघात करणारे ठरते.गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ‘झेंडेपार’ येथे प्रस्तावित लोहखाणीच्या ठिकाणी नागपूरातील चार लोकशाहीचे ‘स्तंभ’ यांनी भेट न देताच त्यांच्या वृत्त वाहीन्यांवर गावक-यांच्या वतीने सहमती,या लोहखाणीतून मिळणारा रोजगार,विकास इत्यादीची बातमी ठोकून दिली.परिणामी स्थानिक गावक-यांनी या मराठी वृत्तवाहीन्यांवर समाज माध्यमावर ‘विशेष’रोष व्यक्त केल्याची घटना समोर आली आहे.

याच महिन्यातील १० ऑक्टोबर रोजी प्रदुषण महामंडळाच्या प्रस्तावित जनसुनावणीला स्थानिक गावक-यांनी प्रचंड विरोध केला होता.हा विरोध मोडून काढण्यासाठी नागपूरातील भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि जिल्ह्यातील त्यांचे नेते व कार्यकर्तेकरवी, कोरची तालुक्यात प्रशासनाच्या मदतीने लोहखाणीला विरोध करणा-या गावक-यांविरुद्ध दबावतंत्राचा वापर करण्यात अाल्याची घटना घडली.यात नागपूरातील मराठी वृत्त वाहीन्यातील ‘चार’ पाकिटधारी बुमधारी व कॅमरामनने या नेत्याच्या घरीच बसून या लोहखाणीच्या समर्थनार्थ वृत्त मुंबईत पाठवले जे प्रसारित देखील झाले!

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या दक्ष्णेतील सूरजागड टेकडीवर लोहखनिजाचे उत्खनन सुरु आहे.या ठिकाणी देखील स्थानिक आदिवासी व ग्रामसभांचा खाणीला विरोध होता.मात्र,शिंदे-फडणवीस सरकारने कंपनी व प्रशसनाच्या मार्फत सर्व पर्याय वापरुन हा विरोध मोडून काढला.आज सूरजागडच्या प्रकल्पामुळे उधवस्थ झालेले ग्रामस्थ,प्रदुषण व पर्यावरणाची निर्माण झालेली भीषण समस्या,जेसीबी तसेच जड वाहनांमुळे चिरडल्या जाणारे स्थानिक,रस्त्यांची झालेली चाळण,चंद्राएवढे खड्डे,शेतीची उधवस्ता ही वर्णन करण्यासारखी राहीली नसून, सूरजागडचा प्रश्‍न काँग्रेसच्या आमदारांनी नागपूरातील अधिवेशनात देखील मागील वर्षी लाऊन धरला होता.

असे असताना आता उत्तरेकडील कोरची तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर लोहखनिज उत्खननासाठी प्रदुषण महामंडळाने १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणीचा फास घातला होता.या सुनावणीला स्थानिक आदिवासींनी पराकोटीचा विरोध केला.या खाणीसाठी या पूर्वीही तीनवेळा जनसुनावणी घेण्यात आली.परंतु,ग्रामसभांचा विरोध बघता सुनावणी रद्द करण्यात आली होती त्यामुळे या वेळेस जनसुनावणी यशस्वी करण्यासाठी नागपूरातील भाजपचा एक नेता व त्याचे कार्यकर्ते गावात ठाण मांडून बसले होते.

इतकंच नव्हे तर त्या पक्षातील स्थानिक नेत्यांना सोबतीला घेत स्थानिक आदिवासींसाठी ‘लक्ष्मीदर्शनाचा’पर्याय देखील खुला ठेवण्यात आला होता. प्रसंगी गरज पडल्यास दबावतंत्राचा वापर देखील केला जात आहे.यामुळे स्थानिक आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात रोष असताना देखील, नागपूरातील हे चार लोकशाहीचे स्तंभ यांनी नेत्याच्या घरी बसूनच खोटे वृत्त प्रसारित केले.या लोहखाणीतून जिल्ह्याचा विकास कसा होणार आहे,यावर बातम्या प्रसारित केल्या!

त्या जिल्ह्याशी काहीही संबंध नसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ’खास’समजल्या जाणा-या भाजपच्या या नेत्याने ग्रामसभांना कायद्याचे संरक्षण असताना देखील सत्तेच्या बळावर त्या जिल्ह्यात चक्क घुसखोरी केली.यासाठी नागपूरातील चार मराठी वृत्त वाहीन्यांच्या बुमधारी व कॅमरामनला सोबत नेले.या चार ही माध्यमकर्मींनी पाकिटाच्या लोभापायी स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या ना केवळ विश्‍वासाची विटंबना केली,तर पत्रकारितेच्या क्षेत्रालाही काळीमा फासण्याचे काम केले,असा संताप आता समाज माध्यमांवर उमटला आहे.

येथील अब्जावधी किमतीच्या खनिजावर डोळा ठेऊन भाजपच्या या नेत्याच्या कृतीतून,पर्यावरण व स्थानिकांच्या जीवनावर होणा-या दुष्परिणामांची सत्य मांडणी करण्यासाठीची, माध्यमकर्मी म्हणून बांधिलकी असताना,या पवित्र क्षेत्रालाच काही हजार किवा लाख रुपयांच्या लोभाला बळी पडून, कलंकित करण्याचे जे ’कृत्य’या चेह-याने ‘सालस’दिसणा-या या चारही माध्यमकर्मींनी केली,त्याविषयी नागपूरातील प्रामाणिक पत्रकारांमध्ये पराकोटीची चीड निर्माण झाली आहे.

काेरची तालुका हा संविधानाच्या कलम २४४ (१) व ५ व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असल्याचा दावा सर्वपक्षीय लोहखाण विरोधी समितीने केला आहे.वनहक्क कायदा २००६ चे नियम, २००८ चा सुधारित नियम व २०१२ नुसार ग्रामसभांना सामूहिक वनहक्क मान्यता देण्यात आली आहे.अश्‍या स्थितीत ग्रामसभांच्या परवानगीशिवाय लोहखाणींना परवानगी देऊन उत्खनानाचा घाट घातला जात आहे.यामुळे,जल,जंगल व जमीन धोक्यात येणार असून, आदिवासी बांधवांच्या पारंपारिक संस्कृती,धार्मिक ठिकाण व नैसर्गिक संसाधनाला फार मोठा धोका निर्माण होणार आहे.

असे असताना बातमीस्थळी न जाता स्थानिक नेत्याच्या घरात बसून नेत्याला फायदा पोहोचेल अशी बातमी प्रसारित करण्याचे कृत्य, हे अक्षम्य असून नागपूरातील या चारही माध्यमकर्मींच्या विरोधात चांगलाच रोष उमटला आहे.

आपल्या या क्षणिक लोभातून किवा वैयक्तिक स्वार्थातून आपण एका संपूर्ण समाजाचे,अनेक गावांचे व पर्यायाने कधीही न भरुन निघणा-या पर्यावरणाचे नुकसान करीत असल्याची थोडीशी देखील जाणीव या ‘महालोभी’माध्यमकर्मींना झाली नाही.पाकिट घेऊन जनभावनेचा खोटा आवाज त्यांनी मुंबईत आपापल्या कार्यालयाला पोहोचवला.नागपूरातील नेत्यासोबत कोरची वारी करुन, तेथील स्थानिक नेत्याच्या घरी सकाळ पासून बसणा-यांनी कितीची जाड पाकिटे घेतली,याची ऑडीयो क्लिप या चार ही माध्यमकर्मींच्या आवाजासह चांगलीच व्हायरल झाली होती.मात्र,वरुन आलेल्या दबावातून नंतर ती ऑडियो क्लिप व त्या अनुषंगाने केलेली डिजिटल बातमीच डिलीट करण्यात आली,हे विशेष!

असे असले तरी पत्रकार व राजकीय नेत्यांमधील हा ‘परिणय’जास्त काळ टिकू शकणार नाही,असा दावा तेथील एका स्थानिक माध्यमकर्मीने खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.

Latest बातम्या