Homeनागपूर न्यूजगडकरीं ऐवजी काँग्रेसने मेट्रोच्या हजार कोटींच्या गैरव्यवहाराबाबत बोलावे

गडकरीं ऐवजी काँग्रेसने मेट्रोच्या हजार कोटींच्या गैरव्यवहाराबाबत बोलावे

प्रशांत पवार यांचे आव्हान

राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याचे मान्य नाही

आमचा कौल राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याकडे!

अनिल देशमुखांच्या घरी चहा घेतला:आमचा पक्ष वेगळा नाहीच:प्रशांत पवार यांचा दावा

आभा पांडे दर शुक्रवारी पक्ष कार्यालयात जाणून घेणार महिलांच्या समस्या

जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता शहरात फिरणार राष्ट्रवादीची तक्रार निवारण गाडी

१५ दिवसांत जनतेच्या समस्यांचे निवारण स्थानिक प्रशासकीय संस्थांनी करावे

नागपूर,ता.२६ ऑगस्ट २०२३: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयावर कॅगच्या अडीचशे कोटी रुपयांच्या ताशे-यांवर काँग्रेसचे नेते भरभरुन टिका करतात,एवढंच नव्हे तर येत्या १ सप्टेंबर पासून काँग्रेस पक्ष कॅगच्या या अहवालावर जनआंदोलन देखील करणार आहेत मात्र,महामेट्रोच्या जवळपास हजार कोटींच्या भ्रष्ट कारभारावरही कॅगने ताशेरे ओढले आहेत, त्याविरोधात काँग्रेस जनआंदोलन का करत नाही?असा सवाल राष्ट्रवादी पक्षाचे(अजित पवार गट)नवनियुक्त शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर,राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे,नवनियुक्त कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर,ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर,प्रदेश महासचिव व ओबीसी सेलचे नेते ईश्‍वर बाळबुधे,माजी नगरसेवक राजेश माटे,विद्यार्थी संघटनेचे नेते रवि पराते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रशांत पवार म्हणाले,की महामेट्रोच्या भ्रष्ट कारभारावर कॅगचा अहवाल तर गडकरी यांच्या खात्यावरील अहवालाच्या फार आधी आला आहे.कस्तुरचंद पार्क येथे महामेट्रोचे ५४ कोटींचे स्टेशन आणि २५ कोटींच्या पार्किंग यासारख्या अनेक खर्चांवर कॅगने आपल्या अहवालात अनेक गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहे.मात्र,तरी देखील काँग्रेसला महामेट्रोवरील कॅगचा अहवाल महत्वाचा वाटत नाही याचा अर्थ काँग्रेस देखील यात सहभागी आहे का?असा सवाल त्यांनी केला.एकमेव काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी प्रश्‍न उपस्थित केला मात्र काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते यावर गप्प आहेत,याचा अर्थ काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांना अडीचशे कोटी आणि हजार कोटींच्या भ्रष्टाचारातील ‘आकड्यां’मधील कोणता आकडा मोठा अाहे,हे कळत नाही का?असा खोचक टोला प्रशांत पवार यांनी याप्रसंगी काँग्रेस नेत्यांना लगावला.

आतापर्यंत ‘जय जवान जय किसान’संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली,याचे श्रेय माध्यमांनाच जातं कारण जनतेच्या प्रश्‍नांना घेऊन, संघटनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलो,भांडलो,आमच्यावर पोलिस केसेस देखील झाल्या,हा संपूर्ण संघर्ष माध्यमांनी जनतेपर्यंत पोहाचवला.या पुढे ही राष्ट्रवादी पक्षातर्फे जनतेच्या प्रश्‍नांसाठी जनआंदोलन केले जाईल.श्रीकांत शिवणकर यासारख्या युवा ब्रिगेडची नियुक्ती कार्याध्यक्ष म्हणून तर अनिल अहिरकर हे पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्त झाल्याने या दोघांच्याही अनुभवातून नागपूरच्या जनतेच्या समस्या कश्‍याप्रकारे सोडवता येईल,यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

मनपाचा दांडगा अनुभव असणा-या आभा पांडे,पक्षाचे शहरात नेतृत्व करणारे अनिल अहिरकर,श्रीकांत शिवणकर,ओबीसींच्या समस्यांची चांगली जाणीव असणारे ईश्‍वर बाळबुधे,उत्तर नागपूरच्या समस्यांची चांगली जाण असणारे माजी नगरसेवक राजेश माटे,आमची संपूर्ण चमू खांद्याला खांदा लाऊन पक्षाचे कार्य करणार.नागपूर शहरात राष्ट्रवादी कशी वाढेल,यासाठी प्रयत्न करु,असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्षाचे दोन पक्ष किवा दोन गट झाले असल्याचे आम्ही मानायला तयार नाही.राष्ट्रवादीचा कोणताही दूसरा पक्ष किवा दूसरा गट नाही.राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व अजित पवार तसेच विदर्भाचे माजी मंत्री प्रफूल्ल पटेल करीत आहेत.पक्षाचे नाव,चिन्ह हे राष्ट्रवादीकडेच असल्याचे ते म्हणाले.

आमचा संपूर्ण प्रयत्न संघटन बांधणीवर असणार आहे.याच दृष्टिने आज आम्ही पूर्व विदर्भाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत अगरवाल तर दक्ष्ण नागपूरचे अध्यक्ष म्हणून अरविंद भाजीपाले या फायरब्रॅण्ड तरुण नेत्यांची नियुक्ती केली असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.येत्या आठ दिवसात चार ही विभागाच्या अध्यक्षांची नेमणूक करणार असून यंग ब्रिगेड तसेच महिलांना यात संधी देणार असल्याचे ते म्हणाले.

आठवड्यातील दर शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे या पक्ष कार्यालयात दुपारी १ ते २.३० पर्यंत आपला वेळ देणार असून मोठ्या प्रमाणात महिलांनी आपल्या समस्या,तक्रारी आभा पांडे यांच्याकडे मांडण्याचे आवाहन यावेळी प्रशांत पवार यांनी केले.

नागपूर सुधार प्रन्यास,नागपूर महानगरपालिका तसेच एनएमआरडीए यावर निशाना साधताना एनएमआरडीएने आता अनाधिकृत बांधकामांना परवानगी देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ वाढवली असल्याचे ते म्हणाले.मूळात शहरात अनाधिकृत बांधकाम होत असताना या संस्थांचे अधिकारी नेमके काय करतात?अनाधिकृत बांधकाम करणा-यांची यात काय चूक असते?असा सवाल करीत, अश्‍या बांधकामांना वेळ देण्याचा प्रश्‍नच उद् भवत नसल्याचे ते म्हणाले.हा संपूर्ण कारभार ओपन व्हायला पाहिजे.आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,असा इशारा देत,एनएमआरडीएने ५६ रुपये विकास शुल्क आकारला आहे.कळमेश्‍वर,बुटीबोरीसारख्या भागात विकास शुल्क ७ रुपये असताना नागपूरमध्ये ५६ रुपये कोणत्या निकषाने आकारल्या जात आहे?असा सवाल त्यांनी केला.

नागपूरात तर आधीच संपूर्ण विकास झाला आहे.मग ५६ रुपये विकास शुल्काचे कोट्यावधी रुपये या संस्था खर्च कुठे करणार आहेत?असा सवाल त्यांनी केला.झिंगाबाई टाकली सारख्या भागात पूर्वी शेती होती तेव्हा तश्‍या भागांचा विकास करण्यासाठी इतके जास्त विकास शुल्क मान्य होते आता मात्र २ हजार फूटांच्या प्लाॅटसाठी ग्राहकांकडून लाख रुपये घेतले जात आहेत,शहरात नाले,सिमेंट कॉक्रिंटचे रस्ते,वीजेचे खांब सगळंच लागलं असताना एवढा विकास शुल्क एनएमआरडीएला हवा कशाला?मागच्यावेळी देखील नागपूरकरांकडून भरमसाठ विकास शुल्क आकारुन तो पैसा विकासा ऐवजी दुसरीकडे वळते करण्यात आले,असा आरोप यावेळी प्रशांत पवार यांनी केला.फक्त एनएमआरडीए किवा नासुप्रच नव्हे तर आभा पांडे यांच्यासोबत मिळून मनपातील गैरव्यवहार देखील बाहेर काढणार,असा इशारा त्यांनी दिला.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात,महामेट्रो व कोल वॉशरीजचा विषय बंद झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोल वॉशरीजमधील गैरप्रकार याबाबतीत अनेकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर प्रत्यक्ष आरोप केले आहे,आता मात्र सत्तेत त्यांच्याचसोबत सहभागी झाले असल्याने व मित्र पक्ष झाल्याने भ्रष्टाचारावर बोलणार का?असा प्रश्‍न विचारला असता,मी बावणकुळे यांच्या सहभागीतेविषयी कधीही बोललो नसल्याचे प्रशांत पवार म्हणाले मात्र,आम्ही जनतेची लृटमार होऊ देणार नाही,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात, आम्ही सरकारच्या नावाने कधीही ‘बोंबा’मारल्या नाही आमचा लढा प्रशासनाच्या भ्रष्टाचारविरुद्ध होता व पुढे ही चालत राहील,असे ते म्हणाले.

शरद पवार हे आजही राष्ट्रवादीवर स्वत:चा दावा सांगत आहेत मग पक्ष तुमचा कसा?असा प्रश्‍न विचारला असता,४० आमदार,खासदार,विभाग,तालुका अध्यक्ष हे सगळे अजित पवार यांच्यासोबत असून येत्या ३० तारखेला फायनल ऑर्डर येणार असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

शरद पवार यांनी त्यांचे छायाचित्र फूटीर गटातील नेत्यांनी वापरु नये असे सांगून देखील शरद पवार यांचे छायाचित्र का लावता?यावर,शरद पवार आमचे दैवत असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.दैवत जर छायाचित्र लाऊ नका,असे सांगतात तर आपल्या दैवताचे ऐकत का नाही?असे विचारले असता,देव कधी आदेश देतो का आमचे छायाचित्र लाऊ नका म्हणून?असा प्रतिप्रश्‍न प्रशांत पवार यांनी केला.

काँग्रेस ही नेहमी मोदी यांनी उल्लेख केलेल्या राष्ट्रवादीच्या संदर्भातील ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत असते मात्र, ज्या दिल्लीत आम आदमी पक्षाला काँग्रेस पक्ष सर्वाधिक भ्रष्ट ठरवते त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लाऊन काँग्रेस बसली,यावर काँग्रेसकडे काय उत्तर आहे?असा सवाल ही यावेळी प्रशांत पवार यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात केला.

मुख्यमंत्री पदावर तर काँग्रेसच्या दोन उमेदवारांचा डोळा आहे,विदर्भातील दोन जिल्ह्यातच स्पर्धा सुरु आहे,असा उल्लेख नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता प्रशांत पवार यांनी केला.तुमचा कौल कोणाला आहे?असा प्रश्‍न केला असता,आमचा कौल राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याकडे असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

आभा पांडे व प्रशांत पवार यांना माजी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी प्रयत्नपूर्वक राष्ट्रवादीत आणले,यासाठी अनिल देशमुख यांना आग्रही करण्यात अहिरकर यांची महत्वाची भूमिका होती.आभा पांडे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अनिल देशमुख करोनामुळे रुग्णालयात होते तरी देखील त्यांनी रुग्णालयातून आभा पांडे यांच्यासाठी शुभेच्छा संदेश प्रसारित केला.प्रशांत पवार यांना पक्षात घेण्यासाठी प्रफूल्ल पटेल आग्रही होते.आता अनिल देशमुख हे शरद पवार यांच्यासोबत आहेत,अश्‍यावेळी अनिल देशमुख यांच्याप्रति नवनियुक्तीनंतर काय भूमिका आहे?असा प्रश्‍न केला असता,दहा दिवसांपूर्वीच आम्ही अनिल देशमुख यांच्या घरी चहा पिऊन आलो आहोत,असे प्रशांत पवार यांनी सांगितले.आम्ही संकटकालीन दरवाजा ठेवला आहे,असे कोड्यात टाकणारे उत्तर यावेळी प्रशांत पवार यांनी दिले.

नागपूरात राष्ट्रवादीचा सर्वाधिक लढा हा भाजपसोबत राहीला आहे,आता सत्ताधारी म्हणून भाजपविरोधात आंदोलन कसे करणार?यावर, आमचा लढा हा भाजपविरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.यावर, एकाच वेळी सत्ताधारी व विरोधकाची भूमिका नागपूरात राष्ट्रवादी बजावणार का?यावर बोलताना,वरिष्ठांचे आदेश आहेत जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढा,तीच आमची भूमिका असल्याचे प्रशांत पवार म्हणाले.

नुकतेच अजित पवार यांनी पुणे मेट्रोच्या संदर्भात स्थानिकांना रोजगार देण्याचे मेट्रो अधिका-यांना ठणकावले.पूर्वी त्यांना मेट्रोमध्येही बिंदू नामावली आहे हे माहिती नव्हते,आम्ही संपूर्ण कागदपत्रे त्यांना दाखवली,यानंतर मेट्रोने ओबीसी तसेच स्थानिकांच्या रोजगाराबाबत दक्षता घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोला दिले असल्याचे उदाहरण प्रशांत पवार यांनी सांगितले.आम्ही मनपा व नासुप्र मधील भ्रष्टाचार देखील त्यांना सांगू,पूर्वी रेल्वेतील अधिकारी महामेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक होते,आता एक आयएएस अधिकारी या पदावर असल्याने त्यांना बिंदू नामावली कळते,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

उपराजधानी नागपूर हे शहर गडकरी व फडणवीस यांचे शहर म्हणून ओळखले जाते,या शहरात राष्ट्रवादीला किती संधी आहे?मूळात ज्या प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी वारंवार आंदोलनाचा इशारा देते,त्या प्रशासनात भाजपच्या अनेक राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाशिवाय भ्रष्टाचार होत नाही,अशा वेळी राष्ट्रवादी, भाजपच्याच विरोधात लढण्यासाठी सज्ज होईल का?असा प्रश्‍न केला असता,फक्त सांगा कोणत्या भाजपचा नेत्यांचा प्रशासनाला आर्शिवाद आहे,मग भूमिका ठरवू,असे प्रशांत पवार म्हणाले.यावर पत्रकारांचे काम नाही हे शोधण्याचे असा पवित्रा उपस्थित पत्रकारांनी घेतला.

……………………………………………..

Latest बातम्या