Homeनागपूर न्यूजकळमना बाजार समितीत ‘परिवर्तन’घडलेच नाही

कळमना बाजार समितीत ‘परिवर्तन’घडलेच नाही

Advertisements

केदार अभिषिक्त विजेते: संपूर्ण केदार पॅनल विजयी

भाजप समर्थकांची तीव्र नाराजी:आमदारांनी जीव ओतलाच नाही!

नागपूर,ता. २४ ऑक्टोबर:आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील १८ जागांसाठी काल शनिवारी निवडणूक पार पडली तर आज रविवार दि. २४ ऑक्टोबर रोजी मजमोजणी झाली,यात भाजप समर्थित ‘परिवर्तन’पॅनलचा पार धुव्वा उडाला असून पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार पुन्हा एकदा अभिषिक्त विजेते ठरले. त्यांच्या ‘सहकार‘पॅनलेने पुन्हा एकदा संपूर्ण १८ जागांवर विजय मिळवला.

यावेळी बाजार समितीत ‘परिवर्तन‘निश्‍चित घडून येईल अशी भाजप समर्थकांना आशा होती.काल पार पडलेल्या मतदानापूर्वीपासूनच यावेळी सहकार पॅनलच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मतदान होईल,अशी अपेक्षा भाजप समर्थकांनी बाळगली होती मात्र प्रत्यक्षात कोणतेही ‘परिवर्तन’घडले नाही व संपूर्ण १८ जागांवर केदार समर्थित सहकार पॅनल पुन्हा एकदा निवडून आले.

भाजप पहील्यांदाज कळमना बाजार समितीच्या निवडणूक अखाड्यात उतरली,यासाठी माजी उर्जामंत्री तसेच प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावणकुळे यांनीही ‘परिवर्तन’घडवून आनण्यासाठी संपूर्ण जोर लावला मात्र भाजपचे आमदार टेकचंद सावरकर व समीर मेघे यांनी ही निवडणूक मनापासून लढलीच नाही,अशी नाराजी भाजप समर्थकांनी व्यक्त केली.

याशिवाय बावणकुळे यांनी एका अविश्‍वासू आमदारावर पूर्ण विश्‍वास टाकल्याची ‘अविश्‍वासार्ह्य कृती’ही देखील केदार यांच्याच पथ्यावर पडली असल्याची चर्चा निकालानंतर ऐकू आली.भाजपने मात्र निवडणूकीत प्रस्थापित पॅनलला चांगली टक्कर दिली,पहील्यांदा या निवडणूकीत उतरले असताना थोडे आणखी ‘एकदिलाने’लढले असते व ही निवडणूक थोडी तरी ‘गांर्भीयाने’मनावर घेतली असती तर फक्त ४०-५० मतांच्या फरकाने असा पराभव परिवर्तन पॅनलच्या नशीबी आला नसता,अशी हताशाही व्यक्त झाली.

या निवडणूकीचा संपूर्ण निकाल हा परंपरेप्रमाणे ‘लक्ष्मी दर्शनावर’अवलंबून राहीला,निवडणूक ही जरी बाजार समितीची होती तरी कोट्यावधींचे ‘व्यवहार’निवडणूकीत झाले असल्याची चर्चा आहे.‘सत्ता जाऊ देणार नाही’ही जिद्द केदारांनी मनाशी बाळगली होती तर साढे पाचशेच्या जवळपास झालेल्या मतदानात परिवर्तन पॅनलला विजयी होणारी मते मात्र मिळू शकली नाही.

ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समित्यांपर्यंत भाजप समर्थित पॅनलला पोहोचण्यासाठी अद्याप बराच घाम गाळावा लागणार आहे,हे या निवडणूकीने सिद्ध केले.पहीलीच निवडणूक असल्याने अनुभव ही कमी पडला असा कबुली जवाब ही भाजप समर्थक देत आहेत.त्यात ज्यांनी या निवडणूकीत भाजपलाच सहकार्य करणार असा शब्द दिला त्यांच्याकडूनच ‘धोका’ही मिळाल्याने या पुढे बे-भरवश्‍याच्या व्यक्तीवर विश्‍वास न करण्याचा ‘संकल्प’ही भाजप समर्थकांकडून करण्यात आला.

आजपर्यंत बाजार समितीवर केदार यांच्याच समर्थकांचे वर्चस्व राहिले आहे.भाजपच्या वतीने बाजर समितीतील अनंत घोटाळे व अव्यवस्था उजागर करण्यात आली मात्र या प्रचाराचा उपयोग मतदानात परिवर्तीत करण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरली.ग्रामीण भाग तसेच हमालांमधील केदारांचे वर्चस्व या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतरही कायम राहील्याचे या निवडणूकीने सिद्ध केले.

कळमना बाजार समितीच्या निवडणूकीत व्यापारी मतदारसंघातील २ जागांसाठी ८ उमेदार रिंगणात होते.हमाल मतदारसंघात १ जागा असून २ उमेदवार तर सेवा सहकारी संस्थंमधील ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते.७ जागांमध्ये महिलांसाठी १,ओबीसींसाठी १,भटक्या विमुक्तांसाठी १ जागा राखीव होती.

ग्रामपंचायत मतदारसंघात २ जागा आहेत.त्यातील १ जागा अनुसूचित जाती,जमाती तर १ जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव होती.
कळमना बाजार समितीवर अनेक वर्षांपासून केदार यांचे वर्चस्व आहे.भ्रष्ट अधिकारी व दलालांना केदार पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी देखील केला होता.

‘सत्ताधीशन’ने भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता कॉल उचलला गेला नाही.

काँग्रेसने तिजोरी खुली केल्याने ‘परिवर्तन’घडले नाही:कृष्णा खोपडे
एक तर आम्ही पहील्यांदाज या निवडणूकीत उतरलो.फक्त ७-८ दिवसांपूर्वी निवडणूकीची तयारी केली त्यामुळे देखील अपेक्षीत वेळ मिळाला नाही.याशिवाय अपेक्षा होती आम्हाला जास्त मतदान होईल मात्र काँग्रेसने तिजोरी खुली केल्याने ‘परिवर्तन’घडले नाही आणि आम्ही टिकू शकलो नाही. मागच्या अनेक वर्षात या बाजार समितीत जे घडत आहे ते सर्वांनाच माहिती आहे.गेल्या ५ वर्षात तर सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग होताना मतदार बघत आहेत.सुरवात झाली आहे.हरलो तरी पुढे आम्ही आमची हार जीतमध्ये बदलणार आहोत,हे मात्र नक्की.कळमना बाजार समितीचा व्यवहार कसा चालतो हे शासनाच्या चौकशीतून सिद्ध झाले आणि न्यायालयाच्या पटलापर्यंतही पोहोचले.दिवाळीच्या सुट्यानंतर यावर निकाल देखील अपेक्षीत आहे.जे १८ उमेदवार जिंकून आले त्यांना मनापासून शुभेच्छा. आता जिंकून आलेल्या प्रतिनिधींनी बाजार समितीमधील भ्रष्टाचार निखंदून काढावा.

Latest बातम्या