Homeनागपूर न्यूजगिरीश व्यास यांना तिकीट नाहीच:गडकरींचा सूचक इशारा

गिरीश व्यास यांना तिकीट नाहीच:गडकरींचा सूचक इशारा

Advertisements


आपण आता पिल्लर,ताकदीने पक्षाचा डोलारा सांभाळण्याचा सल्ला

स्वत: मात्र तिस-या टर्मसाठीही सज्जच! कार्यकर्तांमध्येच कुजबुज

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १२ नोव्हेंबर: विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांची विधान परिषदेतील आमदारकीची मुदत येत्या जानेवरी महिन्यात संपुष्टात येत आहे,२०१५ पासून त्यांनी स्थानिक स्वरज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे,१० डिसेंबर रोजी या जागेसाठी मतदान होणार असून या जागेसाठी पुन्हा भारतीय जनता पक्षातर्फे गिरीश व्यास यांच्या नावाचा विचार होणार नसल्याचा स्पष्ट इशारा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भट सभागृहात व्यास यांच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील कामांच्या प्रगती पर्व अहवाल पुस्तकाच्या विमोचनाप्रसंगी दिला.

आपण आता पायवा झालो असून,पायवाने आपल्या ताकदीने डोलारा सांभाळायला हवा असा अनाहूत सल्ला देखील गडकरींनी याप्रसंगी दिला,व्यास व मी एकाच वयाचे व एकाच कार्यकाळातील कार्यकर्ते असल्याचे त्यांनी सांगितले मात्र व्यास यांना निवृत्तीचा सल्ला देताना, स्वत:साठी मात्र त्यांनी तिस-या टर्ममधील खासदारकीची तिकीटाची अपेक्षा मागे एका कार्यक्रमात उघडपणे केली होती,अजनीवनाचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा लोकसभेची निवडणूक येण्यापूर्वी पूर्ण झालाच पाहिजे,मला मते मागायला जाताना हे विकास कामे नागपूरकर जनतेला दाखवायचे असल्याचे त्यांनी सांगितले होते,याचा अर्थ येत्या २०२४ ची लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनाच पुन्हा एकदा पक्ष खासदारकीची तिकीट देणार हे गडकरींनी गृहीतच धरले असताना त्यांनी,हाच नियम त्यांच्यावर लागू होत नाही का?अशी कुजबुज भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकू आली.

मी तुम्हाला निवृत्त होण्याचा सल्ला देत नाही पण नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मात्र जुन्या कार्यकर्त्यांना निवृत्त व्हावंच लागेल,असे ते म्हणाले.व्यास हे पुढे ही क्रियाशील राहून वैचारिकदृष्टया पक्षासाठी काम करत राहतील,असा अनाहूत सल्ला ही गडकरींनी दिला.

सत्तेच्या राजकारणाला मर्यादा असल्याचे सांगत व्यास हे निवृत्त होणार नाही कारण त्यांची प्रकृती उत्तम असल्याची पुष्टि ही त्यांनी जोडली.शेवटपर्यंत ते काम करत राहतील,त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला मिळत राहील असे ते म्हणाले.ज्याप्रमाणे भट सभागृहातील हे इंटेरियर अतिशय सुंदर आहे,आकर्षक आहे मात्र ही इमारत ज्या पिल्लरवर उभी आहे ते दिसण्याशी शक्यता नाही,असे असले तरी त्या पायवांनीच संपूर्ण इमारतीचा डोलारा सांभाळलेला असतो,आज अनेक जुने कार्यकर्ते गेलेत,त्यांना आयुष्यभर पक्षाकडून काहीच मिळाले नाही, अनंतराव ठवरे हे तर माझ्यापेक्षाही जास्त पक्षासाठी झटलेत तरी पण आनंदाने पक्षासाठी काम करत आहेत.

गिरीश व्यास हे देखील या पुढे दूधात साखरेप्रमाणे राहतील.भाजपची शक्ती वाढवण्यासाठी काम करत राहतील असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला.मी व गिरीश व्यास हे एकाच वयाचे असून एकाच कार्यकाळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी आम्ही काम केले आहे,संषर्घ केला आहे,आंदोलने केली,आणिबाणिच्या काळात कारागृहातही जाऊन आलो प्रसंगी मी तर इतरांनाही झोडपले,त्यांचा माझा इतिहास हा संघर्षाचाच आहे,आजचे कार्यकर्ते हे फक्त ‘सोनेरी इतिहासाचे साक्षीदार आहेत’असे सांगून शेवटच्या मालिकेतील शेवटचा माणूस आणि उत्तम कार्यकर्ता हा गिरीश व्यास होता,असे कौतूक गडकरींनी केले.

मात्र जो नियम आमदार म्हणून व्यास यांना गडकरी यांनी लागू केला तोच नियम खासदार म्हणून गडकरी यांच्यावर लागू होत नाही का?व्यास यांची प्रकृती उत्तम असल्याची ग्वाही गडकरी देतात तरीही त्यांना पुन्हा आमदारकीची संधी नाकारताना, हल्ली प्रामाणिकपणासोबत चातुर्याचीही गरज असल्याचे त्यांनी कबूल केले.व्यास हे विनम्र आणि सौज्वळ,संस्कारक्षम असल्याने हेच त्यांचे गूण,अवगूण ठरत आजच्या काळातील भाजप विचारधारेच्या चौकटीत फिट बसण्यास अयोग्य ठरलेत म्हणून त्यांना पुन्हा तिकिट देण्याचा विचार होत नसल्याचे गडकरींना सूचित करायचे होते का?असा प्रश्‍न ही चांगलाच चर्चिला गेला.

व्यास उत्कृष्ट नगरसेवक होते,नासुप्रमध्ये ही उत्तम काम केले.आमदार म्हणून ही व्यास यांनी विधान परिषदेत उत्कृष्ट काम केल्याची पावती गडकरींनी दिली तरीही अाता पक्षाला काम करणारे कार्यकर्ते किवा उमेदवार चालत नाहीत,तर वेगळी ‘अर्थपूर्ण’ वैशिष्ठे असणारे उमेदवार आता भाजपच्या विचारधारेत बसतात,आताच्या राजकारणात व्यास यांच्यासारख्या उमेदवाराचा प्रामाणिकपणा उपयोगी नाही असे सांगून नवीन काळातील चतुरता आणि जुन्या काळातील नम्रता याच्या जमीन असमाचा फरक असल्याचे गडकरी यांनी कोणत्या अर्थाने विशद केले?याचा अर्थ व्यास यांचे विनम्र व अर्थव्यवहारात पारदर्शक असणे हेच गूण आजच्या काळातील भाजपच्या लेखी ‘दूर्गूण’ ठरले असल्यानेच त्यांना पुन्हा आमदारकीची संधी नाकारली जात असल्याचा सूर ही कार्यकर्त्यांमध्ये उमटला.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणूकीत व्यास यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याची गरज आता पक्षाला नाही तर चातुर्य आणि ‘अर्थकारणात’चोख अश्‍या उमेदवारीची गरज पक्षाला असल्याचा सूतोवाच गडकरींनी केला असल्याची चांगलीच चर्चा रंगली.

आश्‍चर्याची बाब म्हणजे सहसा पक्षाच्या कार्यक्रमात अनुपस्थित असणारे माजी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा हे यावेळी व्यास यांच्या सोबत दिपप्रज्ज्वलनासाठी मंचावर सज्ज होते,या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती भाजपच्या धुरीणांच्या मनातील उमेदवार कोण असणार आहे या चर्चेला देखील वाचा फोडणारी ठरली.

Latest बातम्या