

नितीन गडकरींची दिल्लीत घेतली भेट:चर्चेला आले उधाण
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २८ जुलै: काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी हे येत्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत पक्ष बदल करणार असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खेम्यात प्रवेशकर्ते होणार असल्याची चांगलीच चर्चा त्यांच्या प्रभागात चर्चिली जात आहे.यामागील कारण म्हणजे त्यांनी दोनेवळा दिल्लीत जाऊन नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्रीन घेतली नितीन गडकरी यांची घेतलेली भेट.
या भेटीमध्येच कमलेश चौधरी यांचे पक्ष् बदलाचे प्रयत्न दडले असल्याचे सांगितले जात आहे.महत्वाचे म्हणजे कमलेश चौधरी यांच्या भाजप प्रवेशावर गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या होकाराची प्रतिक्षा असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे कमलेश चौधरी यांना भाजप गोटात घेण्यासाठी आमदार परिणय फुके व भाजपचे शहर अध्यक्ष आमदार प्रविण दटके विशेष प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.

कमलेश चौधरी यांच्या काॅंग्रेस सोडण्याची अनेक कारणे सांगितली जात आहे.आमदार व काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी छत्तीसचा आकडा, सतीश चतुर्वेदी यांचा पक्ष् पातळीवर कमी झालेला करिष्मा तसेच काँग्रेसमध्ये आता कमलेश चौधरी यांचा आता दुसरा कुठलाच गाॅडफादर उरला नसल्याने त्यांनी पक्ष् बदलाचा निर्णय घेतला असल्याची चांगलीच चर्चा त्यांच्या प्रभागात रंगली आहे.

कमलेश चौधरी यांच्यावर मंत्री सुनिल केदार यांचा वरदहस्त आहे मात्र त्यांचे शहर काॅंग्रेसमध्ये जिल्हा परिषदेसारखे वजन नाही. त्यामुळे चहुबाजूंनी घेराबंदी झाल्याची स्थिती झाल्याने व पक्ष संघटनेत फारसे स्थान नसल्याने त्यांनी ऐन निवडणूकीच्या धामधूमीत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कद्दावर नेत्यांनी ज्याप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश घेऊन राज्याच्या राजकारणात भूकंप आणला होता तोच कित्ता नागपूर शहरात गिरवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे,असे बोलले जात आहे.
कमलेश चौधरी यांना शहर काॅंग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत कधीही सामावून घेतले नाही. कमलेश चौधरी हे महानगरपालिकेत तानाजी वनवे यांच्या गटाचे नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विकास ठाकरेंच्या नेतृत्वातील काॅंग्रेसमध्ये त्यांना महत्वही नाही आणि थाराही नाही परिणामी येत्या निवडणूकीत त्यांना आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पक्ष् बदलाशिवाय पर्याय नसल्याचे देखील सांगितले जात आहे.
त्यांची भाजपशी वाढली जवळीक बघता गेल्या १५ वर्षांच्या महापालिकेच्या राजकारणात ते देहाने काॅंग्रेसमध्ये होते मात्र त्यांचं मन आणि निष्ठा दोन्ही भाजप नेत्यांप्रती जास्त होत्या,अशी दबकी चर्चा त्यांचे राजकीय विरोधक करतात. कमलेश चौधरी यांच्या आई मीना चौधरी या भाजपच्या पाठिंब्याने झोन सभापती म्हणून निवडून आल्या. मीना चौधरी या अपक्ष नगरसेवक म्हणून भाजपच्याच सहयोगी सदस्य होत्या. गेल्या पाच वर्षात कमलेश चौधरी हे काॅंग्रेसचे नगरसेवक असले तरी त्यांचे सख्य भाजपशीच अधिक होते. काॅंग्रेसच्या अनेक नगरसेवकांची कामे अडवल्या गेली मात्र कमलेश चौधरी यांना भाजप सोबतच्या मधुर संबंधांमुळे कधीही त्रास झाला नाही.,हे त्यांचे भाजपसोबत सख्य असल्याचे उदाहरण म्हणून सांगितले जातं. विरोधी पक्षात असले तरी कमलेश चौधरी यांना सत्ता पक्षा कडून उलट सहकार्य आणि सत्तेचे संरक्षणही मिळालं,असा आरोप ही त्यांच्यावर केला जात आहे.
बंडखोरीचा इतिहास-
२००७ मध्ये मनपा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात त्यांनी उघड-उघड बंडखोरी केली होती. २०१२ च्या मनपा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मात्र त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. याच निवडणुकीत चौधरी यांच्या आई अपक्ष म्हणून दुस-या प्रभागातून निवडून आल्या होत्या. २०१७ च्या मनपा निवडणुकीत कमलेश चौधरी यांना काॅंग्रेस पक्षाने सिव्हील लाईन्स प्रभागातून उमेदवारी दिली तरी देखील त्यांनी आपल्या आईला सुरेंद्रगढ प्रभागातून काॅंग्रेस उमेदवारा विरोधात
अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात त्यांनी उघडउघड प्रचार केला असल्याची चर्चा ही चांगलीच रंगली होती. या निवडणूकीत त्यांनी गडकरींना मदत केली. एवढंच नव्हे तर गडकरींसाठी आपल्या लाॅनवर मोठा मेळावाही घेतला.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे शहराध्यक्ष् विकास ठाकरे यांच्या विरोधात काम केले व भाजप उमेदवार सुधाकर देशमुख यांना मदत केल्याची वावटळ ही उठली होती.
काॅंग्रेस पक्षाचे नगरसेवक असतांना देखील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरींना छुपी मदत केली. तेव्हापासून चौधरी हे काँग्रेस नेत्यांच्या गूड बूकमधून वगळल्या गेले. विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांच्याही हे लक्षात आले असल्याची माहिती आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी कमलेश चाैधरी यांनी मोठा खटाटोप केला. अनेकांना गळ घातली. दिल्ली वा-या ही केल्या मात्र कुठेही डाळ शिजली नाही. पक्षाने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. चौधरी यांनी ठाकरें विरोधात घरोघरी जाऊन प्रचार केला. या कामासाठी भाजप उमेदवार सुधाकर देशमुख यांच्याकडून त्यांना मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रभागातील कामगिरीही दुय्यम-
प्रभाग १४ चे नगरसेवक म्हणून कमलेश चौधरी फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. प्रभागात पाच वर्षांपुर्वी ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत. गिट्टीखदान, सदर या परिसरात त्यांनी दुर्लक्ष केले. या परिसरातील लोकांची कामे केली नाहीत. ज्या भागात मते मिळाली नाहीत त्या भागात तर त्यांनी पुर्णपणे कानाडोळा केला,असा आरोप त्यांच्यावर केला जातो, भरत नगर, सिव्हील लाइन्स या भागात तर ते फिरकले देखील नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच चौधरी यांनी आता पक्षासोबतच प्रभागातूनही एक्झिट घेण्याचा प्लान बनविला असल्याची चर्चा रंगली.
चौधरी यांचे राजकारण आत्मकेंद्री व संधीसाधून असल्या कारणाने गेल्या १५ वर्षात अनेक जीवाभावाची माणसं त्यांच्यापासून दुरावली असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे वडील दिलीप चौधरी यांची पुण्याई कमलेश यांना कायम ठेवता आली नाही. आर्थिक बाबतीत कमलेश चौधरी यांचा व्यवहार संदिग्ध असल्यामुळे अनेक मित्र व समर्थकांचे त्यांच्या सोबत खटके उडाले आहेत. पुर्वीसारखा करिष्मा व जनाधार नसल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्यामुळेच पक्षांतर व प्रभागांतर करुन पुन्हा काही साधता येतं का या प्रयत्नात ते असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपमध्ये चौधरींना विरोध –
कमलेश चौधरी हे भाजपमध्ये जाण्यासाठी एका पायावर तयार असले तरी महानगरपालिकेच्या उमेदवारीवरुन त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौधरी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चा कानी पडताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघडउघड विरोध सुरु केला असल्याची माहीती आहे.दुस-या पक्षातील माणसांना उमेदवारी मिळणार असेल तर आम्ही काम करणार नाही अशी भूमिका सुरेंद्रगढ येथील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली. भाजपच्या संघटन मंत्र्यांनी सुरेंद्रगढच्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षाने बाहेरचा आणि कुणीही उमेदवार दिला तरी सर्वांना काम करावे लागेल असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले तरी देखील कार्यकर्त्यांचा रोष मावळला नाही.
चौधरींना का हवा राजाश्रय ?
फुटाळा येथील अतिक्रमण, सरकारी जागांवरील झोपडपट्ट्या व इतर अवैध धंद्यांना राजाश्रय मिळवण्यासाठी त्यांनी भाजपशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. राजाश्रय मिळाला तर आपले साम्राज्य वाचविता येईल असा त्यांना विश्वास आहे.असे असले तरी संघटन व पक्ष विस्ताराच्या दृष्टीने कमलेश चौधरी यांचा भाजपला उपयोग ‘शून्य’ आहे. मात्र त्यांच्या प्रवेशामागे अनेक आर्थिक गणितं दडली असल्याचा संशय आहे. फुटाळा येथील मोक्याच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणावर तर कुणाचा डोळा नाही ना असा संशयही या निमित्ताने व्यक्त केला जातोय. शिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूरची जागा परत मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरु आहे. चौधरी हे आपल्या गोटात आले तर विजयाचा मार्ग सुकर होईल असे भाजपकडून तिकीटासाठी इच्छूक असलेल्या अनेकांना वाटतं. आमदार परिणय फुके हे यापैकीच एक, म्हणून त्यांनी चौधरी यांच्या प्रवेशासाठी जोर लावल्याची चर्चा आहे.

काही काँगेस नेते भीतीमुळे माझी प्रतिमा खराब करीत आहेत-कमलेश चौधरी(काँग्रेसचे नगरसेवक)
मला पक्ष् सोडून जायचं असतं तर १० वर्षांपूर्वींच गेलो असतो मात्र मी अपक्ष् म्हणून लढलो पण भाजपमध्ये गेलो नाही.माझ्याच पक्ष्ातील काही नेत्यांच्या मनात माझ्याविषयी भीती आहे आणि त्यामुळेच ते माझी प्रतिमा जनसामान्यात खराब करण्याचे प्रयत्न करत आहेत.
राहीली गोष्ट दिल्लीत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत घेतलेल्या भेटीची तर ते आपल्या शहराचे खासदार आहे आणि त्यांच्याकडे शहराशी संबधित समस्या किवा प्रश्ने घेऊन कोणीही भेटू शकतो.शहरातील एका व्यक्तीची गेल्या ८ वर्षांपासून खनिकर्मची ऑर्डर थांबवून ठेवण्यात आली होती,त्या कामासाठी मी गडकरी यांना भेटलो.
मी माझ्याच पक्षात चालत नाही भाजपचं तर सोडूनच द्या.भाजप विरोधी पक्ष् आहे.माझ्याच पक्षात अनेकांची भूमिका ही माझ्या विरोधातली आहे.जे निवडणूकीत माझ्याकडून हरले तेच राजकीय सूड भावनेतून माझ्या भाजप प्रवेशाबाबतची वावटळ उठवत आहेत मात्र यात काहीही तथ्य नाही. येत्या ६ महिन्यात मनपाच्या निवडणूका होणार आहेत, माझ्या प्रभागातून मी प्रबळ दावेदार असल्यामुळे गटबाजीतून मला लक्ष् केले जात आहे.
महत्वाचे म्हणजे कोणी काहीही तर्क वितर्क करतात तेव्हा त्यांना मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मला भाजपमध्ये जायचेच असते तर १५ वर्षांपूर्वीच गेलो असतो,त्यावेळी काँग्रेस सत्तेत होती.तेव्हा मी भाजपमध्ये गेलो नाही तर आज भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही.आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी ही हवा निर्माण केली जात आहे.
स्थानिक राजकारणच असं असतं की आपल्याच पक्षात मी काही लोकांना चालत नसावा.भाजपचं तर सोडूनच द्या.भाजपने तर माझ्या विरोधात उमेदवार उभे केले होते.निवडणूकीत भाजपची भूमिका तर माझ्या विरोधातच होती. मी काही र्निविरोध निवडून आलो नाही.माझी प्रतिमा मलीन करुन माझ्या पक्षातील काही राजकीय विरोधकांना फायदा उचलायचा आहे.हा भाजपचा विषयच नाही,हा काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचा ज्यांना येथून तिकीट हवे आणि जे माझ्याकडून हरले आहेत त्यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठीच ही हवा निर्माण केली.

काँग्रेस विचारधारेचा माणूस भाजपमध्ये जाणार नाही-आमदार विकास ठाकरे
कमलेश चौधरी यांचे वडील दिलीप चौधरी हे कट्टर काँग्रेसी होते.ते अपक्ष् लढले पण कधीही भारतीय जनता पक्षात गेले नाहीत.कमलेश चौधरी यांची कार्यप्रणाली आपल्या वडीलांसारखी आहे.ते ही अपक्ष् लढलेत मात्र भाजपमध्ये गेले नाहीत.काँग्रेसमध्ये आपापसात वैचारिक मतभेद असू शकतात मात्र काँग्रेस विचारधारेचा माणूस कधीही भाजपमध्ये जाऊ शकत नाही.

चांगल्या लोकांचे पक्षात स्वागतच आहे-अविनाश ठाकरे(मनपा सत्ता पक्ष् नेते)
चांगले लोकं पक्षामध्ये येत असेल तर पक्षाला त्यांना सहभागी करण्यास नक्कीच आवडेल यात कुठलीच शंका नाही मात्र अजून तरी अशी कोणतीही अधिकृत चर्चा किवा माहिती पक्षाच्या फोरमवर झाली नाही.बाहेर चर्चा काय आहे त्याबद्दल माहिती नाही मात्र चांगले लोकं पक्ष्ात येणार असतील तर स्वागतच आहे.दुसरी बाब कमलेश चौधरी यांना आपल्या अनाधिकृत कामांसाठी भाजपकडून संरक्ष् ण हवं आहे त्यासाठी ते पक्षात येत असल्याची बाब ही चुकीची आहे.अश्या प्रकारचं संरक्ष् ण कधीही मिळत नसतं,नियमात जे असतं तेच होत असतं,पक्ष् बदलल्याने अनाधिकृत कामांना सरंक्ष् ण मिळत नाही.नियमात जे आहे ते नियमानुसार होईलच.

आमचे चॅनल subscribe करा